मराठी शाळा

                           मराठी शाळा


         शाळेत असताना मनात नसताना अनेक पुस्तके वाचली आणि कित्येक पुस्तकं प्रत्यक्ष जगली. शाळेवर लेख लिहायला घेतला तर नकळत त्याचं पुस्तक होईल. तरी हा लेख लिहायचा मोह टळत नाही. शाळा तरी कुठे टळायची. जावंच लागायचं. पण ते सुरुवातीला. नंतर शाळा हेच कधी जग व्हायचं ते कळायचं नाही. अचानक घरच्यांपेक्षा जवळचं कोणी असू शकत हे कळायला थोडासा वेळ जातो पण मग घरी न बोलू शकणाऱ्या गोष्टी बोलायला आणि करायला सोबती मिळू लागले की आपलं जग पहिल्यांदा बदलू लागतं. चार भिंतींची मर्यादा गळून आयुष्यातील प्रचंड शक्यता दिसू लागतात आणि त्यांना गवसणी घालण्यासाठी लागणारं बळ, अगदी मूर्खपणा म्हणण्याइतकं वेडं धाडस या मित्रांच्या बरोबरच मिळतं.
        मोठी बहीण पहिलीत होती तेंव्हा. मी अजून बराच लहान होतो शाळेत जाण्यासाठी, त्या वेळच्या मानाने. आता घरचे सांगतात याला पहिल्यापासून आवड आहे शाळेची, अडीच वर्षाचा असल्यापासून जातो वगैरे. पण याला घरी सांभाळत बसण्यापेक्षा शाळेत पाठवलेला बरा अशा प्रकाराची शक्यता नाकारता येत नाही.😀तेवढा उचपती मी असेन कदाचित. पण एका दिवशी बहिणीच्या वर्गात त्यांच्या वर्गशिक्षकाने पाठीत प्रसाद दिल्यावर माझी चड्डी जागेवरच ओली झाली आणि आम्ही गपचूप पहिलीच्या वर्गातून डिमोशन घेऊन अंगणवाडीत आलो. माझ्या समोरच विठ्ठल रखुमाईच्या जुन्या मंदिरातली वीट पडून बाईंच्या अंगठ्यातून आलेलं रक्त आणि वजन करण्यासाठी असलेल्या पिशवीत टाकून दरवाजाच्या कडीला अडकवून केलेलं वजन यापेक्षा अंगणवाडीतलं जास्त काही आठवत नाही. अंगणवाडीच्या बाई अजूनही गावी गेल्यावर भेटतात. दर वेळी आपण यांचे किती ऋणी आहोत असं वाटून जातं.
         "शाळा" म्हणलं की खरंतर पहिली ते चौथीच. तेंव्हा कसं शाळा सोडून इतर अक्कल फारशी नव्हती आणि त्यामुळे सगळ्या गोष्टींचा निखळ आनंद घेता यायचा. पावसात भिजण्याचा, लगोरी-लपाछपी-लंगडी-सूर-बॅटबॉल खेळण्याचा, भांडण्याचा, मार खाण्याचा, सुट्टीचा, चालत निघणाऱ्या सहलीचा, गुरुजींना खिडकीतून चिंचोके मारण्याचा, त्यांच्या गाडीतली हवा सोडण्याचा, अगदी दुसऱ्या पोरांना पास करण्यासाठी त्यांचे पेपर लिहून देण्याचासुद्धा.
           तेंव्हाच पावसात भिजणं कोणाची आठवण नव्हतं आणत. तो एकटाच यायचा आणि आम्ही कितीही प्रयत्न केला पोत्याची खोळ करून वाचायचा तरी भिजायचोच. आणि समजा थोडंफार वाचलो तरी पोरं पायानं चिखल उडवून उद्या गणवेश न घातल्याने मिळणारा मार फिक्स करायची. पण तो काय कुठल्या ना कुठल्या कारणाने मिळणारच असायचा. त्यामुळे त्याने काही भिजण्याची मजा कमी नव्हती होत. पावसाळा सुरु व्हायच्या आधी रानात कामाला येणाऱ्या बायका युरिया ची मोकळी पोती मागायला यायच्या त्यांच्या पोरांना आणि त्यांना खोळ म्हणून वापरायला. आणि एक मागितलं असलं तर आई दोन द्यायची. जाम राग यायचा तेंव्हा आपली पोती कशाला दिली म्हणून. पण एखाद्याकडं खोळ नसली की एकच खोळ दोघांनी डोक्यावर घेऊन रेल्वेच्या डब्यासारखं एकामागं एक चालताना ही असूया कुठेच नसायची. 
         एकदा उशिरा आलो म्हणून मुख्याध्यापकांनी गेट पासून व्हरांड्या पर्यंत गुडघ्यावर आणि कोपरावर चालायला लावलं होतं त्यानंतर तसं करायचा प्रसंग डायरेक्ट पोलीस अकॅडमी मध्ये ट्रेनिंगलाच आला. कदाचित तेंव्हा मिळालेला धडा अजून मला वेळ पाळायला भाग पाडतो. पोरांची आणि पोरींची हाणामारी सुद्धा जोरात चालायची. मी त्यातल्या त्यात हुशार असल्याने माझ्या बाजूने मारामारी करायला काही जण नेहमी तयार असायचे. पण बऱ्यापैकी हुशार पोरांना साधारणपणे असणारा सकाळी सगळ्यात आधी शाळेत पोचायच्या अट्टाहासाचा रोग मलाही होता. पण त्यामुळे पोरींच्या तावडीत मी आयता सापडायचो आणि दणकून मार खायचो. अर्थात त्याचा बदला दुपारच्या सुट्टीत किंवा छोट्या सुट्टीत घेतला जायचाच. आणि त्यातून पण नाहीच जमलं तर शाळा सुटल्यावर घरापासून जाणाऱ्या पोरींचा रस्ता आडवून दादागिरी ठरलेली. अर्थात तेंव्हा कोणतीच मुलगी आवडायची नाही असं नाही बर का. तिचा मार मी मुकाट खायचो😉.
          ज्यांना जास्त काही येत नाही त्यांचे पेपर गुरुजी नंतर आम्हाला लिहायला लावायचे. ते चुकीचं करायचे की बरोबर माहिती नाही. पण सर्वांना बरोबर घेऊन चालायचा धडा आम्ही नकळत शिकलो. 'असूया' कळण्याआधीच आमच्यातून ती संपून गेली. आता 'स्पर्धेच्या' युगात फक्त या एका गुणामुळं समाधानाने जगता येतंय. 'पाठीवर कौतुकाची थाप असली की माणूस क्षमतेच्या पलीकडे काम करतो' हे म्हणजे काय ते कळायच्या आधी माझं ते जगून झालं होतं. आणि मग तिथून सुरु झालेला प्रवास तसाच सुरुय अजूनही. "पाठीवरती हात ठेऊन फक्त लढ म्हणा" असं म्हणायला कवी शिक्षकांकडे का गेला होता हे आत्ता उमगते. आम्हाला पहिली ते चौथी एकचं गुरुजी. आमच्या गुरुजींचा भावगीत म्हणजे जीव की प्राण. आमचा अर्धा वेळ गाणी म्हणण्यातच जायचा. दिलेली गणितं लवकर सोडवून झाल्याने पेटीवर पाय ठेऊन समोर पेपर पकडून त्याआड गुरुजी झोपायचे हा शोध मला लागल्यापासून आम्ही त्याचा 'गैर'फायदा घ्यायला सुरु केलं आणि वर्गातल्या गंमतीत भरच पडली. गुरुजींनी आम्हाला पाच वेळा गूळ-शेंगदाणे उधारीवर आणायला पाठवलं असलं तर बिल देताना सहा बिलं कशी हे गुरुजींच्या लक्षात यायचं नाही,का ते मुद्दाम दुर्लक्ष करायचे ते माहिती नाही. मी मात्र तेवढ्यावर 10-12 पोरं खुश करायचो. परत आठवडाभर माझी कामं पटापट व्हायची.
            सगळ्यांचे असतात तसे माझेही काही खूप जवळचे मित्र होते. आणि एका गावातले असल्यामुळे ते इवलंस नातं आजही तितकंच जिवंत आहे. माझ्याबरोबर भांडलेल्या पोराला मन्या आणि पांडा मला माहिती न होताच मारून यायचे. सुद्याच्या आजीचा आणि माझ्या आजीचा अर्धा वेळ आम्ही कुठे आहे हे हुडकण्यातच जायचा. गजगे हुडकायला, खेकडे धरायला, पाहिजे तेंव्हा पवायला, ओढ्यावर जाऊन उडणारी शेंगरं पकडून पायाला दोरा बांधून उडवायला जायची आणि अशा अनेक गोष्टी करायची खूप इच्छा असूनही घरून जाऊ दिलं जात नाही हे माहित असल्याने बऱ्याचदा पोरं गोळा करून असे किस्से ऐकणे याचा नादच लागला होता मला. गोष्टी ऐकण्याचं आणि सांगण्याचं कसब पुढे यातूनच आलं असावं. घरच्यांना सापडू नये म्हणून रोज नवीन माळावर क्रिकेटचा डाव मांडायचा, पाटावरची बोरं गोळा करून शाळेत पोरींना विकायची, गट्टया नापुन त्या घरच्यांना सापडू नये म्हणून सांधी-कोपऱ्यात लपवून ठेवायच्या, पेन्सिल, पाटी, दप्तर यांचा अभ्यासापेक्षा खेळायला जास्त उपयोग करायचा हे शाळेचे जोडउद्योग अविरत चालूच असायचे.
          ठिगळ लावलेली चड्डी, युरिया च्या पोत्याचे दप्तर, मोठ्या भावंडांनी वापरून फाटून गेलेली पुस्तकं, शर्ट च्या कोपऱ्यात पकडून दाताने फोडून तिघात वाटून खाल्लेली एक गोळी, मातीत पडलेलं चॉकलेट उचलून 'धुवून का पुसून' म्हणून पवित्र करून खाणं, बाद झालेले टायर फिरवत गावभर पळणं, विटांच्या गाड्या आणि वाळूची घरटी बनवणं, चोपण्याची बॅट आणि कापडाचे बॉल बनवून खेळणं या सगळ्यात वंचितता आहे असं कधी वाटलं नाही. या सगळ्यात आपण दुधाची तहान ताकावर भागवतोय असं तेंव्हाही कधी वाटलं नाही आणि आताही आपण कशाला मुकल्याची भावना होत नाही. कारण आजही समाधान देऊन जाण्याची ताकद त्याकाळी जगलेल्या दिवसांमध्ये आहे. आपल्या आई वडिलांच्या परिस्थितीमुळे आपण हे जगण्याचं तत्वज्ञान शिकलो की आपण ते शिकावं म्हणून मुद्दाम आईवडिलांनी त्या परिस्थितीची जाणीव होणारी घडवणूक आपल्याला दिली याचं उत्तर अजूनही मला सापडत नाही. आता मात्र मुलांना वाईट वाटू नये म्हणून वास्तवापासून मुलांना अनभिज्ञ ठेऊन त्यांच्या मर्जीने चालणाऱ्या पालकांना पुढे जाऊन त्याच मुलांकडून अपेक्षाभंगास सामोरे जावे लागले तर त्यात मुलांची काही चूक नसेल हे मात्र नक्की. 
         लहानपण म्हणजे मराठी शाळेत शिकलेले आयुष्याचे धडे. येथे शिकलेली उत्तरे कुठे लिहायची नसतात, ती जगायची असतात. बालपण म्हणजे त्या वयातला निरागस खोडकरपणा. तो जिवंत ठेवता आला की आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर खिदळून हसता येतं. आणि हे जमत असेल तर लहानपण पुन्हा मागावं नाही लागत, ते असतंच तुमच्यात सतत.
         ©-अमोल मांडवे(ACP/DYSP)
        
        

Comments

  1. मस्त !!लहानपण पुन्हा मागावं नाही लागत, ते असतंच तुमच्यात सतत. हे खूप पटलं !!

    ReplyDelete
  2. सुंदर! अल्लड बालपणाच्या आठवणींचा बालदिनीच सुखद रीकॅप👌

    ReplyDelete
  3. अप्रतिम. नाळ या येऊ घातलेल्या सिनेमाची प्रस्तावनाच वाचतोय की काय असा भास झाला.
    प्रत्येक शब्दात जुन्या आठवणी पुन्हा जगून झाल्या त्याबद्दल धन्यवाद. (फक्त आमच्याइकडे पाऊस तेव्हढा पडत नाही त्यामुळं खोळ डोईवर घेऊन शाळेत नाही जाता आलं 😊)

    ReplyDelete
  4. छान लिहीलाय अमोल

    ReplyDelete
  5. Thank you all. Glad that I could take you to your childhood memories.

    ReplyDelete
  6. भावा मस्त जमलंय 👍

    ReplyDelete
  7. बालपणीच्या दिवसांची सफर घडवून आणलीस

    ReplyDelete
  8. Amol, hat's off...very well written

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

पंख पावसाळी

उन्हाळ्याची सुट्टी

आपल्याच मारेकऱ्यांच्या आसऱ्याला