स्पर्धा परिक्षेची तयारी करताय, मग या गोष्टी टाळा : भाग 1

स्पर्धा परिक्षेची तयारी करताय, मग या गोष्टी टाळा: भाग 1

         स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आणि त्यात प्रत्यक्षात यशस्वी होणाऱ्यांची संख्या पाहता 1000 जणांत 1 जण यशस्वी होतो. यशाची आणि अपयशाची कारणे व्यक्तिपरत्वे वेगवेगळी असतात परंतु काही अशा गोष्टी आहेत ज्या आपल्या आणि यशाचा मध्ये अडथळा निर्माण करू शकतील किंवा आपले यश लांबवू शकतील. म्हणून स्पर्धा परीक्षेची तयारी करताना काही गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात. तशा काही गोष्टींचा हा उहापोह करण्यासाठी एक नवीन लेखांची मालिका लिहित आहे.
          या लेखांच्या मालिकेतला हा पहिला लेख. असे एका लेखामध्ये एक किंवा दोन गोष्टींवर चर्चा होईल. नजीकच्या काळात परीक्षेचा कोणता टप्पा जवळ आहे त्यानुसार या बाबींचा क्रम ठरविला आहे. मुख्य परीक्षेचा अपेक्षित असलेला निकाल व मुलाखतीची तयारी अशा वेळीची विद्यार्थ्यांची मानसिकता लक्षात घेऊन लिहिलेला लेख.

1. मुख्यपरिक्षेच्या Key नुसार येणाऱ्या मार्कांवरून पोस्ट मिळणार की नाही, कोणती मिळू शकते याची गणिते मांडत बसणे-
         मुख्य परीक्षा झाली की लगेच आयोगाची answer key येते आणि किती मार्क पडतील याचा अंदाज सगळ्यांना येऊन जातो. तसेच आजकाल classes चे network आणि whatsapp सारख्या माध्यमांमुळे कोणाला किती मार्क पडतील हे सर्वांना कळते. त्यामुळे Cutoff चा एक ढोबळ अंदाज येतोच आणि आपण cutoff च्या जवळपास आहोत की कसे याचाही अंदाज येतो.
          खरे तर यामुळे anxiety, tension कमी होण्यास मदत होते, निकालाचा अंदाज घेऊन पुढचा प्लॅन करणे सोप्पे जाते. मुलाखतीची तयारी तसेच पुढच्या इतर परीक्षांची तयारी याची दिशा निश्चित करता येते. पण काही वेळा हे नुकसानकारक देखील ठरू शकते. होते असे की काही क्लास मधील स्वतःला सर्वज्ञानी समजणारे शिक्षक या मार्कांवरून कोणाला कोणती पोस्ट मिळणार हे अगदी ठरवूनच टाकतात. मग यात ये काठावर असतात त्यांच्या आत्मविश्वासावर पाणी फेरण्याचे कामही ते बेधडक करतात. यामुळे होते असे की cutoff च्या जवळ पास असणाऱ्यांना असे वाटते की आपणास क्लास 1 पोस्ट मिळणे शक्य नाहीच आणि क्लास 2 पोस्ट मिळणे देखील अवघड आहे. असे लोक एकतर अभ्यास करणे सोडून देतात किंवा आपण होऊ की नाही याचा गरजेपेक्षा जास्त विचार करत बसतात. यातून निष्पन्न एकचं होते की त्यांची मुलाखतीची तयारी कमी होते आणि आपसूकच मार्क कमी पडल्याने त्यांना पोस्ट मिळणे अवघड जाते. 
          याउलट हे लक्षात घेणे गरजेचे आहे की, answer key नुसार काढलेले गुण काही अंतिम नाहीत. एकतर दरवर्षी पहिली key आणि Final key यामध्ये खूप फरक पडून अगदी 10-15 मार्क वर-खाली झालेले दिसून येतात. आणि स्पर्धापरिक्षेत प्रत्येक मार्क महत्वाचा असतो. एका एका मार्कांत पास की नापास किंवा कोणती पोस्ट मिळणार यात फरक पडतो. त्यामुळे Cutoff च्या जवळ असणारांनी, किंवा अगोदर क्लास 2 पोस्ट असून क्लास 1 साठी प्रयत्न करणारांनी पहिल्या किंवा अंतिम key वरून स्वतः किंवा कोणाच्या सांगण्यावरून आपले काय होणार हे ठरवून टाकू नये. सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन सर्वोत्तम शक्यतेसाठी प्रयत्नशील रहावे. 
         Answer key वरून लगेच कोणत्याही निर्णयाप्रत न येण्यामागे पुढील घटक देखील महत्वाचे आहेत. जसे की आपणाला मराठी आणि इंग्रजीच्या लेखी पेपर चे मार्क माहिती नसतात. त्यातील मार्कंमुळेही अनेक गणिते वर खाली होऊ शकतात. मला स्वतःला सहाय्यक निबंधक सहकारी संस्था ही पोस्ट मिळाली तेंव्हा मुख्यपरिक्षेत इतके कमी मार्क होते की एका क्लास मधिल शिक्षकाने मला कोणतीही पोस्ट मिळणार नाही असेच सांगून टाकले. परंतु तेंव्हा मराठी-इंग्रजी मध्ये मला 200 पैकी 130 मार्क मिळाले आणि मला बऱ्यापैकी वरच्या preference ची पोस्ट मिळाली. म्हणून मग मराठी-इंग्रजी च्या लेखीच्या गुणांना दुर्लक्षित करू नये.
          तसेच, बऱ्याचदा असे दिसून आले आहे की अनेक विद्यार्थी answer key पाहिल्यानंतर खोटे मार्क्स सांगतात. मार्क फुगवून सांगण्याची काही लोकांना सवय असते. त्यामुळे उगीचच cutoff चा अंदाज देखील वर जातो आणि त्याच्या जवळपास असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे दर वर्षी आपण पाहतो की पहिल्या दहा-पंधरा मध्ये येण्याइतका score सांगणारे विद्यार्थी अंतिम यादीत कुठेच नसतात. त्यामुळे answer key नंतर निघणाऱ्या cutoff च्या अंदाजवर 100% विश्वास ठेऊन चालणार नाही.
          तसेच प्रत्येकाने दिलेले वेगवेगळे post preferences, उपलब्ध जागांमधील वैविध्य, आरक्षणाच्या आकडेवारीची गुंतागुंत यामुळे निश्चित असे काहीच सांगता येत नाही. उदाहरणार्थ, answer key नुसार काढलेल्या गुणांवरून माझ्या एका मित्राला क्लास 2 पोस्ट तरी मिळते की नाही असा प्रश्न होता, परंतु अंतिम यादीत तो Deputy CEO या क्लास 1 पदासाठी निवडला गेला. मला स्वतःला 381 मार्क्स असताना 400 च्या वर खूप लोकं आहेत असे key वरून समजत होते. तेंव्हा मला DYSP पोस्ट मिळणे कठीण वाटत होते परंतु अंतिम यादीमध्ये 30 DYSP जागांमध्ये मला तिसरी जागा मिळाली. 
        इतका फरक पडू शकतो म्हणून answer key वरून ढोबळ अंदाज काढावा परंतु अंतिम काहीही ठरवून टाकू नये. इतरांचे सल्ले देखील फार seriously घेऊ नये. आपला best chance काय आहे तो समोर ठेऊन प्रयत्न करत रहावे. Answer key च्या अंदाजाचा जेवढा सकारात्मक उपयोग करता येईल तेवढा करावा आणि नाकारात्मकतेच्या जाळ्यात अडकणे कटाक्षाने टाळावे.

                        -अमोल मांडवे(परि. पोलीस उपअधीक्षक)

Comments

  1. Yes thats the reality.. plz continue the series..

    ReplyDelete
  2. मस्त सर, पुढील लेखनाची आम्ही वाट बघत आहोत

    ReplyDelete
  3. पुढील दिशा आणि अवास्तव ताण नाहीसा होण्यासाठी उपयोगी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर!

    ReplyDelete
  4. Sir interview preparation tips videi banva .tumch mains prapation cha video khup helping tharala .

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

पंख पावसाळी

उन्हाळ्याची सुट्टी

आपल्याच मारेकऱ्यांच्या आसऱ्याला