Posts

Showing posts from September, 2019

नाळ

Image
                                 नाळ ( Sketch credit: Amol Bhosale, someone I look up to.)           मला खरं तर आज सकाळ पासूनच काहीतरी वेगळं वाटायला लागलं होतं. आणि बाहेर बरीच गडबड पण चालू आहे हे पण कळत होतं. पण नक्की काय चालू आहे हे मात्र काहीच कळत नव्हतं. थोड्या वेळानंतर आपण आपल्या घरात नाही हे आलं माझ्या लक्षात. एव्हाना आपल्या घराशीपण नाळ जुळली होती माझी. आणि तू आणि आजी सोडली तर बाकीची माणसं पण सगळी नवीन आहेत. नक्की काय भानगड आहे. आज काही विशेष आहे का? गेल्या तीन महिन्यात बाबा भेटायला यायचे तेंव्हा असंच विशेष वाटायचं. तुला वाटायचं म्हणून मला पण वाटायचं. आज पण आलेत का बाबा? पण आज तसं काही वाटत नाही. वेगळंच आहे काही. मागे एकदा मला थोडं बरं नव्हतं वाटत तेंव्हा पण असंच काहीसं झालेलं. गम्मत बघ ना, तेंव्हा बरं मला वाटत नव्हतं आणि तुम्हा सगळ्यांना वाटत होतं की तुला बरं नाहीये. पण तेंव्हा पण एवढा गोंधळ नव्हता. आज नवीनच आहे बाबा काहीतरी.             अरे, आई तू ढकलतेय का मला? आता मी काय केलंय? आणि काही केलं असेल तर नेहमीसारखं ओरड ना, ढकलतेय का? अगं त्रास होतोय मला आणि तुला पण. काय

बडबड(बायकोची)

Image
बडबड(बायकोची) (Sketch credit- Deepti Patwardhan, a friend with amazing skills with pencil and colours) किती बोलतेस अगदी कशावरूनही कधीही आणि कुठेही बऱ्याचदा उगाचच पुष्कळदा नकळत काहीवेळा असंबद्धही घडाघडा बोलतेस भडाभडा बोलतेस तडातडा बोलतेस लोकांशी बोलतेसच वस्तूंशीही बोलतेस वेड्यासारखी स्वतःशीही आईसारखं बोलतेस मुलीसारखं बोलतेस बायकोसारखं तर बापरे आनंदांत बडबड दुःखात रडारड सगळं कसं शब्दांत उत्साहात तार स्वर काळजीत कातर भावनांचा पूर ओठांत शब्दांचीच मिठी शब्दांचीच आदळआपट प्रणय तेवढा मुका तुझ्या शब्दांच्या उन्हात माझं जगणं बहरून येतं तुझ्या एवढ्याश्या अबोल्यात सारं जग अंधारून जातं        - अमोल मांडवे

संध्याकाळच्या गोष्टी : निरोपसंध्या

Image
संध्याकाळच्या गोष्टी : निरोपसंध्या (Photo Credit: Sachin Kadam😎, SDPO Akola City)       तुला मधेच अचानक जाग आली. माझ्या श्वासांचे सुस्कारे होत असलेले ऐकू आले असतील कदाचित. तू डोळे उघडून पाहिलेस तर मी तिथेच थोडा वर सरकून बसलेलो. घरभर नजर फिरवीत. तू काय ओळखायचं ते ओळखून गेलीस. हे काय नवीन किंवा पहिल्यांदा नव्हतं.          तू तशीच माझ्या आणखी जवळ सरकून माझ्या नजरेच्या पाऊलवाटांवरून तुझे डोळे फिरवू लागलीस. मोकळ्या भिंती आणि भरलेल्या बॅगा. उद्या सकाळी निघणार होतो आपण. दर दोन-तीन वर्षानंतर निघावंच लागतं. काही वेळा निघायची इच्छा नसते तर काही वेळा कधी एकदा निघतोय असं झालेलं असतं. पण आधली रात्र मात्र नेहमी सारखीच असते. आजसारखी.          तुझं बरं असतं. तू मनाने एव्हाना आपण जाणार त्याठिकाणी पोचलेली असतेस. तिथे घर कसं असेल, कुठे काय ठेवायचं, इथे जे करता नाही आलं ते तिथं कसं करायचं, तिथल्या शेजाऱ्यांशी कसं वागायचं, तिथे बाग नसली तर कशी तयार करायची या अशा आणि आणखी कितीतरी विचारांत रमून गेल्याने तू मनातून तिथली झालेली असतेस. मग हे घर सोडताना तुला फारसं काही वाटत नसावं. की तू तसं फक्त