पंचवीस पैशाचं कोरं पत्र

                        पंचवीस पैशाचं कोरं पत्र
                   


       पाच पैशाला बऱ्याच 'बारक्या' गोळ्या मिळणाऱ्या वेळेची गोष्ट आहे बरं का. त्यामुळे 25 पैशाची किंमत नका करू. आणि असंही, नाही करता येणार आपल्याला त्या पत्राची किंमत. मला काय तेंव्हा येत नव्हती कोणाची पत्रं, आणि मला पत्र येण्याची वेळ येण्याआधीच या पोस्ट कार्डाचा काळ लोटूनही गेला होता. वाळू मुठीत धरली की थोड्या वेळात ती निसटून जाते हातातून, पण काही क्षणांकरिता झालेली वाळूच्या स्पर्शाची अनुभूती रहातेच आपल्याकडे. हे पोस्ट कार्ड मात्र हातात येण्याआधीच निसटून गेलं असेल अनेक जणांच्या. तो काळंच बरंच काही न मिळण्याचा होता. म्हणूनच कदाचित 'समाधानी' वृत्तीचा होता.
        आमच्यात कामाला येणाऱ्या कमलाबाईने तिच्या मुलींची लहानपणीच लग्नं लाऊन दिली म्हणून शेम्बुड पुसायचं कळत नसताना देखील तिची अक्कल आम्ही काढायचो. चार मुली पोटाला आल्या म्हणून लहान वयातच त्यांची लग्नं लाऊन देणाऱ्या मजुरी करण्याऱ्या आईची अगतिकता या 25 पैश्याच्या पोस्ट कार्ड नेच आम्हाला सांगितली. एखाद्या दिवशी कामावरून आलं की ती हातात एक कोरं पोस्टकार्ड घेऊन आमच्या घरी यायची. पोरीचं नाव सांगून कायबाय दोन चार प्रश्न लिहायला सांगायची. अजून कळतेही न झालेले जीव दुसऱ्याच्या दावणीला बांधून आल्यावर त्याची फरफट तर होत नाही ना या विचारांनी होणारी घालमेल दिसायची त्यातून. उत्तरं तिलाही माहिती असणारे प्रश्न असायचे, पण आईचं काळीज, रहावत नसावं. शेवटी माझी 'खुशाली' कळवा हे मात्र प्रत्येक पत्रात ठरलेलं. डोळ्यात काहीतरी लपवायची तिची धडपड कळून यायची. ते अश्रू असायचे की दुःख कळायचं नाही. तिची परिस्थिती होती ती जर 'खुशाली' होती, तर मग मला आयुष्यात काही कमी आहे अशी तक्रार करण्याचा अधिकारच नव्हता राहिला. तिने शिकवलेला धडा आता खूप उपयोगात येतो. आपली पण खुशालीच आहे असं विश्वासानं स्वतःलाच सांगता येतं. चार बुकं शिकलेल्या आम्हाला तेंव्हा काही अर्थ लागायचा नाही त्या पत्रांचा. पण जशी समज येत होती तसा त्या शब्दांमध्ये बंदिस्त भावनांचा ज्वालामुखी किती प्रचंड असावा याचा आवाका लक्षात यायचा. आपल्या बापाला इतकं चांगलं लिहिता याचा अभिमान वाटायचा. बापासारखी आपल्याला पण किंमत द्यावी लोकांनी असं वाटूनच पुढं शाळेची, पुस्तकांची, लिखाणाची ओढ लागली असावी.
         नंतर नंतर कुठे कुठे आजूबाजूला फोन उगवू लागल्यावर आणि 25 पैशांची किंमत कमी झाल्यावर "या देवीच्या नावाने ही पत्रे 16 जणांना पाठवा, ज्यांनी पाठवली त्याला एक लाख रुपये मिळाले आणि ज्याने दुर्लक्ष केले त्याचा अपघात झाला" अशीच पत्रे जास्त यायला लागली.  आणि लोकांना वाटतंय हे व्हाट्सअँप मुळे सुरु झालंय. व्हाट्सअँप च्या बापाच्या जन्माआधीपासून आम्ही या 'तंत्र'ज्ञानात पुढे होतो हे यांना कोण सांगणार.
        आजकालच्या मोबाईल च्या स्क्रीन एवढाच आकार होता त्या कार्ड चा. आणि एका मेसेज एवढेच शब्द बसायचे त्यात. तेवढे पुरेसे असायचे एखाद्याला तो बाप झालंय हे कळवायला आणि एखाद्याची आई गेली हे कळवायला पण. आनंदात मनोमन शुभेच्छा द्यायचा आणि दुःखातमात्र हमखास भेटून ते वाटून घ्यायचा काळ होता तो. आजकाल Congratulations आणि RIP नंतर 💐 हा गुच्छ दोन्हीकडे चालतो आणि त्यावरच भागते पण. आणि तो ही कॉपी पेस्ट वाला. खरं तर या नव्या गोष्टीत वाईट काहीच नाही, पण अतिरेकाने भावना बोथट होतायत एवढं मात्र नक्की.
          हे पत्र लिहितानाची एक गम्मत म्हणजे बहुतेक वेळा पत्राला दोन बाजू आहेत असं गृहीत धरून आपण त्या हिशोबाने लिहायला सुरु करायचो आणि मग पत्र पालटल्यावर अर्धीच बाजू लिहू शकतो हे अचानक लक्षात यायचं. दुसरी बाजू अर्धीच असणं हे "life is not fair" चं अगदी मूर्तिमंत उदाहरण आहे. मग जागा संपत आलेली असते आणि नेमकं महत्वाचं लिहायचं राहून गेलेलं असतं. मग गिचमीड करून आहे त्यात सगळं बसवायचा प्रयत्न होतो. आयुष्य उतरणीला लागल्यावर करायच्या राहून गेलेल्या, बोलायच्या राहून गेलेल्या गोष्टींचा डोंगर पाहून आयुष्यात पण अशीच गिचमीड होते. आणि मग परत एकदा आपल्या चुकांवर आपणच पांघरून घालून "life is not fair" वर सगळं ढकलून स्वर्गाचा किंवा नरकाचा पत्ता कळण्याआधी कसंबसं आयुष्याचं पत्र संपवायचा प्रयत्न आपण करतो.
         दहावीत बोर्डात दुसरा आल्यावर एका अनोळखी, कुठल्या तरी लांब च्या गावातल्या शाळेच्या शिक्षकाचं आलेलं पत्र हे माझ्या नावानं आलेलं पहिलं 25 पैशाचं पोस्ट कार्ड. आजही जपून ठेवलंय ते. आपण खरच कौतुकास्पद काहीतरी केलंय हे ते पत्र वाचल्यावर जेवढं वाटलं तेवढं इतर कधीच नाही वाटलं. आपण गावातल्या सगळ्यांची पत्र लिहून द्यायची अशी स्वप्न बघणाऱ्या मी नंतर काही पत्र लिहिलीपण, पण स्वतःसाठी. कधी पाठवली नाहीत ती. पत्ताच नसायचा पाठवायला. आणि त्या 25 पैशाच्या कार्डावर नेमक्या भावना मांडण्याइतकी प्रगल्भता कधीच नव्हती माझ्यात. 
        एखादं कोरं 25 पैशाचं पोस्टकार्ड सतत बरोबर ठेवावं म्हणतो. मनात दाबून टाकलेली एखादी गोष्ट एखाद्या हळव्या क्षणी लिहून काढायला. 
       -©अमोल मांडवे(DySP/ACP)

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

पंख पावसाळी

उन्हाळ्याची सुट्टी

आपल्याच मारेकऱ्यांच्या आसऱ्याला