ऋतु

ऋतु


तसा प्रेमाचा कोणताही ऋतू नसतो
तरी अवकाळी ढग आठवांना धुमारे आणतातच

हवेतील गारवा वाढू लागला की
तिच्या स्पर्शाची ऊब प्रकर्षाने आठवते
नव्या पालवीची सळसळ ऐकून
पैंजनाची किणकिण अजून ऐकू येते
पहिल्या थेंबाबरोबर येणारा मातीचा गंध
त्या गच्च मिठीच्या आठवणीत विरतो

पावसासाठी झुरणारी रानपाखरं
पाऊस आल्यावर पानांआड अंग चोरतात
पळत येऊन मिठीत शिरणारी जणू ती
स्पर्शाबरोबर लाजून आरक्त होणारी

काळ्याभोर ढगांनी अंधारून येतं
डोळे मिटून मग स्पर्शानेच पाहणं होतं 
कोसळणाऱ्या आभाळाला न जुमानता 
स्वप्नांचे इमले च्या इमले उभे राहतात

पण कडाडणाऱ्या विजांची नजर लागतेच
गारांबरोबर स्वप्नांचे इमलेही कोसळतात
पाऊस संपता संपता गारवा संपतो
उरते नुसती धग, कासावीस करणारी

या पावसात जन्मलेली गवताची पाती
अंकुरतात, फुलतात, टिकून राहतात
तुझ्यामाझ्यातल्या अंतराला न जुमानता
जिवंत असणाऱ्या आंतरिक ओढीसारखी
          -©अमोल मांडवे(DYSP/ACP)

Comments

Popular posts from this blog

पंख पावसाळी

उन्हाळ्याची सुट्टी

आपल्याच मारेकऱ्यांच्या आसऱ्याला