"लवकर सेटल व्हायचंय?" मग नक्की वाचा.

           "लवकर सेटल व्हायचंय?" मग नक्की वाचा.
           

[Sketch credit goes to a dear friend, Amol Bhosale(DSLR), who has amazing command over lines and he can put life into anything. Will always be grateful.☺]


          दिवसेंदिवस मागे सरकून 'विमानतळाला' जागा करून देणाऱ्या 'केशसंभारा'वरून हात फिरवताना सहजच वृत्तपत्रातील त्या जाहिरातीवर लक्ष गेलं, "'well settle' असलेला मुलगा पाहिजे." लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या रणकुंडात उडी घेतली असल्याने तसा 'सेटल' होण्याशी अजून विशेष संबंध आला नव्हता. पण 'सेटल' होणे म्हणजे नक्की काय? या प्रश्नाने मात्र तेंव्हापासून अगदी पिच्छाच पुरवला.
         माझे तेंव्हा engineering कॉलेजला admission झाले तेंव्हा शेजारचे काका म्हणाले होते, 'अरे या कॉलेज ला प्रवेश मिळाला म्हणजे तू आता सेटल झालास असेच समज.' म्हणजे 'कॉलेज ला प्रवेश मिळणे' हे सेटल होण्याचे पहिले परिमाण. टाटा मोटर्स ची नोकरी लागली तेंव्हा बरेच जण म्हणाले, 'एवढ्या नामांकित कंपनी मध्ये नोकरी लागली म्हणजे आता तू सेटल झाला.' म्हणजे नोकरी हे सेटल होण्याचे दुसरे परिमाण. पण नोकरीच्या पहिल्या काही महिन्यातच अंदाज आला की एवढ्या पगारात जर गाडी, घर घ्यायचे झाले तर अर्धे अधिक आयुष्य हफ्ते भरण्यातच जाणार आणि मग तेंव्हा कुठे आपण 'सेटल' होणार. मग सेटल होण्याचा एक शॉर्टकट सुचला. चला म्हटलं लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊ. एका झटक्यात सरकारी घर आणि गाडी! डोक्याला तापच नको. दोन वर्षात सेटल! पहिल्या परिक्षेतच कळून चुकलं की आपण ' शॉर्टकट' ने सेटल व्हायच्या नादात बरेच 'अनसेटल' झालोय ते. 
         पण तोही प्रश्न सुटला. सुदैवाने दुसऱ्याच वर्षी परीक्षा पास झाल्यामुळे गाडी आणि घराचा प्रश्न तरी सुटला. निकालाची गोड बातमी देण्यासाठी आईला केलेला फोन ठेवण्याआधीच आईने कळवले, "अरे एक स्थळ आलंय, मुलगी बघून घे. तुझे 'दोनाचे चार' हात होऊन तू 'सेटल' झाला की आम्ही मोकळे!" सेटल होण्यासाठी चार हात लागतात हे तेंव्हा कळाले. 
          सेटल होण्यासाठी शॉर्टकट ची आता सवय झाली होती जणू. म्हणून तर पहिलीच मुलगी पसंद करून लग्न केलं आणि एका वर्षाच्या आत दोनाचे तीन होण्याचा पराक्रमही केला. वाटलं 'आता तरी आपण झालो की नाही सेटल?' पण नाही! हे सेटल होण्याचं कोडं काही सुटत नव्हतं. त्याचे परिमाण बदलतच चालले होते. एका टप्प्याच्या जवळ जावं तर हे सेटल होणं माकडासारखी उडी घेऊन पुढच्या टप्प्यावर जाऊन बसायचं. असे अनेक टप्पे आले आणि गेले , मुलांचं शिक्षण, त्यांची लग्न, त्यांचं सेटल होणं या सगळ्यात कुठेतरी माझं सेटल होणं राहूनच गेलं. 
        आज वयाच्या 84 व्या वर्षी मृत्युशय्येवर पडलो असताना सेटल झाल्याची भावना जरा बळावली. कारण हातापायांची हालचाल तर बंदच होती, अन्नपाणीही नलिकेद्वारे जातंय पोटात. श्वास घेतानादेखील छातीच्या पिंजऱ्याचं वर खाली होणंही बंद झालंय. त्यावेळी वाटलं, 'चला सरतेशेवटी का होईना पण सेटल झालोच'. सेटल झाल्याचा आनंद 'जीव सोडून' साजरा करावा म्हटलं कारण तेवढीच गोष्ट आता करण्यासारखी राहिली होती. वैकुंठनगरीतून माझ्या वाटेकडे डोळे लाऊन बसलेल्या माझ्या सौभाग्यवतीच्या फोटोचा शेवटचा निरोप घ्यावा म्हणून डोळे भिंतीकडे वळवले आणि हिरव्यागार नऊवारीत वटपौर्णिमेसाठी नटून तयार झालेल्या सौंच्या फोटोकडे पाहून आठवले की, या बाईसाहेबांनी अजून 'सहा जन्म' आपल्याला सेटल न होऊ द्यायचं व्रत केलंय. झालं! मरणानंतरही सेटल होण्याचा प्लॅन पण रद्द!
          त्यावेळी वाटलं, का पळालो आपण सेटल होण्याच्या पाठीमागे? नुसती वणवण झाली. का नाही सगळ्या गोष्टींमध्ये त्या-त्याच वेळी आनंद मानला? आताच्या लग्न करून किंवा नोकरी मिळवून सेटल होण्यापेक्षा, जसे जुन्या पिढीचे लोक म्हणायचे तसं लग्न करून किंवा नोकरी मिळवून 'मार्गी लागणं' जास्त चांगलं नाही का? खरंच का व्हायचं सेटल? गाळासारखं? शेवळाची पुटं चढायला? त्यापेक्षा प्रवाहीच राहूया ना, खळखळत्या पाण्यासारखं! रोज नवीन अनुभवांचा शोध आणि आनंद घेत. प्रत्येक वळणावर छोटा विसावा घेऊ हवा तर पण हे सेटल होणं नको. एकच तर छोटंसं सुंदर आयुष्य आहे, 'सेटल होऊन ते आणखी छोटं आणि निरस का करायचं? 
                    -अमोल मांडवे(DYSP)

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

पंख पावसाळी

उन्हाळ्याची सुट्टी

आपल्याच मारेकऱ्यांच्या आसऱ्याला