संध्याकाळच्या गोष्टी : निरोपसंध्या

संध्याकाळच्या गोष्टी : निरोपसंध्या

(Photo Credit: Sachin Kadam😎, SDPO Akola City)

      तुला मधेच अचानक जाग आली. माझ्या श्वासांचे सुस्कारे होत असलेले ऐकू आले असतील कदाचित. तू डोळे उघडून पाहिलेस तर मी तिथेच थोडा वर सरकून बसलेलो. घरभर नजर फिरवीत. तू काय ओळखायचं ते ओळखून गेलीस. हे काय नवीन किंवा पहिल्यांदा नव्हतं. 
        तू तशीच माझ्या आणखी जवळ सरकून माझ्या नजरेच्या पाऊलवाटांवरून तुझे डोळे फिरवू लागलीस. मोकळ्या भिंती आणि भरलेल्या बॅगा. उद्या सकाळी निघणार होतो आपण. दर दोन-तीन वर्षानंतर निघावंच लागतं. काही वेळा निघायची इच्छा नसते तर काही वेळा कधी एकदा निघतोय असं झालेलं असतं. पण आधली रात्र मात्र नेहमी सारखीच असते. आजसारखी.
         तुझं बरं असतं. तू मनाने एव्हाना आपण जाणार त्याठिकाणी पोचलेली असतेस. तिथे घर कसं असेल, कुठे काय ठेवायचं, इथे जे करता नाही आलं ते तिथं कसं करायचं, तिथल्या शेजाऱ्यांशी कसं वागायचं, तिथे बाग नसली तर कशी तयार करायची या अशा आणि आणखी कितीतरी विचारांत रमून गेल्याने तू मनातून तिथली झालेली असतेस. मग हे घर सोडताना तुला फारसं काही वाटत नसावं. की तू तसं फक्त दाखवतेस? फक्त दाखवतंच असावीस. माझी अशी अवस्था बघून, तू पण असंच केलंस तर माझी दुर्दशा होईल असं वाटून तू सोंग आणत असणार. नाहीतर त्या घरात तूच जास्त वावरलेलं असतंस, बहुतेकदा मी नसताना तूच सावरलेलं असतंस. मग ते सोडताना तुला कसं एवढं तटस्थ राहता येईल? खरं सांग, घरातून बाहेर पडल्यावर काही राहिलंय का बघायला नेहमीच इतका वेळ कसा लागतो गं? की आम्हा सगळ्यांना बाहेर काढून एकटीने सगळ्या भिंतींवरून आणि दारांवरून हात फिरवून मनमोकळं रडून घ्यायला तेवढा वेळ लागतोच? आणि हे सगळं करून बाहेर येताना मात्र ते गोड हसू कुठून आणतेस चेहऱ्यावर? तू अशीच होतीस पहिल्यापासून की माझ्यासाठी अशी झालीस?
          मी मात्र ती रात्र अख्खी जागून काढतो. म्हणजे झोपायचं नाटक करतो पण तुझी झोप लागली की उठून बसतो. बॅगेत भरलेल्या सगळ्या गोष्टी त्यांच्या त्यांच्या जागेवर आठवू पाहतो. बेडजवळच्या खिडकीच्या सळईला लावून ठेवलेली तुझ्या केसाची पिन तू घ्यायला विसरलेली असतेस. तुझ्या सौंदर्यात आणखी थोडी भर टाकणाऱ्या आरशाच्या जागी फक्त खिळ्यांचे व्रण दिसतात. मी तुझ्याकडे पाहतोय हे त्याचं आरशात पाहून तुला कळल्यावर तुझ्या गालांचा रंग थोडा गडद का गं व्हायचा? बूट ठेवण्याच्या जागी आता काही नसतं पण बूट नीट काढून न ठेवल्यामुळे ओरडणारी तू मात्र स्पष्ट दिसतेस. काही वेळा भिंतीचा रंग पाहून घेतलेले पडदे आणि काहीवेळा आत्ताच नवीन पडदे घेतलेत म्हणून भिंतीचा बदललेला रंग. नेहमीच्या वापराने काही ठिकाणी तुझ्या हाताचे ठसे स्पष्ट उठलेले असतात. आता खोलीत मंद अंधार असूनही मला ते स्पष्ट दिसतात. तुझ्या नकळत काहीवेळा मी त्यावरून हात फिरवलाय. ते असं मागे सोडून जाताना नको वाटतं अगं. नंतर येणारा 'भिंती किती खराब केल्यात' असं म्हणून ते मुजवून टाकेल रंगाच्या आणखी एका पडद्याआड. 
       दोघांचं म्हटलं तरी घरातल्या काही जागांची वाटणी होतेच. काही जास्त तुझ्या असतात तर काही जास्त माझ्या असतात. व्हरांड्यातील खुर्ची माझी तर अंगणातील झोपाळा तुझा. कशावरूनतरी रुसलीस की विनाकारण स्वयंपाकघरात घुटमळायचीस. तसा राग कधी भांड्यांवर नाही काढलास म्हणा. तसा बेडचा डावा भाग माझा, पण तुला झालेले आनंद तू त्याच बाजूला बसून व्यक्त केलेस. संध्याकाळी कधीतरी एकटीच पायरीवर बसून राहायचीस. ती पायरी तुझी मैत्रीण होती की काय? एवढं काय बोलायचीस तिच्याशी. तुझ्या जीवाची घालमेल झाली कधी तर ही पायरीच सांगायची मला. इथे होतो तोपर्यंत मी माझ्या आवडत्या जागांच्या प्रेमात राहिलो, आज मात्र फक्त तुझ्या आवडत्या जागा आणि तिथे असणारी तू एवढंच डोळ्यासमोर उभं राहतं. आणि मग आपल्या सहजीवनाच्या एकत्रीत खुणा पुन्हा जिवंत होऊन डोळ्यासमोर तरळून जातात.
         हळू हळू काळीकुट्ट रात्र थोडी थोडी राखाडी व्हायला लागलेली असते. मघाशी जाग येऊन, मला जागं बघून थोडंसं उठून बसलेल्या तुझी परत माझ्या छातीवर डोके टेकवून झोप लागलेली असते. मघाशी तू घट्ट पकडलेला माझा हात आता तू थोडासा सैल सोडलेला असतोस. हे तुला नेमकं जमतं. जेंव्हा मलाच कळत नसतं की मला थोडासा एकांत पाहिजे की सहवास, तेंव्हा तुला मात्र ते नेमकं उमगलेलं असतं आणि तू त्याप्रमाणे मला ते ते देऊन मोकळी झालेली असतेस. हे न बोलता सगळं समजायचं सगळ्याच बायकांना जमतं का? 
          अगदी थोड्याच वेळात हे घर सोडून आपण कुठेतरी दुसरीकडे जाणार ही भीती अगदी मूर्त स्वरूप घ्यायला लागते. ही अस्वस्थता बांध फोडून बाहेर येणारच असते पण अगदी तेंव्हाच माझ्या छातीवर रुळणाऱ्या तुझ्या मंद हळुवार श्वासांची लय या सगळ्या अस्वस्थतेवर फुंकर घालून तिला कुठच्या कुठे पळवून लावते. सगळं जग बदललं तरी तू अशीच असणार माझ्या सोबत. मग तसंच तुला घट्ट मिठीत घेऊन, डोळे बंद करून मी बसून राहतो, नव्या पहाटेची आणि जुन्याच तुझी वाट पाहत.
                                      -अमोल मांडवे

Comments

  1. किती सुन्दर व्यक्त होता येतं. आजच्या या जगात अस पत्र कुणी कुणासाठी लिहण थोडस दुर्मिळच.

    ReplyDelete
  2. हे सगळं शब्दांत मांडणं सोपं नाही.. या लिखाणात एक शब्द आलाय.. तो एक शब्द खूप बोलका आहे... 'घालमेल'

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

पंख पावसाळी

उन्हाळ्याची सुट्टी

आपल्याच मारेकऱ्यांच्या आसऱ्याला