प्रतिभेचा अथांग महासागर : शांताबाई
प्रतिभेचा अथांग महासागर : शांताबाई
शांताबाईंबद्दल मला अथांग आदरभाव आहे आणि अपार कौतुक आहे. एका माणसाच्या ठायी एवढी प्रतिभा कशी असू शकते हाच विचार शांताबाईंचा विषय निघाला की प्रत्येक वेळी माझ्या मनात येतो.
मी पुस्तके वाचतो, पण मी एक अजाण वाचक आहे. एखाद्या पदार्थाच्या चवीची फक्त जिभेला जेवढी जाणीव असते तेवढीच वर वर माझी वाचन आवड आहे. त्यामुळे एखाद्या प्रसिद्ध पुस्तकाचा लेखक मला माहिती असेल असे नाही आणि असला तरी आठवेल असे नाही. किंवा एखादे अगदी लोकांच्या मनामनात असणारे आणि माझ्याही घडी घडी जिभेवर येणारे एखादे गाणे कोणाचे असेल वगैरे असा विचार मला फारसा येत नाही. असंच एकदा वसईतील यात्रेतील बुकफेअर मधून मी "निवडक शांता शेळके" हा कवितासंग्रह घेतला होता. मी जेव्हा तो वाचायला घेतला तेव्हा त्यातील बहुतेक प्रत्येक गीत वाचताना "अरे हे एवढे प्रसिद्ध गाणे शांता शेळके नी लिहिले आहे का?" अशीच प्रतिक्रिया माझ्या मनात उमटत होती. पूर्ण संग्रहभर माझ्या याच प्रतिक्रियेची पुनरावृत्ती होत राहिली. तेंव्हा मला वाटून गेले की आजवर मराठीमध्ये ऐकलेली बहुतेक सगळीच गाणी शांताबाईंची आहेत की काय? आणि मग त्यावेळी मी शांताबाईंच्या प्रतिभेने विस्मयचकित झालो.
त्यानंतर एका चोखंदळ साहित्य रसिक असलेल्या सहकाऱ्याच्या माध्यमाने मी शांताबाईंचा रानजाई हा कार्यक्रम यूट्यूब वर पाहिला. आणि माझ्या विस्मयात कित्येक पटींनी वाढ झाली. एक डोक्यावरून तसूभरही पदर न ढळू देणारी आजीच्या वयाची स्त्री, तिचा व्यासंग, तिची स्मरणशक्ती, शब्दांची पारख, अनुभव - श्रीमंती हे सर्व पाहून थक्क नाही झालो तरच नवल.
त्यानंतर शांताबाईंचे आत्मचरित्रपर असणारे धुळपाटी हे पुस्तक माझ्या वाचण्यात आले. त्यात त्यांनी त्यांचे बालपण, कौटुंबिक पार्श्वभूमी, बालपणी झालेले संस्कार आणि अनुभवलेले प्रसंग, त्याचबरोबर त्यांच्या साहित्यक्षेत्रातील संपूर्ण प्रवासाचे अगदी थोडक्यात चित्रण मांडले आहे. यात मला सर्वाधिक आनंद या गोष्टीचा झाला की हे पुस्तक वाचत असताना मी त्याच शहरात राहत होतो जे शांताबाईंच्या सर्वात जिव्हाळ्याचे ठिकाण होते, ते म्हणजे त्यांचे आजोळ खेड, आताचे राजगुरुनगर. आणि त्यांची जन्मभूमी आणि मुळगाव असणारे मंचर ही देखील माझा रोजचा वावर असणारे शहर. त्यामुळे हे पुस्तक वाचताना ज्या ठिकाणी शांताबाई जन्मल्या, खेळल्या बागडल्या त्याच ठिकाणी आपण वावरतोय याचे मला कोण कौतुक वाटले. त्यांनी वर्णिणेली मंचर येथील घरची शेळकेवाड्याची जागा, उल्लेखलेली पाण्याची बारव, वेशीजवळची मशीद, साड्यांची बाजारपेठ हे शोधून त्या ठिकाणी गेल्यावर आपल्या सोबत शांताबाई पण पुन्हा या ठिकाणी वावरत आहेत असाच भास झाला. खेड मधील सिद्धेश्वराचे मंदिर, इथली बाजारपेठ, शांताबाईंच्या घरासमोरची मशीद, शांताबाईना आवडणारा नदीचा घाट आणि त्यांच्या घरापासून नदीकडे जाणारा रस्ता, या सर्व ठिकाणी मी हे पुस्तक वाचताना पुन्हा पुन्हा गेलो. डोळे बंद करून शांताबाईंचा काळ आणि त्या काळात वावरणाऱ्या शांताबाई आठवायचा प्रयत्न केला. शांताबाईंनी पुस्तकात वर्णिले आहे त्याहून काही मला नाही कल्पिता आले पण तेवढेही वर्णनातीत होते. कधीकाळी याच रस्त्याने अल्लड आणि कोणीही लहान मुलगी असेल तेवढ्या सर्वसामान्य वाटणाऱ्या शांताबाई येथून गेल्या असतील , तेथून जाण्याचे भाग्य आपल्याला लाभले यात मला जन्माचे सार्थक झाल्यासारखाचं प्रत्यय आला.
शांताबाईंनी ज्या वाचनालयातून पुस्तके घेऊन वाचली मी ही त्याचा सदस्य आहे याचेही कौतुक वाटले. मी तेथील ग्रंथपालांना विचारलेही की शांताबाईंनी त्याच्या हाताने लिहिलेले काही अभिलेख आहेत का तिथे. मला ते पहायची अनावर इच्छा होती परंतु दुर्दैवाने मला ते मिळाले नाही. मी त्या जिथे रहायच्या तिथे त्यांचे दूरचे नातेवाईक राहतात तिथे जाऊनही त्यांची एखादी वस्तू - आठवण मिळते का म्हणूनही विचारणा केली पण तिथेही माझ्या हाती फारसे काही लागले नाही. परंतु कुठे विचारायचे एवढी माहितीही या अतिसामान्य आणि त्याच वेळी असामान्य असणाऱ्या व्यक्तीविषयी आपल्याला आहे, हेच मला भाग्याचे वाटले. त्यांच्या एका दूरच्या नातेवाईकाने सांगितलेली आठवण, की शांताबाईंच्या अनेक गाण्यांचे स्फूर्तीस्थान असणारे लिंबाचे झाड या ठिकाणी होते, ते आज तिथे नसले तरी तिथे गेल्यावर मला ते डोळ्यासमोर दिसले, त्याच्या त्यांनी वर्णिलेल्या लिंबोण्या दिसल्या, अस्तित्वात नसलेला त्यांच्या मामाचा वाडा दिसला. या गोष्टीचेही मला किती अप्रूप वाटले.
धुळपाटी हे वाचनाची आवड असणाऱ्या सर्वांनी वाचावे असे पुस्तक आहे. असामान्य वाटणाऱ्या व्यक्तीही किती सामान्य परिस्थितीतून आलेल्या असू शकतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे शांताबाई. या गोष्टीचा प्रत्यय या पुस्तकाच्या प्रत्येक पानावर येतो. या पुस्तकात त्यांनी त्यांचा जवळजवळ पूर्ण साहित्यप्रवास थोडक्यात वर्णिला आहे. त्याचे वर्णन करताना त्यांच्या खाजगी आयुष्यातील अनेक गोष्टींना त्या ओघवता स्पर्श करतात पण त्या गोष्टींमध्ये त्या अडकत किंवा रेंगाळत नाहीत. त्या रमतात ते साहित्यात आणि पुस्तकातच. ज्या ज्या गावात, शहरात त्या वावरल्या त्या जागांनी त्यांना घडवण्यात कसा हातभार लावला याचे अतिशय सुंदर वर्णन त्यांनी पुस्तकाच्या पूर्वार्धात केले आहे. आणि उत्तरार्धात त्यांनी साहित्य क्षेत्रातील सुरुवातीला रसिक म्हणून आणि नंतर कवयित्री, लेखक म्हणून त्यांचा प्रवास त्यांनी उलगडला आहे. चरितार्थासाठी करावी लागलेली धडपडही त्यात आलेली आहे, पण कुठेही त्याचा बाऊ केलेला नाही. कविता, कथा, अनुवाद, गाणी, सदर लेखन या सर्व साहित्यप्रकारावर त्या बोलतात. त्यातून माझ्यासारख्या बाळबोध वाचकांना या साहित्य प्रकारांचे वेगवेगळे कंगोरे लक्षात येतात. या कारणासाठी मला हे पुस्तक फार भावले. आणि शांताबाई मला जास्त भावल्या ते संगीत क्षेत्रातील, साहित्य क्षेत्रातील उत्तमोत्तम लोकांच्या सानिध्यात राहून, त्यांच्यातीलच एक असूनही, किंबहुना त्यांच्यामधील शिरोमणीपैकी एक असूनही, एक असामान्य प्रवास पूर्ण करूनही आपल्या सामान्यत्वाला एकही तडा त्यांनी जाऊ दिला नाही, अहंकाराचा निसटता ही स्पर्श त्यांनी स्वतःला होऊ दिलेला नाही यासाठी.
या पुस्तकाच्या शेवटच्या लेखात शांताबाई त्यांनी लिखाण का केले याचे वर्णन करतात. त्यात नवाकर्षण, वातावरणाचा परिणाम म्हणून, अर्थार्जनासाठी, आप्त जणांच्या आग्रहास्तव अशा अनेक कारणांचा ऊहापोह करून त्या शेवटी फक्त त्यांना निखळ आनंद मिळतो म्हणून त्यांनी हा लेखन प्रपंच केला या निष्कर्षाला येतात. ही प्रत्येकाने मनात ठसवून घ्यायची बाब आहे, की जे काही कराल ते ते निखळ आनंद आणि समाधान मिळवण्यासाठी करा. निर्मितीच्या अत्युच्च शिखरावर जाण्याचा तोच एक मार्ग आहे. मला अगदी माझ्या जाणिवेच्या तळापासून थक्क करणाऱ्या या लेखिकेला, कवयित्रीला शतशः नमन.
-अमोल मांडवे

👌👍
ReplyDeleteThank you
DeleteNice
ReplyDeleteThank you
DeleteMast sir
ReplyDeleteThank you
DeleteKhub chan👌👌
ReplyDeleteThank you
Delete👌👌
ReplyDeleteThank you
Deleteआदरणीय अमोल सर नमस्कार,
ReplyDeleteआपण केलेले वाचन आणि त्यानंतर जिज्ञासू वृत्तीने शांताबाई शेळके यांच्या साहित्याविषयी, त्यांच्या जीवनाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी केलेले प्रयत्न खरोखरच प्रेरणादायी आहेत.
लवकरच मी देखील धुळपाटी हे पुस्तक वाचणार आहे.
वाटाड्या हे साहित्यविश्वात मार्गदर्शकाची भूमिका उत्तम प्रकारे पार पाडत आहे, यात तिळमात्र शंका नाही.
आपले मनःपूर्वक आभार!
आनंद बिराजदार
मनःपूर्वक आभार
Delete