तू माझा ध्रुव तारा

         तू माझा ध्रुव तारा
  


तू म्हणजे पुणवेचं चांदणं जणू
मंद प्रकाशाने उजळून टाकतेस
पण स्पर्शाची अनुभूती मात्र टाळतेस

तू अमावास्येचा अंधार जणू
अगम्य गूढ आणि अकल्पित गहिरा
तरीही अनुभूतीने अंतर्मुख करणारा

तुझं येणं म्हणजे वावटळ जोराची
तुझं माझ्याजवळचं सगळं हिरावून नेतेस
जाता जाता निर्मितीचं बीज मात्र पेरून जातेस

तुझं जाणं म्हणजे पावसाळ्याचा शेवट
बरसनं आणि रुजणं बरोबर घेऊन जातं
बहर आणि दरवळ मात्र ठेऊन जातं

तुझं नसणं झोंबणारा वारा
दिसत नाहीस उघड्या डोळ्यांना कधीच
जाणिवेला मात्र ओतप्रोत भरून टाकतेस

तुझं असणं म्हणजे मृगजळ
नसतानाही माझ्या डोळ्यात असणारं
मिटल्या पापण्यांच्याही पडद्यावर दिसणारं

अनंत जगात, तू माझा ध्रुव तारा
अढळ आहेस मनाच्या आतल्या कप्प्यात
तेवढीच अप्राप्य वसुंधरेच्या अवकाशात
       ©अमोल मांडवे(ACP/DYSP)

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

पंख पावसाळी

उन्हाळ्याची सुट्टी

आपल्याच मारेकऱ्यांच्या आसऱ्याला