आई

आई


तुझ्या समोर डोळे आटतात
उसने अवसान घेऊन
तुझ्या कुशीत बांध फुटतात
अगदी धुमसून धुमसून

काहीच न बोलता 
तुला सगळं कळतं
स्वतःसही न उमगलेलं
तुला मात्र नेमकं वळतं

परमार्थापेक्षा मोठा
तुझा स्वार्थ कसा ठरतो
तुझंही वेगळं अस्तित्व
तुझा जीव कसा विसरतो

तुझ्या दुःखाचं खत करून
आमची सुखं रुजतात
तुझ्या इच्छांच्या लक्तरांनी
आमची स्वप्नं सजतात

तुझ्या बेड्यांना
आमचे पंख आणि 
तुझ्या भिंतींना
आमचं आभाळ केलंस

जे तुझंं ते तर
तू अर्घ्यासारखं दिलंस
तुझं नसेल तेही
विश्व अंगणी उभारलंस

आमच्या राईच्या प्रेमाचा
आम्ही पर्वत करतो
तुझ्या मायेचा सागर
पाझर बनून उरतो

शरीराचं दुखणं 
तुला कळायचंच
तुझ्याच शरीराचा
मी छोटा अंश ना

पण मनीच्या वेदनाही
पोचतातच तुझ्यापर्यंत
मनांचीही कसली 
नाळ असते का गं
       -अमोल मांडवे(ACP/DYSP)



Comments

Post a Comment

Popular posts from this blog

पंख पावसाळी

उन्हाळ्याची सुट्टी

आपल्याच मारेकऱ्यांच्या आसऱ्याला