संध्याकाळच्या गोष्ठी(१)

                  संध्याकाळच्या गोष्ठी(१)
                
SKETCH CREDIT: Amol Bhosale(Dy Superintendent of Land Records)

पावसाचे काळे ढग दाटून आलेल्या आभाळासारखे डोळे भरून आले होते, अंधारून गेलं सगळं. ओघळणारा प्रत्येक अश्रू, काळ्या ढगातून लख:कन खाली येणाऱ्या विजेसारखा, जाळून टाकणारा. प्रत्येक अश्रू बरोबर एक एक आठवण गळून पडत होती. माझ्यातली ती हळू हळू विरून झडत होती. गालावरून ओघळणाऱ्या अश्रूंच्या स्पर्शात तिच्या सहवासाची उत्कट भावना परत आठवत होती. पण गम्मत बघा ना, बरं वाटण्याआधीच तो अश्रू गालावरून ओघळून मिसळून जायचा मातीत. समोर दिसायची मग फक्त रिकामी खुर्ची आणि चहाचा अर्धा संपलेला कप. सगळा चहा संपवण्या एवढाही वेळ नव्हता तिच्याकडे. अचानक वाटलं मीच बुडतोय त्या अर्ध्या राहिलेल्या चहात, पण ते पण धुसरच दिसायचं भरलेल्या जड पापण्याआडून. आणि मग अश्रूंचा महापूर. माझ्याच मरण्यावर माझ्याच डोळ्यांनी केलेल्या आक्रोशातून. थेंब थेंब ओघळणाऱ्या आठवणी खळखळ वाहू लागल्या, गढूळ ओढ्यासारख्या. या आठवसरींना उलट-सुलट फिरवून तडाखे देणारा वारा होताच. पावसा आधीच्या वावटळीत हेलकावे खाणारं कस्पट भिजून चिखलात मिसळून जातं, भावनांच्या तडाख्यात सापडून सुम्ब झालेल्या माझ्या मनासारखं. पाण्याच्या ओघाने खचून जाणाऱ्या बांधासारखं मन पण ओरबडलं जातं. आणि मग माझा मीच विरून जायला लागतो पाऊस पडून गेल्यानंतरच्या ढगांसारखा. संपणारच होतं सगळं.

       पण एवढ्यात कोणाचीतरी नजर पडते माझ्यावर, कुठल्याशा ढगाआडून हलकेच बाहेर पडणाऱ्या किरणांप्रमाणे. माझे अश्रू पुसणाऱ्या, तिच्या उबदार स्पर्शासारख्या मंद धगीमुळे, पुन्हा ढग दाटू लागतात. अकस्मात तिने कडकडून मारलेल्या मिठीसारखी एक वीज चमकते. पुन्हा गरजू लागलेल्या ढगांमधून पण तिला माझ्या छातीतली धडधड ऐकू येते, स्पष्ट. मघाशी भरून आलेल्या माझ्या डोळ्यातील शेवटचे काही अश्रू तिने अलगद टिपून घेतले तिच्या ओठांनी. तिच्या ओठांवरील त्याच अश्रूंची चव माझ्या ओठांना मात्र सुखावणारी वाटली, पहिल्या पावसातील मातीच्या गंधासारखी. माझ्या खांद्यावर रुळणाऱ्या तिच्या केसांसारखे काळेभोर ढग पुन्हा दाटून येतात. पावसाच्या धारांबरोबर माझे हात तिच्या पाठीवरून वाहू लागतात. हेलकावे घेणाऱ्या फांद्याना पाखरं घट्ट धरून ठेवतात, अगदी माझ्या दंडामध्ये रुतणाऱ्या तिच्या नखांसारखी. मुरणाऱ्या पाण्याबरोबर दाह शांत होत जातो मातीचा, तिच्या श्वासात मिसळून मंदावणाऱ्या माझ्या श्वासासारखा. सूर्य पुन्हा ढगाआड लपतो. यावेळी चक्क लाजून. तिच्या साडीच्या पदराआड लपलेलं पाहिलं कदाचित त्याने आम्हांला.
         

Comments

  1. Amazing !!

    Paus - Nisrag ani Prem - Ekmekanmadhe titkach guntlele , kadhihi vegal na karata yenar.

    Change of mood in two paragraphs was actually appreciable. Khup mast varnila aahes tu .

    Keep writing, maja yete vachayla .

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

पंख पावसाळी

उन्हाळ्याची सुट्टी

आपल्याच मारेकऱ्यांच्या आसऱ्याला