कबुली जबाब
पाऊस पण आता तुझ्याकडेच पडला
माझ्याकडे येणारा ढग दारातच अडला
त्यालाही भीती वाटली असेल,
माझ्यासारखं चार भिंतीत अडकला तर?
की बघवली नसेल माझी असहाय्यता,
पावसात मनाचा माझ्या बांध फुटला तर?
वाट तर मीही पहात होतोच की,
पण कोणाची- पावसाची की तिची?
पाऊस येणार, पाठोपाठ तिची आठवण
वैतागला असेल का यावेळी पाऊस पण?
पावसाशिवायपण आठवण आलीच की
बेभान गतीच्या कोरड्या वावटळीसारखी
"तुझ्याकडे पाठवतेय रे पाऊस",
स्वतःवरच्या अजून एका कवितेचा मोह तिचा.
पावसाबरोबर तिलाही मीच आठवतो,
उघड उघड कबुली जबाब तिचा.
- अमोल मांडवे(ACP/DYSP)©

"पाऊस माझ्याकडे आलाच नाही म्हणतोस,
ReplyDeleteपण त्याच्या सरींत अजूनही तुझी हुंदकी आहे..."
ढग कुठे वळतात हे आकाश ठरवतं,
पण आठवणी कुठे थांबतात, हे मन ठरवतं…
तुझ्या दारात थांबलेला पाऊस
माझ्या ओलाव्याचं कारण ठरतो का?
की तूच त्याला पाठवलंस पुन्हा एकदा,
"त्याचं मन अजून भिजलंय का?" बघायला?
पावसाच्या सरी झेलताना
मी शब्दांचा रेनकोट घालतो,
तुझ्या कवितेतून ओघळणारा
तोच जुनाच आठवणींचा पाऊस…
"कविता पाठवलीस", म्हणतोस तू,
माझ्या मौनालाच उत्तर द्यावं लागतं.
तू कविता लिहितोस,
आणि मी त्याचा अर्थ जगत राहते.