संध्याकाळच्या गोष्टी-(२)- चहा

संध्याकाळच्या गोष्टी-(२)- चहा

         (Sketch credit: Amol Bhosale)

ऑफिस मध्ये फारसं काम नव्हतंच आज.  पण ढग दाटून आलेले असले की एक हलकासा अंधार पडतो ऑफिस मध्ये. त्या अंधारात आधीच वाचलेलं आणि आवडलेलं एखादं पुस्तक वाचायला मला खूप आवडतं म्हणून मी खालेद होसेनीच्या "a Thousand Splendid Suns" मधील एकाच नवऱ्याच्या दोन बायकांमध्ये त्याच्या जाचाला कंटाळून निर्माण झालेलं हळवं नात कसं उलगडत जातंय हे वाचत बसलो होतो. पण थोड्याच वेळात अंधार आणखी गडद होत गेला आणि अचानक एक क्षणात पाठीमागच्या खिडकीसह सगळा परिसर उजळून गेला आणि पाठोपाठ वीज कडाडल्याचा आवाज आला. तावदानांवर थेंबांचा विरळ आवाज होऊ लागला आणि मी तडक घरचा रस्ता धरला. ऑफिस पासून जेमतेम 30 मीटर.
          मी लवकर आलो. पण तिचा ऑफिसचा टाइम संपल्याशिवाय तिला निघता येत नाहीच. तोपर्यंत मी कुठल्या खिडक्या दरवाजे उघडे राहून पाणी आत येणार नाही हे पाहून घेतलं. आणि मग वऱ्हांड्यात दोन खुर्च्या टाकून कवितांची जुनी वही काढून बसलो. मावळत्या सूर्याला काही आज आपले रंग उधळता नाही आले. काही काळ्याकुट्ट ढगांनी काळवंडून टाकले तर काही उभ्या धारांनी धुवून टाकले. पण वेळ मात्र तिचं कर्तव्य अविरत करत राहते, आणि घड्याळाचे काटे एकमेकांपासून एकदम दूर गेले की नेमकी आमची भेटण्याची वेळ होते. ती ऑफिस मधून निघाली असणार याचा अंदाज आला की मी चहा टाकला. तसा मी चहा क्वचित टाकतो, पण आज "मौका" पण होता आणि "दस्तुर" पण. खरंच सांगायचं तर, आल्यावर तिने चहा करण्यात वेळ घालवावा हे मला नको होते. 
        ती आत येऊन बॅग टेबल वर ठेवते तोच मी चहाचा कप घेऊन समोर उभा. भुवया उंचावत, 'अरे वा, चक्क सेवा' म्हणत, 'थोडं फ्रेश तरी होऊ देशील की नाही' असं गालात खट्याळ हसू आणून ती बोलत असतानाच, चहाचा कप तिच्या हातात देऊन मोकळ्या झालेल्या हाताने तिचा हात पकडून तिला बाहेर आणून खुर्चीत बसवलं आणि मी पण बसलो. गालावरचं हसू काही विरत नव्हतं. थोडीशी दमलेली, दिवसभर काम करून शिणलेलं समाधान चेहऱ्यावर घेऊन आलेली, एक दोन चुकार बट केसातून बाहेर येऊन चेहऱ्यावर रुळणारी ती विलक्षण सुंदर दिसते. अगदी आजसारखी. तिला असं बघायला कित्येकदा तिच्या घरी येण्याच्या वेळी मी ऑफिसच्या खिडकीशी उभा राहतो.
         मी पण खुर्चीत बसणार तेवढ्यात माझ्या पण हातात कप पाहून, 'दोन कप कशाला' असं म्हणत पहिल्यांदा तो कप चहाच्या पातेल्यात ओतून ये असा बाईसाहेबांचा आदेश झाला. मी ते करून येईपर्यंत तिचा  चहाचा एक घोट घेऊन झाला होता. कपावर तिच्या ओठांचं निशाण उमटलेली बाजू माझ्याकडे करत तिने कप माझ्या हातात दिला. लग्नानंतर फिरायला जाताना, पहिल्यांदाच आम्हाला फक्त आमचा असा वेळ मिळाला असताना जेंव्हा मी दोन चहा मागितले तेंव्हा तिने लाजत-बुजत एकचं मागवा असं सांगितलेलं. मला वाटलेलं हिला आवडत नाही की काय चहा. आपले वांदे होणार असंही वाटून गेलं. पण आणलेल्या चहाचा मी एक घोट घेतला की तिने हात पुढे केलेला , तेंव्हा कुठे मॅडमचा डाव माझ्या लक्षात आला. And that was the first gesture of the affection between us. And it symbolised love for us for coming days and years. दोघांपैकी कोणाला प्रेमाचा झटका आला की दुसऱ्याला ते सुचवायचं असो, किंवा मग भांडणानंतर अबोला घालवायचा असो, किंवा मग दुसऱ्याच्या मनावरचा दिसणारा भार हलका करायचा असो, एक कपातला चहा, त्या कपावरचे ओठांचे निशाण शोधून तिथेच ओठ लावून प्यायचा, हे आमचं सुत्रचं बनून गेलं. 
          पाऊस सुरूच होता. घराच्या बाजूला सगळं जंगलच असल्याने पावसात झाडांचा होणारा एक वेगळाच येणारा आवाज येतंच होता. जवळच कुठल्या तरी फांदीवर बसून मोर केकाटत होता. कदाचित त्याचीही प्रणयाराधनाच सुरू होती. वाऱ्याने पावसाचे शिंतोडे वऱ्हांड्यात यायचे. ते फक्त आमच्या पायांच्या तळव्यापर्यंत पोचतील अश्याच खुर्च्या मांडल्या होत्या. तिच्या नाजूक तळपायांवरून ओघळणारे थेंब मी एकटक पाहात होतो आणि तिच्या ते लक्षात आलं की तिने लाजून पायाचा अंगठा दुमडून खाली दाबला. आणि तिच्या ओठांवरचं हसू आणखी थोडं खुललं. मग हळूच ती तिच्या उजव्या पायाचा तळवा माझ्या डाव्या पायावर टेकवते. तिच्या पायावरून ओघळणारे थेंब माझ्या पायावरून ओघळून खाली पडतात. आणि मग यावेळी झालेली आमची नजरानजर बराच वेळ टिकून राहते. एवढं काय बोलतात डोळे एकमेकांशी माहिती नाही, पण तेवढ्यापुरता जगाचा विसर पडतो एवढं नक्की. 
         तिथूनच खिडकीचं दार उघडून ती माझी कवितेची वही हातात घेते. काही पानं चाळून एका पानापाशी थांबते. मग ते पान माझ्यासमोर धरून वाचून दाखव म्हणते. मला कविता नीट वाचता येत नाही हे माहिती असूनही तिला ऐकायचंच असतं. सगळ्या हट्टामध्ये तिचा हा हट्ट पुरवावाच लागतो. नाहीतर बाईसाहेब 'न भूतो न भविष्यती' टाईप रुसतात. 'प्लीज वाचना', 'प्लीज वाचना' म्हणत म्हणत ती माझा हात पकडून दाबते. मग मात्र नाही म्हणण्याचा विषय संपतो. मग मी वहीत पाहून एक एक ओळ वाचत जातो. आवडणारी ओळ किंवा कडवं पुन्हा वाचतो. कडवं संपलं की तिच्याकडे एक कटाक्ष ही टाकतो. या सगळ्यामध्ये ती तिच्या डोळ्याने एकटक पहात असते माझ्याकडे, कानात प्राण आणून माझा प्रत्येक शब्द ऐकते आणि मनाने पुन्हा एकदा माझी होते. वाचून झालं की मात्र तिला मी मिठीत घ्यायला हवं असतं. आणि मिठीत तिला माझ्यावर रागवायचं असतं, 'मला माझ्याच कविता पाठ का नाहीत म्हणून'. कारण विचारलं तर डोळ्यात डोळे घालून म्हणते 'कविता वाचताना आपल्या दोघात ती वही मला नको असते'. आणि हे बोलून झाल्यावर मात्र बाईसाहेब चक्क लाजून चूर होतात आणि माझ्या छातीत चेहरा लपवून मिठी आणखी घट्ट करतात.
           -अमोल मांडवे(ACP/DYSP)

Comments

  1. डोळ्यासमोर तरळत जाव तसा भास झाला. जणू काही हे सगळ आता असच होत आहे. खिळवून ठेवणारी लेखनपद्धती  तुझ्या शब्दात जादू आहे. व्यक्त होण प्रत्येकालाच जमेल अस नाही।तुला ते खुप छान जमलय

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

पंख पावसाळी

उन्हाळ्याची सुट्टी

आपल्याच मारेकऱ्यांच्या आसऱ्याला