माझिया प्रियाला

माझिया प्रियाला,
        सुरुवात कशाने करावी ठरवताना अडखळलो म्हणून हा पत्राचा अट्टाहास, पण सुरुवात कुठून करावी हा ही गहन प्रश्नच. एरवी एवढा नसतो अडखळलो पण तुझ्याबाबतीत उगीचच विचार कंप पावतात.
        तुला काय वाटेल हे माहिती नसताना पत्र लिहितोय आणि त्यात पुन्हा तुझ्या नावापुढं 'माझिया' वापरतोय, रागावू नकोस. शब्द कदाचित चुकतील, पण तू भावना समजून घे. त्रयस्थाच्या नजरेने सुरुवातीला पूर्ण पत्र वाचून काढ. कदाचित स्वतः म्हणून वाचायला गेलीस तर विचारांचा गोंधळ उडेल आणि कदाचित पूर्ण पत्रावर तुझं लक्षच नाही राहणार. इतक्या सुचनांबद्दल परत रागावू नकोस कारण पुढचं सगळं खूप नाजूक आहे. प्रत्येक शब्द जिवाच्या मोलाचा आहे, आत्ता फक्त माझ्या आणि काही वेळानंतर कदाचित तुझ्याही. 
sketch credit to dearest friend Amol Bhosale(DSLR)

         सरळच सांगायचं तर, 'माझं प्रत्येक स्वप्न तुझ्याभोवती गुंफलय, माझा प्रत्येक श्वास तुझ्या श्वासात घुटमळतोय. माझ्या प्रत्येक पावलाचा ठसा तुझ्या हळुवार पावलांना अलगद उचलायला आसुसलेला आहे. तुझी स्वप्ने पाहताना मला डोळे बंद करावे लागत नाहीत. तुझी आठवण यायला विसरावे लागत नाही. चहाचा प्रत्येक कप दोघांनी अर्धा अर्धा प्यावा आणि जीवनाचा प्रत्येक क्षण अर्धा अर्धा जगावा असं वाटतं. एवढी गुंतागुंत पुरे झाली, आता सरळच सांगतो, 'तू आवडतेस मला. मन गुंतलय माझं तुझ्यात. तू माझी व्हावी हा विचार मी दिवसातून शेकडो वेळा करतो.' हे वाचल्यावर कदाचित पुढचं वाचायचा उत्साह नाही वाटणार तुला पण तरीही वाच, माझ्यासाठी. कारण या भावना काही एकदम नाही तयार झाल्या, त्या तशा का झाल्या हे कदाचित पुढील गोष्टी सांगू शकतील. 
         खूप लहान होतीस, तुला पहिल्यांदा पाहिलं तेंव्हा. हसू नकोस, मी ही लहानच होतो. तुला आठवत असेल किंवा नसेल, पण माझा धक्का लागून तू पडलीही होतीस. अजून तुझा शाळेतला डान्स आठवतो, 'दिल झूम झूम नाचे' गाण्यावरचा. तुझ्या वर्गावर शिक्षक दिना दिवशीचा घेतलेला तास आजही आठवतो. तेंव्हाही तुझे विचार यायचे मनात पण मी स्वतःलाच समजवायचो, 'ह्या वयात काय प्रेम बिम होत नसतं', आणि तो विचार सोडून द्यायचो. का कुणास ठाऊक पण तू यायच्या वेळी आपोआपच नजर रस्त्याकडे लागायची. तुला हसताना बघितल्यावर खूप भारी वाटायचं. वाटायचं तू हसत रहावं आणि मी पहात. शाळा संपली आणि मी बाहेर पडलो. पण जेंव्हा कधी परत शाळेत भेटायला आलो तेंव्हा नकळत डोळ्यांनी तुला शोधलंय. गेल्या सहा वर्षात फक्त चार पाच वेळा पाहिलं असेल तुला, पण तुझा चेहरा डोळ्यासमोर स्पष्ट असतो, सदैव. तुझ्या घरासमोरून गेलोय आणि तुझ्या घराकडे मान वळली नाही असं झाल्याचं आठवत नाही. तू खिडकीत आल्यावर दिसशील म्हणून कित्येकदा रस्त्यावर वाट पाहत उभा राहिलोय. 
         आठवून बघ, एकदा स्टॅंडवर मैत्रिणीला म्हणाली होतीस, 'अगं हा तोच ना?' आणि माझं नाव ऐकल्याबरोबर मी तुझ्याकडे पाहिलं आणि त्याच वेळी तू नजर चुकवून खाली पाहिलंस. दोन वेळा तुझ्या घरी आलो. दोन्ही वेळा सरबत तूच केलास. एकदा काहीच बोलली नाहीस, दुसऱ्या वेळी मात्र बोललीस. माझ्या अपेक्षेपेक्षा काहीसं जास्तच. 'चष्मा न घातल्यामुळे नीट ओळखलेच नाही तुला' म्हणालीस आणि गोड हसलीस. तेंव्हा कळलं इतक्या वर्षात इतक्या कमी वेळा तुला पाहून तू तरीही इतकी का आवडतेस. 
          या सहा वर्षात अनेक मुली दिसल्या, काही आवडल्याही. पण प्रत्येक वेळी प्रत्येक मुलीची तुलना नकळत तुझ्याबरोबरच व्हायची आणि नेहमीप्रमाणे तूच सरस ठरायचीस. खूप विचार केला या गोष्टींचा, तेंव्हाच ठरवलं की तुलाच विचारायचं.
          नशीबवान समजतो मी स्वतःला, कारण माझ्या हळव्या मनाला भुरळ घालणारी तूच होतीस. माझ्या घरातील लोकांबाबतच्या अपेक्षा पूर्ण करणारी तूच वाटतेस, माझ्या स्वप्नांच्या पूर्ततेला हातभार लावू शकणारी तूच वाटतेस. माझे व्यवहारवादी मन पण तुझ्यापाशीच थांबते. तू अगदी तशीच आहेस जशी मला हवी होतीस. किंवा तू जशी आहेस तशीच मला हवी आहेस. मी काही पूर्णपणे तुला ओळखत नाही, पण तू मला समजावून घेशील असा विश्वास वाटतो आणि मी ही तुला समजू शकेन अशी खात्री वाटते.
           मी तुला जेवढं काही ओळखतो, त्यावरून मला वाटते कि तुला माझे गाव, घर, घरातील लोक खूप आवडतील आणि त्यांनाही तू. तुझ्या घरचेही मला आणि माझ्या घरच्यांना ओळखतातच. तू नाही म्हटलीस तर हे करिन ते करिन असं मी काहीही बोलणार नाही कारण मला तुझ्या मनावर दडपण नाही आणायचं. तू अगदी मोकळा विचार कर.
          हे सगळं वाचून तुला काय वाटलं असेल याची मला कल्पना नाही. पण जरी रागावलीस तरी तेही कळव. प्लीज जे असेल ते, पण उत्तर दे. अबोल नको राहू. कारण जेवढा वेळ तू अबोल राहशील तेवढा वेळ माझा जीव घुसमटत जाईल. एकदा त्रयस्थ म्हणून वाच आणि एकदा स्वतः म्हणून, पण प्लीज गैरसमज नको. तुला हे नाही आवडलं तर सांग, मी सगळं विसरून जाईन, पण तुझ्या मनात माझी प्रतिमा जशी अगोदर होती तशीच ठेव. भावनांचा विचार कर, शब्द पोटात घे.
         वाट पाहतोय, तुझ्या प्रतिसादाची. तुझी.
                                                                     तुझाच.

Note: कधीतरी एका जुन्या पुस्तकात लपवून ठेवलेलं एखादं गुपित अचानक नकळत आपल्या हाती लागतं. तसंच काहीसं या पत्राच्या बाबतीत झालं. जवळपास नऊ एक वर्षांपूर्वी लिहिलेला हा पत्रसदृश लेख अचानक हाती लागला. My first complete write up, which gave me confidence to write more. So felt like sharing it.
                        - AMOL MANDAVE(DYSP/ACP)

Comments

  1. well done post, i like it Keep it up

    Thanks,

    Free Mcx Tips Trial

    ReplyDelete
  2. Sir, touching ekdm... do share the rest...

    ReplyDelete
  3. पुन्हा एकदा दहावीच्या वर्गात जाऊन बसल्यासारखे झाले.... तुमच्या लेखनात अगदी त्या काळातील निरागसपणा जाणवतो. प्रेम ही भावना नुकतीच अंकुरित होत असलेला काळ खूप छान शब्दबद्ध केला आहे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

पंख पावसाळी

उन्हाळ्याची सुट्टी

आपल्याच मारेकऱ्यांच्या आसऱ्याला