उन्हाळ्याच्या संध्याकाळचा रानातला पाऊस

      उन्हाळ्याच्या संध्याकाळचा रानातला पाऊस



        उन्हाळ्याच्या सुट्टीत सगळ्यांनी रानात जायचंच असा शिरस्ता असणारा तो काळ होता. दिवसभर खूप काम केलं आणि घरच्यांचा मूड चांगला असला तर कधीकधी ४ चा पिक्चर बघायला घरी जायला मिळायचं. नाहीतर संध्याकाळ पण रानातच जायची. तशी रानातली संध्याकाळ मजेशीर असायची. गुरांच्या गोठ्याची सावली बॅट-बॉल खेळण्याऐवढी पुढे पडली की संध्याकाळ सुरू झाली असं म्हणायचो आम्ही. 'ऊन खाली झाल्यावर खेळा' अशा घरच्यांच्या आदेशामुळे नाखुषीने थांबवलेले खेळ पुन्हा सुरू व्हायचे. बॅटबॉल, विटीदांडू, इटकार नाहीतर मग गट्टया. कधीकधी ढेकळाच्या वावरात जाऊन एकमेकांना ढेकळे हाणत भारत पाकिस्तान युद्ध पण खेळलं जायचं.
          खेळण्या बरोबर संध्याकाळची ठरलेली कामं पण असायची. पाटावर, ज्यात अख्या हयातीत कधी पाणी आलं नाही, तिथे बांधलेल्या म्हशी वर गोठ्यात आणून बांधायच्या, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेण काढणं, जे मला कधीच नीट जमलं नाही. पण काम कमी आणि पोरं जास्त असल्यामुळं काम कधी संपलं कळायचं पण नाही. उन्हाळ्याचे जवळपास सर्व दिवस थोडेफार असेच असायचे. पण एखाद्या दुपारी मात्र पांढऱ्याशुभ्र ढगांचे रथ अचानक कुठूनतरी धावत यायचे आणि त्यांच्याबरोबर धावणाऱ्या त्यांच्या सावलीबरोबर आम्ही शिवाशिवी खेळायचो. पांढरे ढग असले की पाऊस पडत नाही एवढी समज एव्हाना आम्हाला आली होतीच. पण तरी अगदीच काही नसण्यापेक्षा पांढरे ढग पण चालायचे. तेवढीच खेळायला सावली. 
          तशी उन्हाळ्याची सुट्टी अर्धी संपत आली की रोजच पावसाची अपेक्षा असायची. उन्हाळ्यातल्या पावसाच्या अचानक येण्यामुळे त्याच्या येण्याची अपेक्षा रोजच असायची. पण म्हणून काही पाऊस आला नाही म्हणून दुःख नाही व्हायचं. सुखाचंही असंच असतं. त्याची अपेक्षा ठेवावी पण अट्टाहास नसावा. अपेक्षा असली की त्रास होत नाही पण अट्टाहास असला की त्रास हमखास आलाच. एखाद्या दिवशी खेळता खेळता अचानक मधेच वाऱ्याचा वेग वाढतो आणि लाख्खकण कुठेतरी वीज चमकल्यासारखी होते. आणि मग एकाच वेळी पाय आंब्याच्या झाडाकडे आणि डोळे आभाळाकडे पळतात. एकदा का वाऱ्याने पडलेले आंबे गोळा करून झाले की मग फुरसतीने आभाळाकडे बघणं होतं. कोणत्या तरी एका कोपऱ्यात क्षितिज पूर्ण काळवंडून गेलेलं असायचं. पावसाच्या भीतीने एव्हाना सुर्यदेव ढगांच्या छत्रीखाली लपून गायब झालेले असायचे. हळू हळू ते दूरवर काळवंडलेलं आभाळ जवळ सरकायला लागलं की घरच्यांची तारांबळ उडायची पण आम्ही मात्र हरकून जायचो. बहुतेक वेळा वाऱ्याची दिशा उलटी लागून तो हे पावसाचे ढग पळवूनच लावायचा. पण एखाद्यावेळी मात्र वारा उदार होऊन पाऊस ओढून आणायचा.
         पावसाची चाहूल लागली की म्हातारी आई "पोरांनो बुरंगाट सुरू हुयाच्या आदी घरी जावा" म्हणून मागं लागायची. तेवढ्यात नेमकी एखादी वीज कडाडायची मग लगेच परत स्वतःच म्हणायची "नगो नगो, माईन वाटंला जास्तवर पाऊस तुमाला गाठील". अशावेळी सर्व बाजूला नुसती धांदल दिसायची. रात्रीसाठी वैरण भिजायच्या आधी गोठ्यात आणून ठेवायची असायची, रेडकं-वासरं आत बांधायची असायची, कोंबड्या डालायच्या असायच्या. कधी कधी कांद्याची ऐरण नाहीतर कडब्याची गंज झाकायची असायची. उद्यासाठी 'चुलीत घालायला' काटकं आणि चिपाडाचा बिंडा यांची जुळवाजुळव करण्याची आईची गडबड चाललेली असायची. म्हातारी आई मात्र एका जाग्यावर बसलेली असून पण दुनियाभरचा कालवा करायची. हे करा ते करा, हे राहिलं ते राहिलं सुरूच असायचं. लुगड्याचा डोक्यावरून कधीच न पडणारा पदर ती कानावरून घट्ट बांधून घ्यायची.
         रेडकं-वासरं आत बांधली आणि रात्रीसाठी वैरण तोडून दावणीच्या कोपऱ्यात तिचा ढीग लावला की मग आम्ही पावसाची मजा घ्यायला सुरू करायचो. खरं तर पावसाआधी घरी पळून जायची फार इच्छा असायची पण एकदा पाऊस सुरू झाला की मात्र ते सगळं लक्षातून कधी निघून जायचं कळायचं पण नाही. पाऊस फार मोठा यावा असंच वाटायचं नेहमी, पावसाचे फायदे-तोटे कळायच्या आधीपासून, पाऊस आणि प्रणयाराधना यांची सांगड कळायच्या आधीपासून. कदाचित सदैव दुष्काळी भागातील लोकांच्या रक्तातच ही पावसाची असावी. दक्षिणेचा बापशा डोंगर स्पष्ट दिसतोय की अंधुक दिसतोय की दिसतंच नाही हे आमचं पाऊस मोजायचं 'माप' असायचं. बापशा दिसेना म्हणलं की मोठा पाऊस म्हणून आम्ही खुश. आणि थोडा पाऊस अंगावर घेत गोठ्याबाहेर डोकावून पश्चिमेचा आडवा डोंगर पण जर दिसत नसेल तर 'पाऊस बराच वेळ चालणार', असा अंदाज लावायला मोठ्या माणसांचं ऐकून ऐकून आम्ही शिकलो होतो. पत्र्याच्या वळचणीच्या पडणाऱ्या धारा म्हणजे पाऊस मोजण्याचं आमचं दुसरं माप.
          धुळीनं मळकटलेली गोठ्यासमोरची बदाम, लिंबू, लिंब, डाळिंब, कडीपत्ता, इडलिंबू, पेरू यांची झाडं धुवून निघायची. त्यानंतर दिसणाऱ्या पानांचं तेज काही वेगळंच वाटायचं. आता तोच पाऊस मनावरचं मळभ दूर करायला मदत करतो आणि काही वेळाकरिता का होईना आयुष्य पुन्हा तेजोमय होऊन जातं. वळचणीखाली पाणी साठू लागलं की त्या पाण्याला नाळवा करून झाडाकडे वळवायला आम्ही सरसवायचो. खरंतर मोठ्यांच्या शिव्या न खाता पावसात भिजायला एक निमित्त म्हणून हे सगळं. कांद्यावर झाकलेल्या कागदावर दगडं ठेऊन यायचा बहाणा दुसरा. 
        आमचा गुरांचा गोठा वाड्यासारखा आहे, मध्ये मोकळा चौक असणारा. सगळीकडून मध्ये पाणी पडल्याने तिथे लगेच पाणी साठायचं. चगाळ, माती आणि शेणानं पाणी बाहेर जायचा नाला मुजलेला असायचा. मग हातात काठी घेऊन पाण्याला मोकळी वाट करून द्यायला एक वेगळीच मजा यायची. बाकीची पोरं बाहेर गुंतलेली असताना, एकट्याने जाऊन हा उद्योग करत बसण्यात आणि त्या वाटेने जाणारं पाणी बघण्यात एक विलक्षण आनंद भेटायचा. का ते नाही माहिती. असंच स्वतःच आणि इतरांचं आयुष्य प्रवाही करायला किती मजा येत असेल? खरं तर कुदळीने खणलं असतं तर लगेच पाण्याला मोठी वाट मिळाली असती. पण मग ते वहावत जाणाऱ्या आयुष्यासारखं वाटलं असतं, नियंत्रण सुटलेलं. आयुष्य प्रवाही ठेवणं आणि वाहवत जाणं यातला फरक समजला की जगणं सोप्पं होऊन जातं. लहानपणी ज्या गोष्टींमधून आनंद मिळायचा ते आपण जर विसरलो नाही तर आयुष्यात सुखी-समाधानी राहणं किती सोप्पं आहे समजलं असतं.
          तोपर्यंत जळण गोळा करून आणि घरी न्यायची पाटी भरून आई पाऊस उघडायची वाट बघत बसायची. पाऊस पडत असल्याच्या आनंदा बरोबरच, जसा जसा पाऊस उघडायला उशीर होईल तशी तिच्या चेहऱ्यावरची काळजीपण वाढत जायची. कारण परत घरी जाऊन तिला स्वयंपाक पण करायचा असायचा. अशीच मिश्र भावना मला तिच्या चेहऱ्यावर मी सुट्टीवरून परत जातानाही दिसायची. पोरगं चांगलं शिकतंय याचा आनंद आणि ते आपल्यापासून दूर राहतंय याचं वाईट वाटणं. म्हाताऱ्या आईला आता घरी जाऊन स्वयंपाक करावा लागत नव्हता, पण तरी पाऊस लांबला की तिच्या चेहऱ्यावर काळजी दिसायला लागायची. इतक्या वर्षांची सवयच असावी कदाचित.  म्हातारपणी हेच जास्त सलत असेल- उमेदीच्या काळात जगलेल्या सवयीप्रमाणे जगण्याची इच्छा असूनही न जमणं. गाई-म्हशींच्या धारा काढून, वासरा-रेडकांना दूध पाजून वडील आणि काका घरी जायचे कपडे घालून पाऊस उघडायची वाट बघत बसायचे. गोठ्यावरची सगळी माणसं कुठं तरी एक जाग्यावर जमायची. त्यांचं बोलणं म्हणजे अनुभवाचं भांडार असायचं. जर काही थोडंफार शहाणपण आलं असेल तर ते असलं बोलणं ऐकूनच आलं आहे. या पावसाचा कुठल्या पिकावर कसा परिणाम होईल, उद्या पासून काय कामं करावी लागतील, कुठल्या बाजूला किती पाऊस झाला असंल, एकूणच हंगामात पाऊस कसा राहील हे ऐकून आम्ही शेती शिकलो. मागच्या काही वर्षांचा पाऊस, त्या त्या वेळचे अनुभव, त्यानंतर निघणारे इतर विषय हे सगळं ऐकलं की शेतकऱ्याचं जीवन कसं पावसाभोवती फिरतं ते पक्कं कळायचं. 
         मधेच पाऊस उघडायचा. सगळे घरी निघायच्या तयारीला लागायचे तेवढ्यात कोणतरी आवाज द्यायचं, 'मागे डोंगरावर भरून आलंय, पाऊस उघडला नाय'. आणि त्याचं बोलणं संपतंय तोवर पावसाची दुसरी सर पोचायची. परत सगळे आपापल्या जागी जाऊन परत बसायचे. संध्याकाळचा दुध प्यायची वेळ होऊन गेलेली असायची. भुकेने आता बाहेर कमी आणि पोटात जास्त लक्ष जायला लागायचं. जसा पाऊस लांबेल तसा शिव्या खायचा. भुकेपुढे तेंव्हा दुसरं काहीच महत्वाचं नसायचं. जास्तच वेळ झाला की नुकतंच काढलेलं म्हशीच नीरसं दूध प्यायला मिळायचं. नाहीतर दुपारच्या जेवणाचे डबे परत एकदा तपासले जायचे. पाऊस आणखीच लांबला की मात्र सगळे आपापल्या जागी शांत बसून राहायचे. गप्पा पण संपलेल्या असायच्या. प्रत्येक जण अंतर्मुख झालेला असायचा कदाचित. बाहेरच्या पावसाने आत पाझर फुटत असावा. आईची तर आता घालमेल व्हायला लागायची. पोरींनी काही केलंय की नाही या काळजीत ती असायची. पाऊस म्हणलं की हमखास लाईट नसणार आणि मग अशात पोरींनी चूल पेटवली असेल की नाही, अंधारात उगाच त्या धडपडणार तर नाही या विचारात ती गढून जात असावी. परत जाताना ती माझ्याशी बोलताना याच गोष्टीबाबत बोलायची. खरंतर ती स्वतःशीच बोलत असायची. 
          त्यामुळे डोंगर थोडा थोडा दिसू लागला की सर्वात अगोदर घाईघाईने आई घराकडे निघायची. एकतर तिला चालत जायचं असायचं. मग मी पण सायकल असली तरी आणि ती सायकल घेऊन पटकन जा म्हणत असली तरी, चालत सायकल ढकलत तिच्या सोबतच जायचो. आता मात्र सुट्टीमध्ये कधी संध्याकाळपर्यंत रानात असलो की मी सोबत चालत यावं असं आईला वाटत असतं आणि ती ते बोलूनही दाखवते. आता तिला खूपकाही बोलायचं असतं माझ्याशी. आणि त्यासाठी गोठा ते घर हा रस्ता ही सगळ्यात चांगली जागा असते. वडिलांना मात्र आता मी गाडी घेऊन जायला हवं असतं. मी चालत जाणं त्यांना पटत नाही. बाकीचे सगळेजण गाडीवरून व सायकलवरून जायचे. पण आवराआवरी करून येईपर्यंत त्यांनाही वेळच व्हायचा. मातीचा गोड वास यायचा एव्हाना थांबलेला असायचा. रस्त्यावरचा सगळा फुफाटा निघून जाऊन सगळी खडकं वर आलेली असायची. एखाद्या ठिकाणी चिखलात पाय जाणार नाही हे पाहून चालावं लागायचं.
         दरवर्षी उन्हाळ्यात चार-पाचवेळा असा पाऊस यायचाच. प्रत्येक पावसावेळी मागील काही वर्षात अशाच आलेल्या पावसाच्या काही ठळक आठवणी पुन्हा जाग्या व्हायच्या. त्यांच्या तुलना व्हायच्या. त्या भावना परत बोलल्या आणि जगल्या जायच्या. काहीतरी अगाध कारणाने या अशा पावसाने नेहमीच मनाच्या आतल्या कप्प्यात एक विशेष जागा बळकावली आहे. 
         आता उन्हाळी पाऊस जवळजवळ नाहींसाच झालाय. त्याचबरोबर माझं रानात जाणंही फार कमी झालंय. पण रानात गेलो की संध्याकाळी, आणि कुठेही असलो आणि संध्याकाळच्या वेळी पाऊस आला की हा लहानपणी मनात लपून बसलेला पाऊस हळूच बाहेर डोकावतो. खुणावतो. कुठे तरी चल म्हणतो. अगदी हात धरून ओढू पाहतो. आणि घेऊनही जातो पुन्हा त्याच ठिकाणी, साठलेलं पाणी एक लहानसा नाळवा करून प्रवाही करायला. 
                             - अमोल मांडवे

Comments

  1. क्या बात है. खुप सुंदर. लहानपणीच्या पावसात भिजवल्याबद्दल धन्यवाद. रोजच्या ताण तणावात हवाहवासा वाटणारा विसावा. मस्त.

    ReplyDelete
  2. किती सुन्दर लिहितोस यार अमोल. 

    प्रसंगातून आयुष्य जगण्याची केलेली कल्पना आणि नंतर प्रत्यक्षात तू करत असलेल काम अगदी वखाणण्यासारख आहे. 
    "आयुष्य प्रवाही ठेवणं आणि वाहवत जाणं यातला फरक समजला की जगणं सोप्पं होऊन जातं. लहानपणी ज्या गोष्टींमधून आनंद मिळायचा ते आपण जर विसरलो नाही तर आयुष्यात सुखी-समाधानी राहणं किती सोप्पं आहे समजलं असतं."

    जुन्या आठवणीना प्रवाही केल्याबद्दल खुप आभारी आहे. .

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

पंख पावसाळी

उन्हाळ्याची सुट्टी

आपल्याच मारेकऱ्यांच्या आसऱ्याला