©राज्यसेवा : यशाची गुरुकिल्ली - माझ्या येणाऱ्या नवीन पुस्तकाबद्दल थोडेसे

©राज्यसेवा : यशाची गुरुकिल्ली - माझ्या येणाऱ्या नवीन पुस्तकाबद्दल थोडेसे
  



जवळपास दोन वर्षे स्पर्धापरिक्षांचे विविध विषय शिकवण्याचा अनुभव असल्याने आणि नंतर DYSP/ACP पदी निवड झाल्याने अनेक विद्यार्थी अनेक शंका घेऊन भेटायचे, प्रश्न विचारायचे. बऱ्याचदा प्रत्यक्ष भेटून तर कधी फोन, फेसबुक, व्हाट्सअँप या माध्यमातून. शिकवण्याची आवड असल्याने अशा प्रश्नांची उत्तरे देऊन विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविणे हा माझ्या आवडीचा विषय होता.
          परंतु DYSP म्हणून सेवेत रुजू झाल्यावर विद्यार्थ्यांना हवा तेवढा वेळ द्यायला जमेना म्हणून मग वाटाड्या(vataadya) नावाचा ब्लॉग लिहिणे सुरु केले. त्यामार्फत अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करता आले. परंतु तरीही या माध्यमाने सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे शक्य होत नव्हते. तसेच सर्व जणांच्या विचारल्या जाणाऱ्या शंकांचे समाधानही करता येत नव्हते. तेंव्हा महेश शिंदे सरांनी ही पुस्तकाची कल्पना सुचवली आणि मग आम्ही तात्काळ त्यावर काम सुरु केले.
           अगदी राज्यसेवा करावी का असा विचार करणाऱ्या विद्यार्थ्यांपासून ते स्पर्धा परीक्षा क्षेत्रात खूप दिवस असणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना हे पुस्तक मार्गदर्शक ठरावे अशाप्रकारे ते लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. अभ्यास कधी सुरु करावा, क्लास लावावा का, किती वेळ राज्यसेवेला द्यावा, पुस्तके कोणती अभ्यासावीत, कोणता विषय कसा वाचावा, कोणत्या गोष्टींवर जास्त भर द्यावा, कोणत्या गोष्टी टाळाव्यात, कोणत्या घटकावर किती प्रश्न विचारले जातात, माहिती नसलेल्या प्रश्नांची उत्तरे कशी शोधावीत, उजळणी कशी करावी, प्रत्यक्ष परीक्षेच्या वेळी कोणत्या समस्या येतात अशा सर्वच लहान-सहान गोष्टींवर या प्रकाश टाकण्याचा प्रयत्न या पुस्तकाच्या माध्यमातून केला आहे. स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात करण्यापासून ते राज्यसेवा परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यावर, तसेच या कालावधीत प्रत्येक दिवशी विद्यार्थ्याला या पुस्तकाचा उपयोग होईल अशा प्रकारे याचे लेखन केले आहे. या सर्व प्रवासात विद्यार्थ्यांना पडणारे बहुतेक प्रश्न, सर्व समस्या व येणाऱ्या सर्व अडचणी यांवर साधे व आचरणात आणायला सोपे असे उपाय येथे मांडण्याचा प्रयत्न आहे.
         या पुस्तकातील सर्व गोष्टी जे मी प्रत्यक्ष माझ्या व माझ्या आजूबाजूला अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अनुभवातून शिकलो त्यावरूनच मांडल्या आहेत. जे मी स्वतः केले किंवा माझ्या मित्रांना करताना पाहिले तेच लिहिले असल्याने यातील सर्व गोष्टी या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या अनुभवात कधी ना कधी येतातच. माझ्या अनुभवाचा सर्वांना होईल तेवढा फायदा व्हावा हीच हे पुस्तक आणि ब्लॉग लिहिण्यामागची प्रेरणा आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने कायम त्याच्या बरोबर ठेवावे व प्रत्येक वेळी त्यांना मार्गदर्शक ठरेल असे पुस्तक लिहिण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. जे पुण्यात आहेत आणि जे पुण्यात नाहीत, ज्यांनी क्लास लावला आहे व ज्यांनी लावला नाही, ज्यांना गावी घरी राहूनच अभ्यास करायचा आहे, अशा सर्वांसाठी हे पुस्तक एक दीपस्तंभ ठरेल अशी अशा आहे. "यशवंत व्हा" असा एक कानमंत्र देण्याचा हेतू या पुस्तकातून साध्य व्हावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना.

            -अमोल मांडवे(ACP/DYSP)

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

पंख पावसाळी

उन्हाळ्याची सुट्टी

आपल्याच मारेकऱ्यांच्या आसऱ्याला