स्पर्धापरीक्षा आणि अनियमितता: PERSPECTIVE

                              स्पर्धापरीक्षा आणि अनियमितता: PERSPECTIVE



कोरोना मुळे सर्वच गोष्टी मध्ये तात्कालिक, तात्पुरते ही असतील परंतु अमूलाग्र बदल झाले. कधीही कल्पना न केलेल्या गोष्टी आपण सर्वांनी पाहिल्या, अनुभवल्या, त्यांना सामोरे गेलो. जन्म ही न झालेल्या बालकांपासून ते मृत्यूशय्येवरील वृद्धांपर्यंत सर्वांचे जीवन अपार ढवळून निघाले. परंतु ऐन उमेदीच्या वयातील तरुण तरुणींसाठी हा काळ मोठेच आव्हान घेऊन आला. त्या आव्हाणांच्या एका पैलूंवर थोडंसं लिहावं वाटलं.

         महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग आणि त्याकडून आयोजित परीक्षांना अनियमिततेचा एक साग्रसंगीत इतिहास आहे. एकच परीक्षा प्रक्रिया पूर्ण व्हायला पाच पाच वर्षेही लागलेली लोकांनी अनुभवली आहेत. मधल्या काळात काहीशा नियमित झालेल्या परिक्षांनातर जे स्पर्धा परीक्षा क्षेत्रात आले त्यांना ती अनियमितता पचवणे अवघड आहे. आणि आताची पिढी अशी अनाहूत, गबाळी, अगदी ओंगळवणी अनियमितता सहन करणार ही नाही. नुकतेच कुठे ही नियमितता अंग धरू लागली होती की आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वच वेळापत्रक कोलमडले. अजून तो गुंता नक्की कसा आहे ते कळायचं होतं, त्या अगोदर च कोरोना ची परिस्थिती ओढवली. आणि संभ्रमात कशी का होईना सुरू असलेली परीक्षा प्रक्रिया पूर्ण ठप्पच झाली.

         शर्यतीसाठी अगदी तयार असलेला घोडा धावपट्टीवर आणावा तो धावण्याच्या इशाऱ्याची वाट पाहत असताना ऐन मैदानावर त्याला खुंटीला बांधून ठेवावे अशी या युवकांची अवस्था झाली आहे. हतबल करणारी, निराशाजनक, उद्विग्न करणारी, प्रेरणा हरवायला लावणारी अशी ही परिस्थिती आहे. त्यामुळे बहुतेक सर्व च जण नैराश्याच्या गर्तेत किंवा त्याच्या अगदी काठावर तरी गेलेले आहेत. हे असे वाटणे अगदी साहजिक आहे. पण कितीही साहजिक असले तरी ते स्पष्ट आणि पूर्ण चुकीचे आहे. 

        "Pain in inevitable but suffering is not", या इंग्रजी भाषेतील म्हणीप्रमाणे परिस्थिती जरी अवघड असली तरी तिचा आपल्यावर काय आणि किती परिणाम होऊ द्यायचा हे आपण त्याकडे कसे पाहतो यावर आहे. स्पर्धा परीक्षा मधील यश, स्पर्धा परीक्षा मध्ये यश मिळण्याची शक्यता या सगळ्यामध्ये number of attempts आणि त्या अर्थाने 'किती वर्षे अभ्यास केला' हे सर्वात जास्त वापरले जाणारे मापदंड आहेत. त्यामुळे कोरोना मुळे जवळपास 2 वर्षे अशी अनिश्चीततेत गेल्याने युवकांमध्ये निराशा येणे साहजिक आहे. परंतु यापूर्वीही मी बऱ्याचदा जे बोललो आहे ते इथे लागू पडते आणि ते म्हणजे, 'स्पर्धा परीक्षेच्या तयारीदरम्यान ज्या गोष्टी तुमच्या हातात नाहीत त्यावर आणि त्यामुळे तुम्ही जेवढा कमी वेळ घालवणार तेवढे तुम्ही यशाच्या जवळ जाणार.'

        त्यामुळे या परिस्थितीकडे आपण कसे पाहू शकतो याबाबत मनात आलेले काही विचार मांडत आहे. 

         सगळ्यात अगोदर लॉजिक प्रमाणे विचार करू. आत्ता स्पर्धा परीक्षा देणाऱ्या प्रत्येकाला वाटत आहे की माझी दोन वर्षे कोरोना मुळे वाया गेली. परंतु आपण जर पाहिले तर दर वर्षी प्रयत्न करणाऱ्या स्पर्धकांपैकी फक्त 0.1% लोक स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होतात. म्हणजे 2 वर्षात फक्त 0.2% विद्यार्थी उत्तीर्ण झाले असते. इतर 99.8% विद्यार्थी या 2 वर्षा नंतर देखील स्पर्धा परीक्षा अभ्यास करत च असले असते. बरं आणि जे उत्तीर्ण झाले असते त्यापैकी बहुतांश, म्हणजे अगदी 70% विद्यार्थी हे मनासारखी पोस्ट मिळाली नाही म्हणून परत अभ्यास च करत असते. पण तरी पोस्ट मिळाल्या नंतरचा अभ्यास ही एक पूर्णतः वेगळी गोष्ट असली तरी यापैकी बहुतेक लोक हे जवळपास पोस्ट न मिळालेल्या विद्यार्थ्या इतके च असमाधानी असतात. म्हणजे एकूण काय तर 99.9% विद्यार्थी कोरोना नसता तरी आता आहेत त्याच परिस्थितीमध्ये असते. आणि तरीही तेंव्हा त्यांना आता वाटत आहे तितके निराश(depressed) वाटले नसते. त्यामुळे आपण जो मार्ग निवडला तोच मुळी अवघड होता हे मान्य करा. कोरोना मुळे अडचणी मध्ये थोडीशी वाढ झाली हे खरे आहे पण त्यामुळे अगदी अंतर्बाह्य सर्व बदलले असे काही नाही. 

         दुसरा मुद्दा असा होता की स्पर्धा परीक्षेच्या तयारी मध्ये आपण नेहमी बाहेरील disturbance ला दोष द्यायचो. यात वेळ गेला, त्यात वेळ गेला वगैरे. कोरोना ने खरं तर स्पर्धा परीक्षेच्या तयारीला जे पोषक असतं ते बरेच बदल घडवून आणले. विनाकारण फिरणं बंद, गप्पा गोष्टी मध्ये जाणारा वेळ वाचत होता, सर्व च व्यवहार बंद असल्याने तुम्हाला पूर्ण वेळ तुमच्या हातात मिळत होता. बरं तुम्हाला किंवा परिवारातील कोणाला कोरोना झाला असेल अशी परिस्थिती वगळता कोरोना तुमच्या अभ्यासाच्या आड येत नाही. गरज होती ती फक्त मानसिकता बदलण्याची, "माझा घरी अभ्यास होत नाही" वगैरे अशा समजांवर उपाय शोधण्याची. तो जर तुम्हाला मिळाला असता तर कोरोना हे depression चे कारण न बनता तुमच्या साठी संधी बणू शकले असते, अजूनही बणू शकते.

         बरेच जण म्हणतात, परीक्षा समोर असल्याशिवाय अभ्यास होत नाही. तसे असेल तर ठेवा परीक्षा समोर. आयोग परीक्षा घेणार नसला तरी तुम्ही स्वतःची परीक्षा घेऊ च शकता. किंवा तुमच्या ग्रुप मध्ये मिळून तुम्ही एकमेकांची परीक्षा घेऊ शकता. आणि त्या परीक्षेतील यश-अपयशामुळे तुम्हाला प्रत्यक्षात पोस्ट मिळणार नसेल तरी तुम्ही त्या पोस्ट च्या एक पाऊल जवळ नक्की जाल आणि तुमचे एक वर्ष वाया जाणार नाही आणि तसे न वाटल्याने तुमचे हे गैरसमजातून आलेले depression येण्याचा मार्ग नक्की बंद होईल. त्यामुळे स्वतःचे वेळापत्रक तयार करा. त्यात तुम्ही देणाऱ्या सर्व परीक्षांच्या तारखा तुम्हीच ठरवा. त्या तारखांच्या अनुषंगाने अभ्यास करा. आणि त्या तारखांना आयोगाचे जुने पेपर किंवा एखाद्या क्लास चे नवीन पेपर सोडवून mock परीक्षा द्या. त्याचे मार्क काढा. त्यावरून तुमच्या तयारीचा अंदाज बांधा. आणि त्याचा feedback घेऊन पुन्हा तयारीला लागा. त्यामुळे अभ्यासाचे planning, revision चे वेळापत्रक, परीक्षेची मानसिकता, आणि प्रत्यक्ष परीक्षेचा सराव या सर्व गोष्टी नियमित झाल्या असत्या. आणि यातून कोरोना ने निर्माण केलेली अनियमितता तुम्ही तुमच्या पुरती कमी करू शकला असता. अजूनही करू शकाल. आणि जेंव्हा केंव्हा हे सर्व सुरळीत होईल तेंव्हा तुम्ही जोमाने त्यात उतरू शकाल. हे असं पूर्ण शक्य होईल असं नाही. पण जे प्रयत्न करतील ते न कारणाऱ्यांपेक्षा चांगल्या परिस्थिती मध्ये असतील आणि जे हा प्रयत्न यशस्वीपणे करतील ते तर यशाच्या बरेच जवळ गेलेले असतील.

         तसेच हा जो वेळ तुम्हाला मिळत आहे त्यामध्ये तुम्ही इतर परीक्षांचा अंदाज घेऊ शकता, तुम्हाला कोणती परीक्षा सोपी जाईल ते शोधू शकता. एखाद्या अगदी वेगळ्या परीक्षेची मूलभूत तयारी करायला देखील हा वेळ सत्कारणी लावू शकता. तसेच तुम्हाला तुमचे पूर्वीचे निर्णय यांचे पुनर्विलोकन करायला देखील ही एक उत्तम संधी आहे. फक्त हे करताना तुमचे अगोदर चे ध्येय हे सर्वात महत्वाचे आहे हे विसरू नका आणि फक्त विपरीत परिस्थितीमुळे त्या ध्येयापासून विचलित होऊ नका. तुमचे मूळ ध्येय हे बहुतांश आणि इतर सुस्पष्ट कारणाशिवाय तेच राहायला हवे.

          तिसरा मुद्दा म्हणजे, स्पर्धा परीक्षा हा अंतिम पर्याय नाही. इतर करिअर सारखे ते एक करिअर आहे आणि ते इतर करिअर इतके च साधारण आहे. अभ्यास करतानाच्या या सर्व पोस्ट बाबतच्या कल्पना आणि अधिकारी झाल्यानंतरची वास्तविकता यामध्ये प्रचंड तफावत आहे. स्पर्धा परीक्षा म्हणजे आपण खूप काहीतरी उदात्त किंवा मोठे किंवा वेगळे करत आहोत ही कल्पना तुम्ही सेवेमध्ये आल्यावर पहिल्या काही वर्षात पूर्णतः विरून जाते. याचं वेगळेपण किंवा मोठेपण हे निकाल लागल्या पासून ते जॉईन होई पर्यंत च्या सत्कारापूरतेच आहे. त्या नंतर ही सेवा इतर नोकऱ्यांसारखी नोकरी होऊन जाते. किंबहुना ती इतर नोकऱ्यांसारखीच आहे. प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे काहीजण असतात तसेच सरकारी नोकरी मध्येही असतात. त्याचा अर्थ सरकारी नोकरी म्हणजे उल्लेखनीय कामाचा मूलमंत्र हा समज पूर्णपणे फोल आहे. त्यामुळे स्पर्धा परिक्षेकडे तुम्ही rationally एक संधी म्हणून पाहिले पाहिजे. आणि याला समांतर इतर अनेक संधी जगात आहेत याची स्वतःला आणि आपल्या स्वकीयांना जाणीव करून द्यायला पाहिजे. या संधी तुम्ही तपासल्या पाहिजेत. त्यांच्याकडे सकारात्मकतेने पाहिले पाहिजे. त्यामधील एखादी संधी तुम्हाला सामावून घेत असेल तर तुम्ही खुल्या आणि प्रसन्न मनाने ती स्वीकारायला पण पाहिजे. मला स्वतःला बऱ्याचदा मी सहकारी संस्थांचा सहायक निबंधक होतो त्या पदावर किंवा engineer म्हणून टाटा मोटर्स मध्ये होतो त्या नोकरी मध्ये जास्त समाधानी असलो असतो का असा प्रश्न अधून मधून पडत असतो. 

          चौथा मुद्दा म्हणजे तुम्ही स्वतःला कशावरून judge करणार. तुम्ही स्पर्धा परीक्षा करायला लायक आहात म्हणून तुम्ही त्याची तयारी करू लागता. तुमच्या या क्षमतेवर तुमचा आंतरिक विश्वास असायला हवा. तुमची क्षमता ही स्पर्धा परीक्षेच्या निकालाची पाईक नको. जगासाठी एकवेळ ती तशी असेल तरी हरकत नाही पण स्वतःसाठी मात्र ती तशी बिलकुल असता कामा नये. एखादी परीक्षा उत्तीर्ण होणे, किंवा एका ठराविक पगाराची नोकरी मिळणे याने तुम्ही स्वतःची किंमत करणे यासारखा मूर्खपणा नाही. तुमची स्वतःची योग्यता, talent हे आंतरिक असते. तुमचा त्या योग्यतेवर विश्वास हवा. एखादी नोकरी मिळणे हा त्या योग्यतेचा एक परिणाम असू शकेल. पण ती नोकरी तुमच्या योग्यतेचा मापदंड निश्चितच नसेल. एखाद्या कलेक्टर पेक्षा देखील बुद्धिमान असणारे अनेक जण शिपाई म्हणून आयुष्य घालवतात.  बऱ्याचदा अंतर फक्त योग्य संधीचे असते. त्यामुळे अगोदर स्वतः परीक्षेच्या तराजू मध्ये स्वतः ला तोलणे बंद करा मग हळूहळू जग पण तुम्हाला तसे तोलणे बंद करेल किंवा तुम्हाला जगाचा फरक पडणे देखील बंद होईल. स्पर्धा परीक्षेमध्ये तुमची क्षमता, तुमची तयारी, मानसिकता, बाहेरील स्पर्धा, परीक्षेचा कालावधी, परीक्षेचे दिवस, परीक्षेची खोली, अगदी तुम्हाला बसायला मिळालेला बेंच, परीक्षा घेणारे लोक, पेपर काढणारे, पेपर तपासणारे, मुलाखत घेणारे, त्या वेळची तुमच्या भोवतालची परिस्थिती, नशिबाचा भाग, तुमचे आरोग्य, तुमचे कुटुंब, तुमचे मित्र अशा हजारो गोष्टींचा फरक पडतो. यश आलं तर ते नक्की कशामुळे आणि अपयश आले तर ते नक्की कशामुळे हे छातीठोकपणे खरे कोणीच सांगू शकणार नाही. म्हणून परीक्षेच्या यश-अपयशावरून स्वतःला, स्वतःच्या क्षमतेला Judge करणे पूर्णतः सोडून द्या. तुमचा तुमच्या क्षमतेवर विश्वास नसला तर जरी तुम्ही यशस्वी झाला तरी असमाधानी राहाल आणि जर तुमचा तुमच्या क्षमतेवर विश्वास असेल तर तुम्ही जरी अयशस्वी झाला तरी समाधानी मात्र नक्की व्हाल.आणि समाधानी असणं हे परमोच्च यश आहे.  

          जसे तुमच्या क्षमतेला परीक्षेच्या आणि लोकांच्या मतांच्या तराजू मध्ये तोलू नका तसेच तुमच्या यशालाही. स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होणे हे यश नाही तर यशाकडे जाणाऱ्या अनेक मार्गपैकी फक्त एक मार्ग आहे हे तुम्ही लक्षात ठेवणे आवश्यक आहे. जगातील यशस्वी लोकांच्या कथांमध्ये किती जण स्पर्धा परीक्षा किंवा त्या क्षेत्रातले आहेत. स्पर्धा परिक्षे च्या जगाबाहेर देखील टॅलेंट ला तितकेच किंबहुना थोडे जास्तच महत्व आहे. यश म्हणजे तुम्ही जे कराल ते मनापासून आणि पूर्ण क्षमतेने करणे. आणि याउपर यशस्वी होणे हे कोणाच्याही जीवनाचे ध्येय किंवा मूळ नसते. जीवन आणि जगणे हे मूळ आहे. यश किंवा अपयश ही तात्कालिक आणि तात्पुरती अवस्था आहे. त्यामुळे त्याचे गरजेपेक्षा जास्त अवडंबर नकोच.

       आणि आता पाचवा मुद्दा. अनेक जणांकडून ऐकायला मिळतंय की स्पर्धा परीक्षा देणारे आत्ता depression मध्ये आहेत. अनेक जण असतीलही. ते अगदी साहजिक आहे. पण वर दिलेल्या चार मुद्द्यांचा सारासार विचार केला तर depression यायचं काही कारण नाही. आणि समजा आलंही असेल depression तर योग्य दिशेने विचार करून आपण ते दूर लोटू शकतो. डिप्रेशन येण्यामध्ये वावगं काही नाही. ती एक मनाची अवस्था आहे. बऱ्याचदा ती गोष्टीचा योग्य दिशेने विचार न केल्याने उत्पन्न होते. आणि योग्य दिशेने विचार केला की ही अवस्था सुधारता ही येते. विचार ही सुद्धा एक सवय आहे. आपण जसे विचार करतो तशी सवय लागत जाते. आणि इतर सवयी सारखी ही सवय देखील प्रयत्न केले तर बदलता येते. डिप्रेशन हा आपल्या मनाचा एक समज आहे. परिस्थितीला आणि इतरांना आपण स्वतःपेक्षा जास्त महत्व देऊ लागलो की डिप्रेशन यायची शक्यता असते. Pain आणि suffering मधला फरक कळाला की मग आपण डिप्रेशन किंवा negative विचारांपासून दूर राहू शकतो किंवा त्यांच्यावर मात करू शकतो. Rational thinking, सारासार विचार करणे ही जर आपण सवय बनवली तर negative विचारांवर आपण मात करू शकतो. आणि आत्महत्या किंवा त्यासारखे कोणतेही कृत्य हा कशाही वरचा उपाय नाही हे आपल्याला समजू शकेल. आत्महत्येने कोणाचा कोणताच प्रश्न सुटत नाही. एकवेळ हत्येचे समर्थन करता येईल पण आत्महत्येचे समर्थन नाहीच. जीवनाचे गमक हे प्रयत्नांमध्ये आहे , यशामध्ये नाही. संपूर्ण प्रयत्नामध्ये समाधान आहे, यश हा फक्त त्याचा परिणाम आहे. त्यामुळे कोणतेही टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी आपल्या आजूबाजूचे लोक आठवा, आपण कुठून कुठपर्यंत आणि कसे आलोय तो प्रवास आठवा. डोळे उघडून जगातील अनंत संधिकडे एकवार नजर टाका, आणि पुन्हा एकदा नव्याने नव्याच्या तयारीला लागा.

         काळ कठीण आहे. जिवंत असणे हेच आत्ता महत्वाचे आहे. संपूर्ण कुटुंबे जगातून नाहीशी होत असताना आपण 1-2 वर्षाचा हिशोब करून हातपाय गाळून बसणे कितपत योग्य आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडे असते त्या लढवय्या वृत्तीची आज जगाला नितांत गरज असताना, जगाला मार्ग दाखवण्याची स्वप्ने पाहणाऱ्या आपण आपल्या एवढ्याश्या समस्यांचा बाऊ करून बसणे योग्य नाही. गरज आहे ती त्या समस्यांना धीराने सामोरे जाण्याची आणि त्यातून मार्ग काढण्याची. 

                    - अमोल मांडवे



        

Comments

  1. साध्या आणि सोप्या भाषेत खूप मौलिक संदेश दिला आहात आपण साहेब.

    ReplyDelete
  2. धैर्य वाढवण्यासाठी आपण खुप छान लिहिले आहे. धन्यवाद.

    ReplyDelete
  3. Hi sir
    Got to know about you by my father
    I am from nagache kumthe.

    My aim is dysp.
    Sanket hulage.
    Thank you.

    ReplyDelete
  4. Thank you very much for your guidance

    ReplyDelete
  5. खूपच नेमक आणि सरळ सुटसुटीत लिहिलंय सर....
    कळतं पण वळत नाही अशी परिस्थिती झालीये सध्या...
    सगळंच काही इंस्टंट मिळत असताना यश सुद्धा इन्स्टंट मिळाव अशी इच्छा बळवतेय हल्ली...असो आता कळलेलं वळवून घेण्याची वेळ आहे... असच मोलाच आणि नेमकं मार्गदर्शन करत राहा सर🙏😊

    ReplyDelete
    Replies
    1. किती वास्तिवक विचार आहेत तुमचे!

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

पंख पावसाळी

उन्हाळ्याची सुट्टी

आपल्याच मारेकऱ्यांच्या आसऱ्याला