जगावेगळी माणसं- विजय चौधरी(ट्रिपल महाराष्ट्र केसरी) २. काही दिवस शिकार केली नाही म्हणून वाघ पंजा मारायचं विसरत नाही.

जगावेगळी माणसं- विजय चौधरी(ट्रिपल महाराष्ट्र केसरी)


२. काही दिवस शिकार केली नाही म्हणून वाघ पंजा मारायचं विसरत नाही.

        तीस वर्षे वयाचा विजय चौधरी. त्रिपल महाराष्ट्र केसरी. महाराष्ट्रातला सध्याच्या घडीचा सगळ्यात अनुभवी पैलवान. मोठं शरीर, मोठं मन, रुबाब तेवढाच मोठा. रस्त्यानं चालला तर लोकांची लाईन लागते हात मिळवायला. तरी सगळ्यांबरोबर सेल्फी काढून त्यांना खुश करणारा विजय चौधरी. कुस्तीच्या सगळ्या परीक्षा एका नंबरात पास झालेला. जणू खंडोबाचा भंडारा अंगावर उधळून मैदानात उतरलेला पिवळ्या लांघेतला पैलवान. 
        आणि समोर कोण? आदर्श गुंड. नाव आणि आडनावात किती विरोधाभास. वय अवघं १९ वर्षे.  ह्याच्या वयाचा असताना विजय अजून कुस्तीचे पहिले धडेच गिरवत होता. आणि ह्यो मात्र शड्डू ठोकून विजयच्याच समोर उभा. आडदांड पैलवान. पण पहाडाएवढ्या काळजाचा. छातीत काळीज मावंना म्हणून खाली पोटात सरकलंय वाटंतं. आणि त्यामुळे हत्तीसारखं, मातीतल्या पैलवानालाच शोभून दिसणारं डेऱ्यासारखं पोट. वय बारीक पण डोळ्यात निश्चय केवढा. खुल्या गटातली पहिली कुस्ती पटठ्याची पण नवखेपणाचा लवलेश पण नव्हता त्याच्या डोळ्यात.
          पण तरी विजयपुढं ह्यो काय टिकणार. लोकांच्या मनात कोण जिंकणार हा प्रश्न नव्हताच. विजय आज तरी चुणूक दाखवणार का? का काल किरण भगत बरोबर खेळला तसं बचावानचं खेळणार? चर्चा सगळी विजयची. आदर्श फक्त नावाला मैदानात होता. पण कुस्ती अजून सुरु व्हायची होती.
          कुस्ती सुरु झाली. तीन मिनिटाच्या दोन डावांचा सामना होता. मातीतल्यासारखं ताकद आजमावायला टाईम कुठं असतोय ह्यात. डोक्याला डोकं आणि खांद्याला खांदा लागला. दोघांची उंची जवळपास सारखी. दोघं पैलवान अंगानं मोठं. एक सकाळच्या कोवळ्या उन्हात उजळल्यागत दिसणारा पिवळ्या लांघेतला गोरापान विजय आणि एक संध्याकाळच्या सावलीत न्हालेल्या डोंगरासारखा निळं आभाळ पांघरलेला सावळा आदर्श. विजयनं दोन वेळा आदर्श च्या मानेला झटका दिला पण गुडघ्यावर येणं लांब आदर्श साधा हालला नाय जागचा. पोरात ताकद दिसतिय बरं का. अजून शंकर पुजारींचं पैलवानांचं वर्णनच संपलं नव्हतं. विजय ताकद राखून खेळत होता. प्रेक्षक पण शांत बसून होते. एकूण काय तर वातावरण एकदम थंड. आणि बघता काय, काय होतंय ते कळायच्या आत आदर्शनं विजयवर धोबीपछाड टाकून त्याला खाली दाबला. डाव बसला नाय पण ५० किलोचं पोट असून पण आदर्शनं वाऱ्याच्या चपळाईनं विजयवर कब्जा आणि २ गुण मिळवलं. प्रेक्षकांच्या आवाजानं कॉमेंट्री ऐकू यायची बंद झाली.  कुस्ती पुन्हा खडाखडीत सुरु झाली. आदर्श काय विजयला जवळ पण येऊ देईना. आणि विजय पण शांतच. तीन मिनिटं संपली पण विजयकडून काहीच झालं नाही. 
      ब्रेक ची शिट्टी वाजली. कुस्ती थांबली आन डोकी सुरु झाली. 'चौधरी संपलाय", "चौधरीचा आता गेम नाय राहिला", "चौधरीचा करंट संपला". काही मिनिटापूर्वी सर्वात अनुभवी आणि दिग्गज म्हणवून घेतलेला पैलवान आता कुस्तीतली अडगळ म्हणून बघितला जाण्याची ही नांदीच सुरु झाली जणू. लोकं चौधरीच्या DYSP च्या ट्रेनिंग कडं बोटं दाखवू लागली. चौधरी सरावातच नाही. नव्हताच विजय सरावात. गेलं वर्षभर DYSP च्या ट्रेनिंग मध्ये अडकून पडलेला. सकाळी ४.३० वाजल्यापासून ते रात्री ८ वाजेपर्यंत कशात ना कशात बिझी राहावं लागायचं. आम्हाला तर झोप सोडून दुसरं काही सुधरायचं नाही. पण त्यातून पण विजय २ तास जिमला जाऊन व्यायाम करायचा. पण कुस्ती म्हणजे काय व्यायाम नाही. हा खेळ आहे. यात ताकद कमी आणि जिगर जास्त लागते. हा करंट चा गेम आहे. तवा गरम आहे तोपर्यंत पोळी भाजून घ्यावी लागते. मागच्या वर्षीचा दिग्गज या वर्षी टिकंल का सांगता येत नाय. आणि विजय तर तीन वर्ष महाराष्ट्रात अव्वल होता. पण वर्ष भर सराव नाही. सपाट्या मारून आंग बनतं पण कुस्ती जमत नाय. त्यासाठी पकडंच धरावी लागते. कानावर थापडा बसल्याशिवाय आणि मातीत घोळासाघोळशी झाल्या शिवाय पैलवान पैलवान रहात नाय. साध्या दुखापतीनं महिनाभर बाहेर गेलेल्या पैलवानाला मातीनं परत उभं करून न घेतल्याची कितीतरी उदाहरणं आहेत. आणि हा तर वर्षभर पकड न केलेला. त्यात वय तिशीत. लोकांना आयतं रानंच सापडलं बोलायला. तशी बोलणारी तोंड तयार असणारच आधीपासून संधीची वाट बघत. आता त्यांना ती आयती मिळाली होती. अनेकांना उकळ्या फुटाय लागल्या असतील.
         काही लोकं अजून याच विचारात होती आणि दुसरा राऊंड सुरु झाला पण.  याची सुरुवात पण शांतच. काही लोकांच्या डोक्यांना अजून खुराक. विजय ताकद लावत होता पण गुंड त्याला भारी पडत होता. अगदी मला पण आता भीती वाटू लागली होती. १९ वर्षांचं कोवळं पोर पण विजयला अंगाला लागून देत नव्हतं. एकचं मिनिट शिल्लक होता दुसऱ्या राऊंड चा. एवढ्यावरच कुस्ती संपणार असं वाटायला लागलं. आणि इतक्यात शांत डोक्याने खेळणारा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विजयनं एका झटक्यात पाच गुणांचा डाव टाकला. इतका वेळ जवळ पण न येऊन देणाऱ्या आदर्शला विजय ने कसं आणि कधी फिरवलं हे जमिनीवर टेकवलं हे कळायला प्रेक्षक पण तितकाच मुरलेला असावा लागतो. अनुभव म्हणत्यात तो ह्याला. "गरम आंग आन शांत डोकं" त्याचं नाव कुस्ती. शंकर पुजारी काय उगचं म्हणत नाहीत. पुढचं एक मिनिट विजयनं आदर्शला खेळवून काढलं. त्यात त्याने दोन पॉईंट दिले पण. पण विजय कुस्ती गणितानं खेळणारा पैलवान. कवा तव्यातल्या लाहीसारखं उडायचं आणि कवा सारड्यासारखं भुईला चिटकून राहायचं त्याला चांगलंच माहिती होतं. दोन पॉईंट मर्जीनं हारून विजयनं आणखी एक कुस्ती मारली. जितकी रुंद छाती, त्यात तितकंच मोठं मन आहे हे,"मी जिंकलो असलो तरी खरा विजेता आदर्श गुंड आहे" असं म्हणून विजयनं दाखवून दिलं. हृदयातल्या आगीवर कुस्ती करू नका तर डोक्यात आग लागू द्या, असा मोठ्या भावाचा सल्ला पण विजय जाता जाता या नव्या पैलवानांना देऊन गेला. पैलवानांची डोकी गुडघ्यात असत्यात म्हणणाऱ्यांना एकदा या विजयसारख्या पैलवानापुढं उभं करावं.
          बोलणारांची तोंडं बंद झाली पण डोकी चालूच राहीली. "हारता हारता वाचला", "१९ वर्षाच्या पोरानं घायला आणलं" हे सुरूच राहिलं. प्रत्येक मोठ्या खेळाडूला याला सामोरं जावंच लागतं. आणि ते ही मोठा खेळाडू जास्त वेळ सर्वोच्च स्थानावर राहिला की याचं प्रमाण आणखी वाढतं. खरं तर विजयच्या मोठेपणावर या अशा बोलण्याने शिक्का मोर्तबच झालं. किरण भगत बरोबर पण विजय ताकदीच्या जोरावरच जिंकला, काय म्हणावी अशी कुस्ती केली नाही असं बोललं जाऊ लागलं. 
       पण महाराष्ट्र कुस्ती दंगलीत याचा विचार करायला वेळ कुठं होता. जवळपास रोज कुस्ती होती. रोज नवीन आव्हान. काल आदर्श नावाचं वादळ कसंबसं थोपवलेल्या विजयसमोर आज उभा होता शिवराज राक्षे. भारदस्त नाव तसाच देखणा गडी. उंचीला विजयला काकणभर सरस. कातीव कड्यासारखं आंग. रस्त्यानं चालला तर घराघरातल्या भाकरी चुलीवर करपतील असा राजबिंडा गडी. गेलं वर्षभर मैदान गाजवलेला शिवराज राक्षे. 
         आणि हातात हात देऊन कुस्ती सुरु झाली. मानेवर फटाक्याच्या माळा फुटू लागल्या. आणि १३ व्या सेकंदाला शिवराजनं विजयला रेड झोन बाहेर ढकलून खातं उघडलं. परत खडी कुस्ती सुरु होतेय तोवर पुन्हा डाव टाकून शिवराजनं विजयचा कब्जा आणि २ गुण खिशात घातलं. आदर्श विजयला अंगाला लागू देत नव्हता तर शिवराज विजयला जाग्यावर उभा राहू देत नव्हता. खडाखडी झाली की विजयनं अंदाज घेऊन पकड धरायच्या आधीच तो विजयला बाहेर ढकलून देत होता. असाच त्यानं ४था गुण पण घेतला. पण विजय च्या चेहऱ्यावरची रेष पण नव्हती हालली. हृदयातला भूकंप आणि डोक्यातलं वादळ चेहऱ्यावर न दाखवणारा पैलवान म्हणजे विजय चौधरी. हातापायांनं कमी आणि डोक्यानं जास्त कुस्ती खेळणारा पैलवान म्हणजे विजय चौधरी. पाचव्या पॉईंटला तर विजयला बाहेर ढकललं का पकडीतून वाचताना तो स्वतःच बाहेर गेला हे कळायला मार्ग नव्हता. बोलणाऱ्या तोंडाना आता उधाण आलं असणार. ५-० वरून काय विजय वर येतोय तेंव्हा. आणि २ मिनिटाच्या आत ५ गुण हारून पण शांत असणाऱ्या विजयने मनोमन हार स्वीकारली असा कयास पण काढला गेला असणार. ५ गुण घेऊन शिवराज पण खुश झाला असावा स्वतःवरच. एकचं क्षण तो ढिला पडला असावा. आणि विजयने पण तेवढ्या एका क्षणात एक लांब श्वास घेतला. आणि दुसऱ्या क्षणी शिवराज अक्षरशः धडपडत होता, पाठ मॅट वर टेकू नये म्हणून. पण त्यो आता वाघाच्या तावडीत सापडला होता. यातून सुटका नाही हे त्यालाही माहित असावं. पण तरीही जिवाच्या आकांताने थोडी धडपड त्याने केली. पण केलं, विजयने त्याला चितपट केलं. नुसतं त्यावर थांबला नाही तर वाघानं डरकाळी पण फोडली. "५ गुणांनी मागे पडलोय काय? जाऊद्या आज गुणांचा विषयच नको ठेवायला", असा विचार तर नाही ना केला विजयने. मॅट गाजवत असला तरी विजय पैलवान मातीतलाच. गरज म्हणून गुणांच्या मागं पळणारा विजय निकाली कुस्ती विसरला नव्हता. गणितानं मोजून मापून कुस्ती करणाऱ्या विजयकडं आजही कुणाला न सुटणारी डावांची कोडी हायत हे लोकं विसरायला लागली होती. पण लोकांच्या मनावर कसं राज्य करायचं हे विजयला पक्कं ठाऊक होतं. उगाच का त्याच्या मागे लोक वेडे व्हायचे. यावेळी अगदी अनपेक्षित पणे सालटू डाव टाकला विजयने. आणि शिवराजला कसली संधीच नाही मिळाली विजयला विजयापासून थांबवायची. समोरचा पैलवान कोण आहे हे पाहून डाव ठरवणाऱ्या विजयची हुशारी पुन्हा एकदा सर्वश्रुत झाली.
           सरावात नव्हता पण तो कुस्ती विसरला नव्हता. ती त्याच्या रक्तात आहे. सलग पाच वर्ष महाराष्ट्राच्या कुस्तीत एक नंबर ला राहायचं म्हणजे खायचं काम नाही. "येथे पाहिजे जातीचे." काही दिवस शिकार नाही केली म्हणून वाघ पंजा मारायचं विसरत नाही. आणि या ढाण्या वाघानं ते दाखवून दिलं. विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील आणि पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांसारख्या वरिष्ठांनी पाठीवर आश्वासक थाप दिली तर माणूस कसा लढतो याचं उदाहरणच दिलं विजयने. या वर्षीची कुस्ती दंगल लक्षात राहील ती सगळ्या आघाड्यांवर विजयने मारलेल्या बाजीसाठी.
                   ©अमोल मांडवे(ACP/DYSP)


Comments

  1. Great viju bhau
    I am proud of u
    मानाचा मुजरा तुम्हाला
    कुस्ती मधला कोहिनूर हिरा

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

पंख पावसाळी

उन्हाळ्याची सुट्टी

आपल्याच मारेकऱ्यांच्या आसऱ्याला