Posts

Showing posts with the label आतल्या कप्प्यातुन

उन्हाळ्याच्या संध्याकाळचा रानातला पाऊस

Image
      उन्हाळ्याच्या संध्याकाळचा रानातला पाऊस         उन्हाळ्याच्या सुट्टीत सगळ्यांनी रानात जायचंच असा शिरस्ता असणारा तो काळ होता. दिवसभर खूप काम केलं आणि घरच्यांचा मूड चांगला असला तर कधीकधी ४ चा पिक्चर बघायला घरी जायला मिळायचं. नाहीतर संध्याकाळ पण रानातच जायची. तशी रानातली संध्याकाळ मजेशीर असायची. गुरांच्या गोठ्याची सावली बॅट-बॉल खेळण्याऐवढी पुढे पडली की संध्याकाळ सुरू झाली असं म्हणायचो आम्ही. 'ऊन खाली झाल्यावर खेळा' अशा घरच्यांच्या आदेशामुळे नाखुषीने थांबवलेले खेळ पुन्हा सुरू व्हायचे. बॅटबॉल, विटीदांडू, इटकार नाहीतर मग गट्टया. कधीकधी ढेकळाच्या वावरात जाऊन एकमेकांना ढेकळे हाणत भारत पाकिस्तान युद्ध पण खेळलं जायचं.           खेळण्या बरोबर संध्याकाळची ठरलेली कामं पण असायची. पाटावर, ज्यात अख्या हयातीत कधी पाणी आलं नाही, तिथे बांधलेल्या म्हशी वर गोठ्यात आणून बांधायच्या, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेण काढणं, जे मला कधीच नीट जमलं नाही. पण काम कमी आणि पोरं जास्त असल्यामुळं काम कधी संपलं कळायचं पण नाही. उन्हाळ्याचे जवळपास सर्व दिवस थोडेफार असेच असायचे. पण एखाद्या दुपारी

उन्हाळ्याची सुट्टी

Image
                        उन्हाळ्याची सुट्टी (A Stroke of your pensil is worth a hundred words. Thank you Amol Bhosale Sarkar for such an apt sketch)       गुरुजींनी परीक्षेची तारीख सांगितली अन कुठे कुठे आंब्याच्या झाडांना मोहर लागाय सुरुवात झाली की आमच्या डोक्यात उन्हाळ्याची सुट्टी सुरू व्हायची. मागच्या वर्षीच्या उन्हाळ्यात केलेल्या आणि करायला न भेटलेल्या गोष्टींचा हिशोब लावून मग यावर्षी काय काय करायचंय याची गणितं मांडणं सुरू व्हायचं. लपवून ठेवलेले गट्टयांचे डबे, पत्त्यांचे कॅट, रबरी बॉल सगळं जागेवर आहे ना याची घरच्यांची नजर चुकवून खात्री करणं सुरू व्हायचं. घरातल्या एकूण चर्चेवरून आणि पाहुण्याच्या येण्या जाण्यावरून घरात यावर्षी उन्हाळ्यात कुणाचं लग्न होणार याचा अंदाज लावून त्यात आपल्याला काय करायचंय ह्याचं planning आम्ही करू लागायचो. तसा भर फक्त खाण्याची किती चंगळ होणार आणि नवीन कपडे भेटणार यावरच असायचा. परीक्षा मानगुटीवर येऊन बसली असली तरी पोरापोरांच्यात चर्चा सुट्टीचीच असायची. एखादा मित्र परीक्षा झाल्यावर गावाला जाणार आहे म्हणला तर त्याला आम्ही कशी लय मज्जा करणार आहोत आणि तो

मराठी शाळा

Image
                            मराठी शाळा          शाळेत असताना मनात नसताना अनेक पुस्तके वाचली आणि कित्येक पुस्तकं प्रत्यक्ष जगली. शाळेवर लेख लिहायला घेतला तर नकळत त्याचं पुस्तक होईल. तरी हा लेख लिहायचा मोह टळत नाही. शाळा तरी कुठे टळायची. जावंच लागायचं. पण ते सुरुवातीला. नंतर शाळा हेच कधी जग व्हायचं ते कळायचं नाही. अचानक घरच्यांपेक्षा जवळचं कोणी असू शकत हे कळायला थोडासा वेळ जातो पण मग घरी न बोलू शकणाऱ्या गोष्टी बोलायला आणि करायला सोबती मिळू लागले की आपलं जग पहिल्यांदा बदलू लागतं. चार भिंतींची मर्यादा गळून आयुष्यातील प्रचंड शक्यता दिसू लागतात आणि त्यांना गवसणी घालण्यासाठी लागणारं बळ, अगदी मूर्खपणा म्हणण्याइतकं वेडं धाडस या मित्रांच्या बरोबरच मिळतं.         मोठी बहीण पहिलीत होती तेंव्हा. मी अजून बराच लहान होतो शाळेत जाण्यासाठी, त्या वेळच्या मानाने. आता घरचे सांगतात याला पहिल्यापासून आवड आहे शाळेची, अडीच वर्षाचा असल्यापासून जातो वगैरे. पण याला घरी सांभाळत बसण्यापेक्षा शाळेत पाठवलेला बरा अशा प्रकाराची शक्यता नाकारता येत नाही.😀तेवढा उचपती मी असेन कदाचित. पण एका दिवशी बहिणीच्या वर्

घराचा उंबरा आणि ओसरीची पायरी

Image
                घराचा उंबरा आणि ओसरीची पायरी                                  (Sketch Credit- Amol Bhosale, DSLR😊)         स्वतःच्या बालपणीचं काही आठवत नाही, पण ते माझ्या लहान भावंडांपेक्षा फारसं वेगळं नसावं. माझा लहान भाऊ रांगत उंबऱ्याकडे जायला लागला की कोण ना कोण त्याला उचलून आत सोडायचं. पण उचलून ठेवणारा दमून गेला तरी याची उंबऱ्याकडची मोहीम अविरत चालू राहायची. मलाही एवढं आकर्षण असेल का त्या उंबऱ्याचं? आणि असेल तर ते का? उंबऱ्या बाहेरून आत डोकावणाऱ्या नाविन्यामुळे की चार भिंतीबाहेरच्या अनिर्बंध स्वातंत्र्यामुळे की अंतरीच्या अगाध अज्ञानामुळे? याची उत्तरं तेंव्हाही मला माहिती नव्हती आणि आजही नाहीत. पण उंबऱ्या बरोबरचं माझं नातं मात्र दर प्रत्येक भेटीत एका वेगळ्या रंगाने खुलत गेलं. बहिणीचा मुलगा पण उंबऱ्याकडे जायला लागला की असंच त्याला उचलून आत नेलं जायचं. पण एकेदिवशी सगळ्यांची नजर चुकवून जेंव्हा तो उंबरा ओलांडून पायरीवर जाऊन बसला तेंव्हा मात्र दोन दिवस ती कौतुकाने सगळ्यांना तेच सांगत होती. स्वतःच्या सामर्थ्यावर बाहेरच्या जगाला आपलं बाळ सामोरं जातंय याचा आनंद झाला असावा त्या

पंचवीस पैशाचं कोरं पत्र

Image
                        पंचवीस पैशाचं कोरं पत्र                            पाच पैशाला बऱ्याच 'बारक्या' गोळ्या मिळणाऱ्या वेळेची गोष्ट आहे बरं का. त्यामुळे 25 पैशाची किंमत नका करू. आणि असंही, नाही करता येणार आपल्याला त्या पत्राची किंमत. मला काय तेंव्हा येत नव्हती कोणाची पत्रं, आणि मला पत्र येण्याची वेळ येण्याआधीच या पोस्ट कार्डाचा काळ लोटूनही गेला होता. वाळू मुठीत धरली की थोड्या वेळात ती निसटून जाते हातातून, पण काही क्षणांकरिता झालेली वाळूच्या स्पर्शाची अनुभूती रहातेच आपल्याकडे. हे पोस्ट कार्ड मात्र हातात येण्याआधीच निसटून गेलं असेल अनेक जणांच्या. तो काळंच बरंच काही न मिळण्याचा होता. म्हणूनच कदाचित 'समाधानी' वृत्तीचा होता.         आमच्यात कामाला येणाऱ्या कमलाबाईने तिच्या मुलींची लहानपणीच लग्नं लाऊन दिली म्हणून शेम्बुड पुसायचं कळत नसताना देखील तिची अक्कल आम्ही काढायचो. चार मुली पोटाला आल्या म्हणून लहान वयातच त्यांची लग्नं लाऊन देणाऱ्या मजुरी करण्याऱ्या आईची अगतिकता या 25 पैश्याच्या पोस्ट कार्ड नेच आम्हाला सांगितली. एखाद्या दिवशी कामावरून आलं की ती हातात एक कोरं

अंघोळीच्या पाण्याची चूल

Image
                      अंघोळीच्या पाण्याची चूल ( Sketch Credit:- To the dear friend with magical skills Amol Bhosale. Great pencil work🙏 )          घराबाहेर न्हाणीच्या भिताडाला लागूनच मातीनं लिपलेली विटांची चूल. पहाटे केंव्हातरी(अलार्म च्या दुनियेपासून लांब) दोन पावलं पेंडंची किटली घेऊन घराबाहेर पडायची आणि दुसरी दोन पावलं घराला वळसा घालून मागच्या दाराला जाऊन, खाली लाकडाची एक ढपली लाऊन त्यावर चिपाडं ठेऊन अंघोळीच्या पाण्याची चूल पेटवायची. आणि त्या उबीत हळू हळू घराला जाग यायची. पेटवताना चुलीवरचं भगुलं मोकळंच असायचं. त्या पावलांनी संसार सुरु केला तेंव्हा पण असाच मोकळा होता की. जाळ एकदा लागला की मग कळशीनं पाणी आणून आई ते भगुलं भरायची. पुढं तिनं असाच संसार पण भरून टाकला सुखानं, समृद्धीनं. पारूसं झाडून काढे पर्यंत आणि परसाकडं जाऊन येईपर्यंत पाणी तापायचं. अंघोळ केल्याशिवाय आईला दुसरं कुठलं काम करवत नसायचं. म्हणजे अंघोळीची चूल पेटल्याशिवाय भाकरीची चूल काय पेटायची नाय.             तिला अंघोळीला पाणी काढून आई दीदी साठी पाणी ठेवायची आणि जाळ घालून ठेवायची. त्यो घातलेला जाळ विझायच्या आत

मावळतीचे रंग

Image
                               मावळतीचे रंग                     (Sketch credit: AMOL BHOSALE, DSLR THANK YOU FOR COLOURFUL SKETCH☺)       गावाला गेलो की रानातला जनावरांचा गोटा सावलीखाली घेऊन उभ्या असलेल्या लिंबाच्या झाडाखाली बसून मावळणारा सूर्य पाहण्याचे माझे वेड फार जुने आहे. आयुष्याच्या शेवटी सगळ्या गोष्टींमधला फोलपणा कळल्यावर माणूस शांत होऊन जातो आणि तरी त्याच्या चेहऱ्यावर मोक्षप्राप्ती सारखे एक विलक्षण तेज असते. मावळतीचा सूर्यही काहीसा तसाच वाटतो. डोक्यावर सूर्य तळपत असताना तो कधी पुढे सरकतोय अशी वाट पाहणारी माणसं, डोळ्यासमोर काही क्षणात डोंगराआड सरकणाऱ्या मावळतीच्या सूर्याने मात्र थोडेसे तरी रेंगाळावे अशी आशा ठेऊन असतात. आयुष्यभर भविष्याची चिंता करत दगदग करून घेणारे म्हातारे जीव सरते शेवटी उगाच जीवाला कवटाळून बसतात, आणखी काही वाढीव क्षणांच्या आशेवर. सुख कशात आहे हे तेंव्हा कळतं पण वळायला मात्र वेळ नसते राहिलेली. सूर्य डोंगराआड गेल्यावर अगदी तशीच हळहळ वाटते. पण फक्त काही क्षण. नंतर रात्रीच्या विलासी अंधारात हरवून जातो आपण.         मावळतीला पश्चिमेला रंगांच्या छटा म