मावळतीचे रंग

                              मावळतीचे रंग
                   
(Sketch credit: AMOL BHOSALE, DSLR
THANK YOU FOR COLOURFUL SKETCH☺)


      गावाला गेलो की रानातला जनावरांचा गोटा सावलीखाली घेऊन उभ्या असलेल्या लिंबाच्या झाडाखाली बसून मावळणारा सूर्य पाहण्याचे माझे वेड फार जुने आहे. आयुष्याच्या शेवटी सगळ्या गोष्टींमधला फोलपणा कळल्यावर माणूस शांत होऊन जातो आणि तरी त्याच्या चेहऱ्यावर मोक्षप्राप्ती सारखे एक विलक्षण तेज असते. मावळतीचा सूर्यही काहीसा तसाच वाटतो. डोक्यावर सूर्य तळपत असताना तो कधी पुढे सरकतोय अशी वाट पाहणारी माणसं, डोळ्यासमोर काही क्षणात डोंगराआड सरकणाऱ्या मावळतीच्या सूर्याने मात्र थोडेसे तरी रेंगाळावे अशी आशा ठेऊन असतात. आयुष्यभर भविष्याची चिंता करत दगदग करून घेणारे म्हातारे जीव सरते शेवटी उगाच जीवाला कवटाळून बसतात, आणखी काही वाढीव क्षणांच्या आशेवर. सुख कशात आहे हे तेंव्हा कळतं पण वळायला मात्र वेळ नसते राहिलेली. सूर्य डोंगराआड गेल्यावर अगदी तशीच हळहळ वाटते. पण फक्त काही क्षण. नंतर रात्रीच्या विलासी अंधारात हरवून जातो आपण.
        मावळतीला पश्चिमेला रंगांच्या छटा मात्र हळुवार पुसट होत जातात. विस्मृतीत जाणाऱ्या परवणीच्या काही क्षणांसारख्या. अगदी उगवल्यापासून मावळेपर्यंत प्रत्येक छटा वेगळी असते. नवीन भासते. आणि आपण मात्र एखाद्या माणसाला अगदी तोकड्या वेळेत ओळखायचा अट्टाहास धरतो. पण जेवढा सहवास वाढेल तेवढे नवीन रंग दिसणं नैसर्गिक आहे हे आपण मानायलाच तयार होत नाही. मग नाविन्याचं कौतुक न राहता उगाचच उद्विग्नता ओढवून घेतो. आपल्या प्रिय माणसाला आपण कसं पूर्ण ओळखत होतो हा आपला खोटा अहंकार सुखावण्यासाठी आपण त्या माणसाच्या व्यक्तिमत्वाची वाढच खुंटवून टाकतो. अगदी नकळत. मावळतीच्या बदलत्या रंगांइतकं सहज आपण आपल्या माणसांचं बदलणं आपल्याला सुखावून का नाही जात?
    सूर्यास्त आणि माणसाच्या जीवनाचा अंत यात एक लाक्षणिक फरक मात्र आहे. माणसाला मरताना त्याच्या जवळची सगळी माणसं जवळ हवी असतात. पण सूर्य मावळताना मात्र एकट्यालाच पहावा वाटतो. असं का हे मात्र मला कधीच उलगडलं नाही. का कुणास ठाऊक पण सूर्य मावळताना पाहिला की उगाचच एकटं वाटू लागतं. विरहाचं मूर्तिमंत प्रतिकच जणू. विरहात माणूस रमतो आणि म्हणूनच कदाचित सूर्यास्त पाहण्याची मजा एकांतातच जास्त येते. तेंव्हाचा एकाकीपणा भावतो. म्हणूनच सूर्य मावळताना रोज पहावा वाटतो. दूर गेलेली माणसं उद्याच्या उगवत्या सुर्याबरोबर परत येतील, ही वेडी आशा तर असं वाटण्यास कारण ठरत नसेल ना? येणारा जातो याचं प्रतीक जसं जीवन आहे, तसंच जाणारा कधीतरी येईल असं स्वप्नच दाखवतो का सूर्य?
     उगवणारा सूर्य आईसारखा वाटतो. पवित्र. दिसल्या दिसल्या हात जोडावेसे वाटतात. सूर्य माथ्यावर चढला की बाप बनतो. थोडा कडक पण सगळा अट्टाहास आपल्यात जीव ओतण्यासाठीच असतो. त्याच्या शिवाय जीवन खुंटतं. मावळतीचा सूर्य मात्र दर वेळी प्रेयसीचं रूप घेतो. क्षण लांबावे वाटतात. जग थांबावे वाटते. पण प्रेयसीसारखेच अंगावर रोमांच उभे करून तो अचानक मावळून जातो. खुलणाऱ्या रात्रीसारखी कधीतरी अचानक प्रेयसीला बायको बनवून जातो. बायको पण तो रात्रीसारखा वसा अविरत पाळते. तिच्या मिठीत सुख दरवळतं आणि दुःख विरघळतं.
           -अमोल मांडवे(ACP/DYSP)©

             (Photo credit: KHYATI SHAH)

Comments

  1. व.पु. आठवले वाचताना.

    अतिशयोक्ति नाही खरच. इतक सुन्दर आयुष्याचा सुर्यास्ताचा विचार रंगवाला आहेस सूर्योदय अणि सूर्यास्त बरिच जण पाहतात , शब्दात व्यक्त खूप कमी व्यक्ति करू शकतात. तझ्या लिखनातून बऱ्याच जणाना तो आनंद जगता येतोय.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद सौरभ. पण व पु खूप जास्त मोठे आहेत. 😊

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

पंख पावसाळी

उन्हाळ्याची सुट्टी

आपल्याच मारेकऱ्यांच्या आसऱ्याला