Posts

Showing posts from February, 2019

नदी-तट

Image
  नदी- तट तू सागराच्या ओढीने भरधाव चाललीयेस तुझा क्षणभर स्पर्श पुरतो मला-नदीतटाला एरवी फक्त स्पर्शून जातेस माझं अस्तित्वच नाकारून पूर आला की मात्र घट्टमिठीत घेतेस श्वास गुदमरेपर्यंत तुझा घाम माझ्या अंगावर अत्तर म्हणून दरवळतो तुझ्या एवढ्या भेटीनेही उजाड मी बहरून जातो कधी कधी उगाचच मी वेडीवाकडी वळणे घेतो क्षणभर सहवास जास्त मिळावा म्हणून तुला अडवत राहतो कधी कधी भावुक होऊन तू देखील घुटमळतेस बेसावध क्षणी अचानक मग बांध माझे फोडून जातेस तुझ्या ओढीने रोज झुरून मी थोडा थोडा सरून जातो उद्या आणखी सरता यावे म्हणून आज थोडा उरून राहतो मग अचानक एके दिवशी पाश तोडून उफाळून येतेस आयुष्यभर पुरेल ती शिदोरी पदरी माझ्या बांधून जातेस परत तुझ्या पुराची वेडी आस धरून राहतो कवेत नसतेस येणार परि नजरेत तरी ठेऊ पाहतो तुझ्या स्पर्शाच्या खुणांना अंगांगावर कोरून ठेवतो तुझ्या गजऱ्यातून पडलेल्या फुलांनी ओंजळ माझी भरू पाहतो           -अमोल मांडवे(ACP/DYSP)