तिच्या घराचा ओटा: भाग 1

                     तिच्या घराचा ओटा: भाग 1
                 
        (Sketch Credit - Amol Bhosale, DSLR)

        आयुष्याची नवीन सुरूवात करत होतो. नवीन सुरूवात नविन घरात करायची असच दोघांनी ठरवलेलं. घर अगदी तिला हवं तसं बनवत होतो. समोर मोठा ओटा हवा होता तिला-संध्याकाळी बसायला आणि मुलांना खेळायला.  बसून राहिली होती दिवसभर ओटा बांधून होईपर्यंत. नुसता सूचनांचा भडीमार. गवंडी वैतागले होते तिला अक्षरशः. म्हणायची देवघर छोटं पण प्रसन्न असावं. मोठी परसबाग लावली तिने तिच्या हातानेच. सगळ्यांची नजर चुकवून यायची ती झाडे लावायला. मोगरा आणि निशिगंध तिच्या विशेष आवडीचा. मला मोठी झाडे आवडतात म्हणून तीही लावली तिने चारी कोपर्यावर. आणि त्यांच्या बाजूने बाकीची फुलझाडे. म्हणायची तुझ्या झाडाशेजारी माझी रोपटी कशी भराभर वाढतील आणि फुलतिल.
          सगळ्या परसबागेत तिच्याच पावलांचे ठसे उमटले होते. मी कधी गेलो तरी ते पुसले जाणार नाही याची काळजी घ्यायचो. घराचं काम चालूच होतं. ती भिंतीवरून हात फिरवायची आणि हळवी व्हायची. सारखा आपला घर आपला घर चा जप चालायचा. ओल्या भिंतीवर हाताचे ठसे उमटवायची तिला भारी हौस. लाडात आली की म्हणायची हे माझं घर आहे, जास्त नाटकं केलीस तर आत येऊ नाही द्यायची. आणि मग हळूच हलकं हसून म्हणायची, तेंव्हा तू ओट्यावर झोप.
        बघता बघता घर बांधून झालं. वाटलं आयुष्यभराच्या शिदोरीचं पीठ रांधून झालं. ती आज येणार होती, भिंतींवर कुंकवाच्या हाताचे ठसे उमटवायला. सर्वस्वी माझी व्हायला. आज तिला लपून नव्हतं यायचं.
        सकाळची दुपार झाली आणि दुपारची संध्याकाळ. मी ओट्यावरच बसून होतो तिची वाट पाहत. डावीकडे अंधारातून उमटलेली माझी सावली उजवीकडे अंधारात विलीन झाली. आशा अजून होतीच कारण विश्वास होता. तिचं शरीर यायचं होतं, जीव तिचा तिथेच तर होता. नाही आली ती. सकाळी उठून परसबागेत गेलो तर कोणीतरी सगळी फुले तोडून नेलेली. माझा चेहरा मग मात्र फुलला. लबाड पाठीमागून येऊन फुले घेऊन गेली. मला उगाच त्रास देण्याची तिला गम्मत वाटायची आणि मलापण. मीही काही कमी नव्हतो. रात्रभर परसबागेतच बसलो म्हटलं सकाळी चोराला रंगेहात पकडतो. पण फुल फुललीच नाहीत. म्हणजे काल पण ती फुलली नव्हती.
          कशी फुलतील. ती गेली होती. सगळं बरोबर घेऊन. बागेतली फुलं, ओट्यावरचा विसावा, पावलांच्या खुणातला स्पर्श, देवघरांमधले देव, भितींमधला जिव्हाळा, माझी स्वप्न, माझं सत्व. तिचं घर आता फक्त माझं राहिलं होता. माझ्यामध्ये मात्र माझं म्हणावं असं काही राहिलंच नव्हतं. ओट्यावरचं झोपतो आता कधीतरी ती आतून दार उघडेल आणि आत घेऊन जाईल.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

पंख पावसाळी

उन्हाळ्याची सुट्टी

आपल्याच मारेकऱ्यांच्या आसऱ्याला