लेखणीग्रस्त

   लेखणीग्रस्त




जुन्या कवितांनी अलवार माझाच खून केला
नव्या कवितेचा उमाळा आतच जळून गेला
पहिल्या कवितेने प्रेमवीर केलं
      दुसऱ्या कवितेने जणू सर्वस्व नेलं
तिसऱ्यात तर झाली अब्रुची लक्तरे
  पेन ठेवतो, हाती पांढरं निशाण आलं

प्रत्येक कवितेला हवीच का नायिका?
   दरवेळी मीच ती जगायला हवीय का?
वाचणाऱ्याच्या एखाद्या शाबासकीसाठी
   दरवेळी बळी मी जायलाच हवाय का?

नागड्या चेहऱ्याने वावरलो आजवर, परि
माझ्या अभिव्यक्तीचे मुखवटे जड जाहले
कवितांच्या थारोळ्यात रक्तबंबाळ नि सुन्न मी
ते रुधिरही काहींनी रंग म्हणूनी फासले

कवितेचे कागद फाडून टाकले तरी ठिगळ कसं लागायचं
चारित्र्याचं फुटलेलं आभाळ शब्दांनी कसं सांधायचं.
माझ्यातले उरलेले "मी" पण लटकवावे फासावर
की, माझ्यांनीच माझ्या "मी" चे गळे आवळलेलं पहायचं.

                         -अमोल मांडवे(DYSP/ACP)



Comments

  1. जुन्या कवितांनी अलवार माझाच खून केला
    नव्या कवितेचा उमाळा आतच जळून गेला.. बर्‍याचदा लिहिताना ही जाणीव होते... टिपिकल form चा tag लागला की अस होत.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

पंख पावसाळी

उन्हाळ्याची सुट्टी

आपल्याच मारेकऱ्यांच्या आसऱ्याला