प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव कसा करावा

प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव कसा करावा


आपण नेहमी ऐकतो की, खूप अभ्यास केला पण मार्क कमी पडले, ऐन पेपर वेळी गडबड झाली, प्रश्नपत्रिका सोडविण्याचा खूप सराव केला पण तरी परीक्षेत गोंधळ उडाला. कशामुळे विद्यार्थ्यांना असे प्रश्न पडतात? कशामुळे सगळे करूनही यश हुलकावणी देते? याचा एक कारण असते की प्रत्यक्ष परीक्षेमध्ये जे करावे लागते त्याचा कमी सराव किंवा सरावमध्ये कमतरता किंवा चुकीचा सराव. यास्तव हे टाळण्यासाठी सराव पुरेसा आणि सरावाची पद्धत योग्य असावी. सरावाच्या योग्य पद्धतीवर प्रकाश टाकणारा हा पाठ.

1. प्रश्नपत्रिका किती व कधी सोडवाव्यात?
         प्रश्नपत्रिका किती सोडवण्यात याव्यात याचे कोणतेही मापदंड नाहीत. प्रत्येकाला कमी जास्त सराव लागू शकतो. परंतु सर्वसाधारणपणे राज्यसेवेच्या सर्व प्रश्नपत्रिका सोडवून व्हायलाच हव्यात. याशिवाय पूर्वपरिक्षेनंतर प्रत्येक आठवड्यात दोन पेपर सोडवून व्हायलाच हवे. पेपर सोडवल्याने आपल्या अभ्यासाची दिशा योग्य रहाते व आपला अभ्यास योग्य दिशेने चालू आहे हे पडताळण्यास मदत होते.
           बऱ्याचदा विद्यार्थी सुरुवातीला फक्त वाचन करतात व शेवटच्या महिन्यात सराव करूया म्हणून सुरुवातीपासून सराव करत नाहीत. परीक्षा जवळ आली की मग प्रश्नपत्रिका सोडवायला घेतात. मग एक तर परीक्षा जवळ आल्याने पेपर सोडवण्यात वेळ जातोय असे वाटून पेपर नीट सोडवले जात नाहीत. तसेच सोडविलेले पेपर देखील सोडवायचे म्हणून सोडविले जातात. त्याचे विश्लेषण केले जात नाही. त्यामुळे अशा सरावाचा फारसा फायदा होत नाही. त्यासाठी पेपर सुरुवातीपासूनच सोडवावेत. माझ्या मते अभ्यास सुरु करण्यापूर्वीच प्रत्येक विषयाचा एक एक पेपर सोडवावा. हा पेपर शक्यतो राज्यसेवेला पूर्वी आलेला असावा. त्यामुळे आपल्याला आपल्या अभ्यासाचा अंदाज येतो. त्याचबरोबर परीक्षेत काय अपेक्षित आहे याचीही कल्पना येते. यामुळे अभ्यासाची दिशा ठरवता येते, वेळेचे नियोजन करता येते, कशावर भर द्यायचा आणि कशावर नाही हे लक्षात येते.
           आणखी एक गोष्ट म्हणजे, बरेच जण अभ्यास झाल्याशिवाय कशा काय प्रश्नपत्रिका सोडवायला घ्यायच्या अशा विवंचनेत असतात. कितीही अभ्यास केला तरी 150 पैकी 40-60 प्रश्नच आपण नक्की बरोबर माहिती आहेत असे म्हणू शकतो. बाकी उरलेले प्रश्न हे "वाचले आहे परंतु नक्की हेच का हे माहिती नाही", किंवा अगदीच काही माहिती नसलेले असतात. परंतु प्रश्न तर सोडवावे लागतातच. त्यामुळे असाही अर्ध्याहून अधिक पेपर अभ्यास करूनही अंदाजाने सोडवायचा आहे तर मग सुरुवातीपासूनच का अंदाजाने प्रश्न सोडवायचा सराव करू नये? आणि असेही जर अनेक प्रश्न सर्व अभ्यास झाल्यानंतरही माहिती नसणार आहेत तर मग सराव करण्यासाठी अभ्यास होण्याची वाट का पहावी? त्यामुळे अभ्यास झाल्यावर सराव करू ही संकल्पना राज्यसेवेच्या अभ्यासाला आजिबात लागू पडत नाही. त्यामुळे पूर्वपरिक्षेनंतर मुख्यपरिक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केल्या केल्या प्रश्नपत्रिका सोडवायला सुरु करावे. त्याचबरोबर पूर्वपरिक्षेला आपण मुख्यपरीक्षेचा बराच भाग अभ्यासलेला असतो. पूर्वपरिक्षेपूर्वीही आपण बराच अभ्यास केलेला असतो.  म्हणजे खरेतर अभ्यास झाल्यावर प्रश्नपत्रिका सोडवू असा विचार यायचा प्रश्नच उद्भवत नाही.
         त्यामुळे दर आठवड्याला साधारणपणे दोन पेपर सोडवावेत आणि पूर्वपरीक्षा संपल्यानंतर लगेच पेपर सोडवायला सुरुवात करावी.


2. संपूर्ण प्रशपत्रिकांचा सराव करावा की विषयनिहाय प्रश्न सोडवावेत?
          बराच सराव करून देखील प्रत्यक्ष परीक्षेत गोंधळ उडतो अशी अनेकांची तक्रार असते. याचे प्रमुख कारण म्हणजे, सराव प्रत्यक्ष पेपर पेक्षा वेगळा करणे. उदाहरणार्थ बरेच जण जो विषय वाचायला घेतला आहे त्याच विषयाचे प्रश्न प्रश्नसंचातुन सलग सोडवत बसतात. पण परीक्षेत मात्र कोणत्याही विषयाचा प्रश्न कुठेही येऊ शकतो आणि विविध विषयांचे प्रश्न मिसळून येतात. एका विषयाचे सलग प्रश्न सोडवायला घेतले की एकतर प्रश्न विचारणाऱ्याची नाडी सापडली की आपल्याला त्या विषयाची उत्तरे बऱ्यापैकी येतात. पण हेच प्रश्न जेंव्हा इतर प्रश्नांशी मिसळून येतात तेंव्हा मात्र आपले डोके हवे तेवढे योग्य व वेगाने चालत नाही आणि मग सराव करूनही परीक्षेत गोंधळ उडतो. यास्तव जरी अधून मधून विषयवार प्रश्न सोडवणे उचित ठरते, परंतु परीक्षेत 150 संमिश्र प्रश्न येत असल्याने त्याच पद्धतीने सराव करणे आवश्यक आहे. 
          अशा प्रकारे सराव केल्याने पेपर हा एक सोपस्कार होऊन जातो. आणि ऐन परीक्षेत पेपर समोर आल्यावर येणारे दडपण कमी व्हायला बरीच मदत होते.

3. पेपर साठी वातावरण निर्मिती-
        बऱ्याचदा पेपर सोडवायला घेतला जातो आणि मधेच मित्र बोलावतो किंवा चहा ची वेळ होते. बऱ्याचदा पेपर आज अर्धा आणि उद्या अर्धा असा सोडवला जातो. पण इथे लक्षात घ्यायची गोष्ट म्हणजे पेपर आपल्याला कसा जाणार हे जसे अभ्यासावर अवलंबून असते तसेच ते त्या वेळच्या आपल्या मनाच्या अवस्थेवर अवलंबून असते. त्यामुळे सराव करताना देखील आपली मानसिक स्थिती जास्तीत जास्त परीक्षेच्या वेळी जशी असेल तशी ठेवण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी सराव करतानादेखील जणू काय आपण मुख्य परीक्षा देत आहोत असेच समजून सराव पेपर सोडवावेत. 
        यासाठी पुढील काळजी घ्यावी. शक्यतो पेपर दुपारी 2-4 दरम्यान सोडवावा कारण मुख्य परीक्षेचे दुपारचे पेपर याच वेळी असतात तसेच दुपारी अभ्यासाची गतीही मंदावलेली असते. अडीच तास मोबाईल बंद ठेवावा व मित्रांना व्यत्यय न आणण्याबाबत सूचना देऊन ठेवाव्यात. याच पुस्तकातील एका लेखात आपण पूर्वपरीक्षेच्या दोन तासात काय करावे हे सांगितले आहे. त्याच प्रकारे सर्व गोष्टी मुख्य परीक्षेच्या दोन तासात व त्या दिवशी करायच्या असतात. म्हणून मग सराव करतानाही त्या सर्व बाबी पाळाव्यात. अगदी पेपर च्या अगोदर 15 मिनिटे आपण परिक्षाखोलीमध्ये जातो त्याप्रमाणे 15 मिनिटे शांत बसून राहावे जणू काही परीक्षा कक्षातच बसलोय आपण. पाणी किंवा वॉशरूम ला जाण्याकरिता देखील जागेवरून उठू नये. सोडवताना टेबल खुर्चीवर बसूनच सोडवावा, रूमवर गादीवर झोपून नव्हे. सराव पेपर असला तरी वेळेचे बंधन, परीक्षेचे इतर नियम पाळावेत. उत्तरपत्रिका देखील व्यवस्थित भरावी. 
          अशाप्रकारे सराव पेपर ची तयारी आणि वातावरणनिर्मिती प्रत्यक्ष मुख्य पेपर सारखीच हवी.

4. एक एक प्रश्न सोडविताना:-
           दोन तासात 150 प्रश्न सोडवायचे असल्याने इथे पेपर पुन्हा पुन्हा वाचायला वेळ मिळेलच असे नाही. त्यामुळे पहिल्या वाचनातच तुम्हाला प्रश्न सोडवावे लागतील. सुरुवात शक्यतो क्रमाणेच करावी. विषयावार प्रश्न शोधत बसू नये. म्हणजे पेपर 4 सोडविताना अगोदर विज्ञान चे प्रश्न शोधून सोडवतो असे करून नाही चालत. प्रश्न शोधण्यात खूप वेळ जातो. मुख्यपरिक्षेत तेवढा वेळ नसतो. येथे वापरायची पद्धत पूर्वपरीक्षेच्या दोन तासांच्या नियोजनात दिली आहे तीच वापरावी.
            येणारे प्रश्न लगेच उत्तरपत्रिकेत मार्क करावेत. न येणाऱ्या प्रश्नाचे तुम्हाला जे जास्त योग्य वाटते ते उत्तर प्रश्नपत्रिकेत खूण करून ठेवा. जेणेकरून जर शेवटपर्यंत तुम्हाला उत्तर नाहीच आठवले तर ते सर्वात जास्त बरोबर वाटणारे उत्तर उत्तरपत्रिकेत मार्क करून ठेवता येईल. त्यामुळे प्रश्न पुन्हा वाचण्यास लागणारा वेळ टाळता येईल. प्रश्नाचे उत्तर शोधताना elimination पद्धतीचा वापर करावा. यामध्ये कोणते उत्तर बरोबर असेल हे शोधण्याआधी कोणते उत्तर नक्कीच असणार नाही हे शोधावे. जेणेकरून आपण उत्तराच्या जास्त जवळ जातो. जेंव्हा दोन पर्याय चुकीचे आहेत हे आपणाला कळते तेंव्हा उरलेल्या दोन पर्यायातून उत्तर शोधणे तुलनेने सोपे जाते. 
           अशावेळी जेंव्हा दोन किंवा तीन पर्यायांमध्ये खूप गोंधळ निर्माण होत असेल तेंव्हा intuition वर भर द्यावा. आपल्याला माहिती असलेल्या गोष्टीवरून आपले subconscious mind माहिती नसलेल्या प्रश्नाच्या उत्तराबाबत अंदाज बांधते. अशावेळी कोणताही पर्याय निवडताना तो का निवडायचा याचा यथासांग विचार करावा. जेणेकरून नंतर पेपर तपासताना आपण कसा विचार केला आणि तो योग्य होता का हे पडताळता येते. अगदीच काही माहिती नसेल तेंव्हा common sense वाले कोणतेही logic वापरले तरी हरकत नाही. उदाहरणार्थ एक खूप factual असा प्रश्न विचारला असेल आणि त्याबद्दल तुम्हाला कसलीच कल्पना नाही. तेंव्हा अगदी अमुक एक पर्याय खूप वेगळा वाटतो, किंवा अमुक एकच पर्याय थोडा ऐकल्यासारखा वाटतोय, किंवा मग चुकीचा पर्याय एवढा मोठा कशाला देतील, असले अतिशय हास्यास्पद वाटणारे logic देखील काही वेळा कामी येते. पण हे सरावदरम्यान नीट केले तरच ते परिणामकारकपणे अंतिम परीक्षेत वापरता येते. गेल्या दोन तीन वर्षातील cutoff चा वाढता आकडा पाहता 150 पैकी 140 च्या वर प्रश्न सोडवणे जवळपास अनिवार्यच झाले आहे. त्यामुळे कोणतेही लॉजिक वापरून का होईना आपल्याला प्रश्नांची उत्तरे लिहावीच लागतात. आणि योग्य सराव केला तर या पद्धती देखील खूप फायदेशीर ठरतात.

5. पेपर तपासणे आणि त्याचे विश्लेषण:-
           बऱ्याचदा पेपरचा सराव हा पेपर  सोडवणे आणि मार्क किती पडतात ते पाहणे इथपर्यंतच मर्यादित राहतो. पण अशा सरावाचा तुमच्या पेपर सोडविण्याच्या कौशल्यात भर टाकण्यास काहीच फायदा होत नाही. यासाठी विशिष्ट पद्धतीने सराव करणे गरजेचे आहे. 
          यासाठी पेपर सोडवत असतानाच नक्की माहिती असणारे प्रश्न, दोन पैकी एक पर्याय बरोबर आहे असे प्रश्न, काहीच माहिती नाही असे प्रश्न अशा खुणा प्रश्नपत्रिकेत करून ठेवाव्यात. मग पेपर तपासावा. कोणते प्रश्न बरोबर आले आणि कोणते चुकले हे प्रश्नपत्रिकेत मार्क करावे. चुकलेल्या प्रश्नांचे बरोबर पर्याय देखील मार्क करून घ्यावेत. आता प्रत्येक प्रश्नावर नजर टाकावी. त्या प्रश्नाचे उत्तर लिहिताना तुम्ही काय विचार केला हे आठवून पहावे. जर प्रश्न बरोबर असेल तर कशाप्रकारे विचार केल्याने तो बरोबर आला हे पहावे. त्याचबरोबर जर प्रश्न चुकला असेल तर तुम्ही कोणता विचार केला होता?, तो का चुकला?, बरोबर उत्तरासाठी कोणत्या दिशेने विचार करायला पाहिजे होता?, यासर्वाचा विचार करावा. प्रत्येक प्रश्नाला असा विचार केल्याने कसा विचार केल्यावर आपण चुकतो आणि कसा विचार केल्यावर आपण बरोबर येतो हे हळू हळू लक्षात येत जाते. यातून येणारे निष्कर्ष आपल्या नकळत आपल्या subconscious mind मध्ये साठवले जातात. यामुळे हळूहळू आपले माहिती नसलेले, अर्धवट माहिती असलेले प्रश्न बरोबर सोडविण्याचे कौशल्य वाढीस लागते आणि accuracy वाढून negative marking मुळे आपले फारसे नुकसान होत नाही. पण यासाठी माहिती नसलेले प्रश्न न विचार करता अंदाजे सोडवून उपयोग नसतो. काही ना काही लॉजिक, काही ना काही विचार उत्तर लिहिण्या अगोदर केलेलाच असावा. तरच तो विचार योग्य होता की नव्हता यावरून आपण पुढील पेपर साठी आपल्या कौशल्यात सुधारणा घडवून आणू शकतो.
           खूप सरावाअंती ही पद्धत एवढी अंगवळणी पडते की अनेक प्रश्न अगदीच माहिती नसलेल्यापैकी आले तरी आपण उत्तम मार्क्स मिळवू शकतो. हीच पद्धत मग विनासायास परीक्षेत वापरली जाते. 

            अशाप्रकारे योग्य पद्धतीने सराव केला तर अनेक अंगानी याचा आपल्याला फायदा होतो. पहिला हा की फक्त वाचण्यापेक्षा प्रश्नोत्तर स्वरूपात गोष्टी समोर आल्या की त्या जास्त लक्षात राहतात. त्यामुळे अभ्यास पक्का होण्यास मोठी मदत होते. प्रश्नपत्रिका सोडविण्याणे revision होते ती वेगळी. या सरावाचा UPSC आणि इतर सर्व स्पर्धापरिक्षांमध्ये उपयोग होतो. यातून अभ्यास कमी असतानाही जास्त मार्क्स पाडण्याचे कौशल्य प्राप्त होते. सराव करताना आपल्याला आपली अभ्यासाची दिशा बरोबर आहे की नाही हे देखील समजत जाते. त्यामुळे अभ्यासात काही चुकत असेल तर, किंवा अभ्यासात काही कमी असेल तर ते वेळच्या वेळी लक्षात येते आणि त्यात लगेच सुधारणा करून येणारे अपयश टाळता येते. अशा पद्धतीने योग्य सरावामुळे स्पर्धापरिक्षेत यशस्वी होण्याची शक्यता वाढते आणि यामध्ये जाणारा काळ देखील बराच कमी लागतो. 
             -©अमोल मांडवे(DYSP/ACP)

Comments

  1. खूप सुंदर आहे आणि उपयोगी आहे

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

पंख पावसाळी

उन्हाळ्याची सुट्टी

आपल्याच मारेकऱ्यांच्या आसऱ्याला