तिच्या घराचा ओटा: भाग 2

                     तिच्या घराचा ओटा: भाग 2
                      
(Thank you Amol Bhosale(DSLR) for such a wonderful sketch. You make the article worth it.)

        ओट्यावर झोपून होतो. आजूबाजूला पाडलेला वाळक्या पानांचा सडा दूर करावा एवढाही उत्साह नव्हता. सहा महिने बंद असलेल 'तिच्या' घराचं दार आजही बंद होतं. मातीत दिसणाऱ्या खुणांवरून कळत होतं की घर आता रिकामं नाही. साप, विंचू , पाली यांचा वावर असणार. एके दिवशी अगदी उशालाच चांगली तीन फूट कातण सापडली. पण बरंय, एकट असण्यापेक्षा सोबत बरी. सोडून जाणाऱ्या माणसांपेक्षा न मागता साथ देणारे प्राणी काय वाईट. आणि असाही मी तक्रार करण्यापलीकडे गेलो होतो. 
    दाढी वाढली होती, करायला वेळ नव्हता असं नाही. स्वतःच्याच दुःखाच्या तिव्रतेची स्वतःलाच जाणीव करून देण्याचा केविलवाणा प्रयत्न. रात्री जे लोक पाहायचे ते वेडाच म्हणायचे.  सुरुवातीला काही वेळा तर एका आजीबाईने जेवण आणून दिलं. हळू हळू कळलं लोकांना कि हे ते 'वेड' नव्हे. सकाळी ऑफिस ला गेल्यावर मात्र वैयक्तिक वेदनांची पुसटशी देखील खून नाही दिसायची. बरं वाटायचं. रात्री ऑफिस का सुरु नसतं असं व्हायचं. बसून पाहिलं एकदा रात्री पण ऑफिस मध्ये, पण त्या ओट्याची ओढ काही बसू देईना. शेवटी भल्या पहाटे का होईना पण गेलोच. पाठ टेकली आणि मगच झोप लागली. 
    आजची रात्रही नेहमीसारखीच गेली, पण पहाटेमात्र कसल्याशा ओळखीच्या पण विस्मृतीत गेलेल्या गंधाने जाग आली. पहाटेच्या हवेतला गारवा पण आज जरा जास्तच होता. डोळे उघडले तर सुर्योदयापूर्वीच्या मंद प्रकाशात कोपर्यातल्या गुलमोहरावर एक लाल ठिपका दिसला. पहिल्यांदाच गुलमोहर फुलला होता, ती गेल्यापासून. तिच्या जाण्याची खंत बाजूला सारून आयुष्यात पुढे जाण्याचा गुलमोहराचा निर्णय झाला होता बहुतेक. मला मात्र अजून तेच दुःख कवटाळून बसावंस वाटतं होतं. खरच आपण वाट पाहतो आनंदाची पण कोणालाच आपण दुःखाइतकं जवळ नाही करत. 
      ताडकन उठलो आणि सरळ परसबागेत गेलो, खूप दिवसांनी. प्राजक्त पण नवीन पालविने नटला होता. चाफ्याच्या शेंड्यावर दोनच फुलं दिसत होती, नुकत्याच जन्मलेल्या बाळाच्या डोक्यावरील केसांसारखी. तो ओळखीचा सुगंध होताच पण तो काहीतरी नवीन ओळख पण सांगतोय कि काय असं वाटत होतं. इतक्यात दिसले त्याच पावलांचे ठसे. सहा महिन्यापूर्वी दाराच्या आत ओल्या सिमेंट वर माझ्या पावलंशेजारी उमटलेल्या पावलांचे. पण ते आजचे होते कि जुने ते कळेना. मागे एकदा माझ्या इतकीच भाबडी आशा ठेऊन चोरांनी तोडलेला दरवाजा आज परत उघडा दिसला. एक वेगळीच भावना. ती आली की काय म्हणून होऊ पाहणारा आनंद, पण त्याला तितक्याच ताकदीने मागे सारणारे मनात घर करून बसलेले दुःख. नाही झालं धाडस, घरात जाऊन त्याचं रिकामंपण अंगावर घ्यायचं.
       मनाचा तरी काय दोष. बागेतील पुसट होत चाललेल्या तिच्या पावलांच्या ठशांबरोबर तिच्या परत येण्याची आशा मावळली होती. आज बागेला फुटलेली नवी पालवी पाहून मात्र माझ्या जिवंत असण्याला परत जगणं बनवावं असं वाटलं. पण क्षणभरच. मी पाहिलेल्या स्वप्नांमध्ये तिने भरलेले रंग कधीचे उडून गेले होते. आता उरलं होतं एक फसलेलं चित्र. आशेच्या पालविला निराशेने तिलांजली देऊन परत मार्गी लागलो जुन्या घराच्या, आवरून ऑफिस मध्ये जाण्यासाठी. 
       आज ऑफिस मध्ये लक्ष लागलंच नाही. ऑफिस सोडताना जड होणारी पावलं आज कसल्याशा ओढीनं चालली होती 'तिच्या' घराकडे. खरच आशेवर जग 'चालतं'. खरंच ती आली असेल तर ओट्यावर बसून वाट पाहत असेल. ओट्यावरील धुळीबरोबर गुजगोष्टी करणारी पळसाची पानं पाहून पावलातली ओढ, डोळ्यातील चमक, मनातली हुरहुर जळून गेली. 
       कसातरी पोचलो आणि टेकवली पाठ ओट्यावर आणि आभाळाकडे पाहत बसलो. एकही चांदणी दिसेना. कशाने झाकले त्यांना, दाटलेल्या ढगांनी कि मनातील मळभाने? डोळे लागतंच होते तोच पावसाची एक जोरदार सर आली. फिरता वार्याबरोबर पाणी अंगावर येऊ लागलं. मी तिथेच पाय दुमडून बसू पाहत होतो. भिजू नये म्हणून. पहिला पाऊस आणि अंग चोरणारा मी. तिने पाहिलं असतं तर कीव केली असती तिने. दोन्ही हात पसरून पाऊस अंगावर घेणाऱ्या मला पाहत बसणं तिला आवडायचं खूप. मी भिजायचं आणि तिने ओट्यावर बसून पाहायचं. किती ती स्वप्ने. वास्तव हे कि पहिल्या पावसात अंग चोरून बसलेला मी, तिने दार उघडण्याची ठार वेडी आशा ठेवलेला. डोळ्यातून नकळत बाहेर आलेला अश्रू पावसाच्या पाण्यात अलगद विराघळनार एवढ्यात कडी वाजली आणि दार उघडलं, आतून. मग पैंजनांची हलकीशी किनकिन. मग माझ्या केसांमधून फिरून मानेवर विसवणारी शिडशिडीत बोटे. आणि माझ्या गालावरील माझे अश्रू पुसणाऱ्या हाताला चुकवून माझ्याच गालावर पडणारे तिचे अश्रू. उचंबळून आलेली ती आणि जाणिवांच्या पलीकडे गेलेला मी. 
      शेवटी ती आली होती तर. 

Comments

  1. Shevati virah sampla..PN ti kuthe geli hoti???

    Drawing...ek no...

    ReplyDelete
  2. Sundar - Pahila bhag vachun man vishanna zal hot.

    Dusrya bhagacha shevat kalpnik vatala. Vastav aayushyat as kahi zal tar swapnavatach.

    Sundar lihil aahes.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

पंख पावसाळी

उन्हाळ्याची सुट्टी

आपल्याच मारेकऱ्यांच्या आसऱ्याला