Posts

Showing posts from April, 2019

दुःख नियोग

Image
दुःख नियोग आपल्याच हातांनी  धारदार तलवार आपल्याच छातीत वीतभर भोकसावी हृदयातली पीडा रक्ताच्या धारेसह  बाहेर पडते का स्वतःच पहावं जखमेच्या पोकळीत, तलवारीच्या पात्यावर, ओघळत्या रक्तात, कोणी-काही आहे का पहावं कंठातून ओठामार्गे, डोळ्यातून अश्रूमार्गे, मज्जेतून वेदनेमार्गे, कोणी-काही जातंय का पहावं आठलेल्या रक्तात, मिटलेल्या पापण्यात, गोठलेल्या जाणिवांत, कोणी-काही उरलंय का पहावं सगळ्याची होळी करून राखेचं अर्घ्य देऊन सरिता सिंधुस मिळताच दुःख नियोग         -अमोल मांडवे(ACP/DYSP)

सीतायण

Image
सीतायण रामावर चिडणारा मी आता सीतेचा राग येतो चारित्र्याने का कुठे समाज कलंकित होतो जंगलातच राहायचं होतं तर अग्निपरीक्षा नाकारायची होती कोणीतरी बोट दाखवण्याआधी स्वतः वाट शोधायची होती मर्यादांनी बांधलेल्याकडून कशाला आधाराची अपेक्षा प्रेमापोटीच का होईना करून का घ्यावी उपेक्षा तो नायक झाला रामायण घडलं अघटिताचं पातक तुझ्या माथी पडलं पुरुषी अरेराविचा गळा तेंव्हाच घोटता आला असता तुझं नाव काढलं की कारुण्याचा वर्षाव झाला नसता तू धैर्य दाखवलंस थोडी तिडीक दाखवायचीस तू औदार्य दाखवलंस थोडी स्वार्थी बनली असतीस तुझ्या एका त्यागाने पुरुषार्थ झाकोळला स्त्रीत्वाचा मतितार्थ कालातीत डागाळला       -अमोल मांडवे(ACP/DYSP)

वर्णनात्मक पेपर मधील निबंधाची तयारी कशी करावी?

Image
वर्णनात्मक पेपर चा अभ्यास कसा करावा: वर्णनात्मक पेपर अभ्यास करायला अतिशय सोप्पा पण थोडासा tricky आहे. मराठी आणि इंग्रजी दोन्ही पेपर मध्ये निबंध, भाषांतर आणि सरांशलेखन एवढे तीनच प्रश्न असल्याने खुप अभ्यास करावा नाही लागत, परंतु यातील कोणत्याही प्रकारात एखादी लक्षात येण्यासारखी चूक झाली तर मार्क्स एकदम खूप कमी होतात. म्हणून तिन्ही बाबींचा व्यवस्थित नियोजनबद्ध अभ्यास व सराव लागतो. निबंध/ Essay:          मराठी व इंग्रजी दोन्ही पेपर मध्ये 25 मार्क्स साठी एक एक निबंध विचारला जातो. भाषा वेगळ्या असल्या तरी दोन्ही निबंधांमध्ये अपेक्षित असणाऱ्या बाबी सारख्याच असतात. त्यामुळे दोन्हीच्या अभ्यासाची पद्धत सारखीच आहे.            निबंध हा भाषेच्या पेपर मध्ये आहे, तो GS चा भाग नाही हे लक्षात घ्यावे. त्यामुळे त्यात माहितीचा भडीमार नको. तसेच GS चे उत्तर लिहितोय असंही वाटता कामा नये. स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासात आपणाला प्रत्येक गोष्टीबद्दल खुप काही माहिती असते. त्यामुळे एखादा विषय समोर येताच त्याबद्दल आपल्याला माहिती असलेले सगळे कसे लिहिता येईल याकडे आपला भर असतो. त्यामुळे निबंध हा रुक्ष

विदर्भ-संध्या

Image
विदर्भ-संध्या पालाशाच्या माथ्यावर लक्ष सूर्य मावळले पालाशाचे रंग केसरी ओठी तुझ्या अवतरले पश्चिमेला क्षितिजावर घन काळे-दाट उतरले डोंगराच्या खांद्यावर आभाळ ते गहिवरले विद्युल्लतेच्या कटाक्षाने क्षण काही उजळले घराघरातून पाड्यावर समया-दिवे पाजळले पानझडीची करडी चादर तृणांचे गालिचे पसरले शेंड्यांवरची चुकार पाने परी तयांनी नभ झाकोळले बांबूच्या बनी सळसळ वाऱ्याने सूर आळविले फांदीवर भेदरले घरटे पंख पिलांनी पांघरले दिवस रात्रीच्या प्रणयात अरण्य सारेच हरविले संध्येच्या रम्य मिठीत भावही मनीचे शहारले                          -अमोल मांडवे(ACP/DYSP)

मर्यादा

Image
मर्यादा निखाऱ्याने जळत राहावे पोलादी इराद्यांना आकार द्यावे पाणी पडण्यापूर्वीच मात्र स्वतःहून विझून राख व्हावे सूर्याने प्रखर तळपावे तृणी-पानी जीवन द्यावे ढगाने झाकोळण्याआधी डोंगराआड बुडून जावे रात्रीनेही मनसोक्त जागावे मनोमनी स्वप्न पेरावे परी ऊनं पडण्याआधी संधीप्रकाशात दडून बसावे वाऱ्यानेही वाहत जावे सागरावरी वादळ व्हावे किनाऱ्याच्या कुशीत जाता प्रेमभराने झुळूक बनावे समुद्राने सामावून घ्यावे लाटेरूपी थोडे देत जावे अमूर्त तरी अमर्यादंच तो किनाऱ्यापाशी परी नम्र व्हावे      भरभरून प्रेम करावे कोणाचेतरी होऊन जावे स्व व स्वत्व संपण्याआधीच काही पाश सैल करावे        -अमोल मांडवे(ACP/DYSP)