Posts

पंख पावसाळी

Image
                               पंख पावसाळी असं म्हणतात की सुख क्षणिक असते आणि दुःख अनंतकाळाचे असते. असेलही तसेच. पण आजूबाजूला असणारे हे आनंदाचे क्षण जरी वेचायला शिकलो तरी आनंतकाळच्या दुःखाचा विसर पडतो. हे क्षण इतके वेचावे की की त्यांची क्षणिकता जाऊन एक शृंखला तयार व्हावी. तशाच काही क्षणांना शब्दबद्ध करण्याचा हा प्रयत्न. पंख पावसाळी रात्रीच्या प्रहरी निखळता तारा क्षणाची सोबत आसमंती शहारा निळ्या-तप्त नभी शुभ्र एक मेघ हाय रे! दिलासा सावलीची रेघ उभ्या पावसात कोसळती वीज डोळे पाणीदार कातर-काळीज अंतर क्षणाचे कळी होते फुल क्षण असा यावा नी पडावी भूल जातील गळुनी पंख पावसाळी शेवटाचे जरी उड्डाण आभाळी          - अमोल मांडवे

आपल्याच मारेकऱ्यांच्या आसऱ्याला

सवयीच्या, comfort zone च्या, सोयीच्या, असंघर्षाच्या आपण एवढे आहारी जातो त्यातून होणारे नुकसान समोर दिसत असतानाही आपण त्यातून बाहेर पडण्यासाठी आजिबात हातपाय मारत नाही. मला ते "आपल्याच मरेकरऱ्यांच्या आसऱ्याला" जाण्यासारखं वाटतं. आपल्याच  मारेकऱ्यांच्या आसऱ्याला निधड्या माना नि उघड्या छात्या म्यान केलेल्या तलवारी घेऊन आपल्याच बुरुजात सुरुंग लावून चाललो आपल्याच मारेकऱ्यांच्या आसऱ्याला त्यांनीच सांडलेल्या आमच्या रक्ताने त्यांच्याच पायांवर अभिषेक घालून त्यांच्या टापांनी ठेचलेली प्राक्तने घेऊन चाललो आपल्याच मारेकऱ्यांच्या आसऱ्याला स्वत्वाचे मुडदे महत्वाकांक्षांच्या थारोळ्यात अन गतप्राण स्वप्ने कर्तव्याच्या चितेवर सोडून गलितगात्र जगण्याची भीक मागायला चाललो आपल्याच मारेकऱ्यांच्या आसऱ्याला                                 -अमोल मांडवे

स्पर्धापरीक्षा आणि अनियमितता: PERSPECTIVE

Image
                              स्पर्धापरीक्षा आणि अनियमितता: PERSPECTIVE कोरोना मुळे सर्वच गोष्टी मध्ये तात्कालिक, तात्पुरते ही असतील परंतु अमूलाग्र बदल झाले. कधीही कल्पना न केलेल्या गोष्टी आपण सर्वांनी पाहिल्या, अनुभवल्या, त्यांना सामोरे गेलो. जन्म ही न झालेल्या बालकांपासून ते मृत्यूशय्येवरील वृद्धांपर्यंत सर्वांचे जीवन अपार ढवळून निघाले. परंतु ऐन उमेदीच्या वयातील तरुण तरुणींसाठी हा काळ मोठेच आव्हान घेऊन आला. त्या आव्हाणांच्या एका पैलूंवर थोडंसं लिहावं वाटलं.          महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग आणि त्याकडून आयोजित परीक्षांना अनियमिततेचा एक साग्रसंगीत इतिहास आहे. एकच परीक्षा प्रक्रिया पूर्ण व्हायला पाच पाच वर्षेही लागलेली लोकांनी अनुभवली आहेत. मधल्या काळात काहीशा नियमित झालेल्या परिक्षांनातर जे स्पर्धा परीक्षा क्षेत्रात आले त्यांना ती अनियमितता पचवणे अवघड आहे. आणि आताची पिढी अशी अनाहूत, गबाळी, अगदी ओंगळवणी अनियमितता सहन करणार ही नाही. नुकतेच कुठे ही नियमितता अंग धरू लागली होती की आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वच वेळापत्रक कोलमडले. अजून तो गुंता नक्की कसा आहे ते कळायचं होतं, त्या अगोदर च

शेवटचा एक आठवडा#MPSC_Prelim

Image
                        शेवटचा 1 आठवडा # MPSC राज्यसेवा पूर्वपरिक्षे पूर्वीचा कोणत्याही पूर्व परिक्षेवेळी शेवटचा 1 आठवडा हा अत्यंत महत्वाचा असतो. या अगोदर केलेले सर्व श्रम फलित होणार की नाही हे बऱ्याचदा हा एक आठवडा ठरवतो. शेवटच्या 4 तासात उत्तम perform करून जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी या 1 आठवड्यात पुढील गोष्टी केल्या तर निश्चित फायदा होऊ शकेल- 1) विश्वास ठेवा की जेवढा गरजेचा होता तेवढा तुमचा अभ्यास ऑलरेडी झालेला आहे. चुकून काही राहीले असेल तर त्याने एकूण परीक्षा किंवा निकालावर फारसा परिणाम होणार नाही. त्यामुळे तुम्ही पास होण्याकरिता लागणारा सर्व अभ्यास केला आहे हे स्वतःच्या मनाला पटवून द्या. 2) परीक्षेत आपण पास होऊ की नाही हा विचार मनातून पूर्णतः काढून टाका. अभ्यास करणे तुमच्या हातात आहे ते करत राहा. तुम्ही आवश्यक तो अभ्यास केलेला आहे आणि आता फक्त फॉर्मलिटी म्हणून जाऊन परीक्षा द्यायची आहे अशा mindset ने परीक्षेला जा.  3) शेवटचे 2 आठवडे म्हणजे शेवटची 1 revision. अगोदर वाचलेल्या सर्व गोष्टींची एक revision या वेळेत पूर्ण करा. सर्व विषयांना पोहोचायचा प्रयत्न करा. यामध्ये पुनः पूर्ण वाच

Quarantine

Image
Quarantine (Sketch Credit : Amol Bhosale) आमचेच आत्मे पिना टोचून आम्हीच टाकले कोनाड्यात! आमच्याच मनांना डबीत भरून आम्हीच टाकले अडगळीत! आमच्याच इंद्रियांना लाडाऊन ठेऊन आम्हीच बनवले विषयासक्त! स्वातंत्र्याच्या पतंगाचे आम्हीच कापून दोर अंगभर मढवला स्वैराचार! शरीरावरील एवढ्याशा निर्बंधाने कोसळते केवढे आभाळ आमच्यावरच! आत्म्यावर एकांतात अंतिम संस्कार करून 'उर' बडवायला मात्र गावासमोर! कधीच मेलेल्या स्वतःच्या मरणाच्या भीतीने कोंडून घ्यावे लागते आम्हास स्वतःलाच!        - अमोल मांडवे

पथदर्शक

Image
When we are demotivated due to ignorant society and uncalled criticism, this could be the way out!  पथदर्शक लोक तुझा कुत्सित उपहास करतील तू मात्र हेतुपुरस्सर चालत राहा लोक तुझ्याकडे दुर्लक्ष करतील तू छान जागा पाहून खड्डा काढ लोक तुझा सहेतुक परित्याग करतील तू त्या खड्ड्यात माती अन खत टाक लोक तुला तुच्छ म्हणून हिणवतील तू एक इवलीशी बी आणून त्यात रोव लोक तुझा सामूहिक तिरस्कार करतील तू हळुवार पाणी घालून निर्माता हो 'लोक' अंतर्मुख होऊन खंगु लागतील तुझं रोपटं बहरून वटवृक्ष होईल         - अमोल मांडवे

संभ्रम

Image
संभ्रम दिवस आणि रात्रीमधील अंधुक संधीप्रकाशाचा ना हवा ना धड पाणी मधेच तरंगत्या धुक्याचा स्वप्नांच्या मागे धावणाऱ्या साखर झोपेचा वाट बघत घातलेल्या आणखी एका खेपेचा दिवसा उजेडात लावलेल्या देवघरातील समईचा हमखास अडचणीत आणूनही न सुटणाऱ्या सवयीचा गरजेच्या गणितात न बसणाऱ्या एखाद्या सुप्त आवडीचा विना-उत्तराचे प्रश्न चघळणाऱ्या गावातील चावडीचा दरवेळी विसराव्या वाटणाऱ्या एखाद्या आठवणीचा पिल्लांना पंख फुटल्यावर घरट्यातील पक्षिणीचा समुद्रात शिडाविना फिरणाऱ्या किनारा-आसक्त नावेचा अवचित सहज बहरलेल्या नात्याच्या नावाचा        -अमोल मांडवे

आठवणींचे पक्षी

Image
आठवणींचे पक्षी विहिरीच्या कपारीतून अचानक उडणाऱ्या पारव्यासारखे मनाच्या कुठच्यातरी कोपऱ्यातून फडफड करत बाहेर पडतात संध्याकाळच्या वेळी आभाळात स्वच्छंद घिरट्या घालणाऱ्या थव्यासारखे कोणाच्यातरी भोवती अविरत अकारण फिरत राहतात आंब्याच्या उंच फांदीवरच्या अर्धवट खाल्लेल्या आंब्यासारखी कुठलीशी जुनी आठवण अर्धीनिर्धी कुरतडून जातात जडवेल्या पायांच्या मोरासारखे जमिनीवरच चालत राहतात पावसाळी ढगांच्या चाहुलीसरशी पिसारा फुलवून नाचू पाहतात काही पोपटासारखे हिरवेकंच असतात काही घारीसारखे अगदी उंच उंच असतात कधी कोकिळेच्या गळ्यातून प्रियाराधन सुचवतात कधी टिटवीच्या शिळेतून कोणी दुःख रिचवतात एका एका काडीने सुबक घरटं बनवतात मग अचानक एकेदिवशी निरोपाविना उडून जातात           -अमोल मांडवे

नाळ

Image
                                 नाळ ( Sketch credit: Amol Bhosale, someone I look up to.)           मला खरं तर आज सकाळ पासूनच काहीतरी वेगळं वाटायला लागलं होतं. आणि बाहेर बरीच गडबड पण चालू आहे हे पण कळत होतं. पण नक्की काय चालू आहे हे मात्र काहीच कळत नव्हतं. थोड्या वेळानंतर आपण आपल्या घरात नाही हे आलं माझ्या लक्षात. एव्हाना आपल्या घराशीपण नाळ जुळली होती माझी. आणि तू आणि आजी सोडली तर बाकीची माणसं पण सगळी नवीन आहेत. नक्की काय भानगड आहे. आज काही विशेष आहे का? गेल्या तीन महिन्यात बाबा भेटायला यायचे तेंव्हा असंच विशेष वाटायचं. तुला वाटायचं म्हणून मला पण वाटायचं. आज पण आलेत का बाबा? पण आज तसं काही वाटत नाही. वेगळंच आहे काही. मागे एकदा मला थोडं बरं नव्हतं वाटत तेंव्हा पण असंच काहीसं झालेलं. गम्मत बघ ना, तेंव्हा बरं मला वाटत नव्हतं आणि तुम्हा सगळ्यांना वाटत होतं की तुला बरं नाहीये. पण तेंव्हा पण एवढा गोंधळ नव्हता. आज नवीनच आहे बाबा काहीतरी.             अरे, आई तू ढकलतेय का मला? आता मी काय केलंय? आणि काही केलं असेल तर नेहमीसारखं ओरड ना, ढकलतेय का? अगं त्रास होतोय मला आणि तुला पण. काय

बडबड(बायकोची)

Image
बडबड(बायकोची) (Sketch credit- Deepti Patwardhan, a friend with amazing skills with pencil and colours) किती बोलतेस अगदी कशावरूनही कधीही आणि कुठेही बऱ्याचदा उगाचच पुष्कळदा नकळत काहीवेळा असंबद्धही घडाघडा बोलतेस भडाभडा बोलतेस तडातडा बोलतेस लोकांशी बोलतेसच वस्तूंशीही बोलतेस वेड्यासारखी स्वतःशीही आईसारखं बोलतेस मुलीसारखं बोलतेस बायकोसारखं तर बापरे आनंदांत बडबड दुःखात रडारड सगळं कसं शब्दांत उत्साहात तार स्वर काळजीत कातर भावनांचा पूर ओठांत शब्दांचीच मिठी शब्दांचीच आदळआपट प्रणय तेवढा मुका तुझ्या शब्दांच्या उन्हात माझं जगणं बहरून येतं तुझ्या एवढ्याश्या अबोल्यात सारं जग अंधारून जातं        - अमोल मांडवे

संध्याकाळच्या गोष्टी : निरोपसंध्या

Image
संध्याकाळच्या गोष्टी : निरोपसंध्या (Photo Credit: Sachin Kadam😎, SDPO Akola City)       तुला मधेच अचानक जाग आली. माझ्या श्वासांचे सुस्कारे होत असलेले ऐकू आले असतील कदाचित. तू डोळे उघडून पाहिलेस तर मी तिथेच थोडा वर सरकून बसलेलो. घरभर नजर फिरवीत. तू काय ओळखायचं ते ओळखून गेलीस. हे काय नवीन किंवा पहिल्यांदा नव्हतं.          तू तशीच माझ्या आणखी जवळ सरकून माझ्या नजरेच्या पाऊलवाटांवरून तुझे डोळे फिरवू लागलीस. मोकळ्या भिंती आणि भरलेल्या बॅगा. उद्या सकाळी निघणार होतो आपण. दर दोन-तीन वर्षानंतर निघावंच लागतं. काही वेळा निघायची इच्छा नसते तर काही वेळा कधी एकदा निघतोय असं झालेलं असतं. पण आधली रात्र मात्र नेहमी सारखीच असते. आजसारखी.          तुझं बरं असतं. तू मनाने एव्हाना आपण जाणार त्याठिकाणी पोचलेली असतेस. तिथे घर कसं असेल, कुठे काय ठेवायचं, इथे जे करता नाही आलं ते तिथं कसं करायचं, तिथल्या शेजाऱ्यांशी कसं वागायचं, तिथे बाग नसली तर कशी तयार करायची या अशा आणि आणखी कितीतरी विचारांत रमून गेल्याने तू मनातून तिथली झालेली असतेस. मग हे घर सोडताना तुला फारसं काही वाटत नसावं. की तू तसं फक्त

उन्हाळ्याच्या संध्याकाळचा रानातला पाऊस

Image
      उन्हाळ्याच्या संध्याकाळचा रानातला पाऊस         उन्हाळ्याच्या सुट्टीत सगळ्यांनी रानात जायचंच असा शिरस्ता असणारा तो काळ होता. दिवसभर खूप काम केलं आणि घरच्यांचा मूड चांगला असला तर कधीकधी ४ चा पिक्चर बघायला घरी जायला मिळायचं. नाहीतर संध्याकाळ पण रानातच जायची. तशी रानातली संध्याकाळ मजेशीर असायची. गुरांच्या गोठ्याची सावली बॅट-बॉल खेळण्याऐवढी पुढे पडली की संध्याकाळ सुरू झाली असं म्हणायचो आम्ही. 'ऊन खाली झाल्यावर खेळा' अशा घरच्यांच्या आदेशामुळे नाखुषीने थांबवलेले खेळ पुन्हा सुरू व्हायचे. बॅटबॉल, विटीदांडू, इटकार नाहीतर मग गट्टया. कधीकधी ढेकळाच्या वावरात जाऊन एकमेकांना ढेकळे हाणत भारत पाकिस्तान युद्ध पण खेळलं जायचं.           खेळण्या बरोबर संध्याकाळची ठरलेली कामं पण असायची. पाटावर, ज्यात अख्या हयातीत कधी पाणी आलं नाही, तिथे बांधलेल्या म्हशी वर गोठ्यात आणून बांधायच्या, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेण काढणं, जे मला कधीच नीट जमलं नाही. पण काम कमी आणि पोरं जास्त असल्यामुळं काम कधी संपलं कळायचं पण नाही. उन्हाळ्याचे जवळपास सर्व दिवस थोडेफार असेच असायचे. पण एखाद्या दुपारी

दुर्योधन(मूर्तिमंत वाईटपणा)

Image
चांगल्या-वाईटाच्या आपल्या कल्पना इतक्या दृढ असतात की आपण त्याची लेबल घेऊनच फिरत असतो. कोणाला ती चिटकवता येतील हाच शोध सतत सुरू असतो. एकदा लेबल लागलं की त्या माणसाला त्यातून बाहेर पडायचे सर्व दरवाजे आपण बंद करून टाकतो. फक्त आपल्या कोणालातरी वाईट म्हणायच्या अट्टाहासासाठी. त्या वाईटात चांगलं शोधायचा प्रयत्न. दुर्योधन(मूर्तिमंत वाईटपणा) असेलही दगडच तरी त्याचा पाझर कोरडा असतो का? पायात मोडून तुटणाऱ्या काट्याचा काही जीव नसतो का? गाढव म्हणून हिणवलं तरी जगाचं ओझं वाहतंच की कुत्रं भटकं असलं तरी दगड लागला की दुखतंच की चपलाच घेणारा माथ्यावर सदोदित कधी मंदिराच्या पायरीचा दगड असतो स्वच्छ घराची लाज सांभाळत पाठीमागे एक बेअब्रू झालेला उकिरडा दिसतो न बरसणाऱ्या ढगालाही कोरडा का असेना उमाळा असतो वांझ नारळाच्या मनातही एक हिरवा-ओला शहाळा वसतो वाईटाच्या शिक्क्याखाली चांगुलपणाचा कोंडमारा होतो जीव घेणाराचाही जीव मरणारा जाताना घेऊन जातो                          - अमोल मांडवे

संध्याकाळच्या गोष्टी-(२)- चहा

Image
संध्याकाळच्या गोष्टी-(२)- चहा          (Sketch credit: Amol Bhosale) ऑफिस मध्ये फारसं काम नव्हतंच आज.  पण ढग दाटून आलेले असले की एक हलकासा अंधार पडतो ऑफिस मध्ये. त्या अंधारात आधीच वाचलेलं आणि आवडलेलं एखादं पुस्तक वाचायला मला खूप आवडतं म्हणून मी खालेद होसेनीच्या "a Thousand Splendid Suns" मधील एकाच नवऱ्याच्या दोन बायकांमध्ये त्याच्या जाचाला कंटाळून निर्माण झालेलं हळवं नात कसं उलगडत जातंय हे वाचत बसलो होतो. पण थोड्याच वेळात अंधार आणखी गडद होत गेला आणि अचानक एक क्षणात पाठीमागच्या खिडकीसह सगळा परिसर उजळून गेला आणि पाठोपाठ वीज कडाडल्याचा आवाज आला. तावदानांवर थेंबांचा विरळ आवाज होऊ लागला आणि मी तडक घरचा रस्ता धरला. ऑफिस पासून जेमतेम 30 मीटर.           मी लवकर आलो. पण तिचा ऑफिसचा टाइम संपल्याशिवाय तिला निघता येत नाहीच. तोपर्यंत मी कुठल्या खिडक्या दरवाजे उघडे राहून पाणी आत येणार नाही हे पाहून घेतलं. आणि मग वऱ्हांड्यात दोन खुर्च्या टाकून कवितांची जुनी वही काढून बसलो. मावळत्या सूर्याला काही आज आपले रंग उधळता नाही आले. काही काळ्याकुट्ट ढगांनी काळवंडून टाकले तर काही उभ्या ध

आई

Image
आई तुझ्या समोर डोळे आटतात उसने अवसान घेऊन तुझ्या कुशीत बांध फुटतात अगदी धुमसून धुमसून काहीच न बोलता  तुला सगळं कळतं स्वतःसही न उमगलेलं तुला मात्र नेमकं वळतं परमार्थापेक्षा मोठा तुझा स्वार्थ कसा ठरतो तुझंही वेगळं अस्तित्व तुझा जीव कसा विसरतो तुझ्या दुःखाचं खत करून आमची सुखं रुजतात तुझ्या इच्छांच्या लक्तरांनी आमची स्वप्नं सजतात तुझ्या बेड्यांना आमचे पंख आणि  तुझ्या भिंतींना आमचं आभाळ केलंस जे तुझंं ते तर तू अर्घ्यासारखं दिलंस तुझं नसेल तेही विश्व अंगणी उभारलंस आमच्या राईच्या प्रेमाचा आम्ही पर्वत करतो तुझ्या मायेचा सागर पाझर बनून उरतो शरीराचं दुखणं  तुला कळायचंच तुझ्याच शरीराचा मी छोटा अंश ना पण मनीच्या वेदनाही पोचतातच तुझ्यापर्यंत मनांचीही कसली  नाळ असते का गं        -अमोल मांडवे(ACP/DYSP)

जंगलाचं रात-गाणं

Image
जंगलाचं रात-गाणं (In Photo: Harshwardhan Jadhav) हुंकारून कोणी शृंगार वाटतं गहिवरून कोणी दुःख मागतं आरवून कोणी रान जागवतं बावरून कोणी तार केकाटतं चुकार पक्षी मधेच चिर्र करतो रातकीडा एकसारखा किर्रर्र करतो बुंध्यावर टक टक ढाल करतो शेंड्यावर चक चक ताल धरतो डरकाळीचं आव्हान गुरगुरणारी माघार भेदरलेली आरोळी चवताळलेला फुत्कार पानांची सळसळ जणू बालपण खेळतं फांद्यांमधली घरघर जसं यौवन बोलतं ऐकता अंतरंग वनीचे नीरव स्तब्धता कानी येते कवेत घेऊनी अरण्य समाधानाची ऊब देते          - अमोल मांडवे(ACP/DYSP)

वस्त्रहरण

प्रस्थापित गोष्टींचा जरा बारकाईने विचार केला की अनेक गोष्टी खटकू लागतात. संपूर्ण समाजच दांभिक असल्याचे दाखले मिळू लागतात. आणि मग रामायण-महाभारतात रचल्या गेलेल्या या गोष्टींची खरच समाज-घडणीसाठी आवश्यकता होती का असा प्रश्न पडतो. आणि मग त्याच गोष्टी एका वेगळ्या angle ने पहायची गरज वाटते. वस्त्रहरण अपमानापोटी जन्मलेली एका स्त्रीसाठीची 'आसक्ती' सामर्थ्याचा महामेरू असूनही तिच्या इच्छेची वाट पाहणारी या वृत्तीस आम्ही दहा तोंडे लावून दर वर्षी जाळतो, टाळ्या पिटत नाचतो ही भावास 'वर'लेल्या स्त्रीची भावांनाच आसक्ती व्हावी 'आदर्श' म्हणवणाऱ्या आईनेही ती पाचांत वाटून द्यावी 'त्यागाचे' यांच्या गोडवे  हजार सहस्त्र ओव्या भजनी किर्तनी महती कारण 'हरी' पाठीराखा बायकोची वस्त्रे पणाला लावून शमीवरची शस्त्रे जनाला दाखवून सहानुभूतीच्या रथात युगानुयुगे आरूढ होऊन लोकांच्या डोळ्यात धूळ उडवत कृष्ण 'सारथ्य' सुरूच आहे त्या धुळीला गुलाल समजून आम्ही माथी लावून फिरतो प्रस्थापितांनी केलेला अन्याय स

दुःख नियोग

Image
दुःख नियोग आपल्याच हातांनी  धारदार तलवार आपल्याच छातीत वीतभर भोकसावी हृदयातली पीडा रक्ताच्या धारेसह  बाहेर पडते का स्वतःच पहावं जखमेच्या पोकळीत, तलवारीच्या पात्यावर, ओघळत्या रक्तात, कोणी-काही आहे का पहावं कंठातून ओठामार्गे, डोळ्यातून अश्रूमार्गे, मज्जेतून वेदनेमार्गे, कोणी-काही जातंय का पहावं आठलेल्या रक्तात, मिटलेल्या पापण्यात, गोठलेल्या जाणिवांत, कोणी-काही उरलंय का पहावं सगळ्याची होळी करून राखेचं अर्घ्य देऊन सरिता सिंधुस मिळताच दुःख नियोग         -अमोल मांडवे(ACP/DYSP)

सीतायण

Image
सीतायण रामावर चिडणारा मी आता सीतेचा राग येतो चारित्र्याने का कुठे समाज कलंकित होतो जंगलातच राहायचं होतं तर अग्निपरीक्षा नाकारायची होती कोणीतरी बोट दाखवण्याआधी स्वतः वाट शोधायची होती मर्यादांनी बांधलेल्याकडून कशाला आधाराची अपेक्षा प्रेमापोटीच का होईना करून का घ्यावी उपेक्षा तो नायक झाला रामायण घडलं अघटिताचं पातक तुझ्या माथी पडलं पुरुषी अरेराविचा गळा तेंव्हाच घोटता आला असता तुझं नाव काढलं की कारुण्याचा वर्षाव झाला नसता तू धैर्य दाखवलंस थोडी तिडीक दाखवायचीस तू औदार्य दाखवलंस थोडी स्वार्थी बनली असतीस तुझ्या एका त्यागाने पुरुषार्थ झाकोळला स्त्रीत्वाचा मतितार्थ कालातीत डागाळला       -अमोल मांडवे(ACP/DYSP)

वर्णनात्मक पेपर मधील निबंधाची तयारी कशी करावी?

Image
वर्णनात्मक पेपर चा अभ्यास कसा करावा: वर्णनात्मक पेपर अभ्यास करायला अतिशय सोप्पा पण थोडासा tricky आहे. मराठी आणि इंग्रजी दोन्ही पेपर मध्ये निबंध, भाषांतर आणि सरांशलेखन एवढे तीनच प्रश्न असल्याने खुप अभ्यास करावा नाही लागत, परंतु यातील कोणत्याही प्रकारात एखादी लक्षात येण्यासारखी चूक झाली तर मार्क्स एकदम खूप कमी होतात. म्हणून तिन्ही बाबींचा व्यवस्थित नियोजनबद्ध अभ्यास व सराव लागतो. निबंध/ Essay:          मराठी व इंग्रजी दोन्ही पेपर मध्ये 25 मार्क्स साठी एक एक निबंध विचारला जातो. भाषा वेगळ्या असल्या तरी दोन्ही निबंधांमध्ये अपेक्षित असणाऱ्या बाबी सारख्याच असतात. त्यामुळे दोन्हीच्या अभ्यासाची पद्धत सारखीच आहे.            निबंध हा भाषेच्या पेपर मध्ये आहे, तो GS चा भाग नाही हे लक्षात घ्यावे. त्यामुळे त्यात माहितीचा भडीमार नको. तसेच GS चे उत्तर लिहितोय असंही वाटता कामा नये. स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासात आपणाला प्रत्येक गोष्टीबद्दल खुप काही माहिती असते. त्यामुळे एखादा विषय समोर येताच त्याबद्दल आपल्याला माहिती असलेले सगळे कसे लिहिता येईल याकडे आपला भर असतो. त्यामुळे निबंध हा रुक्ष

विदर्भ-संध्या

Image
विदर्भ-संध्या पालाशाच्या माथ्यावर लक्ष सूर्य मावळले पालाशाचे रंग केसरी ओठी तुझ्या अवतरले पश्चिमेला क्षितिजावर घन काळे-दाट उतरले डोंगराच्या खांद्यावर आभाळ ते गहिवरले विद्युल्लतेच्या कटाक्षाने क्षण काही उजळले घराघरातून पाड्यावर समया-दिवे पाजळले पानझडीची करडी चादर तृणांचे गालिचे पसरले शेंड्यांवरची चुकार पाने परी तयांनी नभ झाकोळले बांबूच्या बनी सळसळ वाऱ्याने सूर आळविले फांदीवर भेदरले घरटे पंख पिलांनी पांघरले दिवस रात्रीच्या प्रणयात अरण्य सारेच हरविले संध्येच्या रम्य मिठीत भावही मनीचे शहारले                          -अमोल मांडवे(ACP/DYSP)