पाऊस.. पडायचं विसरून गेलेला

पाऊस.. पडायचं विसरून गेलेला

  
(Sketch credit-Amol Bhosale, Dy Superintendent of Land Records)

      पाऊस.. पडायचं विसरून गेलेला
      डोळ्यातला पूर ओसरून गेलेला ।।

ढग येतात दाटून पण पांढरे फिक्कट
गतप्राण डोळ्याचे तेजहीन बुब्बुळ जणू
क्षितिजावरून येताना आशा आणणारा
आईला पोटातल्या जिवाच्या पहिल्या चाहुलीसारखा

पण तू आशेबरोबर पाणी आणायला विसरून गेलेला
पुन्हा एकदा डोळ्यातला पूर ओसरून गेलेला ।।

          कडाडणाऱ्या विजांचा प्रकोप
          गडाडणाऱ्या ढगांचा प्रक्षोभ
          लतातांडवात जाणारे जीव
          छत्ररहितांची येणारी कीव

सगळं क्षम्य होतं तू आणणाऱ्या अमृतासाठी

तू मात्र आशेच्या किरणांवर ग्रहण पसरून गेलेला
पुन्हा एकदा डोळ्यातला पूर ओसरून गेलेला ।।

श्रावणात श्रावण पकडल्यासारखाच अडलास
गणपतीत गणपतीसारखाच दीड दिवस पडलास
हत्तीच्या नक्षत्रातसुद्धा रुसल्यासारखा वागलास
आभाळाची माया,धरतीचा वसा सहज त्यागलास

तरीही तुला बोल नाही लावला रे कोणी

तू मात्र हुंदकेही ऐकायचे विसरून गेलेला
पुन्हा एकदा डोळ्यातला पूर ओसरून गेलेला ।।


हातातोंडाशी आलेलं पीक मात्र अवेळी घेऊन गेलास
आईच्या लेकराचा गायीच्या वासराचा घास गिळून गेलास
कपाळावरचं कुंकू भिंतीवरच्या फ्रेममध्ये टांगून गेलास
दरवर्षीच्या वारीसारखं याहीवर्षी किती जीव लांघुन गेलास

पुढच्या वर्षी तरीही तुझ्याच वाटेकडे डोळे असतील

तू मात्र गांधारीसारखा मुद्दाम पहायचं विसरून गेलेला
पुन्हा एकदा डोळ्यातला पूर ओसरून गेलेला ।।

                                            -अमोल मांडवे

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

पंख पावसाळी

उन्हाळ्याची सुट्टी

आपल्याच मारेकऱ्यांच्या आसऱ्याला