CSAT प्रत्यक्ष पेपरच्या 2 तासांचे नियोजन



            CSAT प्रत्यक्ष पेपरच्या 2 तासांचे नियोजन
                

         अगदी 100% विद्यार्थी मन लाऊन अभ्यास करत नसले तरी 70-80% तरी अगदी मन लाऊन अभ्यास करतात. सगळा syllabus पूर्ण करतात, अगदी काही लोकांची तर पुस्तकं च्या पुस्तकं पाठ असतात. काहीही विचारा उत्तरं त्यांच्या जिभेवर असतात. एक एक विषय दहा-दहा, पंधरा-पंधरा वेळा वाचलेले लोकं असतात. परीक्षा पास होण्यासाठी लागतो त्याच्या कित्येक पट जास्त अभ्यास झालेला असतो अनेकांचा. पण एवढं सगळं असून यातील बरेच जण अंतिम यादीत मात्र नसतात. पूर्व परीक्षेचा पहिला टप्पाच अनेकांना अनेक वर्षे पार करता येत नाही. 
         काय चुकते नक्की? अभ्यास कमी असतो का? की गरजेपेक्षा जास्त अभ्यास होतो? की केलेल्या अभ्यासाचा योग्य वापर करायचे चुकते? की परीक्षेच्या वेळच्या तणावामुळे अडचणी येतात? परीक्षेची आणि निकालाची भीती इथे प्रॉब्लेम करून जाते का? की ऐन वेळी वेळेचे गणित चुकते? की गोंधळ उडतो अनेक गोष्टी एका वेळी सांभाळता सांभाळता?
          यातील बऱ्याच प्रश्नांची उत्तरे लपली आहेत तुम्ही परीक्षेचा दिवस आणि परीक्षेचे दोन अधिक दोन असे चार तास कसे सामोरे जाता यावर. कितीही अभ्यास असला आणि तो दिवस आणि ती वेळ जर नीट हाताळली नाही तर सगळ्या मेहनतीवर पाणी फिरते. याउलट अभ्यासात थोडेफार इकडे तिकडे झाले असले परंतु परीक्षेचा दिवस आणि ते चार तास कसे हाताळायचे हे कौशल्य असेल तर अगदी मोजक्या अभ्यासात पूर्वपरिक्षा अगदी सहज पार करता येते.
         म्हणून या लेखात आपण प्रत्यक्ष पेपर च्या दिवशी आणि पेपर च्या वेळी काय करावे याचा एक ढोबळ आढावा घेऊ. यातील गोष्टी अगदी मला वाटतात तशाच केल्या तरच फायदा आहे असे नाही. व्यक्तीपरत्वे काही गोष्टी लागू होतील काही होणार नाहीत तर काही गोष्टी काही प्रमाणात लागू होतील पूर्णपणे नाही. म्हणून याकडे एक rough guideline म्हणून पहावे आणि स्वतःच्या strength आणि weaknesses चा विचार करून या गोष्टी त्यानुरूप अमलात आणल्या तर बराच फायदा होईल.

CSAT च्या पेपर चे 2 तास:-
पेपर सोडवायला सुरु करण्याआधी:-
          पेपर सुरुहोण्याअगोदर अर्धा तास आपण परीक्षा हॉल मध्ये आपल्या जागेवर बसलेलो असतो. आत गेल्यागेल्या एकदा hallticket तसेच पेन आणि इतर सर्व गोष्टी बरोबर आहेत का ते तपासून पहा. जेणेकरून ऐनवेळी धावपळ करावी लागणार नाही.
           त्यानंतर अतिशय काळजीपूर्वक उत्तरपत्रिकेतील माहिती भरा. ती भरताना hallticket मध्ये बघून भरा. माहिती भरताना कसलीही गडबड करू नये. दिलेल्या वेळेचा पूर्ण उपयोग करावा. त्यानंतर जेंव्हा प्रश्नपत्रिका मिळते पण वेळ झाला नसल्याने ती उघडण्याची परवानगी नसते तेंव्हा तिच्या मागच्या बाजूला तुम्हाला आत्ता आठवत असलेली पण नंतर विसरण्याची शक्यता आहे असली सूत्रे असतील तर ती पेन्सिल ने कच्च्या कामासाठी दिलेल्या जागेत लिहून काढावीत. तसेच इंग्रजी ABCD वरचे प्रश्न सोडवता यावेत म्हणून कच्च्या कामासाठी दिलेल्या जागेत abcd काढून ठेवा तसेच A to Z ला 1 ते 26 नंबर देऊन ठेवा म्हणजे यावरचा प्रश्न आला की पटकन सोडवता येतो आणि त्यावेळी या सर्व गोष्टी करण्याचा वेळ वाचतो.

परीक्षेला येण्यापूर्वीच ठरवायच्या गोष्टी:-
          तसेच परीक्षेला येण्यापूर्वीच तुम्ही हे दोन तास कसे हाताळणार आहात याचा तुमचा प्लॅन तयार असला पाहिजे. प्रत्येक मिनिटाचा हिशोब तुमच्या डोक्यात फिट असला पाहिजे. सुरुवात कुठून करणार, प्रश्नांचा क्रम कसा ठेवणार, उत्तरपत्रिकेत गोल कधी भरणार, किती attempt करणार आणि किती सोडणार, कोणते attempt करणार आणि कोणते सोडणार, उताऱ्यावरचे प्रश्न कसे हाताळणार हे सर्व काही तुमच्या डोक्यात एकदम स्पष्ट पाहिजे. हे केल्याने ते दोन तास तुम्हाला अतिशय Effectively वापरता येतील. विचार करण्यात आणि निर्णय घेण्यात जाणारा वेळ वाचतो. आणि हाच वेळ यश आणि अपयशामधील अंतर ठरतो. म्हणून अगोदरच वेळेचं नियोजन असलेलं उत्तम.
           आता वरील प्रश्नांच्या सविस्तर उत्तरांकडे वळूया. वरील प्रश्नांची कोणतीही standard उत्तरे नाहीत. हजारो पद्धती अवलंबून, अनेक प्रकारचे प्रयोग करून देखील यशस्वी झालेले विद्यार्थी आहेत. त्यामुळे कोणतीही गोष्ट अमुक एका पद्धतीने करा असे सांगणे तितकेसे उचित नाही. परंतु माझ्या प्रवासात मला जे जाणवलं आणि त्यातून वरील प्रश्नांची कोणती उत्तरे त्यातल्या त्यात सोप्पी आणि परिणामकारक ठरतील असे मला वाटते त्यावर केलेली ही साधक बाधक चर्चा.

सुरुवात कुठून करायची:-
वर चर्चा केल्याप्रमाणे पेपर च्या सुरुवातीला आपली विचार करण्याची गती कमी असते. तसेच या परिक्षेवर आपल्या गेल्या वर्षाच्या कष्टाचे फळ आणि पुढच्या आयुष्याची दिशा अवलंबून असल्याने आपणास प्रत्येक प्रश्नाचे उत्तर लिहिताना एक विशिष्ट प्रकारची anxiety असते. त्यामुळे आपण अगदी पक्का माहिती असलेला प्रश्न देखील दोन तीन वेळा वाचतो. आपण उगाचच उत्तरावर शंका घेत बसतो. नंतर वेळ कमी पडू लागल्यावर ते बंद होतं पण त्याने अगोदरच बराच वेळ खाल्लेला असतो.
           म्हणून हे टाळायचे असेल तर असे करता येईल की, पेपर उघडल्या उघडल्या लगेच decision making चे प्रश्न काढावेत. एकतर त्या प्रश्नांना negative marking नसते त्यामुळे प्रश्न चुकून मार्क वजा होण्याची भीती वाटत नाही. दुसरे म्हणजे त्यामध्ये प्रत्येक पर्यायाला काही ना काही मार्क असतात फक्त एकाच पर्यायाला शून्य मार्क असतात. पण प्रश्नांचे स्वरुपच असे असते की चार पैकी 2 पर्याय आपोआप cancel होतात. आणि मग उरलेल्या दोन पर्यायांपैकी कोणताही निवडला तरी 2 किंवा 2.5 मार्क मिळतातच.
          या सगळ्याचा फायदा हा करून घेता येऊ शकतो तो अशाप्रकारे. सुरुवातीलाच हे प्रश्न निवडून पाच मिनिटात हे पाच किंवा सहा प्रश्न सोडवायचेच असा प्रयत्न करायचा. वर सांगितल्याप्रमाणे यात चुकण्याची शक्यता कमी असते तसेच उत्तर चुकले तरी negative marking नसल्याने होणारे नुकसान कमी असते. त्यामुळे आपण ठरवून अतिशय कमी वेळेत हे प्रश्न हातावेगळे करू शकतो. 
           याउलट जर सुरुवातीला आपण उतारा सोडवायला घेतला तर anxiety आणि भीती मुळे आपण वाचताना हळू वाचतो आणि वरून उत्तरे लिहिताना गरजेपेक्षा जास्त वेळ घालवतो. कधीकधी अगदी तीन प्रश्नांच्या छोट्या उताऱ्याला दहा मिनिटे जातात. किंवा जर गणिते किंवा reasoning चे प्रश्न अगोदर घेतले तरी आपण भीतीपोटी ते सोडवले तरी पुन्हा एकदा recheck करण्याचा मोह होतो आणि आपण प्रश्न slow सोडवतो ते वेगळे. म्हणजे एकूण काय तर decision making वगळता इतर कशानेही सुरुवात केली तरी slow सुरुवात होऊन वेळ जाण्याची शक्यता बळावते. पण decision making मध्ये आपण ठरवून वेग वाढवू शकतो व ठरवून पाच ते सात मिनिटात पाच प्रश्न सोडवू शकतो. आणि मग हे करताना आपण एकदा स्पीड पकडलं की मग मात्र ते स्पीड उत्तरोत्तर वाढून किंवा कायम राहून वेळेचे गणित बरोबर जुळते. Attempt पूर्ण होण्याच्या दृष्टीने हे अतिशय महत्वाचे आहे. म्हणून मग अशी सुरुवात करायला हरकत नाही असे माझे मत आहे.

सुरुवातीनंतर आपल्या कलाप्रमाणे निर्णय घेणे:-
          एकदा का decision making चे प्रश्न हातावेगळे केले की मग प्रत्येकाने आपापल्या skill आणि क्षमतेप्रमाणे passages किंवा मग aptitude व reasoning चे प्रश्न सोडवायला घ्यावेत. उरलेल्या 75 प्रश्नांसाठी उरलेल्या वेळेची विभागणी करावी लागेल. या 75 पैकी जवळपास 50 प्रश्न हे उताऱ्यावर येतात. Decision making, उत्तरपत्रिकेत गोल भरणे आणि सही इत्यादी औपचारिकता करणे यासाठी 20 मिनिटे पकडली तर 100 मिनिटे शिल्लक राहतात. त्यापैकी साधारणपणे 40 मिनिटे aptitude व reasoning च्या 25 प्रश्नांना द्यावीत व 60 मिनिटे उताऱ्यावरील 50 प्रश्नांना द्यावीत. अगोदर कोणते सोडवायचे हा प्रत्येकाच्या सोयीचा आणि comfort चा प्रश्न आहे. काही लोकांना passages मध्ये चांगले मार्क्स पडतात, ते त्यास प्राधान्य देतील तर काहींना aptitude व reasoning मध्ये अगदी हमखास मार्क पडतात, ते त्यास प्राधान्य देतील. आपल्याला काय सोप्पे जाते आणि कशात आपल्याला जास्त मार्क पडतात हे प्रत्येकाने पेपर सोडवण्याचा सराव करून मग ठरवावे.
         शक्यतो हे सगळे निर्णय परीक्षेच्या महिनाभर आधी तयार असावेत जेणेकरून त्यांचा त्याच पद्धतीने तंतोतंत सराव करता येईल व परीक्षेत नवीन असं काहीच करावं लागणार नाही. आणि एकदा ठरल्यावर शक्यतो त्यावर ठाम राहावे. पेपर च्या स्वरूपानुसार छोटेमोठे बदल करावेच लागतात. पण एकूण ढोबळ साचा सारखाच राहतो.
         मला स्वतःला decision making नंतर aptitude सोडवणे सोप्पे वाटायचे. कारण त्यात माझी accuracy चांगली असल्यामुळे जेवढे सुटतील ते प्रश्न बऱ्यापैकी बरोबर यायचे. त्या 25 प्रश्नांपैकी 20 एक प्रश्न मी सोडवायचो. आणि त्यापैकी 18-19 बरोबर यायचे. उरलेले पाच एक प्रश्न मात्र मी न सोडवताच सोडून द्यायचो.
          हे प्रश्न सोडवताना मी पेपर मध्ये ज्या क्रमाने दिलेत त्याच क्रमाने सोडवायचो. ते सोडवताना करावे लागणारे कच्चे काम तिथेच पेपर वर दिलेल्या जागेत करायचो. एकदा का प्रश्नात दिलेली माहिती तुम्ही कागदावर एका ठिकाणी मांडली की आपोआप त्या आकड्यांचे परस्पर संबंध दिसून येतात व गणिताची आणि कोड्यांची उकल व्हायला सोप्पे जाते. 
          या प्रकारातील पाच एक प्रश्न अतिशय अवघड असतात, दुसरे दहा अतिशय साधे व सरळ असतात तर उरलेले दहा हे मध्यम प्रकारचे असतात.     

कठीण प्रश्न का आणि कसे सोडून द्यावेत :-
         अत्यंत अवघड असे जे पाच प्रश्न असतात ते सोडवण्याचा प्रयत्न न करता नुसते पाहून ओळखता आले पाहिजेत. जेणेकरून बघितल्या बघितल्या ते बाजूला सरून पुढे जाता येईल. अन्यथा होते असे की, आपण तो प्रश्न सोडवायला घेतो. एक दोन मिनिटे त्यावर विचार करण्यात घालवतो आणि नंतर कळते की हा प्रश्न काही आपल्याला सुटणार नाही. अशा वेळी आपण दोन गोष्टींपैकी एक गोष्ट करण्याची शक्यता असते. एकतर आपण इर्षेला पेटून हा प्रश्न कसा सुटत नाही ते पाहूच असं म्हणत त्यावर आणखी वेळ घालवतो. आणि एवढे करूनही तो प्रश्न चुकण्याचीच शक्यता जास्त असते. त्यामुळे पाच एक मिनिटे वाया जातात, त्या प्रश्नाचे 2.5 मार्क जातात वरून चुकल्यामुळे एक तृतियांश negative marking मुळे आणखी 0.83 असे एकूण 3.33 गुण जातात. वरून इथे जास्तीचा वेळ वाया गेल्याने येणारे, सोप्पे असे दोन एक प्रश्न राहून जातात आणि त्यांचे हमखास पडु शकणारे पाच एक मार्क जातात. म्हणजे एका अवघड, न येणाऱ्या प्रश्नात गुंतल्याने जवळपास 10 मार्कांचे नुकसान होते आणि आपण स्पर्धेत लांब मागे फेकले जातो. 
          आणि दुसरे म्हणजे जरी दोन मिनिटात आपल्याला कळाले की हा प्रश्न आपल्याला सुटणार नाही आणि आपण तो ताबडतोब सोडून दिला तरी तो वाचण्यात आणि सोडवण्याच्या प्रयत्न करण्यात दोन मिनिटे घालवलेलीच असतात. त्यामुळे एका येऊ शकणाऱ्या प्रश्नाचा वेळ हा जातोच. उदाहरणार्थ- मला "input-output" या प्रकारचे प्रश्न अवघड जायचे. एक अंकांची मालिका दिलेली असते आणि अनुक्रमे कोणत्या स्टेप ला output काय असेल ते दिलेले असते. आणि मग दुसरी एक अंकमालिक देऊन या अंकमालिकेवरून कोणत्यातरी एका स्टेप ला कोणता क्रम येईल असे विचारलेले असते. एकतर असल्या प्रश्नांना समजून घ्यायलाच वेळ लागतो आणि सोडवण्यासाठी खूप कच्चे काम करावे लागते आणि वरून क्लिष्टता जास्त असल्याने चुकण्याची शक्यता जास्त. हे सगळे मला सराव प्रश्नपत्रिका सोडवताना कळाले. म्हणून मग मी हा प्रश्न न वाचताच सोडून पुढे जायचो आणि वेळ मिळाला तरच याकडे परत यायचे. परंतु बहुतेक वेळा परत येण्याइतका वेळच नसतो मुळी. म्हणून असे प्रश्न न वाचता सोडण्याइतका आत्मविश्वास यायला हवा.
          म्हणून मग हे पाच अवघड प्रश्न नुसते बघून ओळखता आले पाहिजेत आणि ते आत्मविश्वासाने सोडता आले पाहिजेत. फक्त काळजी घ्यायची की अशा प्रश्नांची संख्या पाच-सहा पेक्षा जास्त होणार नाही. कारण मग तसे झाले तर attempt खूप कमी होऊन आपण अडचणीत येऊ शकतो.

सोपे व मध्यम काठिण्यपातळीचे प्रश्न कसे हाताळावे:-
           त्यानंतर जे दहा सरळ सोप्पे प्रश्न असतात ते आपले basic ज्ञान वापरून पटकन सोडवून घ्यावेत. या गणितांसाठी वा reasoning साठी कोणतेही मोठे formulae किंवा सूत्रे लक्षात ठेवायची गरज नाही. रेल्वे ची गती, पाण्याची टाकी एका नळाने भरण्यास आणि खाली करण्यास लागणारा वेळ, वेगळी आकृती ओळखा, सोप्पी कोडी इत्यादी या प्रकारात मोडतात. आपल्या मूलभूत ज्ञानाच्या जोरावर हे प्रश्न आरामात सुटतात. पण आपण राज्यसेवा देतोय म्हणजे एक खूप अवघड परीक्षा देतोय आणि हे सोप्पे प्रश्न इतके सोप्पे कसे काय विचारू शकतील असा विचार करतो. आणि मग त्या प्रश्नात काहीतरी trick असेल असा विचार करून उगाच सोप्पा प्रश्न अवघड करून वेळ तर घालवतोच पण कदाचित उत्तर देखील चुकीचे येण्याची शक्यता वाढवून ठेवतो. म्हणून मग उगीच overthinking पण करू नये आणि हे सोप्पे प्रश्न हमखास पदरात पाडून घ्यावेत.
          त्यानंतर उरलेले जे प्रश्न असतात ते मुळात सोप्पे असतात परंतु थोडेशे lengthy म्हणजे जास्त वेळ घेणारे किंवा मग एखादी छोटीशी पण लगेच लक्षात न येणारी trick असलेले असतात. थोडासा वेळ दिला की हे प्रश्न हमखास सुटतात. पण कमी वेळेत हे सोडवण्यासाठी आधी सराव असणे गरजेचे आहे. या प्रश्नात एकदा ट्रिक लक्षात आली की झटकन उत्तर मिळते. पण कधीकधी ती trick लवकर लक्षात येत नाही आणि अनाहूत वेळ जातो. उदाहरणार्थ संख्यामालिकेतील प्रश्नचिन्हांच्या जागी कोणता अंक येईल ओळखा किंवा दिलेल्या आकृतीत प्रश्नचिन्हांच्या जागी कोणता अंक किंवा अक्षर येईल अशा प्रकारचे प्रश्न बघितल्यावर पहिल्या मिनिटात जर trick लक्षात आली तर लगेच उत्तर मिळते. अन्यथा कितीही विचार केला तरी ती trick लक्षातच येत नाही. अगदी तासभर जरी प्रयत्न केला तरी उत्तर काही मिळत नाही. असे प्रश्न सोडवायचा आणि अपेक्षित trick शोधण्याचा प्रयत्न करावा पण एकदा का एका मिनिटांपेक्षा जास्त वेळ देऊन काय केले पाहीजे हे लक्षात नाही आले तर मात्र तो प्रश्न तिथेच सोडून पुढे जावे.
         तुम्ही स्पर्धेत कुठे असणार हे ठरवण्यात या दहा tricky प्रश्नांचा खूप महत्वाचा रोल आहे. कारण अवघड प्रश्न बहुतेकांना येत नाहीत आणि सोप्पे जवळपास सगळ्या serious अभ्यास करणाऱ्यांना येतात. म्हणून मग फरक पडायचा असेल तर तो या दहा मध्यम difficulty level च्या प्रश्नातच पाडावा लागतो.

उतारे सोडविण्याबाबत:-
           एकदा का हे aptitude चे वीस एक प्रश्न सोडवून झाले किंवा त्यासाठी आपण दिलेले 40 मिनिट झाले की आपला मोर्चा passage कढे वळवावा.
          50 प्रश्न हे जवळपास बारा ते तेरा उताऱ्यांवर अवलंबून असतात. पण यात सगळ्यात महत्वाची आणि लक्षात घ्यायची गोष्ट म्हणजे सर्व उताऱ्यांची लांबी आणि त्यावर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची संख्या सारखी नसते. तसेच उताऱ्यांची काठिण्य पातळी देखील वेगळी असते. कोणत्या उताऱ्यापासून सुरुवात करायची आणि कोणता उतारा सोडवायचा नाही हे ठरवायला या सगळ्यांचे निरीक्षण करणे आवश्यक ठरते. एकदम परीक्षेत हे करायला गेलात तर हे ठरावण्यातच सगळा वेळ जाईल म्हणून मग सराव करतानाच या गोष्टींचा देखील सराव करावा.

उताऱ्यांचा क्रम ठरविण्याबाबत:-
          उताऱ्यांचा क्रम ठरवताना सुरवातीला फक्त मराठीत आणि फक्त इंग्रजीमध्ये दिलेले जे उतारे असतात ते घ्यावेत. ते ओळखण्याची खूण म्हणजे त्यांचे दुसऱ्या भाषेत भाषांतर दिलेले नसते. एकतर ते छोटे असतात आणि त्यावरचे प्रश्न हे सरळ विचारलेले असतात. ते सोडवताना खूप complex विचार करावा नाही लागत आणि वेगात उतारे सोडवता येतात. तसेच बरोबर येण्याची शक्यता जास्त असल्याने हे उतारे शेवटी ठेऊन सोडवायचे राहिले तर आपले खूप नुकसान होऊ शकते. म्हणून हे उतारे व यावर विचारले जाणारे सात ते आठ प्रश्न प्रथम सोडवावेत. 
         त्यानंतर अगदी पहिल्या उताऱ्या पासून सलग सुरुवात करावी आणि क्रमाने उतारे सोडवीत जावे. बऱ्याचदा लोकांच्या मनात असे गृह असतात की अर्थशास्त्रावर आधारित उतारे अवघड असतात, philosophical उतारे अवघड असतात आणि पर्यावरण, राज्यशास्त्र यावर आधारित उतारे सोप्पे असतात. मग विद्यार्थी पेपर मध्ये ते उतारे शोधू लागतात. दिलेले उतारा कशावर आहे हे कळण्यासाठी त्याचा पहिला परिच्छेद तरी वाचावाच लागतो. आणि मग तो उतारा ते जो विषय शोधत आहेत त्यावरील नसला की ते दुसऱ्या उताऱ्यामध्ये शोधतात. या शोधाशोधिमध्ये नकळत खूप वेळ निघून जातो आणि मग अनेक प्रश्न सोडवायचे राहून जातात. 
         म्हणून मग एकदा का वर उल्लेखलेले भाषेचे उतारे सोडवून झाले की मग सलग पहिल्यापासून उतारे सोडवावेत जावे. ते तसे करत असताना जर एखादा उतारा समजायला खूपच अवघड वाटला आणि त्यावरचे प्रश्न सहज सुटणार नाहीत असे तुम्हाला वाटले तर तशी खूण करून तुम्ही पुढील उताऱ्याकडे जाऊ शकता आणि शेवटी वेळ उरला तर हा उतारा सोडवावा. किंवा तुम्हाला असे आढळून आले की एक अतिशय लहान उतारा आहे आणि त्यावर पाच किंवा चार प्रश्न विचारलेत तर तास उतारा अगोदर घ्यायला हरकत नाही. पण त्याच वेळी हेही लक्षात घ्या की उतारा लहान असला तरी तो समजायला कसा आहे. कारण एखादा उतारा समजण्यात थोडीशी चूक झाली तर कधीकधी आपले त्या उताऱ्यावरचे सगळे प्रश्न चुकण्याची संभावना असते. म्हणून इथे खूप सतर्क असणे गरजेचे आहे आणि ही प्रक्रिया सरावाची असणे गरजेचे आहे. त्यासाठी अगदी अशीच पद्धत वापरून सराव प्रश्नपत्रिका सोडविलेल्या असल्या पाहिजेत. 
          अशाप्रकारे एकदा का उतारे सोडवण्याच्या क्रमाबद्दलच्या शंका संपल्यानंतर आपण प्रत्येक उतारा सोडवताना काय दिशा असावी यावर भाष्य करू.

प्रत्यक्ष उतारा सोडविण्या संदर्भात:-
           उताऱ्यावरचे प्रश्न विशिष्ट साच्यातले असतात. त्यामुळे बऱ्यापैकी सराव केला तर हा प्रकार हमखास मार्क्स देऊन जातो. उताऱ्यावर दोन, तीन, चार किंवा पाच प्रश्न असतात. यापैकी एखादा प्रश्न खूपच संदिग्ध असतो, एखादा खूप सरळ असतो तर एखाद्यामध्ये उगीचच complexity आणण्याचा प्रयत्न केलेला असतो पण थंड डोक्याने प्रश्न वाचला तर मग विशेष अडचण येत नाही. 
         यापैकी अवघड प्रश्नामध्ये आपल्याला चार पैकी दोन पर्याय चुकीचे आहेत हे माहित असते पण उरलेल्या दोन पर्यायांपैकी बरोबर कोणता हे शोधणे मात्र अवघड जाते. अशावेळी अजून एकदा उताऱ्यावरून नजर फिरवून उत्तर सापडतय का पहा परंतु तरीही काहीच ठरवता येत नसेल तर मात्र तिथे खूप वेळ रेंगाळत बसू नका. कारण अशा वेळी कितीही वेळा उतारा वाचला तरी नेमके खात्रीने उत्तर सापडण्याची शक्यता 50%च असते. वरून जर त्यात खूप वेळ घालवला तर पुढच्या येणाऱ्या प्रश्नाचा वेळ जातो आणि मग पाच सहा मार्कांचे नुकसान होते. तसेच उतारा वाचण्यात आणि त्या प्रश्नावर बराच वेळ खर्च केल्याने तो प्रश्न न सोडवता सोडून देणेही परवडणारे नसते. म्हणून मग ज्या दोनपर्यायांपैकी कोणता यावर आपण अडलेलो असतो त्यापैकी एक निवडावा आणि पुढे जावे. यात दोन पर्याय आधीच cancel झाल्यामुळे उत्तर बरोबर येण्याची शक्यता 50% पेक्षा जास्तच असते त्यामुळे फार काही नुकसान होत नाही. 
          तसेच उतारे सोडवताना काही लोकांना अगोदर प्रश्न वाचून मग उतारे वाचणे सोप्पे वाटते तर काहींना अगोदर उतारे वाचून मग प्रश्न वाचणे फायदेशीर वाटते. तुम्ही दोन्हीपैकी कोणताही पर्याय निवडू शकता. जर प्रश्न अगोदर वाचले आणि त्यातले keywords बाहेर काढले तर त्या प्रश्नांची उत्तरे कुठे आहेत हे उतारा वाचताना मार्क करून ठेवता येते आणि त्यामुळे वेळ थोडाफार वाचू शकतो. पण मग यात प्रश्न वाचण्यात जास्त वेळ तर जाणार नाही ही काळजी घ्यावी लागते. अन्यथा होते असे की भीतीपोटी आपण उतारा वाचण्याआधी पण प्रश्न खूप बारकाईने वाचतो आणि पुन्हापुन्हा वाचतो आणि अमूल्य वेळ गमावून बसतो.
           मला मात्र अगोदर उतारा वाचून मग प्रश्न वाचण्याची पद्धत जास्त आवडायची. कारण सलग उतारा वाचून समजून घेतला की उत्तरे लिहायला बरीच मदत होते. उताऱ्यांचे एक overall understanding झाले की प्रश्नांची link लागते व अचूक पर्याय निवडायला बरे पडते. प्रश्न वाचून मग उतारे वाचताना अर्धे अधिक लक्ष त्या प्रश्नातील शब्दांकडे राहते आणि मग उतारा पूर्णपणे समजून घेण्यात अडचणी येण्याची शक्यता निर्माण होते.
           पण तुमचा हा निर्णय परीक्षेच्या किमान 2 महिने अगोदर झालेला असला पाहिजे. जेणेकरून तुम्ही दोन महिने त्याचा सराव करू शकता. एकदा का तुम्ही ठरवले की आपण अमुक एक पद्धत निवडायची, तर मग त्यावर ठाम राहा आणि ऐन परीक्षेत त्यात जास्त बदल करू नका. कारण पद्धत कोणतीही निवडली तरी त्याचा तुम्हाला किती फायदा होणार हे तुम्ही किती सराव करता त्यावर आहे. सराव कमी असेल तर कोणतीही पद्धत वापरली तरी मार्क कमीच पडणार. याउलट खूप सराव केला तर पद्धत कोणतीही का वापरेना मार्क जास्तच पडणार.

Attempt किती करायचा?
         शेवटची पण महत्वाची गोष्ट म्हणजे किती attempt करायचा हे ठरवणे. CSAT हा 200 मार्क्स चा पेपर असला तरी राज्यसेवा परीक्षेत 100 पेक्षा जास्त हा CSAT चा चांगला स्कोर मानला जातो. जर वेळेचे नियोजन नीट केले आणि सगळा प्लॅन आधीच तयार असेल तर अगदी अवघड पेपर मध्ये 120 आणि medium पेपर मध्ये 150 पर्यंत मार्क्स पडणे अगदी शक्य आहे. जर हे साध्य झाले तर तुम्हाला GS च्या पेपर मध्ये किती मार्क्स पडतील याची काळजीच करावी नाही लागणार.
         इथे आपण 125 मार्क्स कसे पडायचे त्या दृष्टीने योजना आखू. 50 प्रश्न नेट बरोबर आले की, 50×2.5=125 मार्क्स पडतात. पण आपण सोडविलेले सगळेच प्रश्न बरोबर येत नाहीत, म्हणून आपल्याला negative marking गृहीत धरून 50 पेक्षा जास्त प्रश्न सोडवावे लागतील. समजा आपण 70 प्रश्न सोडवले, पैकी 15 चुकले आणि 55 बरोबर आले. चुकलेल्या 15 प्रश्नांमुळे, पाच प्रश्नांचे गुण वजा करावे लागतील. कारण एकतृतीयांश negative marking मुळे 15÷3=5 प्रश्नांचे गुण वजा करावे लागतील. म्हणून मग बरोबर आलेले, 55-5=50, म्हणजे नेट 50 प्रश्न बरोबर येतील आणि आपल्याला 125 मार्क्स मिळतील. 
          आता आपण या attempt करायच्या 70 आणि बरोबर आणायच्या 55 प्रश्नांचा हिशोब लावूया. Decision making चे 5, aptitude आणि reasoning मधील 25 पैकी 20 सोडवायचे आणि उताऱ्यांमध्ये 50 पैकी 45 सोडवायचे. मग हे होतात 70 प्रश्न. 10 प्रश्न कोणते सोडायचे याची सविस्तर चर्चा आपण वर केलेली आहेच. 
          बरोबर यायला पाहिजेत अशा 55 प्रश्नांचा हिशोब पुढील प्रमाणे. Decision making चे 5 च्या 5 बरोबर पकडू, aptitude आणि reasoning मधिल सोडवलेल्या 20 पैकी 15 बरोबर येतील आणि उताऱ्यामधील सोडवलेल्या 45 पैकी 35 बरोबर येतील. (5+15+35)=55. म्हणजे तुम्हाला उताऱ्यांचा 10 प्रश्न आणि इतर 5 प्रश्न चुकवण्याची मुभा आहे. वरून आपण अगोदरच अवघड असलेले 10 प्रश्न न सोडवता सोडून दिलेत.
          या सगळ्या गणिताच्या मांडणीवरून हे स्पष्ट होते कि CSAT च्या पेपर मध्ये 120 च्या वर मार्क्स पाडणे तितकेसे अवघड नाही. परंतु त्यासाठी अत्यंत काटेकोर नियोजनाची आणि तशाच नियोजनबद्ध अभ्यासाची गरज आहे. वर आपण जे गणित 125 गुणांसाठी मांडले तेच तुम्ही 100 किंवा अगदी 150 गुणांसाठी देखील मांडू शकता. प्रत्येकाला आपापल्या कौशल्याप्रमाणे आपण कितीपर्यंत मार्क पाडू शकतो हे ओळखता आले पाहिजे. मग नियोजन करणे सोपे जाते. तसेच प्रत्येकाला आपण GS मधे कुठपर्यंत मजल मारू शकतो याचा अंदाज असेल तर मग त्याप्रमाणे इकडे CSAT चे नियोजन करता येईल. तसेच यात प्रत्येकाला काय सोप्पे जाते त्यानुसार आकडे वर खाली होतील. म्हणजे एखादा APTITUDE चे 20 पैकी 20 बरोबर सोडवले तर कोणी उताऱ्यांचे 50 पैकी 40 बरोबर सोडवेल. हे व्यक्तिपरत्वे बदलेल, पण एकूण हिशोब मात्र आपण वर मांडल्याप्रमाणेच व्हायला हवा.
            परीक्षाखोलीमध्ये जाण्या  अगोदरच जर तुमचे नियोजन इतके सूक्ष्म असेल तर परीक्षा छानच जाते आणि तुम्ही स्पर्धेमध्ये इतरांच्या बरेच पुढे निघून जाता. कारण बहुतांशी लोकांचा "वेळ आणि ATTEMPT" चे नियोजन नसणे हाच मोठा प्रॉब्लेम असतो. तुमचे ते नियोजन अगदी काटेकोर तयार असते. तसेच तशा प्रकारचे नियोजन अंमलात आणायचा तुम्ही दोन महिने सराव देखील केलेला असतो. प्रत्येक प्रश्नाचा आणि प्रत्येक मिनिटाचा हिशोब तुमच्याकडे असतो. साहजिकच तुम्ही कमी वेळेत जास्त प्रश्न सोडवता आणि आपसूकच स्पर्धेत इतरांच्या पुढे जाता.

उत्तरपत्रिकेत उत्तरे कधी मार्क करायची:-
           आता प्रश्न सोडवून झाल्यावर त्या दोन तासांमध्ये करायची उरलेली गोष्ट म्हणजे उत्तरपत्रिकेत गोल काळ्या पेनने डार्क करणे. यात तुम्ही एकतर प्रत्येक वेळी प्रश्न सोडवला की त्याचे उत्तर डार्क करू शकता. पण यात दर प्रश्नगणिक उत्तरपत्रिकेत मार्क करावे लागत असल्याने वेळ थोडा जास्त जातो आणि उतारा सोडवताना लिंक तुटण्याची शक्यताही असते.
        किंवा दुसरा मार्ग म्हणजे सगळा पेपर सोडवून मग शेवटच्या 10 मिनिटात तुम्ही उत्तरे उत्तरपत्रिकेत मांडू शकता. पण सगळे गोल भरण्याचे शेवटी राखून ठेवले आणि गडबडीत जर गोल भरायला कमी वेळ राहिला तर आपण गडबडीत गोल भरायला चुकण्याची शक्यता असते किंवा काही गोल भरायचेच राहून जातात. दोन्ही प्रॉब्लेम झालेले विद्यार्थी मी स्वतः पाहिलेले आहेत.
         म्हणून मग आपण मध्यम मार्ग काढायचा. सुरुवातीला decision making चे पाच प्रश्न सलग सोडवून ते पाच एकदम उत्तरपत्रिकेत मार्क करावेत. नंतर aptitude आणि reasoning सोडवून घ्यावे आणि त्या सगळ्यांची उत्तरे एकत्रित उत्तरपत्रिकेत भरावीत. त्यानंतर दोन-दोन किंवा तीन-तीन उतारे सलग सोडवायचे आणि नंतर एकत्रितपणे त्यांची उत्तरे उत्तरपत्रिकेत भरावीत. अशा प्रकारे सगळे गोल भरायचे शेवटी ठेवल्यामुळे निर्माण होऊ शकणारा धोका टळतो तसेच प्रत्येक प्रश्नामागे उत्तरपत्रिकडे जाण्यामुळे होणारा वेळेचा अपव्यय आणि लिंक तुटणे या दोन्ही गोष्टी आपण टाळू शकतो.

Tension कसे हाताळायचे?
          यानंतर मुद्दा उरतो तो ऐन परीक्षेत सुरुवातीचे काही प्रश्न अवघड गेल्याने येणारे tension आणि त्याचा पेपरवर होणारा परिणाम. बऱ्याचदा आपल्याला काही प्रश्न सुटत नाहीत किंवा काही प्रश्न सोडवायला थोडासा जास्त वेळ लागतो. लगेच आता आपल्याला कमी मार्क्स पडणार अशी भीती वाटून आपण panic होतो. मग तिथून पुढे आपला अर्धा मेंदू त्याच चिंतेत राहतो आणि फक्त अर्धाच मेंदू पेपर सोडवत असतो. Panic आणि tension मुळे मग येणाऱ्या गोष्टी देखील विसरतात किंवा चुकू लागतात. आणि मग मागच्या चुकांचे विचारात आपण पुढच्या चुकांची पायाभरणी करतो. पण पेपर देऊन बाहेर आल्यावर आपल्याला कळते की सुरुवातीचे प्रश्न सर्वांनाच अवघड गेलेले असतात. पण आपण त्याचा बाऊ करून आपले नुकसान करून घेतलेले असते. यात आपण विसरून जातो की ही एक स्पर्धापरिक्षा आहे. यात तुम्हाला किती मार्क पडले यापेक्षा इतरांच्या तुलनेत तुम्हाला कसे मार्क पडलेत हे जास्त महत्वाचे ठरते. त्यामुळे जेंव्हा तुम्हाला वाटेल की आपल्याला पेपर अवघड जातोय तेंव्हा लक्षात असुद्या की पेपर सगळ्यांनाच अवघड वाटत असणार. मग अशावेळी खूप लोक panic होणार आणि तुम्ही फक्त डोके शांत ठेवले तरी तुम्ही अनेक लोकांना स्पर्धेत मागे टाकणार हे तुमच्या लक्षात यायला हवे. म्हणून अशावेळी पेपर सगळ्यांनाच सारखा आहे आणि तुम्हाला त्यातल्या त्यात बरा performance द्यायचा आहे एवढे लक्षात असुद्या आणि त्याप्रमाणे पेपर कडे पहा मग आपोआप तुम्ही सकारात्मक विचारात जाल आणि पेपर तुम्हाला बरा जाऊ लागेल. पूर्व परीक्षा ही जेवढा अभ्यासावर अवलंबून आहे तेवढीच ती मानसिकतेवर आणि मानसिक बळावर अवलंबून आहे.
           परीक्षेच्या कालावधित नेमके काय करायला पाहिजे हे आपण अगदी सविस्तर पाहिले. परंतु हे सर्व आपण direct परीक्षेत करू असे फक्त ठरवून बसलो तर ऐनवेळी आपण ते अंमलात आणूच शकणार नाही. यासाठी आपण अगदी तंतोतंत याप्रमाणे खूप सराव केला पाहिजे. तरच या सर्व गोष्टी आत्मसात होतील आणि ऐन परीक्षेच्या वेळी जास्त प्रयत्न न करता आपसूक सवयीप्रमाणे होतील. यासाठी परीक्षेच्या दिवसाची रंगीत तालीम किमान चार-पाच वेळा तरी व्हायला हवी. तसेच इतर वेळी पेपर सोडवतानाही आपण केलेल्या नियोजनावर कटाक्ष ठेऊनच मग पेपर सोडवावेत, जेणेकरून सगळ्या पद्धती आपल्या सवयीचा भाग बनतील. जर यातील 80 % जरी आपण ठरवल्याप्रमाणे करू शकलो तर आपल्याला यश हमखास मिळालेच असे समजा.

                 -अमोल अशोक मांडवे(DYSP/ACP)
(असे आणखी लेख माझ्या "राज्यसेवा : यशाची गुरुकिल्ली" या पुस्तकात समाविष्ट आहेत.)

Comments

  1. Very well written and helpful to everyone. Thank you sir

    ReplyDelete
  2. Thanks. Very helpful tips.

    ReplyDelete
  3. After going through this blog one thing is for sure that the readers wont experience any hard feelings for CSAT like before. Thank you very much:)

    ReplyDelete
  4. सर,मी ग्रामीण भागातील एका खेड्यातील विद्यार्थी आहे .तुमच्या अमूल्य मार्गदर्शनाचा खूप फायदा होत आहे. Please sir ही लेखमाला अशीच चालू ठेवा ...

    ReplyDelete
  5. अपल्याकडूम सर्वकाही अचूक मार्गदिले आहे,बाकी उरतंय ते उमेदवारांकडून कठोर अंमलबजावणी.यातून एक मानसिक आधार आणि लढाईची शस्त्रे धारधार होण्यास नक्कीच मदत मिळेल.धन्यवाद सर !

    ReplyDelete
  6. Very in depth analysis and strategy..... thnks for this article.

    ReplyDelete
  7. खूप खूप धन्यवाद सर
    पूर्णपणे अंमलात आणण्याचा प्रयत्न करू

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

पंख पावसाळी

उन्हाळ्याची सुट्टी

आपल्याच मारेकऱ्यांच्या आसऱ्याला