नाळ

                                नाळ
(Sketch credit: Amol Bhosale, someone I look up to.)

          मला खरं तर आज सकाळ पासूनच काहीतरी वेगळं वाटायला लागलं होतं. आणि बाहेर बरीच गडबड पण चालू आहे हे पण कळत होतं. पण नक्की काय चालू आहे हे मात्र काहीच कळत नव्हतं. थोड्या वेळानंतर आपण आपल्या घरात नाही हे आलं माझ्या लक्षात. एव्हाना आपल्या घराशीपण नाळ जुळली होती माझी. आणि तू आणि आजी सोडली तर बाकीची माणसं पण सगळी नवीन आहेत. नक्की काय भानगड आहे. आज काही विशेष आहे का? गेल्या तीन महिन्यात बाबा भेटायला यायचे तेंव्हा असंच विशेष वाटायचं. तुला वाटायचं म्हणून मला पण वाटायचं. आज पण आलेत का बाबा? पण आज तसं काही वाटत नाही. वेगळंच आहे काही. मागे एकदा मला थोडं बरं नव्हतं वाटत तेंव्हा पण असंच काहीसं झालेलं. गम्मत बघ ना, तेंव्हा बरं मला वाटत नव्हतं आणि तुम्हा सगळ्यांना वाटत होतं की तुला बरं नाहीये. पण तेंव्हा पण एवढा गोंधळ नव्हता. आज नवीनच आहे बाबा काहीतरी.
            अरे, आई तू ढकलतेय का मला? आता मी काय केलंय? आणि काही केलं असेल तर नेहमीसारखं ओरड ना, ढकलतेय का? अगं त्रास होतोय मला आणि तुला पण. काय यार थोडं आठवावंच लागेल त्याशिवाय कळणार नाही. अरे हां, तू आणि बाबा, कधी कधी आजी, मावशी, काका, दादा जे बोलायचा की मी आल्यावर हे करायचं , ते करायचं. म्हणजे मी येणार होतो ते आज का. आलं लक्षात. म्हणजे तुम्ही म्हणायचा तसा जन्म होणारे का माझा? आयला मजाय की. 
            ए पण आई, तुला काय होतंय? तुला बरं वाटतंय की कसं, तुझा मूड कसा आहे, एवढंच काय तर तुला काय खावंसं वाटतंय हेही कळायचं मला. मग मला आज का कळेना तुला काय होतंय ते? मी तुला काय होतंय जाणून घ्यायचा प्रयत्न केला की मला काय होतंय त्याकडेच लक्ष जातंय माझं. अगं मी ठीक आहे पण तुला काय होतंय कळू दे ना. तुला एवढ्या वेदना होत असून पण तुला माझीच काळजी आहे वाटतं. पण त्यामुळे तुझ्या वेदना मला कळतंच नाहीयेत ना. मलाही कळू दे ना त्या. तू नाहीच ऐकणार. ए पण बाबा पण आहेत वाटतं इथेच कुठेतरी. मला जाणवतंय ते जवळपास असल्याचं. ते पण घाबरलेत गं फार. फार काळजीत वाटतायत. त्यांना पण माझीच काळजी असणार बहुतेक. थांब विचारतो. अगं नाही. खोटारडे कुठले. तुला म्हणायचे बघ, की बाळ आलं की तुझी काळजी कोण करतंय, माझं सगळं प्रेम आता बाळाचं. पण आत्ता त्यांना फक्त तुझी काळजी वाटतेय. म्हणजे माझी पण वाटतेच आहे पण तुझ्या काळजीपुढे अगदी थोडीशी. बहुतेक ते दरवाज्याच्या बाहेर उभे आहेत भिंतीला टेकून. घामाघून झालेत. बोटं चोळताहेत, हात जोडताहेत, मधेच नखं चावताय, पाय थरथर कापत आहेत का काय त्यांचे? पण तुझ्यापेक्षा त्यांना कोणीचं महत्वाचं नाही एवढं मात्र खरं. मी पण नाही. आणि आज नाही म्हणजे कधीच नसणार. तुझं नाव घोळताय ते मनातल्या मनात, सतत. तूच विचार त्यांना नंतर एवढं काय झालेलं म्हणून. 
            मी पण ना. तुला एवढी प्रचंड वेदना होत असताना माझं लक्ष बाबांकडे कसं गेलं. की तुझी सहनशक्ती संपल्या संपल्या तुझं लक्ष बाबांकडे गेल्याने माझं पण गेलं? असो. पण ए आई मला एकदमच वेगळं वाटू लागलंय. तू दिसत नाहीयेस मला. तुझा स्पर्श का नाही होत ए मला. आई मला रडू येतंय. कुठेयस तू? हे अनोळखी लोक कोण आहेत मला घेतलेले? अरे आई आहेस तू. पण आज एवढ्या दूर का आहेस? आणि मी रडतोय आणि तुला हायसं का वाटतंय? एव्हाना मला थोडं काही वाटलं तरी किती घालमेल होते तुझी. चक्क हसू आलंय तुझ्या गालांवर. आणि डोळ्यातून पाणी येतंय ते नक्की मघाशी होत असलेल्या वेदनेमुळे की आत्ता तुझ्या चेहऱ्यावर दिसत असलेल्या आनंदामुळे?
             अरे, आता तू पण बाबांसारखी खोटं का बोलतेयस? 'मला माझं बाळ पाहुद्या' म्हणे. काहीही हां. जसं काय तू मला पाहिलंच नाहीस अजून. अगं कित्येक महिने झाले मला रोज आणि सतत पाहतीयेस तू. आणि 'माझं बाळ माझ्याकडे द्या' म्हणजे काय? मी आत्तापर्यंत तुझ्याकडेच तर होतो. काय झालंय नक्की तुला आज. तू हे सगळं पहिल्यांदा घडतंय असं का दाखवतीये लोकांना. आणि माझ्यासाठी पण जरा जास्तच कौतुक दिसतंय मला तुझ्या डोळ्यात. म्हणजे मलाही ते पाहून बरं वाटतंय. पण का हे असं मध्ये उगाच? बघ आता आजीचं पण तेच. ती तर मनातल्या मनात पण खोटं बोलतीये. म्हणे तिला माझा पहिला स्पर्श झाला की तुझ्या जन्माच्या वेळचा प्रसंग आठवला. ते आठवुदे कायपण. पण याआधी आजीने किती वेळ स्पर्श केलाय मला. म्हणे काय तर पहिला स्पर्श! मग माझी टाळू कोण भरायचं? मला ऊब कोण द्यायचं? बापरे! सगळेच. काय विचित्र वागताय राव आज तुम्ही. अरे आपण गेले काही महिने सोबतच राहिलोय. नवीन काय आहे त्यात. मी तर तुम्हा सर्वांना चांगलं ओळखतो. तुम्हा सगळ्यांचे आवाज, स्पर्श सगळं मला माहिती आहे. तुम्हीच का अचानक मी आजच तुमच्या समोर आल्यासारखे एकमेकांना सांगताय काय माहिती. बाबा तुम्ही तर रात्र रात्रभर माझ्या डोक्यावर हात ठेवून झोपवलंय मला. आणि तुम्ही तुमच्या कानाने सारखेच किती गुदगुल्या करायचे मला. पण तुम्ही पण आज वेडे झालाय.
           आई आज अजून किती धक्के देणारेस. आता तुला मला भूक लागलेली पण कळेना का? आधी कधी मला सांगावं नाही लागलं भूक लागलेली. तुला आपोआप कळायचं. बापरे आता हे तुला सांगायचं कसं? हे बघ मला आता परत रडू यायला लागलंय.
                   -©अमोल मांडवे
  

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

पंख पावसाळी

उन्हाळ्याची सुट्टी

आपल्याच मारेकऱ्यांच्या आसऱ्याला