Posts

Showing posts from December, 2018

निर्माल्य

Image
  निर्माल्य तुझ्या नवीन वाटेच्या सुरुवातीला माझ्या जुन्या आठवणी विसरायच्यात तुझ्या नवीन स्वप्नांच्या पहाटेत माझ्या जागून घालवलेल्या रात्री संपवायच्यात तुझ्या सुखी जीवनाच्या अवकाशात माझ्या दुःखाचं आभाळ लपवायचंय तू नदीसारखी तुझ्या समुद्राला भेटताना मला त्या डोंगरासारखं पाठमोरं व्हायचंय तू थंडीसारखी हळूहळू बहरत जाताना मला पावसासारखं अचानक सरून जायचंय तू तुझ्या कॅनव्हासवर एक एक रंग भरताना मला मात्र रोज थोडंस पुसट होत जायचंय तुझ्या पदरी कायमचा शुक्लपक्ष बांधून कृष्णपक्ष माझ्या कपाळी धारण करायचाय तुझ्या शेवटीच्या वैकुंठ वारीवेळी मला ओवाळून टाकलेलं निर्माल्य व्हायचंय     -अमोल मांडवे(ACP/DYSP)

जगावेगळी माणसं:पैलवान विकास जाधव : दुर्दम्य इच्छाशक्तीचा नवा मापदंड!

Image
जगावेगळी माणसं:पैलवान विकास जाधव : दुर्दम्य इच्छाशक्तीचा नवा मापदंड!     ट्रेनची शिट्टी वाजली आणि हळू हळू प्लॅटफॉर्म पाठीमागं सरकायला लागला. जायचं ठिकाण तेच. लहानपणा पासून खुणावणारं, किनाऱ्या वरच्या दीपस्तंभासारखं. पण यावेळी रस्ता थोडा वेगळा होता. थोडा कसला खूपच वेगळा होता. ही वाट धरली की प्रत्येक वेळी घात झाला होता. ऐन उमेद असताना स्वप्नांचा चुराडा झाला होता. दीपस्तंभ नजरेच्या टप्प्यात आला की दर वेळी समुद्रानंच नाव गिळून टाकावी असंच काहीसं होत आलं होतं. यावेळी तर नाव ही जुनी होती आणि समुद्र खवळलेला. ही नाव समुद्रात ढकलायला आता सह्याद्री एवढ्या काळजाची गरज होती.           पण आता नावेनं किनारा सोडला होता. आणि परतीचे दोर सोबत घेउन बाहेर पडणारातली जात नव्हती. ट्रेन वेगानं पुढं सरकायला लागली आणि मन वेगानं भूतकाळात मागं सरकायला लागलं.           जीव लावणारी बायको आणि लळा लावणारी पोरं, आता चांगलंच बहरलेलं घरदार, पेट्रोल पंपच्या निमित्तानं दिवसरात्र पुरेल एवढं काम, शब्द खाली पडू न देणारे गावकरी, आणि मोठ्यात मोठ्या पैलवानांचं पण आदरानं तात्या म्हणून पायाला लागणारं हात, सगळं होत

प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव कसा करावा

Image
प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव कसा करावा आपण नेहमी ऐकतो की, खूप अभ्यास केला पण मार्क कमी पडले, ऐन पेपर वेळी गडबड झाली, प्रश्नपत्रिका सोडविण्याचा खूप सराव केला पण तरी परीक्षेत गोंधळ उडाला. कशामुळे विद्यार्थ्यांना असे प्रश्न पडतात? कशामुळे सगळे करूनही यश हुलकावणी देते? याचा एक कारण असते की प्रत्यक्ष परीक्षेमध्ये जे करावे लागते त्याचा कमी सराव किंवा सरावमध्ये कमतरता किंवा चुकीचा सराव. यास्तव हे टाळण्यासाठी सराव पुरेसा आणि सरावाची पद्धत योग्य असावी. सरावाच्या योग्य पद्धतीवर प्रकाश टाकणारा हा पाठ. 1. प्रश्नपत्रिका किती व कधी सोडवाव्यात?          प्रश्नपत्रिका किती सोडवण्यात याव्यात याचे कोणतेही मापदंड नाहीत. प्रत्येकाला कमी जास्त सराव लागू शकतो. परंतु सर्वसाधारणपणे राज्यसेवेच्या सर्व प्रश्नपत्रिका सोडवून व्हायलाच हव्यात. याशिवाय पूर्वपरिक्षेनंतर प्रत्येक आठवड्यात दोन पेपर सोडवून व्हायलाच हवे. पेपर सोडवल्याने आपल्या अभ्यासाची दिशा योग्य रहाते व आपला अभ्यास योग्य दिशेने चालू आहे हे पडताळण्यास मदत होते.            बऱ्याचदा विद्यार्थी सुरुवातीला फक्त वाचन करतात व शेवटच्या महिन

तू माझा ध्रुव तारा

Image
          तू माझा ध्रुव तारा    तू म्हणजे पुणवेचं चांदणं जणू मंद प्रकाशाने उजळून टाकतेस पण स्पर्शाची अनुभूती मात्र टाळतेस तू अमावास्येचा अंधार जणू अगम्य गूढ आणि अकल्पित गहिरा तरीही अनुभूतीने अंतर्मुख करणारा तुझं येणं म्हणजे वावटळ जोराची तुझं माझ्याजवळचं सगळं हिरावून नेतेस जाता जाता निर्मितीचं बीज मात्र पेरून जातेस तुझं जाणं म्हणजे पावसाळ्याचा शेवट बरसनं आणि रुजणं बरोबर घेऊन जातं बहर आणि दरवळ मात्र ठेऊन जातं तुझं नसणं झोंबणारा वारा दिसत नाहीस उघड्या डोळ्यांना कधीच जाणिवेला मात्र ओतप्रोत भरून टाकतेस तुझं असणं म्हणजे मृगजळ नसतानाही माझ्या डोळ्यात असणारं मिटल्या पापण्यांच्याही पडद्यावर दिसणारं अनंत जगात, तू माझा ध्रुव तारा अढळ आहेस मनाच्या आतल्या कप्प्यात तेवढीच अप्राप्य वसुंधरेच्या अवकाशात        ©अमोल मांडवे(ACP/DYSP)