यश आणि अपयश कसे स्वीकारावे

                यश आणि अपयश कसे स्वीकारावे

      महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे किंवा संघ लोकसेवा आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये काही हजार विद्यार्थ्यांमधून 1 जण, असे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण आहे. म्हणजे तसे पहिले 99.9 % विद्यार्थी अनुत्तीर्ण होतात. पण इथे लक्षात घ्यायची गोष्ट अशी की "अनुत्तीर्ण" विद्यार्थ्यांचे प्रमाण जरी जास्त असले तरी "अपयशी" विद्यार्थ्यांचे प्रमाण मात्र अतिशय कमी आहे. अनुत्तीर्ण म्हणजे अपयशी हे समीकरण इथे लागू पडत नाही. संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थी राज्यसेवेतून चांगली पदे मिळवतात, राज्यसेवेत यश न मिळालेले इतर स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवतात. आयोगाच्या परीक्षांच्या अभ्यासाच्या जोरावर आज अनेक जण बँकिंग, journalism, education या क्षेत्रात प्रचंड यश संपादित करत आहेत. तर अनेक जण यशस्वी उद्योजक आहेत. आणि ते अगदी सहज आपल्या स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासादरम्यान मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करून घेताना दिसतात. त्यामुळे अशा लोकांना अपयशी म्हणता येणार नाही. स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासातून मिळालेले ज्ञान, आलेली प्रगल्भता ही आयुष्यात खूप उपयोगी ठरते. जगण्याची दिशाच बदलून जाते असे म्हणा हवे तर.
        तरी पण अभ्यास सुरु असताना आपले vision इतके clear नसते. त्यामुळे प्रत्येक अनुत्तीर्ण परीक्षा हे एक मोठे अपयश वाटते तर साधी prelim पास झाल्यावर देखील काही जणांच्या डोक्यात हवा जाते. म्हणून अभ्यास करतानाच्या काळात यश आणि अपयश म्हणजे काय हे नीट ओळखले पाहिजे आणि दोन्ही गोष्टी पचवायच्या कशा ते देखील पाहिले पाहिजे.
          सर्वात अगोदर स्पर्धापरिक्षा करतोय म्हणजे आपण प्रचंड मोठं असं काहीतरी करतोय असा जो समज असतो तो अगोदर काढून टाका. कोणत्याही इतर परिक्षांसारखीच ही देखील एक परीक्षा आहे आणि इतर कोणत्याही नोकरीसारखी पगार देणारी ही एक नोकरी आहे हे लक्षात ठेवायला हवं. परीक्षेचे अवडंबर माजवले नाही तर त्या परीक्षेचा अभ्यास व परीक्षा सोपी जातेच. पण महत्वाचे म्हणजे तसे केल्याने यश वा अपयश पचवणे फारसे अवघड जात नाही.
          स्पर्धा परीक्षेच्या जगात अपयश पचवता येणे आणि त्यातून लवकरात लवकर मार्ग काढून वाटचाल चालू ठेवणे हे सर्वात मोठे आव्हान आणि सर्वात उपयुक्त कौशल्य आहे. स्पर्धा परीक्षा पहिल्या प्रयत्नात पार करणारे अगदी बोटावर मोजण्याइतके कमी असतात आणि त्यातील बहुतेक जण अजून चांगली पोस्ट मिळावी म्हणून परत प्रयत्न करतात. तसेच स्पर्धापरिक्षेचे एका मागून एक टप्पे लागून येत राहतात, त्यामध्ये कुठेही निवांत होण्यास किंवा खूप विचार करत बसण्यास वेळ नसतो. अशावेळी जर अपयशातून येणाऱ्या नैराश्यात किंवा यशातून येणाऱ्या समाधानामध्ये तुम्ही थोडा वेळ जरी गुरफटला तर तुम्ही स्पर्धेतून मागे पडण्याची दाट शक्यता निर्माण होते. म्हणून अपयश आले तर त्यावर अडून निराश न होता त्याची कारणे शोधावीत. आपली अभ्यासाची दिशा आणि प्रत्यक्ष परीक्षेवेळचे नियोजन यातील नक्की काय चुकले याचा आढावा घ्यावा. बऱ्याचदा अपयश आले की आपण आत्तापर्यंत केलेले सगळेच चुकीचे होते असा समज विद्यार्थी करून घेतात व सर्व गोष्टी बदलायचा विचार करू लागतात. Sources बदलायचे का, दुसरा क्लास लावायचा का, library बदलायची का, अभ्यासाची पद्धत बदलायची का असे नानाविध प्रश्न मनात घर करतात आणि मूळ प्रश्न बाजूला राहतो आणि कोणत्या तरी असंबंध गोष्टीवर अपयशाचे खापर फुटते आणि त्यातून एखादा वेगळाच निष्कर्ष काढून अनावश्यक बदल करून अभ्यास सुरु केला जातो.
          खरे तर बऱ्याचदा अभ्यासात जास्त काही चुकलेले नसतेच. परिक्षेवेळी योग्य वेळी योग्य निर्णय न घेता आल्याने किंवा सराव कमी पडल्याने किंवा तणावाखाली पेपर दिल्याने अपयश आलेले असते. ही कारणे मात्र कधीच समोर आणली जात नाहीत. मग अभ्यासात बदल करायच्या वेडापायी ज्या गोष्टी योग्य होत्या त्याही बदलल्या जातात आणि अभ्यासाचा पायाच बदलल्याने परत सगळी मेहनत नव्याने करावी लागते आणि यात वेळ गेल्याने नुकसान होण्याची शक्यताच जास्त असते.
           यावर सोप्पा उपाय म्हणजे स्पर्धा परीक्षा क्षेत्राचे rational analysis करणे. त्यातून यशस्वी होण्यासाठी सर्वसाधारणपणे किती वेळ लागतो आणि आपण स्वतःला किती वेळ दवणार आहोत याचे गणित पक्के मांडणे. जे यावर्षी यशस्वी आहेत ते देखील कधीकाळी अयशस्वी होते याची जाण ठेवणे. रोजच्या रोज आपण योग्य दिशेने जात आहोत का ते पडताळणे. अपयशाचा विचार करत बसल्याने किंवा त्याचा ताण घेतल्याने गेलो तर आपण यशापासून दूरच जाऊ याची कल्पना असली की आपण त्यात अडकून राहत नाही. त्यातही अपयश पचविण्यासाठी लागणारी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःवर विश्वास. स्वतःवर विश्वास असेल तरच या क्षेत्रात तुम्ही टिकून राहू शकता. त्यासाठी स्वतःला स्वतःच्या प्रयत्नांवर विश्वास हवा. परीक्षेच्या निकालावरून स्वतःचे यशापयश या क्षेत्रात ठरवता येत नाही. "परीक्षा पास होण्यासाठी, आणि मला शक्य होते तेवढे प्रयत्न मी केले का?" हा प्रश्न स्वतःला विचारावा आणि जर याचे उत्तर होकारार्थी असेल तर परीक्षेचा निकाल काहीही लागला तरी तुम्हाला समाधानी राहता आले पाहिजे. कारण स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत तेच आपल्या नियंत्रणात असते. निकाल काय लागणार, पेपर कसा येणार, cutoff चे काय होणार यावर आपले कसलेच नियंत्रण नसते. किती अभ्यास करणे आणि कसा अभ्यास करणे गरजेचे आहे आणि मी तसे केले का? एवढी साधी गोष्ट लक्षात ठेवली की स्पर्धापरिक्षेचा ताण टाळता येतो. आणि ताण नसेल तर यशाचा मार्ग अधिक सुकर बनतो.
           तसेच यावेळी उत्तीर्ण झालेले बरेच लोकं पुढच्या वर्षी आपल्या बरोबर परीक्षेला असणारच आहेत. त्यामुळे फार निराश होण्यासारखे काही नसतेच आणि पुढील वर्षी अशा लोकांशी स्पर्धा करायची असेल तर यावर्षी त्यांच्याइतका अभ्यास करावाच लागेल. त्यासाठी अपयशाने निराश होऊन बसने परवडणार नाही.
          म्हणून जरी अपयश आले असले तरी आपण 80% गोष्टी बरोबर केल्या आणि त्या आपल्याला इथून पुढेही तशाच करायच्या आहेत हे लक्षात ठेवावे. आपल्या फक्त 20% गोष्टींमध्ये थोडे वरखाली झालेले असते. या एवढ्याच गोष्टी थोड्याफार बदलाने सुधारून घ्याव्यात. असे केल्याने परत अभ्यास नव्याने सुरु न होता फक्त value addition होते आणि तीच गरजेची असते. असे केल्याने चूक सुधारायला वेळ आणि ऊर्जा मिळते. अन्यथा माझे सगळेच चुकले असा विचार केल्याने सगळे काही नव्याने सुरु करण्याच्या नादात नक्की चुकले काय याचा थांगपत्ता लागत नाही आणि पुढील वर्षी देखील त्याच चुकांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता निर्माण होते. अनेक वर्षे देऊनही यश न मिळण्यामागे बऱ्याचदा हेच कारण असते.
           यावरून हे लक्षात येते की अपयश नीट हाताळता आले की ते आपोआप आपल्याला यशाकडे घेऊन जाते. याचप्रमाणे जर यश व्यवस्थित हाताळता नाही आले तर ते आपल्याला अपयशाकडे घेऊन जाते.
           राज्यसेवा तीन टप्पे असणारी परीक्षा आहे. तिन्ही पार केल्या तरच आपण इच्छित ठिकाणी पोचतो. पण बऱ्याचदा फक्त पूर्वपरीक्षा पास झाल्यावर सुद्धा काहीजणांच्या डोक्यात हवा जाते. आपण पूर्वपरीक्षा पास झालो म्हणजे अर्धे अधिकारी झालो असेच यांचे मत होते आणि त्यात ते हुरळून जातात. त्यामुळे अभ्यासावर परिणाम होऊन मुख्यपरिक्षेत अवघड परिस्थिती निर्माण होते. तसेच मुख्यपरिक्षेनंतर मुलाखतीच्या तयारीवेळी होण्याची शक्यता असते. म्हणून मग एका टप्प्यावरचे यश हे डोक्यात न जाऊ देता जास्त जोमाने पुढच्या परीक्षेच्या तयारीला लागावे. कोण पास झाले आणि कोण नाही, कोणाचे काय चुकले असल्या गप्पांमध्ये वेळ न घालवता पुढील तयारीला लागावे. त्यामुळे अंतिम यश मिळण्याची शक्यता नक्कीच वाढेल.
          तसेच जरी एखादी पोस्ट मिळाली तरी बऱ्याचदा ती क्लास 2 असते. पुढे आपल्याला क्लास 1 ची देखील तयारी करायची असते किंवा क्लास 2 मधील आणखी आपल्या आवडीची पोस्ट मिळण्यासाठी प्रयत्न करायचा असतो. अशावेळी जर मागील यश साजरे करण्यात गरजेपेक्षा जास्त वेळ आणि energy गेली की मग अवघड होऊन बसते. आनंद साजरा नक्की करावा, कारण आपण कित्येक महिने केलेल्या कष्टाचे ते चीज असते. त्याचबरोबर यात समाधान देखील असावे, कारण समाधान मानण्याची वृत्ती नसेल तर तर कायम अतृप्तीची भावना राहते आणि आपण बऱ्याच आनंदाला मुकतो. पण त्याचवेळी यात हुरळून जाऊनही फायदा नाही. तसे झाल्यास पुढे वाट पाहत असलेले मोठे यश तुमच्या हातातून निघून जाईल.
         बऱ्याचदा पोस्ट मिळूनही आपण extension घेऊन अभ्यास करत असतो. पण बऱ्याच पोस्ट मिळालेल्या लोकांचे इतर विद्यार्थ्यांशी वागणे या काळात बदलून जाते. आपण काहीतरी खूप मोठे मिळवले आहे आणि बाकीच्यांना ते तितकेसे जमणार नाही असा अविर्भाव अनेकांच्या वागण्यात दिसतो. ती अध:पतानाची नांदी असते. अशा लोकांनां इर्षेने यश मिळलही पण समाजमान्यता आणि समाधान कधीच नाही मिळणार. म्हणून यशाकडे देखील अमुक एक परीक्षा उत्तीर्ण झालो असेच पाहावे. मी खूप मोठा कोणतरी झालोय असा विचार डोक्यात बसला की प्रगतीची दारे बंद होतात हे नक्की. म्हणून यश मिळाले तरी स्थितप्रज्ञता कायम ठेवावी. त्यामुळे प्रत्यक्ष त्या पदावर काम करताना लागणारे गुण तुमच्याकडे आहेत याचा देखील दाखल मिळेल.
          यश- अपयश हा स्पर्धा परीक्षेचा अविभाज्य भाग आहे. पण त्यावरून स्वतःची किंमत करणे कदापिही योग्य नाही. परीक्षा तुमच्यापेक्षा मोठी नाही हे कायम लक्षात असुद्या. स्वतःच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवा आणि त्यावरूनच स्वतःची परीक्षा करा. हे जमले तर आयुष्यात यशस्वी होण्याची हमीच मिळते.
                   -अमोल मांडवे(DYSP/ACP)©
    (माझे पुस्तक "राज्यसेवा: यशाची गुरुकिल्ली" मधून घेतलेला लेख)

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

पंख पावसाळी

उन्हाळ्याची सुट्टी

आपल्याच मारेकऱ्यांच्या आसऱ्याला