पहिला पाऊस, पहिलं प्रेम आणि पहिला स्पर्श

           पहिला पाऊस, पहिलं प्रेम आणि पहिला स्पर्श.   
         
                    


(प्रास्ताविक: प्रस्तुत लेखामध्ये दोन कथांचे समांतर सादरीकरण केले आहे. एकी मध्ये जमिनीला ढगाबद्दल वाटणारी ओढ, तर दुसरीमध्ये मुलाचे एका मुलीवरील प्रेम दाखवले आहे. जमिनीच्या आणि मुलाच्या, दोघांच्या भावनांतील सारखेपणा दाखवण्यासाठी, दोघांकरिता एकाच अर्थाची दोन वेगवेगळी वाक्ये वापरली आहेत. 'ती' हे जमिनीसाठी आणि 'तो' हे मुलासाठी वापरले आहे.)

        'ती' झाडांच्या वाळक्या आणि गळक्या पानांचा आश्रय घेत होती, आणि 'तो' पेन आणि कागदाचा.
         'ति'ला ग्रीष्माच्या दाहकतेची पर्वा नव्हती, पण 'ति'ला त्या ढगाचा विरह सहन होत नव्हता. 'ती' त्याच्याकडे आशाळभूत नजरेने याचना करीत होती, काही थेंबांची. पण तो त्याच्या असंख्य थेंबरूपी नेत्रातून फक्त अहंकारी कटाक्ष टाकत होता, 'ति'च्याकडे. त्याच्याजवळच्या असंख्य थेंबापैकी काही 'ति'ला हवे होते, कारण भाळली होती 'ती' त्याच्यावर. कित्येक दिवस तिष्ठत होती, त्याची वाट बघत. पण एवढाच तिटकारा वाटत होता तर मग सुर्याआड येऊन काही क्षणांकरिता का होईना, दोघांच्या सहअस्तित्वाची गोड स्वप्ने त्याने 'ति'ला दाखवावीतच का?
         एकटेपणाशी 'तो' अनोळखी नव्हता पण पहिल्यांदाच त्यानं कोणाच्यातरी सोबतीचं स्वप्न पाहिलं होतं. एवढी वर्षे 'तो' तिचीच वाट पहात होता हे त्याला जाणवलं होतं. तिच्यासाठी स्वतःच्या स्वाभिमानाच्या 'कस्पटला' तुडवून 'तो' मैत्रीचा हात पुढे करून उभा होता, पण स्वतःच नाव सांगावं इतकीही उत्कटता तिला जाणवली नाही त्याच्या भावनांत. तिच्या जाणिवेने 'त्या'च्या रक्तातून शब्द स्फुरू लागले होते, पण ते तिच्या श्वासांवरदेखील तरंग निर्माण करण्यास असमर्थ होते. 'त्या'ला स्वीकारण्याची हिम्मत नव्हती, मग तिनं त्याचं फूल स्वीकारून कीव तरी का करावी त्याची?
           'ती' तिच्या मर्यादा जाणते. नसेल नव्हे, नाहीच ती कोकणा इतकी सुंदर, पण पिकांचे, धान्यांचे डोंगर उभे करते ती. 'तो' ही कोणी मदन नाही, पण पर्वताएवढा निश्चयी आणि समुद्राएवढा अथांग तो ही आहे. सर्व आहे 'ति'च्याजवळ, पण पावसाच्या धारांशिवाय 'ती' बहरू शकत नाही. शब्द खूप आहेत 'त्या'च्याजवळ, पण तिच्याशिवाय त्या शब्दांची कविता होत नाही. 'ती' केंव्हाची तयार आहे चिंब होण्यास, पण त्याला बरसावंच वाटत नाही. आपल्या प्रेमाची फुलं ओंजळीत घेऊन 'तो' ऊभाय केंव्हाचा, पण त्यांचा सुगंधही घ्यावासा वाटत नाही तिला. तो ढग दाटून येतो आणि फक्त गरजून जातो. तीही येते, पण देऊन जाते स्वप्न, कधीच पूर्ण न होणारं. 'ति'ला वाटतं, हे सगळं सांगावं त्या ढगाला. म्हणून ती वादळं उठवते, धुळीची. पण वारा या धुळीच्या लोटांना अडवतो,मधेच आणि फरफटत नेतो कुठेही. 'त्या'लाही वाटतं सगळं सांगावं तिला, पण त्यालाही भीती वाटते, कोणी त्याची स्वप्ने मोडणार तर नाही? ग्रीष्मानं 'ति'ची लाही लाही केली आहे, याची 'ति'ला जाणीवचं नव्हती, तो ढग तिच्यावर सावली धरेपर्यंत. 'त्या'च्या हृदयात एवढ्या हळव्या भावना भरल्यात, हे 'त्या'लातरी कुठं ठाऊक होतं, ती समोर येण्याअगोदर. मंद झुळूक आली तरी 'ती' प्रतिसाद द्यायची, पानांची सळसळ करून, पण आता थैमान वारा असूनही ती निश्चल होती. चंद्राच्या कोरीच्या सौन्दर्यावर भाळलेल्या 'त्या'ला पौर्णिमेचा चंद्रही फिका वाटू लागला होता, तिच्यासमोर.
            'ती' वाट बघत होती पहिल्या पावसाची आणि 'तो' पहिल्या स्पर्शाची. पण दोघांना दोन्ही गोष्टी अशक्यप्राय वाटू लागल्या होत्या. 'ति'ने उष्ण सुस्कारे सोडणे बंद केले होते, 'त्या'चाही श्वास थंडावला होता.
             आजतर एवढी उष्णता होती की, गवताची पिवळी पाती करपून काळीठिक्कर पडली होती. 'त्या'चं हृदयही रक्तबंबाळ झालं होतं, तिच्या नजरेतील तिरस्कारानं. आज 'ति'चे बंध गळाले आणि 'त्या'चाही बांध फुुटला. निराश होऊन 'ति'नं वाळक्या पाचोळ्याचं वादळ करून फेकून दिलं, त्या पाषाणी ढगाकडे, सगळी ताकद लाऊन. 'त्या'नेही फेकले कागदाचे गोळे तिच्याकडे, असह्य उद्विग्नतेने. त्या पाचोळ्याच्या आणि धुळीच्या वादळानं ढगाला अगदी कस्पटासारखं घुसळून काढलं. त्या धुळीआडून तो ढगही 'ति'ला दिसेनासा झाला. कागदाच्या ढिगाआड तीही दिसेनाशी झाली.
           इतक्यात धुळीच्या पडद्याआडून एक टपोरा थेंब सरसरत आला आणि 'टप' असा आवाज करत 'ति'च्याशी एकरूप झाला. वाळक्या पानांच्या आणि तापलेल्या, रापलेल्या धुळीच्या भावनांची जाणीव त्या ढगाला आज प्रथमच झाली आणि त्या भावनांची उत्कटता त्या पाषणालाही पाझर फोडून गेली. त्याच वेळी तिच्या हातातील एका चुरगळलेल्या कागदावर एक उष्ण 'अश्रू' पडला आणि तिथला एक शब्द पुसला गेला. कदाचित त्या शब्दांतील भावनांचा ओलावा प्रथमच तिच्या मनाला भिडला होता.
            बाहेर बेफाम कोसळणारा ढग आणि 'ती' एकरूप झाले होते, तर तिकडे आत कागदावर कोरलेल्या 'त्या'च्या भावनांचे ठसे तिच्या मनावर उमटत होते. बाहेर मुसळधार पावसात 'तो' भिजत होता आणि आत आसवांच्या धारांखाली त्याच्या कविता.
            पाऊस ओसरला होता, रिमझिम सुरु होती. ढगाचा आणि 'ति'चा प्रणय ऐन रंगात आला होता. विजांचे तांडव केंव्हाच थांबले होते. पावसाने 'ति'ला केलेल्या पहिल्या स्पर्शामुळे 'ती' गंधित झाली होती. झाडांची पाने आणि त्याखाली लपलेले पक्षी माना वाकवून 'ति'चे आणि ढगाचे मिलन पहात होती आणि ते पाहून लाजलेला सूर्य मान खाली करून डोंगराआड लपु पहात होता.
            'तो' अजून तसाच उभा होता, अविचल. त्याच्या सर्वांगावरून पाणी ओघळत होतं आणि तिच्या डोळ्यातून अश्रू. ढग आणि 'ति'चे मिलन पाहून 'त्या'ला स्वतःचे एकटेपण अधिकच भयाण वाटले. पण, इतक्यात 'त्या'च्या डोळ्यातील अश्रूंच्या पडद्यापालिकडून एक आकृती त्याच्याकडे येताना दिसली. तिच्या हातात एक कागद होता, चुरगळलेला. तो कागद त्याला त्याच्या 'हृदयासारखा' वाटला आणि तिला 'त्या'चे 'हृदयच' वाटला. दोघे एकमेकांच्या इतके जवळ होते की, दोघांना एकमेकांचा श्वासही जाणवत होता पण तरीही ते एकमेकांना अस्पष्टच दिसत होते, रिमझिम पावसामुळे आणि डोळ्यातील मोत्यांमुळे. पण पावसाला मात्र एक गोष्ट स्पष्ट दिसत होती, 'त्या'च्या हातातला तिचा हात आणि तिच्या हातातला कागद. सूर्य आता पूर्ण बुडाला होता, कदाचित लाजेने, पण संध्याकाळ मात्र सजली होती, प्रणयरंगानं, ढगाच्या आणि जमिनीच्या, त्याच्या आणि तिच्या.
                                 -अमोल मांडवे(DySP)

Comments

  1. Bhari analogy rangvali aahe Amol.

    Paus ani Jamin - TO ani Ti chi gosht - ZAKAS!!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

पंख पावसाळी

उन्हाळ्याची सुट्टी

आपल्याच मारेकऱ्यांच्या आसऱ्याला