जगावेगळी माणसं:पैलवान विकास जाधव : दुर्दम्य इच्छाशक्तीचा नवा मापदंड!


जगावेगळी माणसं:पैलवान विकास जाधव : दुर्दम्य इच्छाशक्तीचा नवा मापदंड!


    ट्रेनची शिट्टी वाजली आणि हळू हळू प्लॅटफॉर्म पाठीमागं सरकायला लागला. जायचं ठिकाण तेच. लहानपणा पासून खुणावणारं, किनाऱ्या वरच्या दीपस्तंभासारखं. पण यावेळी रस्ता थोडा वेगळा होता. थोडा कसला खूपच वेगळा होता. ही वाट धरली की प्रत्येक वेळी घात झाला होता. ऐन उमेद असताना स्वप्नांचा चुराडा झाला होता. दीपस्तंभ नजरेच्या टप्प्यात आला की दर वेळी समुद्रानंच नाव गिळून टाकावी असंच काहीसं होत आलं होतं. यावेळी तर नाव ही जुनी होती आणि समुद्र खवळलेला. ही नाव समुद्रात ढकलायला आता सह्याद्री एवढ्या काळजाची गरज होती. 
         पण आता नावेनं किनारा सोडला होता. आणि परतीचे दोर सोबत घेउन बाहेर पडणारातली जात नव्हती. ट्रेन वेगानं पुढं सरकायला लागली आणि मन वेगानं भूतकाळात मागं सरकायला लागलं. 
         जीव लावणारी बायको आणि लळा लावणारी पोरं, आता चांगलंच बहरलेलं घरदार, पेट्रोल पंपच्या निमित्तानं दिवसरात्र पुरेल एवढं काम, शब्द खाली पडू न देणारे गावकरी, आणि मोठ्यात मोठ्या पैलवानांचं पण आदरानं तात्या म्हणून पायाला लागणारं हात, सगळं होत. सुखी समाधानी आयुष्याला लागणार सगळं भरभरून होतं. आणि वय पण आता काही मिळवायचं नव्हतं राहिलं, जे मिळवलंय त्याचा उपभोग घेण्याचं होतं. तरीही हे वेडं धाडस का करावं? उद्या हसं झालं तर? त्याच स्वप्नाचा पुन्हा तसाच चुराडा झाला तर? तेंव्हा एक सहन केलं, आता तेवढी ताकद राहिली नसली तर? असले प्रश्न आम्हाला पडले की आम्ही सपशेल माघार घेतो. पण हे प्रश्न पडले आणि तात्यांच्या आठवणींची ट्रेन थेट पहिल्या स्टेशन वर जाऊन थांबली. जिथून या सगळ्याची सुरुवात झाली. त्या स्वप्नाची पण.
           मातीत कुस्ती. पैलवानांचा भाग, पैलवानांचं गाव. जरा पोरगं बरं दिसलं की त्याला रतीब लावून तालमीत घालायची पद्धत. रक्तात कुस्ती. पणजा, आजा मोठा पैलवान. बाप बी नावाजलेला पैलवान. आन हे पोरगं अजून नीट चड्डी बी घालत नव्हतं, तवापन चालताना कोणी बघितलं तर लोकं पैलवान म्हणूनच हाक मारायचे. वयापेक्षा दोन-तीन उन्हाळे जास्त पाहिल्यागत शरीर. कुस्तीसाठीच जन्म जणू.
         वयाच्या नवव्या वर्षी पहिला शड्डू ठोकला. त्या दिवसापासनं गावाचा मारुती प्रसन्न. आणि गुरू पण खमक्या, साहेबराव जाधव, उपमहाराष्ट्र केसरी. आणि 1987 कुस्तीची सुरुवात कुठं व्हावी? सातारा! ऑलिम्पिक म्हणजे काय ते कुणाला माहीत नसताना ऑलिम्पिक पदक मिळवणाऱ्या खाशाबा जाधवांचा सातारा! 'नवा पैलवान', 'नवा पैलवान' असंच म्हणत होते लोक अजून तोवर 1987 सालीच सह्याद्री कारखान्याचं मानधन, आणि शिवाजी विद्यापीठात दुसऱ्या क्रमांकाचा पैलवान ठरला. 1988-89 च्या अधिवेशनात 74 किलो गटात जिल्ह्यात पहिला. सातारा जिल्ह्यात पहिला म्हणजे जवळपास महाराष्ट्रातच की. नवा म्हणता म्हणता कधी लोक नावाजलेला म्हणायला लागले ते समजलं पण नाही. 'आरं चला धोबी नाहीतर घिस्सा बघायला मिळंल, विकास ची कुस्ती हाय', अशी वाक्य ज्या त्या फडावर ऐकू यायला लागली. विकासाची कुस्ती ज्या गावात आसल त्या गावाची माणसं 'यावर्षी लय पावणं आलं जेवायला' म्हणून वैतागायची. पण पावणं आल्याल असायचं विकासच्या कुस्तीला.
         घिस्सा आणि धोबी. विकासचे हुकमी डाव. डाव करावा तर असा की पुढं लोकांनी तुमच्या नावानं तो डाव ओळखावा. जसं स्ट्रेट ड्राइव्ह म्हणलं की सचिन तेंडुलकर तसं.  पलूस, कुंडल, देवराष्ट्रच काय तर शाहू महाराजांच्या छाती एवढं मोठं खासबागपण , विकास ची कुस्ती म्हणली की फुल्ल व्हायचं. विकास काय अजून मोठा पैलवान नव्हता झाला पण पापणी लवायच्या आधी कुस्ती करणारा आणि कुस्ती पाहायला मिळाली की डोळ्याचं पारणं फेडणारा पैलवान म्हणून मात्र ओळखला जाऊ लागला होता. उत्तर भारतीय पैलवान जाम घाबरायचे या धोबी आणि घिस्स्याला. आणि विकास त्यात पारंगत. गामा मिश्रा, गुलाम साबीर,चंद्राबल यादव, अच्छेलाल यादव,  विजयकुमार हे (दिल्ली) , तेजपाल चिमा, गुरविंदर सिंग(पंजाब) हे सगळे नावाजलेले उत्तर भारतीय पैलवान विकास च्या हातून चितपट होऊन गेले. धोबी आणि घिस्स्याचा धसका त्यांनी घेतला तो कायमचा. 
         घिस्याचे तसे तीन प्रकार. पोकळ घिस्सा, सांड काढून घिस्सा, फौजदारी घिस्सा. विकासची खासियत म्हणजे पोकळ घिस्सा. प्रतिस्पर्ध्याला गुडघ्यावर खेचायचा, त्याचा एक हात त्याच्याच पाठीवर घट्ट पकडायचा आणि आपल्या दुसऱ्या हाताने त्याच्या मांडीला ओढून डाव्या किंवा उजव्या बाजूला फेकायचं. अवघड डाव. ताकद मोठी, पकड मजबूत आणि चपळाई असली तरच करावा. नाहीतर उलटला म्हणून समजायचं. घिस्सा म्हणजे बसून खेळायचा डाव. याउलट धोबीपछाड. धोबी कपडे धुताना खांद्यावरून फिरवून पुढं दगडावर आपटतो तसं पैलवानाला आपल्या खांद्यावरून फिरवून टाकायचं. पकड सुरू असताना प्रतिस्पर्ध्याची एकाग्रता एक क्षणभरासाठी ढळायची वाट बघायची. आणि त्याला काही कळायच्या आत गुडघ्यावर बसून दोन्ही हातानी त्याच्या कोणताही एक दंड पकडून झटका देऊन त्याला खांद्यावरून समोर फेकायचं. डाव पूर्ण व्हायच्या आत जर समोरचा पैलवान सावध झाला तर आपल्याला आहे तसं खाली दाबून चितपट करणार हे नक्की. म्हणून मग घोड्याला लाजवेल अशी चपळता आणि तो बेसावध क्षण शोधणारी घुबडाची नजर पाहिजे. पण डाव असा की बसला तर ना खेळणारा विसरणार ना बघणारा. क्रिकेट मध्ये क्लीन बोल्ड आणि कुस्ती मध्ये धोबी पछाड. धोबी आणि घिस्सा, एक जमला तरी भारी पैलवान म्हणायचे लोक. कुणाचं पण काम नव्हतं ते. आणि विकासची खासियत म्हणजे डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजूला धोबी आणि घिस्सा विकास सारख्याच ताकदीनं टाकायचा. पैलवान गुडघे टेकायचे, दिमाग काय द्यायचं बंद करायचा त्यांचा. उगाच नाही विकास नं उत्तर भारतीय मल्लांचं पानिपत केलं.

        पण विकासच्या कुस्तीला खरी कलाटणी आणि दिशा मिळाली ती 1993 मध्ये. त्या काळचा महाराष्ट्राचा मोठा पैलवान मधू मोरेवर विकास ने घिस्सा मारून विजय मिळवला आणि गडी लोकांच्या नजरेत बसला. कामगार मैदान. त्याकाळी नावाजलेलं. एक लाख प्रेक्षक कुस्ती बघायला आलेले. कुस्तीचे सोन्याचे दिवस होते ते. उत्तर भारतीय मल्ल आणि महाराष्ट्रीय मल्ल यांच्यात मोठी चुरस असायची. कुस्ती म्हणजे जीवन मरणाचा प्रश्न बनायचा. खेड्यापाड्यातन लोकं ऐपत नसताना गाड्या करून 500 किलोमीटर जायची. फक्त कुस्ती बघायला. आसं ते मैदान. उत्तर भारतीय पैलवान म्हणलं की माज आलाच. आणि त्यांना तो शोभायचा पण. तसाच माज शोभणारा एक पैलवान, गामा, गामा मिश्रा. नुसतं नाव ऐकलं तरी काहीतरी भारी असणार असं वाटणारा. घोड्यासारख्या छातीत वाघासारखं काळीज जपणारा. दारासिंग पेक्षा उंचीला थोडाच कमी असणारा. दाढी ठेवणारा. चेहऱ्यावर जाल तर गोड वाटणारा. पण पकडीत आला तर कणकीसारखं मळणारा. भारत केसरी गामा मिश्रा. 
          आन काय केलं त्या गामा मिश्रानं? ओपन चॅलेंज दिलं. महाराष्ट्राच्या पैलवानांना, ते पण महाराष्ट्रात येऊन. त्याला जिगर पाहिजे. गामात ती होती. महाराष्ट्राच्या अहंकाराला हात घातला गामानं. पण करायचं तरी काय? कोण पुढं होणार? हरलो तर सगळा महाराष्ट्र दूषणं देणार. जमत नाही तर कुणी सांगितला होता शहाणपणा करायला असं प्रत्येक फडावर ऐकायला मिळणार. पण म्हणून हे आव्हान असंच जाऊ द्यायचं? इतका भ्याड महाराष्ट्र कधीच नव्हता. पळण्यातल्या नामर्दकी पेक्षा हरण्यातली शेरदिली महाराष्ट्रानं कायम जवळ केलीय. असुदे असला तर त्यो गामा, मी पण विकास हाय म्हणत विकासनं ते खुलं आव्हान स्वीकारलं. खडाखडी झाली, झटाझटी झाली आणि गामा विकासच्या घिस्स्यात आला. आणि घिस्स्यात आला म्हणजे संपला. पुढे पुजारी अण्णा म्हणू लागले, "या विकास च्या घिस्स्यात हत्ती जरी आला तरी पडणार". मग गामाचं काय ते कौतुक. महाराष्ट्राची नुसती लाजंच नाही राखली तर उत्तर भारतीय मल्लांच्या डोळ्यात डोळे घालून बघायची ताकद दिली महाराष्ट्राला या कुस्तीनं. बरं हे एवढ्यावर थांबलं नाय. उत्तर महाराष्ट्राचा दुसरा तसाच पैलवान गुलाम साबीर, मेरठचा. नाव गुलाम पण राजा माणूस. एक एक मांडी सागाच्या बुंध्यासारखी. गोरापान. कानावर थापाडा मारणं ह्याची खासियत. समोरचा पैलवान अर्धी कुस्ती आणि सगळं मनोबल त्या थापडीनंच हारायचा. अशा या साबीर नं पण असंच खुल आव्हान दिलं अजिंक्यताऱ्याच्या मैदानावर. त्याला बहुतेक माहिती नव्हतं तो विकास जाधवाच्या भूमीत आलाय. कुस्ती सुरू होऊन दोघांची आंगं अजून गरम व्हायचीच होती तोवर विकासनं धोबी टाकला. इथेच हरला असता तर बरं झालं असतं साबीर साठी. पण त्याचं नशीब वाईट. धोबी डावावर तो पडला पण मैदानाबाहेर. पंचानं निकाल दिला नाही. कुस्ती परत लागली. परत कशाला धोबी, याला दुसरा डावबी दाखवू म्हणून विकासनं यावेळी घिस्सा टाकला. आणि घिस्सा म्हणजे खेल खलास!
         अजून विकासच्या घिस्यात न अडकलेलं एकचं वादळ उरलं होतं महाराष्ट्रात. आप्पालाल शेख नावाचं! मैदाना पाठोपाठ मैदान गाजवलेला पैलवान. जाईल तिथं शेवटच्या कुस्तीचा मान मिळवणारा पैलवान. आप्पालाल मैदानात उतरला म्हणजे बाकीच्या कुस्त्या बंद करायची वेळ आलीय असं समजून जायचं. न झालेल्या कुस्त्या बरोबरीत सुटायच्या. प्रेक्षक ते प्रेक्षक, बाकीचे पैलवान पण पापणी न लवता त्यांची कुस्ती बघायचे. पण 1993 विकासचं होतं. पुणे अधिवेशनात विकासनं आप्पालाल वर 1 गुणाने विजय मिळवला. विकास आप्पालाल च्या जोडीत जाऊन बसला. आता विकासचा दबदबा मैदानात दिसू लागला. नंबर एकची बिरुदावली आणि शेवटच्या कुस्तीचा मान जाईल तिथं मिळू लागला. बऱ्याच मैदानावरून विकास कुस्ती न करता माघारी जाऊ लागला. कारण प्रतिस्पर्धिचं मिळेना ना. वस्ताद विकासचं हात धरून फडात फेऱ्या माराय लागलं की पाऊल पडलं तिथला पैलवान एक पाऊल मागं सराय लागला. महाराष्ट्र केसरी कोण होणार याची लोकांची सगळी उत्सुकताच निघून गेली. विकासच, दुसरं कोण हाय तवा अशी चर्चा होऊ लागली. 
         स्वप्न सत्य होण्याच्या मार्गावर होतं. आणि तेवढ्यात गार पाण्याची बादली तोंडावर ओतून झोपेतून जागं करून कोणीतरी ते स्वप्न पूर्ण होता होता मोडावं असं झालं. विकासला अन्नातून विषबाधा झाली. झाली की केली? आई करून करून कंटाळावी इतकं खाणारा गडी पण कशाचा एक घास घशाखाली उतरत नव्हता. काहीच पचेनासं झालं. 95 किलो वरून वजन 60 किलो वर आला. जगला तरी खूप झालं इथपर्यंत प्रकरण आलं. दूध कधीच पचणार नाही, गोळ्या कायम घ्याव्या लागणार असं डॉक्टर सांगायचे. पैलवानाला दूध न प्यायला सांगणं आणि त्याचा गळा दाबणं यात फार फरक नाही. कुस्ती संपली असंच डॉक्टर सांगायचे. सगळे उपाय थकले. शेवटी विकास आणि घरचे यशवंत बाबांच्या दर्शनाला गेले. बाबांनी सांगितलं रोज एक सोन्याचं पान खा. बाबांनी उपाय तर सांगितला पण त्याचा अर्थ मात्र कोणालाच कळेना. हा पण उपाय वायाच गेला असं वाटू लागलं. पण त्यांनतर हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे भेटले आणि विकास बरा होऊ लागला. खंचनाळे रोज सोन्याचं एक पान खायचे. मिठाई वर येणाऱ्या चांदीच्या आवरणासारखा आयुर्वेदिक गुणधर्म असलेला सोन्यासारखा दिसणारा एक पदार्थ सोन्याचं पान म्हणून ओळखला जायचा. याची मात्रा विकासवर चालली. पण या आजारपणात थोडी थोडकी नाही तर तब्बल आठ वर्षे वाया गेली. ती ही ऐन उमेदीची. विकासच्या पायाला हात लावणारी पोरं महाराष्ट्र केसरी झाली होती. 
         विकासनं हळू हळू प्रॅक्टिस सुरू केलं. गाडी रुळावर येते ना येते तोच पायाचा लिगामेंट तुटला. माणूस सरळ सरळ यशस्वी झाला तर तो फक्त यशस्वी म्हणून ओळखला जातो. पण तो अडचणीतून यशस्वी झाला तर तो नायक(हिरो) बनतो. कदाचित विकास च्या नशिबात असंच काहीसं असावं. डॉक्टर म्हणायचे ऑपरेशन करावं लागणार. पण ऑपरेशन म्हणलं की कुस्ती बंद करावी लागेल म्हणून विकासनं ऑपरेशनला सरळ सरळ नकार दिला. शेवटी एका वैद्याच्या औषधाने पाय बरा झाला. आणि तब्बल दहा वर्षानंतर 2002-03 साली विकासाची कुस्तीची दुसरी इंनिंग सुरू झाली. 
         विकासचा आता 'तात्या' झाला होता. तात्या कुस्ती पासून दूर होते पण कुस्ती त्यांना विसरली नव्हती आणि पैलवान तात्यांच्या कुस्तीन्ना विसरले नव्हते. अगदी समोरचा प्रतिस्पर्धी सुद्धा तात्यांचा आशीर्वाद घेऊन मगच शड्डू ठोकायचा. तात्यांच्या इच्छाशक्तीला, त्यांच्या कुस्तीवरच्या प्रेमाला तो सलाम असायचा बाकीच्या मल्लांचा. तात्यांची दुसरी इंनिंग सुरू झाली सांगलीच्या भोसले व्यायामशाळेत. गुरू इथं पण कच्चा नव्हता. पै विष्णुपंत सावर्डेकर. दादोजी कोंडदेव पुरस्काराचे मानकरी ठरलेले वस्ताद. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तात्यांची कुस्ती परत जोरात सुरू झाली. 'विकास परत आला', 'विकास परत आला' याच चर्चेत अजून फड रंगात होते तोपर्यंत हा पठ्ठा आठ महिन्यात एक नंबरच्या जोडीत जाऊन बसला. 
        २००४ सालच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत तात्या सेमी फायनल मधून बाहेर पडले. सगळ्या अधिवेशनाच्या स्पर्धेत भाग घेतला पण दर वेळी सेमी फायनलला गाडी अडली. बॅड पॅच. प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात येतो हा. आणि तुम्ही कोणत्याही खेळाडूला विचारा की तुम्ही सगळ्यात जास्त कधी शिकला तर तो डोळे झाकून उत्तर देईल की बॅड पॅच वेळी. तात्याला पण कळून चुकलं कोण आपलं आणि कोण परकं. पण लोक कितीही तिरकं चालेले तरी आपण सरळच चालायचं असं तात्याचं तत्वज्ञान. २००५ साली महान भारत केसरी स्पर्धा आयोजकांनी कारण न देता ऐनवेळी अचानक रद्द केली. तो ही चान्स गेला. २००७ साली तात्या फायनल ला गेले पण, परत त्यांना जगाच्या तिरक्या चालिला सामोरं जावं लागलं. स्पर्धेत नसलेला एक पैलवान फक्त तात्यांना हरवायचं म्हणून मैदानात आणला गेला. आणि तात्या हरले. पण कुस्तीचा शौकीन कुस्ती चांगली जाणतो. आखड्यातली माती घामाची ओळख ठेवते. चांगला पैलवान एकवेळ कुस्ती हारंल पण बघणारांची मनं नाय. इतकी संकटं आली. इतकी लोकं विरोधी झाली. पण तात्यांनी जिद्द सोडली नाही. ते लढत राहिले- मैदानात,मैदानाबाहेर,जगाशी, स्वतःशी. म्हणून कुठल्या पण फडावर गेला की तात्याचं नाव महान मल्ल म्हणून घेतलं जाऊ लागलं.
          पण तात्यांच्या या दुसऱ्या इनिंग मधला सर्वोच्च बिंदू कोणता असेल तर अस्लम काझी विरुद्धची तात्यांची लढत. साल २००८. मैदान दुसरं तिसरं कुठलं नाही. खुद्द खासबाग. कोल्हापूरच्या हृदयात बसलेलं. शाहू महाराजांच्या कर्तृत्वाची एक छोटीशी पाकळी. कुस्त्या सुरू झाल्या की बाजूचा रस्ता बंद पडायचा. मंदिरातली गर्दी कमी झाली की खुद्द देवी महालक्ष्मी समजून जायची की आज खासबागला मैदान भरलंय बहुतेक. ती पण थोडा वेळ मंदिर सोडून येत असावी खासबागला कुस्ती बघायला. डोंगरावरणं जोतिबा मान वर करून खासबाग वर नजर ठेवायचा. त्याशिवाय का आलं असेल दैवी वलय त्या मैदानाच्या मातीला.
        आणि कुस्ती कोणाशी? अस्लम काझी. अस्लम काझी बद्दल काय सांगावं. काझी सारखाच लोकांच्या मनाला भुरळ घालणारा पैलवान. चपळ म्हणून सगळीकडे प्रसिद्ध असणारा. पण पुजारी अण्णा म्हणायचे तसं विकास पण काय कच्या गुरूचा चेला नव्हता. मोठी कुस्ती. दोन्ही पैलवान मोठे. मैदान मोठं. सगळ्या महाराष्ट्रचं लक्ष लागलेलं. पैलवानांची नावं पुकारली. तात्या आणि काझी कपडे काढून लंगोट बांधून तयार होत होते. आणि कुस्ती सुरू होण्याआधीच, कुस्ती निवेदक बापूसाहेब लाडे याच मैदानात म्हणाले, "दहा हजार कुस्त्या बघितल्या की एका कुस्तीत धोबी बघायला मिळते, आणि ती कुस्ती म्हणजे तात्याची कुस्ती. डोळे मिटू नका कुस्ती शौकीणांनो, विकास मैदानात आलाय." आणि सांगून तिसऱ्या मिनिटाला धोबी टाकून तात्यांनी अस्लम ला अस्मान दाखवलं. "खासबागच्या ऐतिहासिक मैदानात विकासचा धोबीपछाड" असं शीर्षक उद्याच्या वर्तमानपत्रात दिमाखात झळकणार होतं. सांगून धोबी टाकणारा म्हणून तात्या महाराष्ट्रात ओळखले जाऊ लागले. शंकर पुजारी आण्णा म्हणायचे "उठला की धोबी, बसला की घिस्सा त्याचं नाव विकास. नो डिफेन्स." धोबीनं प्रेक्षक खुश झाले होते, मंदिरातून महालक्ष्मी आणि गडावरून जोतिबा आनंदानं तात्याला आशीर्वाद देत होते आणि मैदानात टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला.
           अचानक तात्या तंद्रीतून बाहेर आले आणि पाहतात तर ट्रेन शेवटच्या स्टेशनला पोचलेली. तात्यांच्या चेहऱ्यावर एक हलकं हसू उमटलं आणि तात्या सामान घेऊन ट्रेन मधून उतरले. हरयाणात. घरी सांगितलेलं की मुंबईला चाललोय. तात्यांनी सरळ आखाडा गाठला. आर्मीच्या वतीने हिंदकेसरी स्पर्धेचे आयोजन केले होते. आणि तात्या त्या ठिकाणी पोचले. बघायला नाही बर का, खेळायला. तात्यांची तिसरी इनिंग. २०१८ साली दुसऱ्या इंनिंग नंतर तब्बल दहा वर्षांनी. आणि वय किती असावं? जास्त नाही फक्त सत्तेचाळीस. पन्नाशीला तीनच कमी. आठ महिन्यांपूर्वी ही स्पर्धा होणार आहे असं गावातल्या एका आर्मी वाल्यानं सांगितलं आणि स्पर्धेचं कुपन पण दिलं. तात्यांनी घरी न कळू देता सराव सुरू केला. शेजारच्या गावच्या एका ओळखीच्या माणसानं त्याचं पोरगं ठेवलं होतं तात्याकडे कुस्ती शिकायला. तो माणूस मोसंबीची पोती पाठवू लागला तात्यासाठी. तात्या त्या पोराच्या नावाखाली सराव करू लागले आणि खुराक पण सुरू केला. घरी कळालं असतं तर परत हा वेडेपणा घरच्यांनी करूच दिला नसता. सत्तेचाळीस हे काय कुस्ती खेळायचं वय नाही. पण ते इतरांसाठी. वयाच्या सत्तेचाळीसाव्या वर्षी फक्त खेळायचं सोडा तात्या जिंकायचं स्वप्न बघत होते. तेच जुनं स्वप्न. बाकीचे पैलवान विशीतले, लयतर एखादा तिशीतला. तात्यांच्या बरोबर गेलेल्या लोकांना भीती होती हसून करून घेण्याची. दुखापत झाली तर जीवावर बेतायची. पण त्यांना तात्यांच्या इच्छाशक्तीची देखील कल्पना होतीच. आणि एक तरुण आर्मीच्या पैलवानाला हरवून तात्यांनी हिंदकेसरी खिताब जिंकला. आणि ती मानाची गदा मानाच्या खांद्यावर विराजमान झाली. पैलवानाला गदा की गदेला पैलवान-कोण कोणाला शोभतंय हेच कळत नव्हतं. मातीचं आणि रक्ताचं दोन्हीचं पांग फिटलं. एक वकील हिंद केसरी झाल्याचं भारतानं पहिल्यांदा पाहिलं असेल. घरच्यांना कळलं तेंव्हा त्यांना हसावं की रडावं कळत नव्हतं. पण तात्यांना जे चांगलं ओळखत होते त्यांना हा धक्का पचवायला फार काय अवघड गेलं नाही.
         एखाद्या स्वप्नाच्या मागं किती वेड व्हावं हे दाखवून दिलं तात्यांनी. वय हा फक्त एक आकडा आहे हे जे आपण नेहमी ऐकतो ते जगून दाखवलं तात्यांनी. अडचणींपेक्षा तुमचं ध्येय मोठ्ठ असलं की यश उशिरा का होईना पण मिळतंच हेच सांगितलं तात्यांनी. दुर्दम्य इच्छाशक्ती म्हणजे काय याचा एक नवीन मापदंडच घालून दिला तात्यांनी. 
         तात्या तुमच्या ध्येयवेड्या दुर्दम्य इच्छाशक्तीला त्रिवार सलाम!!!
         ©अमोल मांडवे(ACP/DYSP)



Comments

  1. मांडवे साहेब खरच तात्यांची जिद्द तुम्ही हुबेहुब मांडली,मन भरून आलं बगा

    ReplyDelete
  2. अमोल दादा खूप छान लेख👌

    ReplyDelete
  3. Khup chan lihale ahe pn tuhi kahi kami nahis tuja pn success khup motha ahe

    ReplyDelete
  4. खूप प्रेरणादायी कथा आणि त्याला तुझ्या ओघवत्या लिखाणाची जोड! क्या बात!!!

    ReplyDelete
  5. काय लिहितोस... जबरदस्त कुस्ती चालू फड उभा राहिला डोळ्यासमोर खूप सुंदर आहे

    ReplyDelete
  6. खासबाग, तात्या अन सातारची ती माती आणि तुमची लेखणी या सर्वांना माझा सलाम !

    ReplyDelete
  7. केवळ अप्रतिम अमोल. तात्यांची इच्छाशक्ती आणि तुझी लेखनशैली...
    डोळ्याच्या कडा पणावल्या....

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

पंख पावसाळी

उन्हाळ्याची सुट्टी

आपल्याच मारेकऱ्यांच्या आसऱ्याला