घराचा उंबरा आणि ओसरीची पायरी
घराचा उंबरा आणि ओसरीची पायरी (Sketch Credit- Amol Bhosale, DSLR😊) स्वतःच्या बालपणीचं काही आठवत नाही, पण ते माझ्या लहान भावंडांपेक्षा फारसं वेगळं नसावं. माझा लहान भाऊ रांगत उंबऱ्याकडे जायला लागला की कोण ना कोण त्याला उचलून आत सोडायचं. पण उचलून ठेवणारा दमून गेला तरी याची उंबऱ्याकडची मोहीम अविरत चालू राहायची. मलाही एवढं आकर्षण असेल का त्या उंबऱ्याचं? आणि असेल तर ते का? उंबऱ्या बाहेरून आत डोकावणाऱ्या नाविन्यामुळे की चार भिंतीबाहेरच्या अनिर्बंध स्वातंत्र्यामुळे की अंतरीच्या अगाध अज्ञानामुळे? याची उत्तरं तेंव्हाही मला माहिती नव्हती आणि आजही नाहीत. पण उंबऱ्या बरोबरचं माझं नातं मात्र दर प्रत्येक भेटीत एका वेगळ्या रंगाने खुलत गेलं. बहिणीचा मुलगा पण उंबऱ्याकडे जायला लागला की असंच त्याला उचलून आत नेलं जायचं. पण एकेदिवशी सगळ्यांची नजर चुकवून जेंव्हा तो उंबरा ओलांडून पायरीवर जाऊन बसला तें...