वर्णनात्मक पेपर मधील निबंधाची तयारी कशी करावी?

वर्णनात्मक पेपर चा अभ्यास कसा करावा:


वर्णनात्मक पेपर अभ्यास करायला अतिशय सोप्पा पण थोडासा tricky आहे. मराठी आणि इंग्रजी दोन्ही पेपर मध्ये निबंध, भाषांतर आणि सरांशलेखन एवढे तीनच प्रश्न असल्याने खुप अभ्यास करावा नाही लागत, परंतु यातील कोणत्याही प्रकारात एखादी लक्षात येण्यासारखी चूक झाली तर मार्क्स एकदम खूप कमी होतात. म्हणून तिन्ही बाबींचा व्यवस्थित नियोजनबद्ध अभ्यास व सराव लागतो.

निबंध/ Essay:
         मराठी व इंग्रजी दोन्ही पेपर मध्ये 25 मार्क्स साठी एक एक निबंध विचारला जातो. भाषा वेगळ्या असल्या तरी दोन्ही निबंधांमध्ये अपेक्षित असणाऱ्या बाबी सारख्याच असतात. त्यामुळे दोन्हीच्या अभ्यासाची पद्धत सारखीच आहे. 
          निबंध हा भाषेच्या पेपर मध्ये आहे, तो GS चा भाग नाही हे लक्षात घ्यावे. त्यामुळे त्यात माहितीचा भडीमार नको. तसेच GS चे उत्तर लिहितोय असंही वाटता कामा नये. स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासात आपणाला प्रत्येक गोष्टीबद्दल खुप काही माहिती असते. त्यामुळे एखादा विषय समोर येताच त्याबद्दल आपल्याला माहिती असलेले सगळे कसे लिहिता येईल याकडे आपला भर असतो. त्यामुळे निबंध हा रुक्ष माहितीने भरून जातो आणि तो वाचण्यात वाचणाऱ्याला विशेष रस येत नाही. म्हणून मग फक्त माहिती पेक्षा, थोडी माहिती आणि त्याचे वेगवेगळ्या angle ने केलेले analysis जास्त असावे. निबंधात तुमच्या माहितीच्या range पेक्षा तुमच्या विचारांची खोली आणि सूत्रबद्धता कळणे जास्त महत्वाचे आहे.
          एखाद्या विषयामध्ये तुम्ही काय लिहिले आहे किंवा काय लिहायचे राहिले यावर तो निबंध किती चांगला आहे हे ठरत नाही. त्यासाठी तुम्ही जे लिहिले आहे ते किती परिणामकारक रित्या मांडले आहे हे फार महत्वाचे आहे. हा पेपर भाषेचा असल्याने या मांडणीला आणि त्यात वापरलेल्या शब्दांना तसेच वाक्यरचनेला जास्त महत्व प्राप्त होते. म्हणून एखाद्या विषयाची मांडणी कशी करावी, एखादा विषय मुद्देसूदपणे कसा लिहावा हे कळण्यासाठी वर्तमानपत्रातील अग्रलेख आणि column वाचणे अतिशय उपयुक्त ठरते. 
         अग्रलेखात एखादा विषय त्याच्या जास्तीत जास्त पैलूंचा विचार करून लिहिलेला असतो. त्यात positive, negative दोन्ही बाबी उल्लेखिलेल्या असतात. लेखकाला कोणती बाजू जास्त बरोबर वाटते ते पटवून देण्याचा प्रयत्न केलेला असतो. ज्यांचे मत त्याविरुद्ध असेल त्यांना ते तसे असण्यास वाव दिलेला असतो. एखादा मुद्दा स्पष्ट करताना उदाहरणे किंवा आकडे दिलेले असतात पण फक्त माहितीचा भडीमार नसतो. तसेच या विषयाबद्दल कोणी महत्वाची व्यक्ती वा संस्था काही बोलले असतील तर त्याचा उल्लेख केलेला असतो. सामान्यपणे त्या विषयासंबंधी बहुतेक लोक जो किंवा जसा विचार करत नाही तो विचार केलेला असतो, आणि एक-दोन नाविन्यपूर्ण मुद्दे त्यात लिहिलेले असतात. तसेच या विषयांचा सामाजिक, आर्थिक, राजकीय, ऐतिहासिक, भौगोलिक,मानसशास्त्रीय, वैज्ञानिक, आंतरराष्ट्रीय अशा अनेकविध विषयांशी संबंध जोडण्याचा प्रयत्न केलेला असतो. तसेच संपूर्ण लिखाणाला एक लय व flow असतो. मध्ये कुठेच एक मुद्दा संपून वेगळेच काहीतरी सुरु झाले असे वाटत नाही. सगळे कसे अगदी क्रमाने येत आहे आणि सर्व मिळून एक integrated approach आहे असे वाटते.
          कोणत्याही निबंधामध्ये या वर नमूद केलेल्या गोष्टी असतील तर तो निबंध जास्त परिपूर्ण आणि परिणामकारक ठरतो. म्हणून मग अग्रलेख वाचताना फक्त त्यात काय दिले आहे याकडे लक्ष न देता, त्यात विषय कसा मांडलाय याचा बारकाईने अभ्यास करावा. सुरुवात कशी केलीय, त्यानंतर मुद्दे एकमेकांना कसे जोडलेत, उदाहरणे कशी स्पष्ट केलीत आणि मग विषय शेवटाकडे कसा नेलाय हे पहावे. सुरुवातीला हे थोडंस टिपण स्वरूपात लिहून काढले तरी चालेल. हे सातत्याने केल्यास आपोआप आपल्याला विषय कसा मांडायचा याची idea येऊन जाते. मग तसा सराव केल्यास ते कौशल्य आत्मसात होऊन आपोआप आपला निबंध चांगला बनू लागतो.
          निबंध किती चांगला झालाय हे, वाचणाराला तो न थांबता वाचून काढावासा वाटला का?, पुढे काय लिहिले असेल अशी उत्सुकता त्याला वाटली का?, तुम्ही लिहिलेलं त्याला पटो न पटो पण ते त्याच्या मनाला भिडले का?, यावर ठरते. हे सर्व वाटण्यासाठी भाषेवर थोडंस प्रभुत्व असावे लागते आणि वाक्यांची रचना थोडी interesting करावी लागते. उदाहरणार्थ "समाजात खूप भ्रष्टाचार वाढला आहे" हे असे सांगण्यापेक्षा "आज आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या बायकोला, सरकारकडून नवऱ्याच्या मृत्यूमुळे मिळणाऱ्या रकमेतील निम्मा वाटा स्थानिक राजकारण्यांच्या घश्यात घालावा लागतो" असे सांगितले तर ते जास्त परिणामकारक ठरते. "अर्भक मृत्यू दर 50 एवढा आहे" असे सांगण्यापेक्षा "50 बालकांना आईला आई म्हणून हाक मारण्याऐवढे देखील आयुष्य मिळत नाही" असे लिहिणे वाचनाराला जास्त भिडते आणि मग तो पुढील गोष्टी लक्ष देऊन वाचतो. पेपर तापसणाऱ्याला सगळा पेपर वाचायला लावणे हे सर्वात मोठे काम यामुळे होऊन जाते.
         एकदा का आपण examiner ला आपला निबंध पूर्ण वाचायला भाग पाडले की प्रश्न उरतो फक्त हाच की आपल्या निबंधात किती continuity आली आहे. एक मुद्दा संपवून दुसरा मुद्दा सुरु करताना त्या दोन्हीमध्ये link कशी प्रस्थापित करायची हे कौशल्य त्यासाठी आत्मसात करावे लागते. वर सांगितल्याप्रमाणे वर्तमान पत्रातील लेख वाचून किंवा लघुकथा यांसारखी पुस्तके वाचून हे skill आत्मसात करता येईल. मला स्वतःला दोन मुद्दे किंवा निबंधाच्या दोन भागांना जोडण्यासाठी प्रश्नार्थक वाक्याचा उपयोग करणे सोप्पे आणि लाभदायक वाटायचे. याने वाचणाराचा interest राहतो तो वेगळा मुद्दा. समजा तुम्ही 'लोकशाही: शाप की वरदान' हा निबंध लिहिताय. तुमचे लोकशाहीचे तोटे लिहून झालेत. आता तुम्हाला लोकशाहीचे फायदे लिहायचे आहेत. तेंव्हा डायरेक्ट फायदे लिहायला सुरु न करता असा प्रश्न विचारा, "वरील तोट्यांवरून आणि लोकशाहीत एवढ्या त्रुटी असून देखील मग का आपण अजून लोकशाही ला धरून आहोत? का नाही आपण लोकशाही सोडून दुसरी एखादी राज्यघटना अवलंबत? खरच लोकशाही इतकी वाईट आहे का?". हे लिहून झाले की मग पुढचा paragraph असा सुरु करा- "नाही. लोकशाही मध्ये उणीवा आहेत पण ती वाईट नक्कीच नाही. लोकशाहीतील अनेक तत्वांमुळे आज आपण आपला सर्वांगीण विकास करून घेऊ शकलो. त्यातील काही तत्वे पुढीलप्रमाणे."
           अशाप्रकारे दोन मुद्दे अगदी सहज जोडले जातात आणि निबंधात continuity येते. सरावाने आणि वाचनाने तुमची स्वतःची अशी एक पद्धत तयार होईल. मग त्याचाच जास्तीत जास्त विकास करा.
           निबंध लिहिताना वाक्ये अगदी लहान असावीत. त्यामुळे आपल्याला काय म्हणायचे आहे ते परिक्षकाला नेमके कळते आणि अर्थाचा विपर्यास होऊन मार्क जाण्याचा संभव टळतो. तसेच छोटी, साधी वाक्ये वापरल्याने निबंध वाचायला हलका फुलका आणि तरल होतो. Exceptional मार्क्स पडणाऱ्या बहुतेकांचे साधेपणा आणि सुटसुटीतपणा हे वैशिष्ट्य मला जाणवले. बऱ्याचदा असा समज असतो की अलंकारिक भाषा वापरली की जास्त मार्क्स पडतात. पण भाषा अलंकारिक नको तर परिणामकारक हवी. मग ती कितीही सध्या शब्दात लिहिलेली का असेना. खूप मोठे मोठे शब्द वगैरे वापरायलाच पाहिजेत असे काही नसते.
             यानंतर महत्वाचा मुद्दा म्हणजे निबंध लिहिताना तुमच्या डोक्यात विषयाची idea clear असली पाहिजे. विषय पाहताक्षणी आपल्याला यात काय विचारले आहे आणि आपण ते कसे लिहिणार आहोत हे तुमच्या नजरेसमोर यायला हवे. हे ठरवताना त्या गोष्टींबद्दल असलेली तुमची मते clear असतील तर त्या अनुषंगानेच तुम्ही लिहा. तुम्ही स्वतःचे असे काहीतरी लिहिताय असे वाटले पाहिजे. त्या विषयाबद्दलची तुमची आस्था दिसायला हवी. असे असले की आपोआप निबंधाला एक सुसूत्रता येते आणि एक flow देखील दिसतो. त्यासाठी निबंध लिहायला सुरु करण्याआधी तुम्ही कच्च्या कागदावर त्या विषयाचा एक mind map काढा. त्या विषयाशी निगडित ज्या गोष्टी आठवतील आणि त्यांचा विचारलेल्या गोष्टींशी संबंध लावता येईल अशा सर्व गोष्टी तुम्ही त्या कच्च्या कागदावर लिहा. मग त्या सगळ्या गोष्टी एकत्र करून त्यांची रचना आणि sequence तुम्हाला विषय ज्या प्रकारे मांडायचा आहे त्याप्रमाणे लाऊन घ्या. असे केल्याने अनेक मुद्दे हाताशी येतात आणि आठवत बसण्याचा वेळ वाचतो. तसेच एखादी गोष्ट नंतर आठवली परंतु आता ती लिहिली तर निबंधाचा flow बिघडेल असे होण्याचे प्रमाण कमी होते. त्यातूनही एखादी नवीन गोष्ट आठवलीच आणि त्यामुळे flow disturb होणार असेल तर तो मुद्दा टाळणे योग्य ठरते. कारण तुमचे काय लिहायचे राहिले यापेक्षा जे लिहिले ते कसे लिहिले हे जास्त महत्वाचे आहे.
           अशाप्रकारे वरील सर्व गोष्टींची काळजी घेतली की निबंध हा चांगला होतो आणि blunder होऊन खुपच कमी मार्क पडण्याचा धोका तरी टळतो. या गोष्टींनी आपण किमान धोक्याची पातळी ओलांडून पुढे येतो. यापेक्षा किती जास्त मार्क्स मिळणार हे मात्र प्रत्येकाच्या कौशल्यावर आणि थोडाफार luck वर देखील अवलंबून असते. फक्त हे करताना आपण विहित वेळेतच निबंध पूर्ण करतोय याकडे लक्ष द्यावे अन्यथा आपण वहावत जाऊन बाकीच्या प्रश्नांची वेळ खाण्याचा संभव असतो.
         सर्वात शेवटी निबंध लिहिण्याचा सराव कसा करावा यावर एक नजर टाकू. सर्वप्रथम आठवड्यातून किमान एक निबंध लिहून पहावा. तेही वेळ लाऊन. मग एका आठवड्यात इंग्रजीचा आणि दुसऱ्या आठवड्यात मराठीचा असे केले तरी चालेल. यात वर आपण उल्लेखिलेल्या कोणत्या गोष्टी तुम्ही आणणार हे लिहून काढा. एक चेकलिस्ट च बनवा. मग वरील प्रमाणे प्रत्यक्ष निबंध लिहून काढा. तो एकदा वाचा आणि चेकलिस्ट मधील कोणकोणत्या गोष्टी तुम्ही अंमलात आणू शकलात ते पहा. न आलेल्या गोष्टी का नाही आल्या ते पहा. काय बदल केल्यावर निबंध आणखी परिणामकारक ठरेल हे पहा. असे केल्याने कोणाकडून निबंध तपासून घेण्याची देखील गरज पडणार नाही. असे नेहमी करत राहिल्यास आपोआप वर उल्लेख केलेल्या, निबंध छान बनवण्यास आवश्यक असणाऱ्या गोष्टी आपणास जमू लागतात. पण विद्यार्थी इथेच चुकतात. ते मनात ठरवतात की आपण निबंध असा लिहू, तसा लिहू पण प्रत्यक्षात मात्र सराव करत नाहीत. आणि मग सवयीचा भाग न झाल्याने या गोष्टी ऐन परीक्षेत जमत नाहीत. मग मार्क्स कमी पडतात. म्हणून मग फक्त मनात planning करण्यापेक्षा जास्तीत जास्त गोष्टी कागदावर आल्या तर जास्त फायदा होईल.
        

      सारांश लेखन व भाषांतर, तसेच मराठी-इंग्रजी व्याकरण यांचा अभ्यास कसा करावा, GS च्या चार पेपर चा अभ्यास कसा करावा याचे सविस्तर वर्णन "राज्यसेवा: यशाची गुरुकिल्ली" या MPSC Planner पुस्तकात दिले आहे.
            - अमोल मांडवे(ACP/DYSP)

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

पंख पावसाळी

उन्हाळ्याची सुट्टी

आपल्याच मारेकऱ्यांच्या आसऱ्याला