उन्हाळ्याची सुट्टी

                       उन्हाळ्याची सुट्टी
(A Stroke of your pensil is worth a hundred words. Thank you Amol Bhosale Sarkar for such an apt sketch)

      गुरुजींनी परीक्षेची तारीख सांगितली अन कुठे कुठे आंब्याच्या झाडांना मोहर लागाय सुरुवात झाली की आमच्या डोक्यात उन्हाळ्याची सुट्टी सुरू व्हायची. मागच्या वर्षीच्या उन्हाळ्यात केलेल्या आणि करायला न भेटलेल्या गोष्टींचा हिशोब लावून मग यावर्षी काय काय करायचंय याची गणितं मांडणं सुरू व्हायचं. लपवून ठेवलेले गट्टयांचे डबे, पत्त्यांचे कॅट, रबरी बॉल सगळं जागेवर आहे ना याची घरच्यांची नजर चुकवून खात्री करणं सुरू व्हायचं. घरातल्या एकूण चर्चेवरून आणि पाहुण्याच्या येण्या जाण्यावरून घरात यावर्षी उन्हाळ्यात कुणाचं लग्न होणार याचा अंदाज लावून त्यात आपल्याला काय करायचंय ह्याचं planning आम्ही करू लागायचो. तसा भर फक्त खाण्याची किती चंगळ होणार आणि नवीन कपडे भेटणार यावरच असायचा. परीक्षा मानगुटीवर येऊन बसली असली तरी पोरापोरांच्यात चर्चा सुट्टीचीच असायची. एखादा मित्र परीक्षा झाल्यावर गावाला जाणार आहे म्हणला तर त्याला आम्ही कशी लय मज्जा करणार आहोत आणि तो गावाला गेला तर त्याला असलं काही करायला भेटणार नाही हे त्याला पटवून देऊन त्याचं जाणं रद्द करण्यासाठी अगदी आटापिटा करायचो.
        बाहेर उन्हाळी ढग दाटू लागायचे आणि शाळेतले खिदळण्याचे, कालव्याचे आवाज परीक्षेच्या धुक्यात हरवून जायचे. तसा परीक्षा हा माझ्या आवडीचा विषय. बाकी लोकांपेक्षा आपल्याला जास्त मार्क पडत्यात याचा अंदाज आल्यामुळे कशात तरी आपण बाकीच्या पोरांपेक्षा भारी आहो हे दाखवायला आणि घरी आलेल्या पाहुण्यांपुढे भाव खायला आयाता चान्स परिक्षेमुळं मिळायचा. नाहीतर कुस्तीत, क्रिकेटमध्ये, भांडणात, पळण्यात, दगडाच्या नेमबाजीत सगळ्यात कोण ना कोण माझ्यापेक्षा भारी होतंच. त्यात परीक्षेत पोरं लय भाव द्यायची. सांगल ती कामं करायची. त्यामुळं मनातून भीती वाटत असली तरी एक मन परीक्षेची वाट पण बघायचं. आणि परीक्षेची वाट बघायचं त्याहून महत्वाचं कारण म्हणजे परीक्षा संपल्यावरच उन्हाळ्याची सुट्टी लागणार असायची.
        आधी प्रचंड वाट बघायला लावलेली उन्हाळ्याची सुट्टी परीक्षा संपली की अचानक सुरू व्हायची. काय करू अन काय नको या पळापळीतच पहिले एक दोन दिवस जायचे. वडिलांच्या किंवा काकांच्या गाडीचा आवाज आला की चोरागात पळून जाऊन लपणारे आणि गट्टया, पत्ते लपवणारे आम्ही आता वाघ होत असू. पत्ते फिसत फिसत कधी कधी त्यांच्या नजरेला नजर द्यायची हिम्मत सुद्धा व्हायची. पण कधी कधी सांगून पण खेळणं बंद केलं नाही म्हणून दणकून मार खाल्ला की आमच्या लक्षात यायचं की सुट्टी म्हणजे काय free-license नाही. आणि मग सुरू व्हायचा छुप्या जागांचा शोध. त्या फक्त आम्हालाच छुप्या वाटायच्या. खेळाय न घेतलेलं आमच्यातलंच कोणतरी आम्ही कुठं आहे हे अगदी घरी जाऊन जाऊन सांगायचं. नंतर आम्हा सगळ्यांचा मार खायचं तो विषय वेगळा.
          सुट्टी सुरू होण्याच्या सुमारास नेमकी सुगीची कामं शेवटच्या टप्प्यात आलेली असायची. घरचे कामासाठी बोलवायचे तेंव्हा खूप जीवावर यायचं. प्रेमानं विचारून, थोडं भांडून शेवटी रडून पण काम करावंच लागणार आहे हे लक्षात आलं की गुमान काम सुरू करायचो. आणि मग लक्षात यायचं की कामात पण गम्मत आहे. खळं बडवायचं असो, गंज लावायची असो, हरभरा बडवायचा असो, मिरचीला पाणी पाजायचं असो, वैरण गोळा करायची असो की खत इस्कटायचं असो सगळं करताना एकमेकांच्या नादानं मस्ती करत घरच्यांना हातभार लावायला पण मज्जा यायची. नकळत, त्यावयात न समजणार एक आंतरिक समाधान मिळून जायचं. कोंबड्या डालायला आणि रेडकांना सोडून आत बांधायला विशेष गम्मत वाटायची. गाळणीच्या मशीन जवळ ज्वारीच्या पोत्याच तोंड धरून उभं राहिल्यावर भरलेली पोती मोजण्याची मजा दुसऱ्या कशात नाही. प्रत्येक भरणाऱ्या पोत्याबरोबर आनंद ओसंडायचा. वर्षभर घरच्यांनी केलेल्या कष्टाचं मूर्तिमंत चीज जास्तीत जास्त कसं होईल एवढीच ते पुन्हा पुन्हा मोजण्या मागची आमच्या छोट्या जीवांची धडपड असायची. आणि पोती बरोबर मोजल्यावर शाळेत जाऊन पोरं एक तरी कामाची गोष्ट शिकली याचं समाधान घरच्यांच्या चेहऱ्यावर दिसायचं ते वेगळं. खेळ ऐन भरात असताना घरच्यांनी काही काम लावलं की मात्र फार जीवावर यायचं. मोठ्ठी माणसं मुद्दाम आपल्याशी असं वागतात असे बालिश विचार येऊन जातात. राग मग सांगितलेल्या कामावर निघतो. मुद्दाम एखादं काम नीट केलं जातं नाही आणि मग हमखास मार पण खावाच लागतो. पण यातूनच एखादं काम कमीत कमी वेळेत कसं संपवायचं याच्या आयडिया यायला लागतात. कामं दुसऱ्यावर कसं ढकलायचं याचं बेसिक ट्रेनिंग इथेच मिळतं.
        पण जशी जशी सुट्टी जुनी व्हायची तशी तशी कामं कमी व्हायची. आणि हळू हळू आतेभाऊ-बहिणी, मुंबई वाले सगळे गावी आलेले असायचे. त्यामुळे आता दिवस वेगवेगळ्या खेळात कसा वाटायचा हाच मुख्य विषय राहायचा. सकाळी अंघोळ केली की एक दिवस गंजीचं माळ, एक दिवस विठोबाचं माळ तर एखादा दिवस मसनवट्यात बॅट-बॉल खेळायला जायचं. रोज एकाच ठिकाणी गेलं की घरचे हुडकत येत्यात म्हणून आम्ही शोधलेला हा उपाय होता. मॅच पैशावर लागायची पण सगळा व्यवहार उधारीवर. कारण पैसे कुणाकडेच नसायचे. बॉल गेला तर नवीन घ्यायचं म्हणलं तरी नाकीनऊ यायचं. मुंबई वाले आले की हा प्रश्न जरा निकालात निघायचा. नाहीतर मग विहिर, आड यातले बॉल बाहेर काढायची मोहीम हाती घ्यावी लागायची.
         10 वाजल्या की जेऊन सगळी पोरं सायकलवर डबल-टिबलशीट रानाकडं निघायची. दर दोन दिवसात एक तरी जण सायकल उरावर घेऊन नाहीतर सायकलच्या उरावर पडायचाच. पण लागल्यापेक्षा पोरं हसायची त्याचं बेकार वाटायचं. रानात जाऊन गुरांना पाणी खाया टाकायचं. ते बी जबरदस्ती त्यांना तान-भूक नसली तरी. एखादं काम असलं तर ते उरकून टाकायचं. कारण एकदा खेळणं सुरू झालं की हे काम नको असायचं. ऊन पण लय लागायचं. त्यामुळे चलश, नाहीतर सावलीत गट्टयांचा डाव रंगायचा. दिवस डोक्याव आला की अर्ध्या लोकांची पवायला जायचं म्हणून लगबग सुरू व्हायची आणि अर्ध्या लोकांची पवायला जायचं आज काही तरी कारण काढून टाळता येईल का म्हणून तगमग सुरू व्हायची. पळून जाणं, झाडावर लपून बसणं, आजारी पडल्याचं नाटक, ऐनवेळी हागायला लागल्याचं नाटक काहीच चालायचं नाही. शेवटी आम्हाला पवायला नेणाऱ्यांनी "चार उन्हाळे जास्त पाहिले" असल्याचं खरंच होतं. पण नंतर नंतर पवायची मजा इतकी यायला लागली की विहिरीतून बाहेर काढायला घरच्यांना काठ्या घेऊन यावं लागायचं. कोण किती वरून उड्या मारतोय, कोण किती राऊंड मारतोय, कोण जास्त वेळ पाण्याखाली राहतोय, कोण पाणी जास्त वर उडवतोय असल्या "जीवघेण्या" स्पर्धा चालायच्या. यातलं उंचीवरून उडी मारणं सोडून बाकी फारसं मला काही जमलं नाही. मी दुसरीत असताना पवायला गेल्यावर आमच्या घरी कामाला असणारा गडी बुडून मरण पावला होता ही गोष्ट मात्र मनावर कायम कोरली गेली. त्यानंतर वर्षभर आम्हाला कोणी पवायला जाऊच दिलं नव्हतं. पवायला जाताना डोक्याला चड्ड्या घालण्यापासून, ओली कपडे अंगावरच वाळवणे, दुसऱ्याची कपडे बुडवणे, एखादा पोहून वर आला की अंगावर माती टाकून त्याला पुन्हा पाण्यात जायला भाग पाडणे, पाण्यातून खालून जाऊन एखाद्याला आत ओढणे, एखाद्याचा टॉवेल गायब करणे अशा आणि काही इथे न सांगण्यासारख्या अशा अनेक मजेदार गोष्टी या पोहण्याच्या निमित्ताने व्हायच्या.
          पवताना काही कळायचं नाही पण एकदा पोहून झालं की पोटात भुकेचा आगडोंब उसळायचा. एकच्या ऐवजी दोन भाकरी जायच्या. एवढ्या एका गोष्टीमुळे घरचे खुश असायचे. पोरांनी भरपूर जेवावे म्हणून मागे लागावे लागायचे नाही. उलट जास्त खाऊ नको म्हणून मार खाणारा बहुदा जगात मी एकटाच असेन. जेऊन झालं की सगळी पोरं आंब्याखाली जमायची. मोठी माणसं दाट सावली बघून झोपून जायची आणि आम्ही गार जागा बघून पत्त्यांचा डाव मांडायचो. आम्ही बारके पडायचो त्यामुळे आम्हाला मुख्य डावात सहभागी व्हायला चान्स नसायचा. मग आम्ही राहिलेले पत्ते घेऊन जोड्या लावावर भागवून घ्यायचो. तसा हातचलाखी मध्ये मी बऱ्यापैकी हुशार असल्याने मला मोठ्या डावात एन्ट्री तशी लवकर मिळाली. दुपारच्या वाऱ्याने बऱ्याचदा जरा पिकू लागलेले आंबे खाली पडायचे. अशावेळी हातातली पानं टाकून सगळे धावत सुटायचे. शेवटी कोणालाही सापडला तरी आंबा सगळ्यांना वाटुनच खावा लागायचा. त्यातल्या त्यात ज्याला सापडला त्याला कोय मिळायची हाच काय तो फायदा. आताच्या पिढीला ना यातली मजा मिळणार ना यातले संस्कार कळणार.


          थोडं ऊन कमी झालं की मग सुरू व्हायची भटकंती रानमेवा गोळा करायची. बोरं, चिंचा, चिंचोके, सीताफळ जो तो आपल्या आपल्या आवडीच्या गोष्टींच्या मागे लागायचा. नाहीतर मग परत बॅट-बॉल नाहीतर विटी-दांडू चा डाव रंगायचा. पण बहुतांश वेळा दुपारनंतर घरी जाऊन दुसऱ्या आळीच्या पोरांबरोबर गट्टया खेळायला जास्त इंटरेस्ट असायचा. गट्टया खेळण्यात पण प्रत्येकाची वेगळी style होती आणि ती सर्वाना परिचित असायची. त्यावरून पुढचे डाव रचले जायचे. बरेच जण हारायला लागले की ताकदीच्या जोरावर घोळ करून गट्टया नापून घेऊन जायचे. आम्ही रडत जाऊन घरी सांगायचो आणि तुला पन्नास वेला सांगितलं तरी त्याच्याबरोबर कशाला खेळतो म्हणून मारानेच आमचे सांत्वन व्हायचे. मी दिवसभर उन्हात गट्टया खेळतो म्हणून गट्टयांचे डबे काका आडात फेकून देतो म्हणायचे. म्हणून मी सर्व डबे वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवायचो. खेळणं बंद झाल्यावरही कित्येक वर्षे मधूनच एखाद्या सांदीतून किंवा दिवळीतून एखादा डबा सापडायचा. मुंबई वाले आले की आमच्या खेळांमध्ये जरा variety यायची. त्यांच्या मर्जीने, त्यांना आवडेल तसं का होईना पण कॅरम, सापशिडी, नवा व्यापार असले खेळ खेळायला मिळायचे. आपल्याला आपल्या मर्जीने खेळता यावं म्हणून मी वह्यांच्या पुठ्यांचा त्यावर कलर पेन्सिलने चित्रं काढून नवा व्यापार खेळ स्वतःच तयार केला होता. मुंबई वरून येणारी भावंडं "चंपक कॉमिक" घेऊन यायची, त्याची वाट मी अगदी वर्षभर बघायचो. पण ऊन कमी झालं की ठरलेली काही कामं ही असायचीच.


          उन्हाळ्याच्या सुट्टीत लागणारं सगळ्यात बोरिंग काम म्हणजे म्हशी चरायला नेणं. एकतर आमची म्हस मोकळी सोडली की वर तोंड करून नुसती फिरायची. खायचं नाव काढायची नाही. तिच्या मागं पळून जीव घायला यायचा. आणि म्हस बांधलेली दिसली तर मार देण्याचा दम घरच्यांनी दिलेला असायचा.एकदा घानवडीत म्हशी चरायला घेऊन गेलो आणि खेळण्यात सगळेच दंग झालो. खेळून झाल्यावर बघतो तर एक म्हस गायब. सगळीकडं बघितलं पण काहीच पत्ता लागेना. घरी जाऊन सांगितलं. म्हस दुसऱ्या दिवशी एका दुसऱ्या गावात सापडली. घरच्यांनी अनपेक्षितपणे त्यादिवशी आजिबात मारले नाही पण जोपर्यंत ती सापडली नव्हती तोपर्यंत जीवात जीव नव्हता. जबाबदारी या शब्दाचा अर्थ कदाचित तेंव्हा पहिल्यांदा कळाला असेल मला. त्यानंतर माझं नावडतं दुसरं काम म्हणजे शेण काढणं. ते करणं मला आवडायचं नाही कारण मी कितीही प्रयत्न केला तरी मला ते नीटनेटकं करताच यायचं नाही. मग मी हमखास घरच्यांचं बोलणं खायचो. त्यामुळे मी शक्य तेंव्हा ते टाळायचोच. पण मी शेण काढावं असा आईचा फार आग्रह असायचा. ती म्हणायची शेण काढणाऱ्या माणसाचे पाय नेहमी जमिनीवर राहतात त्याला कोणतंच काम करायला लाज वाटत नाही. एवढ्या शुल्लक गोष्टीचा एवढा प्रगल्भ अर्थ लावणारी आई स्वतःला अडाणी म्हणवून घ्यायची. अशावेळी आम्हा तथाकथित सुशिक्षितांना अंतर्मुख होण्यावाचून पर्याय राहत नाही. तेंव्हा या सगळ्याचा अर्थ लागायचा नाही पण आज पावलापावलावर त्या संस्कारांची अनुभूती येते.

           दिवसभराचं ऊन पचवून उन्हाळ्याची संध्याकाळ एक विलक्षण हवाहवासा वाटणारा गारवा घेऊन यायची. उन्हाळा संपत आला की किंवा त्याआधीही कधी कधी अचानक वळीव पाऊस नेमका घरी जायच्या वेळी हजेरी लावायचा. तो आला की क्षणात सगळं जग बदलून जायचं. ते वर्णन करायला एक वेगळा लेख लागेल. मन मावळत्या सूर्याच्या स्वाधीन करायची सवय तेंव्हापासूनच लागली मला. संधीप्रकाशात पक्षांचे थवे वेगवेगळे आकार घेत मनसोक्त फिरत असताना आपण पक्षी का नाही असं न वाटणारा कोणी असेल असं मला वाटत नाही.

(Thank you Deepti Patwardhan for this beautiful painting)
          उन्हाळ्याच्या रात्री पण मजेशीर असायच्या. अर्धे लोक बाहेर अंगणात नाहीतर गच्चीवर किंवा टायली मध्ये झोपायला असायचे. पण त्या अगोदर सिनिअर-ज्युनिअर गँग एकत्र बसून पत्ते खेळायची. वाड्याच्या सगळ्या कोपऱ्यात छोटे छोटे गट गप्पात रंगलेले असायचे. बायकांची खुसपुस सुरू असायची व त्याचबरोबर उन्हाळी कामाचं प्लांनिंग, बऱ्याच जणी नकुलं करत, वाकळा शिवत गप्पा मारायच्या. नवीन लग्न करून आलेली कोण कशी यावर या ग्रुप मध्ये विशेष चर्चा व्हायची. थोड्या वयस्कर गटात मुख्य चर्चेचा विषय कोणाचं काय दुखतंय याचा असायचा. आता टीव्ही आणि मोबाईल मुळे या गोष्टी फार दिसत नाहीत पण यातील मजा शब्दात नाहीच सांगता येणार. 
         सगळे खेळ , गप्पा गोष्टी संपल्या की झोपायची तयारी व्हायची. मी गॅलरी मध्ये झोपायचो आभाळाकडे बघत. चांदण्या गावात स्पष्ट दिसायच्या आणि उन्हाळ्यात तर आणखी स्पष्ट. सप्तर्षी, ध्रुवतारा, हरीण, बाझलं , बाण हे सगळे तारकासमूह मी न्याहाळत राहायचो. सप्तर्षी कसा ध्रुव ताऱ्याभोवती फिरतो हे लोकांना सांगताना आणि दाखवताना विद्वान झाल्याचा फील यायचा. कित्येकदा रात्रभर मी जागा असायचो. दिवसातून व रात्रीतून किती विमानं जातात हे मोजून बघायचो. मधेच एखादा मंद तारा हळुवार पुढे सरकताना दिसायचा. तर कधी अचानक तुटून पडणारे तारेही पाहायला मिळाले. पण मागणार काय त्याच्याकडे? काही कमी आहे असं कधी वाटायचंच नाही तेंव्हा. आणि खरंच काही कमी नव्हतंही. उन्हाळ्याच्या सुट्टीसारखी उन्हाळ्यात बाहेर झोपायची वाट जवळपास आम्ही सगळी बच्चे कंपनी हमखास बघायचो.
         उन्हाळ्याची सुट्टी, मामाच्या गावची यात्रा, आंब्याचा सिझन, द्राक्षे या सगळ्या गोष्टी अगदी एकत्र यायच्या. त्यामुळे मामाच्या गावचा एक आठवडा म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीच्या मजेचा कळस असायचा. द्राक्षाच्या बागेत गडाची फक्त 2-3 द्राक्ष खाल्ली की लगेच पुढच्या गडाकडे स्वारी. आंबा जरासा आंबट लागला तर लगेच दुसऱ्या झाडाकडे कूच. पाण्याच्या टाकीत अंघोळ, आणि कोणाचंही बोलणं न खाता हवं तेवढं खेळा. पैशांचा लाड कोण करायचं नाही पण यात्रेमुळं खायला असंच भरपूर मिळायचं. आम्ही भावंडं एक एक मामा निवडून घ्यायचो आणि मग एक तर आम्ही तरी भांडायचो नाहीतर त्यांच्यात तरी भांडण लावायचो. एकूणच जोड्या पडलेल्या असायच्या. मामाच्या गावची खरी मजा अगदी पुस्तकातल्यासारखी अनुभवायला मिळायची. 
          उन्हाळ्याच्या सुट्टीचे जेवढे वेध लागायचे तेवढेच शाळा सुरू होण्याचेही लागायचे. सुट्टी संपायला 15-20 दिवस बाकी असल्यापासून नवीन दप्तर, नवीन पेन, नवीन पुस्तकं यासाठी मागे लागावं लागायचं. कारण अगोदर 20 दिवस सुरू केलं तर कुठे शाळा सुरू झाल्यावर एक दोन आठवड्यात हे सगळं मिळायचं. पुस्तक नवीन नव्हती मिळत कधी. बहिणींची जुनी पुस्तकं पोत्यात बांधून ठेवलेली असायची तीच शोधून घ्यावी लागायची. बऱ्याचवेळा मराठी आणि हिंदी ची अर्धी पुस्तकं माझी शाळा सुरू व्हायच्या आधीच वाचून झालेली असायची. त्यातल्या गोष्टी वाचण्यात मला जाम भारी वाटायचं. नाही म्हणलं तरी शाळेला आणि शाळेच्या मित्रांना पूर्ण सुट्टीभर मिस करत असतोच प्रत्येक जण. त्यामुळे सुट्टी संपत आली की नवीन वर्ग, त्यात आपली जागा कुठली असणार, नवीन गुरुजी, ते कसे असणार, नवीन काय शिकणार या सगळ्यांचे पुसटसे का होईना विचार माझ्या मनात यायचेच. पण बरंय, मागे गेलेली गोष्ट कितीही प्रिय असली तरी समोर येणारी गोष्ट जास्त महत्वाची असते हे या सुट्टी आणि शाळेच्या चक्रात नकळत शिकलो. पूर्वी शिक्षण आणि आता नोकरीसाठी एक जागा सोडून दुसरीकडे जायची वेळ आली की आता या शिकण्याचा चांगला फायदा होतो आणि सोडत असलेल्या गोष्टीच्या आठवणी काढत त्रास करून घेण्यापेक्षा नवीन येणाऱ्या गोष्टीला सामोरं जायचं नियोजन करण्यात जास्त मन गुंतवता येतं.
         आणि मग जशी अचानक सुरू होते तशी उन्हाळ्याची सुट्टी अचानक संपून पण जाते. पण शाळेतील 'नव्या' च्या कौतुकामध्ये संपलेल्या सुट्टीचं काही सोयरसुतक नसायचं. कारण सुट्टीतही मजाच यायची आणि शाळेतही. पण आता सुट्टीच्या फेटाळल्या जाणाऱ्या प्रत्येक अर्जाबरोबर ती सुट्टी आठवत राहते. उन्हाळे येतात आणि जातात, उन्हाळ्याच्या सुट्टीच्या आठवणी मात्र एकदा आल्या की अगदी मनात घरच करून राहतात. मग गावाची ओढ लागून राहते. जुनं काही मिळणार नसतं पण सगळ्या गोष्टींच्या खुणा पावलो पावली भेटतात. जरी उन्हाळ्याची सुट्टी प्रत्यक्षात नाही मिळाली तरी जर तुमच्यात ते लहान मूल जर जिवंत असेल तर आजही मनाच्या एका आतल्या कप्प्यात ती सुट्टी असते बरं का लपून बसलेली आणि तिला तिथून बाहेर काढून तिची मजाही परत अनुभवता येते. आणि जर प्रचलितांच्या थोडं विरुद्ध जाण्याचं धाडस आणि थोडासा प्रयत्न  केला तर आजही तीच उन्हाळ्याची सुट्टी प्रत्यक्षातही आणू शकतो. 
         -अमोल मांडवे(ACP/DYSP)


          

Comments

  1. Thank you for giving me opportunity ..
    U hv amazing skills bhai...

    ReplyDelete
    Replies
    1. Fortunately we shared same childhood. So it clicked both ways.

      Delete
  2. Kya baat hai. Beautifully written. Taken me down the memory lane. But for some details of time and space everything is in tune with my own version of summer vacation. Though from Chandrapur we used to go to a small village. Thank you so much for making me relive those wonderful moments of fun and innocence which I very much miss and in this dry, professional world desperately seek. A solace for the battered soul.

    ReplyDelete
    Replies
    1. I am honoured Sir. The purpose of this is just to make people look into their on childhood. I am so happy I could do that. Give me your blessings to come up with many more of such pieces. Thank you Sir.

      Delete
    2. You have the blessings of your parents. My best wishes are with you. You write straight from the heart. Your writings carry fragrance of honest feelings. Great.

      Delete
  3. Kadak na bhai. Its really simple yet captivating. सादगी में क़यामत की अदा होती है types !!
    Wish you more strength !

    ReplyDelete
    Replies
    1. This comment has been removed by the author.

      Delete
  4. खूपच भारी ...👌👌👌पण वेळ कधी मिळतो एवढं लिहायला..

    ReplyDelete
  5. माझ्या बाबतीत एखादा चांगला सिनेमा , त्यातली थीम - मला त्या काळात घेऊन जाते. तसे तुझे हे लेख, मला बालपणीच्या आठवणींमध्ये नॉस्टॅल्जिक करतात. खेडे गावाकडची फार पार्श्वभूमी नसली तरी ते अनुभव आपले वाटतात. खुप छान! Keep it up👍

    ReplyDelete
  6. Baalpanichya sagalya aathvani n sagalya goshti aani to niragas aanand sagal kas same to same.

    Te samadhan n ti fulfilment sagal asun aata nahi...... N tyachi lekh sampat yetana honari janiv kasach feel karun dete. Remembering n having gratitude to all people n frnds who were part of this.

    ReplyDelete
  7. सर्व काही डोळ्यासमोर उभं राहिलं. लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या.
    खूप मस्त लिहिता सर.. 👍👌

    ReplyDelete
  8. Khup sundar 👍🏻

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

पंख पावसाळी

आपल्याच मारेकऱ्यांच्या आसऱ्याला