घराचा उंबरा आणि ओसरीची पायरी

                घराचा उंबरा आणि ओसरीची पायरी

                                
(Sketch Credit- Amol Bhosale, DSLR😊)

        स्वतःच्या बालपणीचं काही आठवत नाही, पण ते माझ्या लहान भावंडांपेक्षा फारसं वेगळं नसावं. माझा लहान भाऊ रांगत उंबऱ्याकडे जायला लागला की कोण ना कोण त्याला उचलून आत सोडायचं. पण उचलून ठेवणारा दमून गेला तरी याची उंबऱ्याकडची मोहीम अविरत चालू राहायची. मलाही एवढं आकर्षण असेल का त्या उंबऱ्याचं? आणि असेल तर ते का? उंबऱ्या बाहेरून आत डोकावणाऱ्या नाविन्यामुळे की चार भिंतीबाहेरच्या अनिर्बंध स्वातंत्र्यामुळे की अंतरीच्या अगाध अज्ञानामुळे? याची उत्तरं तेंव्हाही मला माहिती नव्हती आणि आजही नाहीत. पण उंबऱ्या बरोबरचं माझं नातं मात्र दर प्रत्येक भेटीत एका वेगळ्या रंगाने खुलत गेलं. बहिणीचा मुलगा पण उंबऱ्याकडे जायला लागला की असंच त्याला उचलून आत नेलं जायचं. पण एकेदिवशी सगळ्यांची नजर चुकवून जेंव्हा तो उंबरा ओलांडून पायरीवर जाऊन बसला तेंव्हा मात्र दोन दिवस ती कौतुकाने सगळ्यांना तेच सांगत होती. स्वतःच्या सामर्थ्यावर बाहेरच्या जगाला आपलं बाळ सामोरं जातंय याचा आनंद झाला असावा त्या माउलीला. शेवटी तिच्या बाळाचं ते पहिलं सीमोल्लंघन असायचं.
          आमच्या घराच्या दरवाजाचा लाकडी उंबरा आणि त्याच्या बाहेरची काळ्या कातळात कोरलेली पायरी. आम्हा सगळ्या पोरांची हक्काची जागा. तसं तिथे बसायला काही कारण नाही लागायचं. पण काही गुजगोष्टी मात्र फक्त त्या पायरीलाच ऐकाव्या लागायच्या. वडिलांनी किंवा काकांनी मारलं तरी आईकडे जाऊन रडता यायचं. पण आईनेच मारलंकी मात्र त्या पायरी शिवाय कोणचं नसायचं ऐकून घ्यायला. गुडघ्यात डोकं घालून रडणाऱ्या माझी कित्येक आसवं पुसलीत त्या पायरीने. पण कधी कधी दोघा-तिघांना एकावेळी मार बसला की मात्र पंचायत व्हायची. सगळ्यांनाच त्या पायरीवरच बसायचं असायचं. पण भांडणं झालेली असायची, एकत्र कसं बसणार. मग तिथे बसण्यावरून अजून भांडणं व्हायची आणि फुकटचा वाढीव मार खायला लागायचा. पण "बहिणींशी भांडतो म्हणून" आणि "तो लहान आहे त्याला एक  कळत नाही म्हणून तुला पण कळत नाही का?" या सबबी खाली मार खाण्याचा मान जास्त करून मलाच मिळायचा म्हणून त्या पायरीचा सहवासही मला थोडा जास्तच मिळाला.
        सकाळी उठल्या उठल्या उंबऱ्यावरच जाऊन बसायचो मी. "हां बसला का बरोबर उंबऱ्यावर" म्हणून लगेच आजीची वॉर्निंग यायची. उंबऱ्यावर बसायचं नसतं हा प्रघात होता. का कुणास ठाऊक पण होता. खरं तर अजून आहे. पण तरी आडमुठ्यासारखं तिथंच बसायचं असायचं. आपण अजून अर्धं झोपेत असताना बाहेरचं पालवी फुटलेलं जग धावपळ करीत असायचं. कुणी अंगणात चुलीचा जाळ घालत असायचं तर कुणी अंगणातच पोरांना अंघोळ घालत असायचं. एक तरी जण सायकलच्या चाकात हवा भरताना दिसायचा. पांढऱ्या लेंगा-टोपी वाली सिनियर मंडळी कोवळ्या उन्हात बसून कसलीतरी चर्चा करण्यात मग्न दिसायची. हाकांचा, स्वयंपाकाच्या भांड्यांचा, पाण्याचा मधूनच एखाद्या शेळीचा आवाज. या सगळ्यांच्या मिश्रणातून एक वेगळंच संगीत तयार व्हायचं. मूर्तिमंत चैतन्य!
          रानात गेलेली आई आज तरी लवकर येणार अशी आशा न चुकता रोज संध्याकाळी वाटायची. मग शाळा सुटल्यावर एखादा तास खेळणं झालं की लगेच आईच्या येण्याचे वेध लागायचे. भूक पण लागलेली असायची आणि दूध प्यायला लागणार याची भीतीही. मग एक तासभर आधीपासूनच पायरीवर उंबऱ्याला टेकून बसून आईची वाट बघणं सुरु व्हायचं. आई तिच्या नेहमीच्या वेळी यायची आणि आम्हाला मात्र उगाच ती उशिरा येते असं वाटतं राहायचं. मधेच तिचा राग यायचा, मधेच तीव्र आठवण, ती आल्यावर काय काय करायचं, काय काय सांगायचं हे सगळं डोक्यात चालू असायचंच. ती अंगणात आलेली दिसल्यावर मात्र एक गोड हसू यायचं सगळ्यांच्या चेहऱ्यावर. तितकं निर्मळ हसणं परत कधी झालं असेल वाटत नाही. तितका निर्भेळ आनंदही परत कधी झाला असेल असं वाटत नाही. त्याच पायरीवर बसून आणि आम्हाला खाली बसवून शाळेच्या गोष्टी कित्येकदा वडिलांनी समजावून सांगितल्या. वडील बाजाराला निघाले की रुसल्यागत करून पैसे मागायला तीच पायरी जागा करून द्यायची. तीन चार शनिवारी रुसल्यावर मग एखादा रुपाया पदरात पडायचा. त्याचा आनंद इतका असायचा की तीन चार दिवस त्याचा काही घेऊन खायचं धाडस व्हायचं नाही. ते मिरवून मित्रांना दाखवण्यातच जास्त मज्जा यायची.
          आजोबा वारले तेंव्हा मला फार काही कळत नव्हतं. पण मला बाहेर पायरीवर बसवलेलं. तिथून माणसांच्या गर्दीतून भिंतीला टेकून बसवलेल्या आजोबांचा चेहरा आजही तसाच्या तसा डोळ्यासमोर दिसतो. कदाचित तेंव्हाच माझी नाळ जोडली गेली असावी त्या पायरीशी. पुसटश्या आठवणाऱ्या आठवणींपैकी ही एक. काय झालं हे तेंव्हा काहीच कळतं नव्हतं पण काहीतरी कायमचं हरवून गेलं हे त्या छोट्या जीवाला तेंव्हाही कळालं असेल कदाचित.
          मोठी पोरं खेळायला घेत नाहीत म्हणून पायरीवर बसून राहिलेल्या अगतिकतेचं, रागाचं कोण तरी आऊट झाल्यावर, फोर मारल्यावर टाळ्या पिटणाऱ्या आनंदात कधी रूपांतर व्हायचं ते काळायचंच नाही. इतक्या सहज इतका टोकाचा भावनिक प्रवास करण्याइतकी निरागसता त्या पायरीवर बसणाऱ्या जीवांच्या ठायी असावी. किमान थोडावेळ तरी ती परत यावी म्हणून अजूनही घरी गेलं की त्या पायरीवर बसावं वाटतं. अंगणात खेळत असताना काकांच्या गाडीचा आवाज आल्यावर सगळ्यांची पळापळ व्हायची. मग वेळेत घरात घुसू न शकलेल्यांना तीच पायरी आसरा द्यायची. आणि पायरीवर बसून आपण कसे खेळत नव्हतो आणि बाकीचे कसे आत्ताच पळून आत गेलेत अशी चुगली करायचा पहिला चान्स पण भेटायचा. त्यामुळे नंतर मार खावा लागायचा ही गोष्ट निराळी.पळता पळता पायरीला किंवा उंबऱ्याला धडकून पडून किती टेंगूळ येऊन गेले त्याला माप नाही. भांडण झालेल्या शेजारच्या पोराला घरात येऊन द्यायचं नाही म्हणून उंबऱ्याची खिंड कित्येकदा लढवली आहे. अर्थात त्याच उंबऱ्यावर तेच दोघे दुसऱ्यादिवशी शेंगा खात बसलेले असायचे.
        अशा कित्येक आठवणींचे पदर जोडले गेले आहेत या पायरीशी आणि उंबऱ्याशी. आता जाऊन त्या पायरीवर बसलं की एक एक पाकळी उमलायला लागते आणि आठवणींचा दरवळ पसरतो. आणि तिथेच बसून रहावं वाटतं. कधी कधी रुसून पायरीवर बसलो असताना वडील शेजारी येऊन बसायचे आणि माझ्या धुमसण्याला न जुमानता ओढून मांडीवर बसवायचे. तेंव्हा कळायचं या पायरीपेक्षाही हक्काची अजून एक जागा आहे या जगात.
          -©अमोल मांडवे(ACP/DYSP)
(कृपया आपला अभिप्राय, सूचना, सुधारणा खालील Comment section मध्ये लिहून पाठवा. तुमची एखादी आठवण सांगितली तर त्याहून उत्तम)

Comments

  1. For writing..
    " Sukhbharane ivlepnii... Maan Masoli hovun fire... "
    Prodigious !!!
    All the Best !

    ReplyDelete
  2. आपल्या बऱ्याच आठवणी मध्ये साम्य दिसतंय... भूतकाळात घेऊन गेलास मित्रा.... अनेक बंद केलेली किवाड उघडली इतक्या वर्षांनी.....

    ReplyDelete
    Replies
    1. आपल्या वयाच्या आणि मोठ्या जवळपास सगळ्यांच्या सारख्याच आहेत बघ आठवणी. त्याच जाग्या करायचा प्रयत्न आहे.

      Delete
  3. Chan lihle ahe. Mala athavali ti payri ani umbara.

    ReplyDelete
  4. माझ्या मनातल्या हरवलेल्या सुन्दर आठवणी आपल्या मनाचा आतला कप्पा उघडून शोधून देणारा पोलिसमित्र भेटला. 

    ReplyDelete
  5. खुपच छान भाऊजी. लिखाण आणि मांडणी अप्रतिम.

    ReplyDelete
  6. सुंदर लेख आहेत...

    ReplyDelete
  7. खुप खुप मस्त अमोल दादा👌

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

पंख पावसाळी

उन्हाळ्याची सुट्टी

आपल्याच मारेकऱ्यांच्या आसऱ्याला