Posts

Showing posts with the label प्रेमकाव्य

बडबड(बायकोची)

Image
बडबड(बायकोची) (Sketch credit- Deepti Patwardhan, a friend with amazing skills with pencil and colours) किती बोलतेस अगदी कशावरूनही कधीही आणि कुठेही बऱ्याचदा उगाचच पुष्कळदा नकळत काहीवेळा असंबद्धही घडाघडा बोलतेस भडाभडा बोलतेस तडातडा बोलतेस लोकांशी बोलतेसच वस्तूंशीही बोलतेस वेड्यासारखी स्वतःशीही आईसारखं बोलतेस मुलीसारखं बोलतेस बायकोसारखं तर बापरे आनंदांत बडबड दुःखात रडारड सगळं कसं शब्दांत उत्साहात तार स्वर काळजीत कातर भावनांचा पूर ओठांत शब्दांचीच मिठी शब्दांचीच आदळआपट प्रणय तेवढा मुका तुझ्या शब्दांच्या उन्हात माझं जगणं बहरून येतं तुझ्या एवढ्याश्या अबोल्यात सारं जग अंधारून जातं        - अमोल मांडवे

तुझ्या प्रत्येक नसण्याबरोबर

Image
तुझ्या प्रत्येक नसण्याबरोबर तुझ्या प्रत्येक न येण्याबरोबर तू थोडी थोडी सरत गेलीस वाळूच्या किल्ल्यासारखी लाटेबरोबर विरत गेलीस तुझ्या प्रत्येक आठवणीसह स्वप्नांचं विश्व बहरून येतं मात्र तुझं न येणं स्वप्नांसह आणखी काहीतरी घेऊन जातं कारणं बरोबर असतीलही पण ती माझ्या प्रेमाहुन मोठी का व्हावी? चुकार ढगाने एखाद्या संध्याकाळची लाली हिरावून का न्यावी? दर वेळी तुझ्या चाहुलीने माझ्या क्षितिजावर वसंत उतरतो वाट पाहून ग्रीष्मभर तुझी, मनी कुसळांचा माळच माळ उरतो बंद पापण्याआडच्या माझ्या दुनियेत तू नित्य उत्कट भेटत गेलीस मुठीतल्या ओल्या वाळूसारखी हलकेच डोळयांसमोर निसटत गेलीस माझ्या अवकाशात विरहाचं चांदणं शिंपत गेलीस आठवणींची कवाडं तुझ्याच हाताने लिंपत गेलीस तुझ्या प्रत्येक नसण्याबरोबर तू थोडी थोडी सरत गेलीस तुझ्या प्रेमासाठी कसलेल्या शिवारात विरह पेरत गेलीस            ©अमोल मांडवे(ACP/DYSP)

नदी-तट

Image
  नदी- तट तू सागराच्या ओढीने भरधाव चाललीयेस तुझा क्षणभर स्पर्श पुरतो मला-नदीतटाला एरवी फक्त स्पर्शून जातेस माझं अस्तित्वच नाकारून पूर आला की मात्र घट्टमिठीत घेतेस श्वास गुदमरेपर्यंत तुझा घाम माझ्या अंगावर अत्तर म्हणून दरवळतो तुझ्या एवढ्या भेटीनेही उजाड मी बहरून जातो कधी कधी उगाचच मी वेडीवाकडी वळणे घेतो क्षणभर सहवास जास्त मिळावा म्हणून तुला अडवत राहतो कधी कधी भावुक होऊन तू देखील घुटमळतेस बेसावध क्षणी अचानक मग बांध माझे फोडून जातेस तुझ्या ओढीने रोज झुरून मी थोडा थोडा सरून जातो उद्या आणखी सरता यावे म्हणून आज थोडा उरून राहतो मग अचानक एके दिवशी पाश तोडून उफाळून येतेस आयुष्यभर पुरेल ती शिदोरी पदरी माझ्या बांधून जातेस परत तुझ्या पुराची वेडी आस धरून राहतो कवेत नसतेस येणार परि नजरेत तरी ठेऊ पाहतो तुझ्या स्पर्शाच्या खुणांना अंगांगावर कोरून ठेवतो तुझ्या गजऱ्यातून पडलेल्या फुलांनी ओंजळ माझी भरू पाहतो           -अमोल मांडवे(ACP/DYSP)

अपूर्णत्व

Image
अपूर्णत्व (Sketch credit: Dearest friend Amol Bhosale) बदलून गेलेल्या नदीच्या पात्रातील  सुकलेल्या ओघळांच्या ओरखड्यांसारखं पाकळ्या गळून गेलेल्या  बोडक्या हिरमुसल्या देठासारखं विधवेच्या कपाळावरील  कुंकवाच्या पांढऱ्या वणासारखं सूर्य बुडल्यावर मागे उरलेल्या निराधार निस्तेज कांतीसारखं कसायाच्या दारात सोडलेल्या वासराच्या घरच्या दावणीला राहिलेल्या दाव्यासारखं पिलं घरट्यातून उडून गेलेल्या म्हाताऱ्या जोडप्याच्या संसारासारखं लाखो श्वापदांचे अस्तित्व असूनही निपचित अरण्यातील भयाण शांततेसारखं तिची दूर जाणारी आकृती साठवत पापणीवर थिजलेल्या आसवासारखं       -अमोल मांडवे(ACP/DYSP)

तू

Image
तू सह्याद्रीच्या कड्याचा काळा पाषाण मी आणि तू समुद्राचा निळसर किनारा विशाल जटाधारी वृक्ष मी आणि तू गर्द गार सावली चंद्र गिळालेला दाट अंधार मी आणि तू चांदणं निखळ रात्रीचं  त्सुनामीच्या मागून येणारा विध्वंस मी आणि तू तिथे उमललेलं इवलंसं फुल उथळ अवखळ खळाळता ओढा मी आणि तू नदी गूढ गहिरी रसरसत्या वणव्याच्या राक्षसी दाह मी आणि तू देव्हाऱ्यातील समई अथांग अनादी वाळवंट मी आणि तू ओल्या आठवणींचा शिंपला -©अमोल मांडवे(ACP/DYSP)

निर्माल्य

Image
  निर्माल्य तुझ्या नवीन वाटेच्या सुरुवातीला माझ्या जुन्या आठवणी विसरायच्यात तुझ्या नवीन स्वप्नांच्या पहाटेत माझ्या जागून घालवलेल्या रात्री संपवायच्यात तुझ्या सुखी जीवनाच्या अवकाशात माझ्या दुःखाचं आभाळ लपवायचंय तू नदीसारखी तुझ्या समुद्राला भेटताना मला त्या डोंगरासारखं पाठमोरं व्हायचंय तू थंडीसारखी हळूहळू बहरत जाताना मला पावसासारखं अचानक सरून जायचंय तू तुझ्या कॅनव्हासवर एक एक रंग भरताना मला मात्र रोज थोडंस पुसट होत जायचंय तुझ्या पदरी कायमचा शुक्लपक्ष बांधून कृष्णपक्ष माझ्या कपाळी धारण करायचाय तुझ्या शेवटीच्या वैकुंठ वारीवेळी मला ओवाळून टाकलेलं निर्माल्य व्हायचंय     -अमोल मांडवे(ACP/DYSP)

तू माझा ध्रुव तारा

Image
          तू माझा ध्रुव तारा    तू म्हणजे पुणवेचं चांदणं जणू मंद प्रकाशाने उजळून टाकतेस पण स्पर्शाची अनुभूती मात्र टाळतेस तू अमावास्येचा अंधार जणू अगम्य गूढ आणि अकल्पित गहिरा तरीही अनुभूतीने अंतर्मुख करणारा तुझं येणं म्हणजे वावटळ जोराची तुझं माझ्याजवळचं सगळं हिरावून नेतेस जाता जाता निर्मितीचं बीज मात्र पेरून जातेस तुझं जाणं म्हणजे पावसाळ्याचा शेवट बरसनं आणि रुजणं बरोबर घेऊन जातं बहर आणि दरवळ मात्र ठेऊन जातं तुझं नसणं झोंबणारा वारा दिसत नाहीस उघड्या डोळ्यांना कधीच जाणिवेला मात्र ओतप्रोत भरून टाकतेस तुझं असणं म्हणजे मृगजळ नसतानाही माझ्या डोळ्यात असणारं मिटल्या पापण्यांच्याही पडद्यावर दिसणारं अनंत जगात, तू माझा ध्रुव तारा अढळ आहेस मनाच्या आतल्या कप्प्यात तेवढीच अप्राप्य वसुंधरेच्या अवकाशात        ©अमोल मांडवे(ACP/DYSP)

कबुली जबाब

Image
                    कबुली जबाब             (Sketch credit- Amol Bhosale, DSLR) पाऊस पण आता तुझ्याकडेच पडला माझ्याकडे येणारा ढग दारातच अडला त्यालाही भीती वाटली असेल, माझ्यासारखं चार भिंतीत अडकला तर? की बघवली नसेल माझी असहाय्यता, पावसात मनाचा माझ्या बांध फुटला तर? वाट तर मीही पहात होतोच की, पण कोणाची- पावसाची की तिची? पाऊस येणार, पाठोपाठ तिची आठवण वैतागला असेल का यावेळी पाऊस पण? पावसाशिवायपण आठवण आलीच की बेभान गतीच्या कोरड्या वावटळीसारखी "तुझ्याकडे पाठवतेय रे पाऊस", स्वतःवरच्या अजून एका कवितेचा मोह तिचा. पावसाबरोबर तिलाही मीच आठवतो, उघड उघड कबुली जबाब तिचा.             - अमोल मांडवे(ACP/DYSP)©

ऋतु

Image
ऋतु तसा प्रेमाचा कोणताही ऋतू नसतो तरी अवकाळी ढग आठवांना धुमारे आणतातच हवेतील गारवा वाढू लागला की तिच्या स्पर्शाची ऊब प्रकर्षाने आठवते नव्या पालवीची सळसळ ऐकून पैंजनाची किणकिण अजून ऐकू येते पहिल्या थेंबाबरोबर येणारा मातीचा गंध त्या गच्च मिठीच्या आठवणीत विरतो पावसासाठी झुरणारी रानपाखरं पाऊस आल्यावर पानांआड अंग चोरतात पळत येऊन मिठीत शिरणारी जणू ती स्पर्शाबरोबर लाजून आरक्त होणारी काळ्याभोर ढगांनी अंधारून येतं डोळे मिटून मग स्पर्शानेच पाहणं होतं  कोसळणाऱ्या आभाळाला न जुमानता  स्वप्नांचे इमले च्या इमले उभे राहतात पण कडाडणाऱ्या विजांची नजर लागतेच गारांबरोबर स्वप्नांचे इमलेही कोसळतात पाऊस संपता संपता गारवा संपतो उरते नुसती धग, कासावीस करणारी या पावसात जन्मलेली गवताची पाती अंकुरतात, फुलतात, टिकून राहतात तुझ्यामाझ्यातल्या अंतराला न जुमानता जिवंत असणाऱ्या आंतरिक ओढीसारखी           -©अमोल मांडवे(DYSP/ACP)

लेखणीग्रस्त

Image
    लेखणीग्रस्त जुन्या कवितांनी अलवार माझाच खून केला नव्या कवितेचा उमाळा आतच जळून गेला पहिल्या कवितेने प्रेमवीर केलं       दुसऱ्या कवितेने जणू सर्वस्व नेलं तिसऱ्यात तर झाली अब्रुची लक्तरे   पेन ठेवतो, हाती पांढरं निशाण आलं प्रत्येक कवितेला हवीच का नायिका?    दरवेळी मीच ती जगायला हवीय का? वाचणाऱ्याच्या एखाद्या शाबासकीसाठी    दरवेळी बळी मी जायलाच हवाय का? नागड्या चेहऱ्याने वावरलो आजवर, परि माझ्या अभिव्यक्तीचे मुखवटे जड जाहले कवितांच्या थारोळ्यात रक्तबंबाळ नि सुन्न मी ते रुधिरही काहींनी रंग म्हणूनी फासले कवितेचे कागद फाडून टाकले तरी ठिगळ कसं लागायचं चारित्र्याचं फुटलेलं आभाळ शब्दांनी कसं सांधायचं. माझ्यातले उरलेले "मी" पण लटकवावे फासावर की, माझ्यांनीच माझ्या "मी" चे गळे आवळलेलं पहायचं.                          -अमोल मांडवे(DYSP/ACP)

तू घरी नव्हतास म्हणून.....

Image
              तू घरी नव्हतास म्हणून......                Sketch credit: Amol Bhosale(DSLR) तू घरी नव्हतास म्हणून                     मग भिजले पावसात अंगांगावरून ओघळणारा                     तुझा स्पर्श आठवत ओठांवरच्या थेंबांना                     तुझ्या ओठांची सर नाही पण ओठांवरून मानेवर मात्र                     पाऊस तुझ्यासारखाच उतरतो थंडगार पावसात वाऱ्याची                      झुळूकही उष्ण जाणवते खांद्यांवर विसवणाऱ्या                       तुझ्या फुलत्या श्वासांसारखी भिजल्या मातीच्या गंधाला                       तुझ्या गंधाची सर नाही पदरावरून कमरेवर मात्र                       पाऊस तुझ्यासारखाच दरवळतो पैंजनावरचे थेंब                     हळुवार पायावर उतरतात केसांमधले थेंब खट्याळ,                     पाठीवर खेळत बसतात पावसाच्या वाढत्या जोराला                     तुझी सर नाही ओसरता पाऊस मात्र तुझ्यासारखाच                     माझ्या मिठीत मुरत जातो                       -अमोल मांडवे(DYSP)                  

अनोळखी वाटेवर अनामिक व्यक्तीवर अव्यक्त प्रेम

Image
अनोळखी वाटेवर अनामिक व्यक्तीवर अव्यक्त प्रेम               तुला काय वाटेल या भीतीने                        माझं वाटणं विरून गेलं पाझर फुटण्याआधीच डोळ्यातलं                        पाणी झरून गेलं 'अनोळखी पणाच्या' ग्रहनाने                        चंद्र झोकाळून टाकला 'अनामिक पणाच्या' अंतराने                        बंधही जाळून टाकला अंधाराच्या गर्दीत माझं मंद                        टिमटीमनं मुरून गेलं कालांतराने पहाट झालीही,                         पण चांदणं सरून गेलं... आपल्या तारा जुळण्याआधी तुझे सुत जुळाले आपले बोलणे होण्याआधी गीत तुझे वळाले मला 'मी' नीटसा कळण्याआधी तुला प्रेम कळाले मावळतीच्या सुर्याइतके चित्र जलद पळाले... हातपाय मारण्या आधीच                          पाणी डोक्या वरून गेलं वाचला जीव त्यातूनही पण                          मन मात्र मरून गेलं कालांतराने पहाट झालीही,                           पण चांदणं सरून गेलं... तूच एकदा म्हणालीस, बोलला नाहीस ते आधी तूच सांग आता, खरचं आली का तशी वेळ कधी मला वाटलं एकदा, वेळ आली,... पण

तुझ्यावरचा राग

Image
                  तुझ्यावरचा राग         (Sketch Credit - Amol Bhosale, DSLR) कधी कधी सकाळीच तुझा प्रचंड राग येतो वागण्याचा विचित्र तुझ्या जीवघेणा त्रास होतो एखादेदिवाशी अचानक वेड्यासारखी वागतेस ऐकायचंच नाही कुणाचं ठरवूनच टाकतेस जेवढं समजवावं तेवढा पारा चढतो शहाणपणाच्या गोष्टींनी तिढा आणखी वाढतो तुझी आदळआपट आणि माझी चिडचिड माझी आरडाओरड आणि तुझी धुसमुस मी नाष्ता न करता तसाच तडक निघतो तुझ्या ताटातला नाश्ताही ताटातंच निवतो माझा राग तो गाडीच्या दारांवर निघतो तुझा मात्र माडीच्या पायऱ्यांवर सजतो नकोशी सकाळ जाते सरून तुझ्या चुका आठवत बांध तुझाही फुटतो तू कधीचा आलेली साठवत आतड्याला पीळ पडला कि मग येते आठवण तुझी 'हॉटेलात खाऊ' ची हौस पहिल्या घासात भागते माझी तेंव्हा मला जाण होते तुझ्या अगतिकतेची कळ उठते काळजात माझ्या अहंपणाची काय हवं असतं तिला? कधीतरी तिच्या हातच्या चवीची स्तुती कधी तिने उधळून टाकलेल्या प्रेमाची नुसती पोचपावती "दमली असशील" म्हणून नकळत पुढे झालेला पाण्याचा ग्लास वॉशिंग मशीन चं चालू केलेलं बटन, ऐकून तिचा दमता श्वास कधीतरी अचानक म

डंख

                         डंख तुझीच म्हणत म्हणत दुसऱ्याची होताना ढगाआड लपत लपत चंद्र पाताळी जाताना तुझ्या पावलांचे ठसे उरतातच भल्या पहाटेच्या मंद चांदण्यासारखे तुझ्या प्रेमळ आश्वासनांचा खच पडलेला दिव्याभोवती मरून पडलेल्या चिलटांसारखा तुझ्या पोकळ काळजीचा शब्दसडा विस्कटलेला वादळाने उधळलेल्या वाळक्या कस्पटांसारखा                    तुझ्या आठवणींचा व्रण उरतोच                    अश्वत्थामाच्या भळभळत्या जखमेसारखा तुझ्या गोड हाकांचा गहिवर झालेला गाईपासून तुटलेल्या वासराच्या हंबरड्यासारखा तुझ्या हळव्या स्पर्शाचा ओरखडा झालेला काट्यांमध्ये अडकून फाटलेल्या पदरासारखा                    तुझ्यावरच्या मायेचा अंश राहतोच                    दगडाखाली गारव्याला बसलेल्या विंचवासारखा                                        डंख मारणारा.......

तुझ्या आठवणीत भिजताना

Image
                     तुझ्या आठवणीत भिजताना                         ढग दाटून आले की तुझी किणकिणणारी पैंजणे आठवतात पाऊस आणणाऱ्या ढगांसारखी ती तुझ्या येण्याची चाहूल देतात    पावसाच्या कोसळणाऱ्या सरी पाहता                        तुझे ओलेचिंब केस आठवतात    खिडकीवर ओघळणाऱ्या सरींसारखे                        ते तुझ्या चेहऱ्यावर पसरतात    मग मी खिडकी उघडून काही धारा                        चेहऱ्यावर घ्यायचा प्रयत्न करतो    तू तुझ्या केसांमधील पाणी झटकून                          जागी करतीयेस असा भास होतो.                   मातीचा गंध तुझ्यासारखाच                   मोगरा धुंद तुझ्यासारखाच     खळखळतं पाणी तुझ्या                               खिदळण्याची याद आणतं      पानांवरचं टपोरं दव                               तुझ्या डोळ्यांनीच साद घालतं.      पावसानंतरचं कोवळं ऊन                               तुझ्या लटक्या रागासारखं असतं      डोळ्यात रागाचा आव असूनही                               गालावरचं हसू काही लपत नसतं                   वाऱ्याचा स्पर