आठवणींचे पक्षी

आठवणींचे पक्षी



विहिरीच्या कपारीतून
अचानक उडणाऱ्या पारव्यासारखे
मनाच्या कुठच्यातरी कोपऱ्यातून
फडफड करत बाहेर पडतात

संध्याकाळच्या वेळी आभाळात
स्वच्छंद घिरट्या घालणाऱ्या थव्यासारखे
कोणाच्यातरी भोवती
अविरत अकारण फिरत राहतात

आंब्याच्या उंच फांदीवरच्या
अर्धवट खाल्लेल्या आंब्यासारखी
कुठलीशी जुनी आठवण
अर्धीनिर्धी कुरतडून जातात

जडवेल्या पायांच्या मोरासारखे
जमिनीवरच चालत राहतात
पावसाळी ढगांच्या चाहुलीसरशी
पिसारा फुलवून नाचू पाहतात

काही पोपटासारखे
हिरवेकंच असतात
काही घारीसारखे
अगदी उंच उंच असतात

कधी कोकिळेच्या गळ्यातून
प्रियाराधन सुचवतात
कधी टिटवीच्या शिळेतून
कोणी दुःख रिचवतात

एका एका काडीने
सुबक घरटं बनवतात
मग अचानक एकेदिवशी
निरोपाविना उडून जातात
          -अमोल मांडवे


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

पंख पावसाळी

उन्हाळ्याची सुट्टी

आपल्याच मारेकऱ्यांच्या आसऱ्याला