अंघोळीच्या पाण्याची चूल

                     अंघोळीच्या पाण्याची चूल
(Sketch Credit:- To the dear friend with magical skills Amol Bhosale. Great pencil work🙏)

         घराबाहेर न्हाणीच्या भिताडाला लागूनच मातीनं लिपलेली विटांची चूल. पहाटे केंव्हातरी(अलार्म च्या दुनियेपासून लांब) दोन पावलं पेंडंची किटली घेऊन घराबाहेर पडायची आणि दुसरी दोन पावलं घराला वळसा घालून मागच्या दाराला जाऊन, खाली लाकडाची एक ढपली लाऊन त्यावर चिपाडं ठेऊन अंघोळीच्या पाण्याची चूल पेटवायची. आणि त्या उबीत हळू हळू घराला जाग यायची. पेटवताना चुलीवरचं भगुलं मोकळंच असायचं. त्या पावलांनी संसार सुरु केला तेंव्हा पण असाच मोकळा होता की. जाळ एकदा लागला की मग कळशीनं पाणी आणून आई ते भगुलं भरायची. पुढं तिनं असाच संसार पण भरून टाकला सुखानं, समृद्धीनं. पारूसं झाडून काढे पर्यंत आणि परसाकडं जाऊन येईपर्यंत पाणी तापायचं. अंघोळ केल्याशिवाय आईला दुसरं कुठलं काम करवत नसायचं. म्हणजे अंघोळीची चूल पेटल्याशिवाय भाकरीची चूल काय पेटायची नाय. 
           तिला अंघोळीला पाणी काढून आई दीदी साठी पाणी ठेवायची आणि जाळ घालून ठेवायची. त्यो घातलेला जाळ विझायच्या आत दीदी उठून चुलीपुढं येऊन बसायची. संसाराचा गाडा असाच अलगद आईकडून तिच्याकडे नकळत गेला. आईनं करायचं त्यातलं निम्मं अर्धं आम्हा भावंडांचं तिनंच केलं. आई रानात गेली की आम्ही आन घर तिच्याच भरवशावर असायचं. दीदी नंतर म्हातारी आय, म्हणजे आमची आजी, येऊन बसायची चुलीपुढं. बसल्यापासून हाका सुरु करायची त्या सगळ्यांच्या अंघोळा झाल्यावरच बंद व्हायच्या. झोपायचं असलं तर अंघोळ करून खुशाल लोळत पडा असं तिचं म्हणणं असायचं. चूल बंद पडू नये आणि पाणी जास्त तापायच्या आत आंघोळीला घ्यायला पाहिजे असा तिचा नियम. जगण्याचं सार देऊन गेल्या या गोष्टी. कमीत कमी जळणात आणि फुकणी न वापरता मोठा जाळ लाऊन पाणी लगेच तापवायचं तंत्र तिला अवगत होतं. काडी काडी वेचून संसार उभा केलेल्या माणसानेच हे करू जाणो. शरीर थकलं तरी उभ्या केलेल्या संसाराचा गाडा ढकलायचा मोह माणसाला सुटत नाही. आईकडे स्वयंपाकाच्या चुलीचा ताबा गेल्यावर तिने घेतलेला अंघोळीच्या चुलीचा ताबा हे याचे मूर्तिमंत उदाहरण. पण या बदलतलं नाट्य एखाद्या राजकीय सत्ताबदलाइतकंच रंजक असतं हे ही खरंच आहे.
           घरातल्या कर्त्या पुरुषांना कधीतरी थंडी सोडली तर अंघोळीच्या पाण्याच्या चुलीला जाळ घालताना बघितलं नाही. त्यांना तापलेलं पाणी आणि अंघोळीला नंबर आयता मिळायचा. गडी माणसांना लय महत्वाची कामं असत्यात ना. असो.     
           आमचा मात्र अंघोळीच्या चुलीशी अनेक प्रकारे संबंध यायचा. पाय छातीबरोबर दुमडून, मान गुडघ्यावर ठवून गारठ्याच्या दिवसात चुलीपुढं बसायला भांडणं लागायची. मी तापवलेलं पाणी दुसऱ्याला का दिलं म्हणून दर दोन तीन दिवसात कुणी ना कुणी भोकांड पसरलेलं असणारच. बऱ्याचदा प्रश्न मारामारीने सुरु व्हायचे आणि कोणातरी मोठ्या माणसाचा मार खाऊन सुटायचे.  जाळाबरोबर जादूचे प्रयोग आणि त्यातही संशोधनात्मक प्रयोग वाखाणण्यासारखे सारखे असायचे. पण त्यांचेही पर्यवसान बऱ्याचदा मारातच व्हायचे. वेगवेगळ्या प्रकारचं प्लास्टिक हातात धरून जाळायच्या प्रयत्नात बोटंही भाजून घेतली. कागद जळाला तरी त्यावरची अक्षरे वाचता येतात हा शोध मला लागला तेंव्हा भेटंल त्याला चार दिवस मी तेच सांगत होतो आणि पोरांना प्रयोग करून दाखवत होतो. दुपारी विटांच्या गाड्या फिरवायला रस्ता करायला याच अंघोळीच्या चुलीतला राखूंडा कामाला यायचा. कधी कधी कोपरं आणि गुडघ घासायला पण तीच राख लागायची. जाळ घालत घालत चिपाडाची सरकी काडून बैलगाडी बनवणं हा माझा आवडता उद्योग होता. लपाछपी नाहीतर शिवणापाणी खेळताना न्हाणीच्या भिताडावर चढायला पायरी म्हणून पण ही चूल कामाला आली. अंघोळीच्या चुलीसारखीच फुकणी  पण बहुआयामी. विस्तवावर फुंकर मारायला, जाळ पुढे सारायला, नारळ फोडायला आणि आईला राग आला असला तर फेकून मारायला पण ती उपयोगात यायची. लहानपणी फुकणीने मार खाल्लाय याची या वयात फुशारकी मारता येते. शिव्यांचा जगात पण फुकणीची विशेष जागा आहे.
          दर शनीवारी आई चूल लिपायची. चिरट्या मुजवल्या तरंच जाळ नीट लागतोय. घरातले हेवेदावे चव्हाट्यावर आले तर घर संपून जातंय. म्हणून तर घर टिकवायला असल्या गोष्टींवर पोत्याराच फिरवावा लागतोय. बंब आला, गॅस आला, पुन्हा हीटर आला, घर नवीन झालं  पण अंघोळीची चूल अजून आहे बाहेर तशीच. पहिल्यासारखं आता घरदार तिच्यावर अवलंबून नाय पण गरज पडंल तवा ती असतीच. तशी सावत्रपणाची तिला सवय असतेच आधीपासून. मान, पूजा स्वयपाकाच्या चुलीचीच व्हायची. पण लय पाहुणं येणार असलं की मटाण शिजवायला हिच्यावर, भुईमूग काढला की शेंगा शिजवायला हिच्यावर, भातवड्या-कुरवड्या करायच्या म्हणाल्या की आदान हिच्यावर. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, हा संदेश द्यायला कोना संतांची वा देवाची गरज नाही.
           दिवाळीच्या अंघोळीला आता हमखास त्या चुलीची आठवण येते. दोन, कधी कधी तीन बादल्या एकदम कडक पाण्याच्या मिळायच्या. अंगाला तेल लाऊन देणाऱ्या आईइतकी आणि अंग चोळून देणाऱ्या बहिनींइतकी माया अंघोळीच्या चुलीनं पण केली आपल्यावर असं वाटतं राहतं. गावाला गेल्यावर माणसांना भेटल्यावर जितकं बरं वाटतं तेवढंच ती चूल दिसली तरी वाटतं.
          © -अमोल मांडवे(ACP/DYSP)


Comments

  1. खूप छान लिहिलंय, सगळं बालपण आठवलं, चुलीवर तापवलेल्या पाण्यात लाकडाचा वास मूरतो त्यात अंघोळ करण्यात वेगळीच मजा यायची, आता ती राहिली नाही

    ReplyDelete
  2. Harshvardhan B R Shinde6:45 pm, September 28, 2018

    ओळ न ओळ वाचताना लहानपणीची आठवण येत होती।
    Thanks .....����
    इतकं जबरदस्त शब्दसामर्थ्य, लिखाना मधला जिवंतपणा सगळंच कौतुकास्पद आहे.............
    असेच चोखंदळ विषयावर लिहित राहा.... लिहीत राहा.... लिहीत राहा

    ReplyDelete
  3. सुंदर चित्रण👌👌👌
    लहानपण पुन्हा एकदा तुझा लेखणी मधून डोळ्यासमोरून तरळले!!!

    ReplyDelete
  4. गावाकडच्या आठवणी जाग्या केल्या अमोल दादा,😘मस्तच लिखाण👌

    ReplyDelete
  5. खूप सुंदर लेख...

    ReplyDelete
  6. अगदी दररोज नाही पण जेव्हा कोया पुट्ठ, रद्दी, जमायची तवा उन्हाळ्यामधि आई चूल पेटवायची. लई वाटयच लका.
    पुनः एकदा तुझ्या लिखनातून तो आनंद अनुभवता आला. असाच लिहित रहा आनंद वाटत रहा.

    ReplyDelete
  7. मला माझी म्हातारी आय आठवली....

    ReplyDelete
  8. Nice and fresh writing Amol!Shivyanchya jagat fuknichi vishesh jaaga ahe :P

    ReplyDelete
  9. अप्रतिम..तुझ्या लेखांतून बालपण परत अनुभवायला मिळत आहे.

    ReplyDelete
  10. Yaa ki mag. Tumhala quarantine pn thambvu nai shakat

    ReplyDelete
  11. अप्रतिम सर👌👌

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

पंख पावसाळी

उन्हाळ्याची सुट्टी

आपल्याच मारेकऱ्यांच्या आसऱ्याला