स्पर्धा परिक्षेची तयारी करताय, मग या गोष्टी टाळा: भाग 2

स्पर्धा परिक्षेची तयारी करताय, मग या गोष्टी टाळा: भाग 2



         स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आणि त्यात प्रत्यक्षात यशस्वी होणाऱ्यांची संख्या पाहता 1000 जणांत 1 जण यशस्वी होतो. यशाची आणि अपयशाची कारणे व्यक्तिपरत्वे वेगवेगळी असतात परंतु काही अशा गोष्टी आहेत ज्या आपल्या आणि यशाचा मध्ये अडथळा निर्माण करू शकतील किंवा आपले यश लांबवू शकतील. म्हणून स्पर्धा परीक्षेची तयारी करताना काही गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात. तशा काही गोष्टींचा हा उहापोह करण्यासाठी एक नवीन लेखांची मालिका लिहित आहे.
           त्या मालिकेतला हा दुसरा लेख. राज्यसेवेची मुख्यपरीक्षा समोर असताना विद्यार्थ्यांचे 100% लक्ष अभ्यासावर असले पाहिजे. तसेच सकारात्मकता या टप्प्यावर खूप महत्वाची आहे. त्यादृष्टीने अभ्यासाच्या प्रक्रियेतील काही गोष्टींवर टाकलेला हा प्रकाशझोत.

2. Negative बोलणे, आपण कसा कमी अभ्यास करतो हे लोकांना पटवून देत बसणे:-
          'तुम्ही जसा विचार करता तसे बनता' असे गांधीजी म्हणाले होते. आपल्याला प्रत्येकाला असा अनुभव येतंच असतो. 
          स्पर्धापरिक्षांच्या प्रवासात मला एक गोष्ट खूप प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे या क्षेत्रात पडलेल्या विद्यार्थ्यांच्या बोलण्यात जाणवणारी negativity. एखाद्याला काय येते, काय सोप्पे जाते, कशात कोणाला गती आहे यापेक्षा परीक्षेत काय अवघड आहे, परीक्षा पास होणे कसे शक्य नाही, एखाद्याला काय अवघड जाते यावरच जास्त चर्चा होताना दिसते. प्रत्येकाला हे क्षेत्र किती अवघड आहे याची कल्पना असते. आणि यात पडण्यापूर्वीच हे प्रत्येकाला माहिती असतेच. तरी पण मग अभ्यास सुरु केल्यावर याच्या कठिणतेचा एवढा गजर का करावा हे मला कळत नाही. बरं, आणि सततच्या अशा बोलण्याने काय परीक्षा सोप्पी होणार आहे का? किंवा अशा बोलण्याचा इतर कोणता भौतिक व मानसिक फायदा आहे का? नाही ना. मग कशाला सारखं तेच तेच बोलायला हवं. 
          स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांमध्ये आपण कायम ऐकतो, अरे आज माझा अभ्यासाचं नाही झाला, गेल्या आठवड्यापासून माझं लक्षच नाही लागत आहे, गेले पंधरा दिवस मी एकचं विषय करतोय, मला या विषयातलं आजिबात काहीच कळत नाही, आज फक्त झोपून काढला रे. याउलट, अरे आज माझा खूप मस्त अभ्यास होतोय, अरे मला हा टॉपिक आज खूप छान समजला, गेल्या 15 दिवसात माझी पूर्ण revision झाली, आजकाल माझी झोप कमी झालीय, असं किती लोक सांगताना दिसतात? जवळपास कोणीच नाही. म्हणजे याचा असा अर्थ काढायचा का की यात उतरलेल्या सगळ्या जणांचा वाईटच अभ्यास सुरुय का? आणि तसं असेल तर मग जे पास होतात ते कसे होतात?
         असं का होत असावे याचा मी बराच विचार केला. त्यामध्ये अनेक शक्यता माझ्या डोक्यात येऊन गेल्या. पहिले म्हणजे मानवाचा मूळ स्वभाव. बहुतांश लोकांना आपले दुःख सर्वांना सांगायची खूप इच्छा आणि घाई असते. कदाचित त्यातून कसलेसे मानसिक सुख किंवा कमीत कमी दिलासा तरी मिळत असावा. 
         आणि दुसरे असे की, स्पर्धापरीक्षेच्या क्षेत्रात, मग ती संघ लोकसेवा आयोगाची असो की राज्य लोकसेवा आयोगाची, मी कसा काय कमी अभ्यासात पास झालो हेच दाखवण्याचा पोटतिडकीने प्रयन्त सुरु असतो. परीक्षेचा निकाल लागण्याआधी tension ने मेटाकुटीला आलेले लोक पण full confidence ने सांगतात की त्यांना वाटलेलंच की यावेळी होऊन जाणार म्हणून. बरं, तेही आम्ही मान्य करू, पण यांचे सांगणे असते की यांनी खूप कमी अभ्यास केला आणि तरी ते झाले. कदाचित कमी अभ्यासात झालो असे सांगितल्यावर लोक आपल्याला अतिशय हुशार,असामान्य बुद्धीचा आहे वगैरे समजतील असा एक सर्वसाधारण समज स्पर्धापरिक्षा करणाऱ्या लोकांमध्ये पसरला असावा. 
          पण या सगळ्याचा परिणाम अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर होतो. लोकांना कळाले की आपण खूप अभ्यास करतो तर त्यांना वाटेल की हा मठ्ठ आहे, घोकंपट्टीवाला आहे, घासु आहे वगैरे वगैरे कल्पना त्यांच्या डोक्यात घर करतात. तसेच खूप अभ्यास करतोय असे दिसले तर नंतर कमी अभ्यासात झालो असे न सांगता येण्याची भीतीही असेल कदाचित. आणि मग यातूनच आपण कसा कमी अभ्यास करतोय हे दाखवण्याची स्पर्धा सुरु होते. एखादा तास झोप लागली तर पुढचे चार दिवस मित्रांना तेच सांगितले जाते. आणि मग आपण कमी अभ्यास करतोय हे दाखवण्याच्या प्रयत्नात कधी खरोखरच आपण कमी अभ्यास करायला लागतो हे कळतदेखील नाही. मग हे दुष्टचक्र वाढतच जाऊन स्पर्धापरिक्षेच्या स्पर्धेतून आपण आपसूक बाजूला ढकलले जातो.
          दुसरी एक नकारात्मक गोष्ट म्हणजे जास्त अभ्यास करणाऱ्याला तुच्छ लेखणारी College च्या विद्यार्थ्यांसारखी सवय. एखादा जास्त अभ्यास करत असेल तेंव्हा, "मित्रा तुझा फार छान अभ्यास चालू आहे, मला पण करायचंय अरे, आपण बरोबर करू", असे कोणीच नाही म्हणणार. उलट "अरे आता मरतो का वाचून वाचून, अरे किती पुस्तकं वाचशील, आता काय एका दिवसात सगळा syllabus संपवतो का काय" अशा प्रतिक्रिया मिळतात. एखादा चुकून म्हणाला कि अरे तुझा अभ्यास जोरात सुरु आहे, तरी त्यात मोकळेपणाने केलेल्या प्रशंसेपेक्षा उपहासात्मक टिप्पणीचा भाग जास्त असतो. 
        यामुळे होते काय कि, ग्रुप-अभ्यासिका-क्लास येथील एकूण वातावरणच negative होऊन जाते. मग आपसूकच एकमेकांना मदत करत, एकमेकांच्या साथीने मार्ग सुकर करून अभ्यास करण्यापेक्षा एकमेकांना पाण्यात पाहण्याची, कुचकमची स्पर्धा चालू होते. जणू आपला ग्रुप, आपली अभ्यासिका यातच खरी स्पर्धा आहे अशी वागणूक सुरु होते आणि मग देशव्यापी आणि राज्यव्यापी प्रखर स्पर्धेची जाणीवच रहात नाही. अशाने असे लोक आपसूक स्पर्धेत मागे पडत जातात आणि आपल्याबरोबर दुसर्यांनाही मागे ओढतात. 
          म्हणून मग वातावरण सकारात्मक ठेवण्यासाठी जे काही करता येईल ते करायला पाहिजे. एकत्र बसून ठरवून खूप अभ्यास करणे, एखाद्याचा अभ्यास होत नसेल तर त्याची अडचण दूर करून त्याला बरोबर घेऊन जाणे, जो जास्त अभ्यास करतोय त्याचे अनुकरण करून स्वतः पण तेवढा अभ्यास करण्याचा प्रयत्न करणे, मित्रांना लवकर अभ्यासिकेत यायला प्रोत्साहित करणे, लवकर येणाऱ्यांना, उशिरापर्यंत थांबणाऱ्यांना टोमणे मारणे बंद करणे, एखादी नवीन गोष्ट वाचनात आली तर इतरांना ती मोकळ्या मनाने सांगणे यासारख्या छोट्या छोट्या गोष्टींनी वातावरण सकारात्मक राहण्यास बरीच मदत होते.
         सकारात्मक वातावरणामुळे सगळी Energy अभ्यासात लागते आणि 100% लक्ष अभ्यासात राहते. यामुळे मग अभ्यास चांगला होतो आणि आपण खऱ्या स्पर्धेला तोंड द्यायला तयार होतो. आणि वरून आपण यात एकटे नसतो, तर आपले अनेक मित्र आपल्याबरोबर खांद्याला खांदा लाऊन उभे असतात. यामुळे अभ्यास सुखावह आणि यशाचा मार्ग सुखकर होतो. पण यासाठी सर्वात अगोदर स्वतःमधिल आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांमधिल नकारात्मक विचार आणि वृत्ती प्रयत्नपूर्वक कमी करावी लागेल.

   यासारखे बाकीचे मुद्दे "राज्यसेवा: यशाची गुरुकिल्ली" या MPSC Planner पुस्तकामध्ये समाविष्ट केलेले आहेत.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

पंख पावसाळी

उन्हाळ्याची सुट्टी

आपल्याच मारेकऱ्यांच्या आसऱ्याला