डंख

                         डंख

तुझीच म्हणत म्हणत दुसऱ्याची होताना
ढगाआड लपत लपत चंद्र पाताळी जाताना
तुझ्या पावलांचे ठसे उरतातच
भल्या पहाटेच्या मंद चांदण्यासारखे

तुझ्या प्रेमळ आश्वासनांचा खच पडलेला
दिव्याभोवती मरून पडलेल्या चिलटांसारखा
तुझ्या पोकळ काळजीचा शब्दसडा विस्कटलेला
वादळाने उधळलेल्या वाळक्या कस्पटांसारखा
                   तुझ्या आठवणींचा व्रण उरतोच
                   अश्वत्थामाच्या भळभळत्या जखमेसारखा

तुझ्या गोड हाकांचा गहिवर झालेला
गाईपासून तुटलेल्या वासराच्या हंबरड्यासारखा
तुझ्या हळव्या स्पर्शाचा ओरखडा झालेला
काट्यांमध्ये अडकून फाटलेल्या पदरासारखा
                   तुझ्यावरच्या मायेचा अंश राहतोच
                   दगडाखाली गारव्याला बसलेल्या विंचवासारखा
                   
                   डंख मारणारा.......

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

पंख पावसाळी

उन्हाळ्याची सुट्टी

आपल्याच मारेकऱ्यांच्या आसऱ्याला