जगावेगळी माणसं- विजय चौधरी(ट्रिपल महाराष्ट्र केसरी)... १. बाळाचे पाय..गदालोटचा पहिला डाव
जगावेगळी माणसं- विजय चौधरी(ट्रिपल महाराष्ट्र केसरी)
१. बाळाचे पाय..... गदालोटचा पहिला डाव
अस्लम काझी. नावातच दरारा. ते कमी का काय म्हणून असतानाच आडदांड पैलवान आणि तरीपण वाऱ्यासारखा चपळ. पंचानं हातात हात दिला आणि पंच मागं सरला. तसा अस्लम लक्खकण खाली वाकला आणि दोन मुठी भरून माती पुढच्या पैलवानाच्या खांद्यावर आन पाठीवर टाकली. पुढं कोण होता? पोरकट दिसणारा, दाढी वाढवलेला, सहा फूट उंचीचा देखणा पण कवळा पैलवान. गांगरलेल्या पुढच्या पैलवानानं पण अस्लम काझीनं केलं तेच करायचं म्हणून मुठी भरल्या. माती अंगावर पडल्यावर काझी न असं गदागदा सगळं धूड हालवलं ना. माती काय चिटकल अंगाला. ह्यो तर माती अंगाला लागून दिना, ह्यो काय पाठ लागू देणार मातीला? बोटात बोटं फसली, ताकद आजमावायला सुरुवात झाली. समोरचं पोरगं बघून अस्लम चांगलाच चेकाळला. डोळ्याच्या एका कोपऱ्यातन त्यानं गदेवर आणि गर्दीवर नजर फिरवली. आणि दुसऱ्या सेकंदाला डावा हात गर्रदिशी फिरून पुढच्या पैलवानाच्या उजव्या कानावर बसला. सनक डोक्यात गेली आणि कान बधिर झाले. बरंच झालं, नाहीतर मैदानातल्या प्रेक्षकांचे सुस्कारे आणि अर्रर्र ऐकून हाय नाय ते पण आवसान गळालं आसतं. क्षणभर पैलवानाचे डोळे बंद झाले. हा पैलवान म्हणजे विजय चौधरी, कुस्तीत येणारं आणखी एक नवं पोरगं.
त्या डोळे मिटलेल्या एका क्षणात सगळे दिवस, कुस्तीसाठीच्या खस्ता त्या नवख्या पैलवानाच्या डोळ्यासमोर तरळून गेल्या.
बाप,नथु चौधरी, मोठा पैलवान पण बापाला लाज वाटंल इतकी विजयला कुस्तीची नावड. 10वी पर्यंत गड्यानं तालमीचं तोंड नाय बघितलं. खेळू नको पण नुसता बसायला चल, खेळू नको पण माती तरी उकर, आज ह्यो आला नाय तर त्याच्याबर कुस्ती खेळ, आसं करत बापानं ह्याला आखाड्यात उतरवला. ह्यो पण आपलं करायचं म्हणून सगळं करायचा. पण रक्त बोलणारच. आणि नथू पैलवानाचं रक्त कसं गप बसंल? पहिल्या काही पकडीतच ह्यो रोजचा सराव असणाऱ्या पोरांना भारी पडू लागला. बापाच्या नजरेतन ते सुटलं नाय. मग काय सायगाव वरन चाळीसगाव, चाळीसगाव वरन जळगाव, जळगाव वरन पुणे.
आणि पुणे म्हणजे पुणेरी वागणं आलंच. पुण्यातल्या तालमीत अजून पुण्यातल्या MPSC च्या क्लाससारखं अर्थकारण आलं नव्हतं. नाहीतर दर चार चांगल्या पैलवानामागं हजार काडीपैलवान भरले असते. तालमीत भरती व्हायला गेलं की पहिला प्रश्न, कुठणं आलाय? सातारा का कोल्हापूर? जळगाव सांगितलं की, जळगाव ला पण कुस्त्या खेळतात का? कुठली गदा जिंकलीय? आरं गदा आधीच जिंकली असती तर तुमच्याकडं काय मारुतीचा भंडारा खायला आलो आसतो का. पण नाय. कोणी दारात उभं करंना. बाप वैतागला. पोराला आधीच हौस नव्हती. पण मग लय गयावया केल्यावर घेतलं एका तालमीनं तात्पुरतं ठेऊन.
काही दिवस असेच गेले, नुसती माती उकरत. पुण्यात कस्पटे वस्तीच्या मैदानावर मैदान भरलं. अस्लम काझी फायनल ला आला. तालमीतला एक मोठा पैलवान आणि विजय दोघांपैकी एकजण फायनल ला जाणार होता. वस्तादाने विजय च्या खांद्यावर हात ठेऊन सगळ्यांना सांगितलं, "उद्या विजय खेळलं फायनल ला. काझीला पाडायचं दुसऱ्या कुणाला जमणार नाय." विजयला स्वतःलाच काय चाललंय कळेना, त्यात तो मोठा पैलवान चिडून गेला. पण वस्तादाने दाखवलेल्या विश्वासानं विजयच्या आत्मविश्वासात भर पडली हे नक्की. 112 किलोच्या अस्लम पुढे 88 किलोचे पोरगं कुठं टिकणार? महाराष्ट्राची मैदानं गाजवणारा काझी कुठं अन अजून कुणाला माहिती नसलेला विजय कुठं. पण म्हणतात ना, 'बाळाचे पाय पाळण्यात दिसतात.' विजय चे पाळण्यातले पाय वस्ताद चांगलाच जाणून होता.
रात्री विजयनं घरी फोन केला, आईशी बोलायचं म्हणून. कुस्ती वडिलांनी शिकवली असली तर विजयची ताकद मात्र आई 'रंजना'च्या शब्दात होती. "चांगला खेळ" एवढंच त्या माऊलीने त्याला सांगितलं. आत्ताच्या आयांसारखा जिंकायचंच हा अट्टाहास नाही. या "चांगलं" खेळण्याच्या आईच्या इच्छेनेच विजयचा खेळ नेहमी स्वच्छ राहिला. जिंकण्यासाठी चांगलं खेळणं सोडून दुसरा मार्ग कधी त्याला अवलंबावा लागला नाही.
दुसऱ्या दिवशी कुस्तीला जायची वेळ झाली. जिंकायची आशा नव्हतीच. चमत्कार झाला तरच. मग अशा वेळी वस्ताद बरोबर जाण्याचा प्रश्नच येत नाय. तीन चार पोरं घेऊन विजय निघाला. गाडी पण नाय, कायतरी वहान भेटंल म्हणून हायवे ला येऊन उभा राहिला. लय गाड्यांना हात केले पण थांबलं कोणंच नाय. शेवटी एका 'छोटा हाथी' गाडीत मागं बसून बालेवाडीचं मैदान गाठलं. नुकतीच म्हशी सोडून गाडी परत निघाली होती, खाली पाचट तशीच होती.
गाडी रस्त्यावर पळत होती, का पुण्यात आल्यापासन सगळ्यांनी मांडलेल्या उपेक्षेवर तेच कळतं नव्हतं. वरन मोठ्या कुस्तीत इतक्या लोकांपुढं हसं होणार ते वेगळंच. कुस्ती डावपेचाचा खेळ. डोकं शांत लागतं. तर समोरच्याच्या डोक्यात शिरून त्याचा काटा करता येतो. पण ही असली फरपट आसताना कसं डोकं शांत राहील कुणाचं?
सगळं आपल्या बाजून असल्यावर "कोणपन" लढतंय, पण विजय चौधरी अजून तरी "कोणंच" नसला तरी त्यो "कोणपन" नव्हता. नाव कसं करायचं हे त्याला चांगलंच माहित होतं. सामान्य लोकं संधीची वाट पाहतात आणि संधी निर्माण करणारी लोकं असामान्य ठरतात.
कान अजून बधिर होताच पण डोळे उघडले होते. डोक्यातली सनक आता डोळ्यात उतरली. डोकं परत बर्फासारखं थंड झालं. आणि विजय ने एक पाऊल मागे घेऊन शड्डू ठोकला. आवाज चांगलाच घुमला. काझीच्या डोळ्यात झटकन एक चमक येऊन गेली त्या आवाजासरशी. कदाचित त्याला नसली तरी त्याच्या डोळ्यांना कल्पना आली होती की समोर उभं राहिलेलं पोरगं वाटतं तेवढं सोप्प नाही. 10 मिनिटात कुस्ती निकाली नाय झाली तर पॉईंट वर विजेता ठरणार होता. आठ मिनिटं झाली पण काझीनं विजयला एका जाग्यावर उभंच राहू दिलं नाय. नुसते मानेवर झटके देऊन विजयचं आवसान काढायचा त्याचा प्रयत्न होता. विजय ची दमछाक बघून प्रेक्षकांना जास्तच मजा येत होती आणि ते एकच कालवा उठवून देत होते. त्या आवाजानं अस्लम अजून चेकाळत होता. पॉईंट वर मॅच गेली की काझीचं वजन आपल्याला भारी पडणार हे विजयला पक्क माहिती होतं. 10 मिनिटं संपत आली होती. एवढा नवा पैलवान समोर असून निकाली कुस्ती नाय केली तर लोकं बोलतील म्हणून अस्लमला पण कुस्ती निकालात काढायची होती.
त्यानं डाव टाकला. तो विजयच्या पाठीमागे आला आणि पोटावर घट्ट पकड घेतली. पाठीमागून विजयला धक्का द्यायचा आणि पुढे पडू नये म्हणून विजय ने मागे ताकद लावली की बॅकथ्रो डावाने त्याला पछाडायचा. जाणकार शौकिनांच्या पण डाव लक्षात आला. 5 पॉईंटचा डाव. नवा पण खतरनाक समजला जाणारा डाव. आणि काझीची खासियत. आता विजय गेला असंच सगळ्यांना वाटलं. त्यांची तरी काय चूक. त्यांना अजून विजयचा गदालोट माहितीच नव्हता. काझीनं विजय ला पुढे धक्का दिला पण पुढची चाल खेळायच्या आधी त्याच्या लक्षात आलं की, विजयच्या डाव्या हाताची पकड त्याच्या डाव्या हातावर घट्ट बसलेली आणि विजयचा उजवा हात त्याच्या उजव्या पटात शिरलेला. 112 किलोचं कापसाचं पोतं उचलावं असं विजयनं काझीला पाठीवर उचललं आणि तितकंच अलगद मातीवर टेकवलं. काझीला कळालं काय झालाय ते. पण लोकांना अजून त्यांच्याच डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. मैदानात क्षणभर एकचं शांतता पसरली. इतक्यात विजयबरोबर आलेली पोरं ओरडत मैदानात घुसली आणि पुढच्या क्षणी विजय लोकांच्या गर्दीत दिसेनासा झाला. विजयने खाली बसलेल्या काझीला हात दिला आणि काझी उभा राहिला. आणि नवल झालं, जिंकलेल्या पैलवानानं हरलेल्या पैलवानाच्या पायाला स्पर्श करून नमस्कार केला. काझीनं विजयची पाठ थोपटली. विजय दुसऱ्यांदा जिंकला. कुस्तीत राहिलेली मने त्याने आता जिंकून घेतली.
काझी एकटा मैदानाबाहेर चाललेला आणि फक्त काझीला बघायला आलेलं मैदान विजयला खांद्यावर घेऊन नाचत होतं. मघाशी अर्रर्र करणारी लोकं आता हुर्रे करत होती. मघाशी सुस्कारे सोडणारे आता घसा फाटेपर्यंत ओरडत होते. ज्याच्याबरोबर स्वतःच्या तालमीतलं कोण आलं नव्हतं त्याच्या हातात हात द्यायला आणि त्याला शाबासकी द्यायला लोकांनी गर्दी केली होती. आणि त्या गर्दीच्या मध्ये हा गडी गदा घेऊन उभा होता. हनुमानाची भक्ती आज फळाला आली होती. छोटा हाथी मधून आलेला पैलवान पण आता वस्ताद गाडी घेऊन येणार होते त्याला न्यायला. जाणारी प्रत्येक गाडी विचारत होती पैलवान कुठं सोडायचंय, चला सोडतो.
येताना एकटा आलेला पैलवान जाताना एकटा नव्हता. येताना नवखा असलेला पैलवान आता नवखा राहिला नव्हता. गदालोट नाव आता महाराष्ट्राच्या कुस्तीला नवीन राहिलं नव्हतं. कुठल्याच पैलवानाला जमलं नाही असं यश पुढे विजयने मिळवलं. अस्लमला त्याने दाखवलेलं अस्मान म्हणजे 'बाळाचे पाळण्यात दिसलेले पायच' होते.
-अमोल मांडवे(ACP/DYSP)
महाराष्ट्र पोलीस
Blog Name: Vataadya
महाराष्ट्र पोलीस
Blog Name: Vataadya

वा रे मर्दा!!! चौधरी म्हणजे ढान्या वाघ आणि अमोलची लेखनी म्हणजे आधुनिक बखरच जणु!!!
ReplyDeleteThank you dada
DeleteMast ch re. मराठी च्या पुस्तकातला धडा असल्यासारखं वाटतंय. भारी.
ReplyDelete😁thank you bhau
Deleteमस्त, उत्कंठावर्धक, पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
ReplyDeleteThanks. Soon😊😊
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteKya baat, Jabardast!!!
ReplyDeleteThank you bhava
Deleteएक जबरदस्त व्यक्तीमत्व एका सुंदर लेखनितून वाचायला मिळाले.. अप्रतिम 🙏
ReplyDeleteNice Amol and happy to reading about vijay.
ReplyDeleteThank you
DeleteThank you
DeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteInspiring Story & Superb Lines....!!!!
ReplyDeleteखूप छान मांडणी आणि तितकेच उत्सुकता
ReplyDeleteआशा आहे या सगळया गोष्टी पुस्तकरूपाने पाहायला मिळतील।
तत्काळ पुढील लेखनास शुभेच्छा।।
Thank you
ReplyDeleteविजय भाऊ चौधरी यांच्या विषयी माहिती आहेच..
ReplyDeleteमाझे सगळे बंधू पैलवान असल्या मुळे आणि 1 बंधू विजय भाऊंच्या तालमीत असल्याने त्यांच्या नावाची चर्चा असतेच...
मी पैलवान होऊ शकलो नाही याची खंत वाटते MPSC च्या वेडाने पुण्यात आलो भावा कडे गेलो लहान पनीचे तालमीतील दिवस आठवले पण आता PSI होऊन तालीम करायची(समाधानासाठी) अशी शप्पथ घेतली...
लेखन कला अगदी उत्तम.... कदाचित असे वाटते आहे की राज्यसेवा मुख्य मराठी पेपर मध्ये निबंध लेखनात चांगलीच बाजी मारलेली असेल..
आणि लेखातील १ वाक्य खरचं खूप आवडलं पण ते विजय भाऊनशी संबंधित नाही आहे पण उत्तम आहे
" MPSC च्या कलासेस सारखं अर्थकारण .."
असे आणखी लेख वाचनास यावेत.
धन्यवाद अमोल सर
Inspirational.......
ReplyDeleteReally sir, motivated me...
खुप छान लेखन केलय सर…
ReplyDeleteअमोलदादा एक नंबर लेख. नाद खुळा....
DeleteNivval naadmadhurya nhi tr hya julnarya sunder naadmadhur shabdhanchya pathi mage ek samarthyavaan sandesh denare man aani vichar aslyashivaay asa lekhak kinvha kavi hou shakat nahi....
ReplyDeleteTumchya vichardhana la majha namaskar!!
Thank you all
ReplyDeleteसर, आपलं लिखाण म्हणजे जणु डोळ्यासमोर घडत असलेल्या घटनांचा जिवंत प्रक्षेपण वाटते सर. अप्रतिम सर.जय हिंद सर
ReplyDelete