Posts

मर्यादा

Image
मर्यादा निखाऱ्याने जळत राहावे पोलादी इराद्यांना आकार द्यावे पाणी पडण्यापूर्वीच मात्र स्वतःहून विझून राख व्हावे सूर्याने प्रखर तळपावे तृणी-पानी जीवन द्यावे ढगाने झाकोळण्याआधी डोंगराआड बुडून जावे रात्रीनेही मनसोक्त जागावे मनोमनी स्वप्न पेरावे परी ऊनं पडण्याआधी संधीप्रकाशात दडून बसावे वाऱ्यानेही वाहत जावे सागरावरी वादळ व्हावे किनाऱ्याच्या कुशीत जाता प्रेमभराने झुळूक बनावे समुद्राने सामावून घ्यावे लाटेरूपी थोडे देत जावे अमूर्त तरी अमर्यादंच तो किनाऱ्यापाशी परी नम्र व्हावे      भरभरून प्रेम करावे कोणाचेतरी होऊन जावे स्व व स्वत्व संपण्याआधीच काही पाश सैल करावे        -अमोल मांडवे(ACP/DYSP)

उन्हाळ्याची सुट्टी

Image
                        उन्हाळ्याची सुट्टी (A Stroke of your pensil is worth a hundred words. Thank you Amol Bhosale Sarkar for such an apt sketch)       गुरुजींनी परीक्षेची तारीख सांगितली अन कुठे कुठे आंब्याच्या झाडांना मोहर लागाय सुरुवात झाली की आमच्या डोक्यात उन्हाळ्याची सुट्टी सुरू व्हायची. मागच्या वर्षीच्या उन्हाळ्यात केलेल्या आणि करायला न भेटलेल्या गोष्टींचा हिशोब लावून मग यावर्षी काय काय करायचंय याची गणितं मांडणं सुरू व्हायचं. लपवून ठेवलेले गट्टयांचे डबे, पत्त्यांचे कॅट, रबरी बॉल सगळं जागेवर आहे ना याची घरच्यांची नजर चुकवून खात्री करणं सुरू व्हायचं. घरातल्या एकूण चर्चेवरून आणि पाहुण्याच्या येण्या जाण्यावरून घरात यावर्षी उन्हाळ्यात कुणाचं लग्न होणार याचा अंदाज लावून त्यात आपल्याला काय करायचंय ह्याचं planning आम्ही करू लागायचो. तसा भर फक्त खाण्याची किती चंगळ होणार आणि नवीन कपडे भेटणार यावरच असायचा. परीक्षा मानगुटीवर येऊन बसली असली तरी पोरापोरांच्यात चर्चा सुट्टीचीच असायची. एखादा मित्र परीक्षा झाल्यावर गावाला जाणार आहे म्हणला तर त्याला आम्ही कशी लय मज्जा करणार आहोत आणि तो

मराठी-इंग्रजी वर्णनात्मक पेपर: अभ्यास कसा, कधी , किती करावा.

Image
मराठी-इंग्रजी वर्णनात्मक पेपर:         अगोदर 200 मार्क्स साठी असणारा हा घटक आता मराठीसाठी 50 आणि इंग्रजीसाठी 50 असा 100 गुणांचा करण्यात आला आहे. संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मराठी आणि इंग्रजीचे गुण अंतिम निकालात पकडले जात नसल्याने कधी कधी सुरुवातीला विद्यार्थ्यांचा असा ग्रह होतो की राज्यसेवेच्या परिक्षेतही या पेपर चे गुण फक्त qualifying आहेत. परंतु तसे नसून या पेपर चे मार्क अंतिम निकालात पकडतात आणि किंबहुना निकालात उल्लेखनीय फरकही पाडतात. वर्णनात्मक पेपर चे महत्व:          सगळी परीक्षा objective type प्रश्नांची असल्याने ज्यांना वर्णनात्मक पेपर मध्ये गती आहे त्यांना हा एकच पेपर आधार देतो. तसेच objective type पेपर मध्ये अनिश्चितता खूप जास्त असते. म्हणून मग त्यातल्या त्यात थोडेफार स्थैर्य आणण्याचे काम हाच पेपर करतो. या पेपर मध्ये जर खूप जास्त मार्क पडले तर तुमचा न येणार result येऊ शकतो, तुम्हाला क्लास 2 पोस्ट मिळणार असेल तर क्लास 1 मिळू शकते. आणि तुम्ही जर टॉप च्या पोस्ट साठी प्रयत्न करत असाल तर मग यामध्ये उत्तम मार्क पडण्याशिवाय गत्यंतर नाही.            मला स्वतःला जे

तुझ्या प्रत्येक नसण्याबरोबर

Image
तुझ्या प्रत्येक नसण्याबरोबर तुझ्या प्रत्येक न येण्याबरोबर तू थोडी थोडी सरत गेलीस वाळूच्या किल्ल्यासारखी लाटेबरोबर विरत गेलीस तुझ्या प्रत्येक आठवणीसह स्वप्नांचं विश्व बहरून येतं मात्र तुझं न येणं स्वप्नांसह आणखी काहीतरी घेऊन जातं कारणं बरोबर असतीलही पण ती माझ्या प्रेमाहुन मोठी का व्हावी? चुकार ढगाने एखाद्या संध्याकाळची लाली हिरावून का न्यावी? दर वेळी तुझ्या चाहुलीने माझ्या क्षितिजावर वसंत उतरतो वाट पाहून ग्रीष्मभर तुझी, मनी कुसळांचा माळच माळ उरतो बंद पापण्याआडच्या माझ्या दुनियेत तू नित्य उत्कट भेटत गेलीस मुठीतल्या ओल्या वाळूसारखी हलकेच डोळयांसमोर निसटत गेलीस माझ्या अवकाशात विरहाचं चांदणं शिंपत गेलीस आठवणींची कवाडं तुझ्याच हाताने लिंपत गेलीस तुझ्या प्रत्येक नसण्याबरोबर तू थोडी थोडी सरत गेलीस तुझ्या प्रेमासाठी कसलेल्या शिवारात विरह पेरत गेलीस            ©अमोल मांडवे(ACP/DYSP)

नदी-तट

Image
  नदी- तट तू सागराच्या ओढीने भरधाव चाललीयेस तुझा क्षणभर स्पर्श पुरतो मला-नदीतटाला एरवी फक्त स्पर्शून जातेस माझं अस्तित्वच नाकारून पूर आला की मात्र घट्टमिठीत घेतेस श्वास गुदमरेपर्यंत तुझा घाम माझ्या अंगावर अत्तर म्हणून दरवळतो तुझ्या एवढ्या भेटीनेही उजाड मी बहरून जातो कधी कधी उगाचच मी वेडीवाकडी वळणे घेतो क्षणभर सहवास जास्त मिळावा म्हणून तुला अडवत राहतो कधी कधी भावुक होऊन तू देखील घुटमळतेस बेसावध क्षणी अचानक मग बांध माझे फोडून जातेस तुझ्या ओढीने रोज झुरून मी थोडा थोडा सरून जातो उद्या आणखी सरता यावे म्हणून आज थोडा उरून राहतो मग अचानक एके दिवशी पाश तोडून उफाळून येतेस आयुष्यभर पुरेल ती शिदोरी पदरी माझ्या बांधून जातेस परत तुझ्या पुराची वेडी आस धरून राहतो कवेत नसतेस येणार परि नजरेत तरी ठेऊ पाहतो तुझ्या स्पर्शाच्या खुणांना अंगांगावर कोरून ठेवतो तुझ्या गजऱ्यातून पडलेल्या फुलांनी ओंजळ माझी भरू पाहतो           -अमोल मांडवे(ACP/DYSP)

अपूर्णत्व

Image
अपूर्णत्व (Sketch credit: Dearest friend Amol Bhosale) बदलून गेलेल्या नदीच्या पात्रातील  सुकलेल्या ओघळांच्या ओरखड्यांसारखं पाकळ्या गळून गेलेल्या  बोडक्या हिरमुसल्या देठासारखं विधवेच्या कपाळावरील  कुंकवाच्या पांढऱ्या वणासारखं सूर्य बुडल्यावर मागे उरलेल्या निराधार निस्तेज कांतीसारखं कसायाच्या दारात सोडलेल्या वासराच्या घरच्या दावणीला राहिलेल्या दाव्यासारखं पिलं घरट्यातून उडून गेलेल्या म्हाताऱ्या जोडप्याच्या संसारासारखं लाखो श्वापदांचे अस्तित्व असूनही निपचित अरण्यातील भयाण शांततेसारखं तिची दूर जाणारी आकृती साठवत पापणीवर थिजलेल्या आसवासारखं       -अमोल मांडवे(ACP/DYSP)

तू

Image
तू सह्याद्रीच्या कड्याचा काळा पाषाण मी आणि तू समुद्राचा निळसर किनारा विशाल जटाधारी वृक्ष मी आणि तू गर्द गार सावली चंद्र गिळालेला दाट अंधार मी आणि तू चांदणं निखळ रात्रीचं  त्सुनामीच्या मागून येणारा विध्वंस मी आणि तू तिथे उमललेलं इवलंसं फुल उथळ अवखळ खळाळता ओढा मी आणि तू नदी गूढ गहिरी रसरसत्या वणव्याच्या राक्षसी दाह मी आणि तू देव्हाऱ्यातील समई अथांग अनादी वाळवंट मी आणि तू ओल्या आठवणींचा शिंपला -©अमोल मांडवे(ACP/DYSP)

निर्माल्य

Image
  निर्माल्य तुझ्या नवीन वाटेच्या सुरुवातीला माझ्या जुन्या आठवणी विसरायच्यात तुझ्या नवीन स्वप्नांच्या पहाटेत माझ्या जागून घालवलेल्या रात्री संपवायच्यात तुझ्या सुखी जीवनाच्या अवकाशात माझ्या दुःखाचं आभाळ लपवायचंय तू नदीसारखी तुझ्या समुद्राला भेटताना मला त्या डोंगरासारखं पाठमोरं व्हायचंय तू थंडीसारखी हळूहळू बहरत जाताना मला पावसासारखं अचानक सरून जायचंय तू तुझ्या कॅनव्हासवर एक एक रंग भरताना मला मात्र रोज थोडंस पुसट होत जायचंय तुझ्या पदरी कायमचा शुक्लपक्ष बांधून कृष्णपक्ष माझ्या कपाळी धारण करायचाय तुझ्या शेवटीच्या वैकुंठ वारीवेळी मला ओवाळून टाकलेलं निर्माल्य व्हायचंय     -अमोल मांडवे(ACP/DYSP)

जगावेगळी माणसं:पैलवान विकास जाधव : दुर्दम्य इच्छाशक्तीचा नवा मापदंड!

Image
जगावेगळी माणसं:पैलवान विकास जाधव : दुर्दम्य इच्छाशक्तीचा नवा मापदंड!     ट्रेनची शिट्टी वाजली आणि हळू हळू प्लॅटफॉर्म पाठीमागं सरकायला लागला. जायचं ठिकाण तेच. लहानपणा पासून खुणावणारं, किनाऱ्या वरच्या दीपस्तंभासारखं. पण यावेळी रस्ता थोडा वेगळा होता. थोडा कसला खूपच वेगळा होता. ही वाट धरली की प्रत्येक वेळी घात झाला होता. ऐन उमेद असताना स्वप्नांचा चुराडा झाला होता. दीपस्तंभ नजरेच्या टप्प्यात आला की दर वेळी समुद्रानंच नाव गिळून टाकावी असंच काहीसं होत आलं होतं. यावेळी तर नाव ही जुनी होती आणि समुद्र खवळलेला. ही नाव समुद्रात ढकलायला आता सह्याद्री एवढ्या काळजाची गरज होती.           पण आता नावेनं किनारा सोडला होता. आणि परतीचे दोर सोबत घेउन बाहेर पडणारातली जात नव्हती. ट्रेन वेगानं पुढं सरकायला लागली आणि मन वेगानं भूतकाळात मागं सरकायला लागलं.           जीव लावणारी बायको आणि लळा लावणारी पोरं, आता चांगलंच बहरलेलं घरदार, पेट्रोल पंपच्या निमित्तानं दिवसरात्र पुरेल एवढं काम, शब्द खाली पडू न देणारे गावकरी, आणि मोठ्यात मोठ्या पैलवानांचं पण आदरानं तात्या म्हणून पायाला लागणारं हात, सगळं होत

प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव कसा करावा

Image
प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव कसा करावा आपण नेहमी ऐकतो की, खूप अभ्यास केला पण मार्क कमी पडले, ऐन पेपर वेळी गडबड झाली, प्रश्नपत्रिका सोडविण्याचा खूप सराव केला पण तरी परीक्षेत गोंधळ उडाला. कशामुळे विद्यार्थ्यांना असे प्रश्न पडतात? कशामुळे सगळे करूनही यश हुलकावणी देते? याचा एक कारण असते की प्रत्यक्ष परीक्षेमध्ये जे करावे लागते त्याचा कमी सराव किंवा सरावमध्ये कमतरता किंवा चुकीचा सराव. यास्तव हे टाळण्यासाठी सराव पुरेसा आणि सरावाची पद्धत योग्य असावी. सरावाच्या योग्य पद्धतीवर प्रकाश टाकणारा हा पाठ. 1. प्रश्नपत्रिका किती व कधी सोडवाव्यात?          प्रश्नपत्रिका किती सोडवण्यात याव्यात याचे कोणतेही मापदंड नाहीत. प्रत्येकाला कमी जास्त सराव लागू शकतो. परंतु सर्वसाधारणपणे राज्यसेवेच्या सर्व प्रश्नपत्रिका सोडवून व्हायलाच हव्यात. याशिवाय पूर्वपरिक्षेनंतर प्रत्येक आठवड्यात दोन पेपर सोडवून व्हायलाच हवे. पेपर सोडवल्याने आपल्या अभ्यासाची दिशा योग्य रहाते व आपला अभ्यास योग्य दिशेने चालू आहे हे पडताळण्यास मदत होते.            बऱ्याचदा विद्यार्थी सुरुवातीला फक्त वाचन करतात व शेवटच्या महिन

तू माझा ध्रुव तारा

Image
          तू माझा ध्रुव तारा    तू म्हणजे पुणवेचं चांदणं जणू मंद प्रकाशाने उजळून टाकतेस पण स्पर्शाची अनुभूती मात्र टाळतेस तू अमावास्येचा अंधार जणू अगम्य गूढ आणि अकल्पित गहिरा तरीही अनुभूतीने अंतर्मुख करणारा तुझं येणं म्हणजे वावटळ जोराची तुझं माझ्याजवळचं सगळं हिरावून नेतेस जाता जाता निर्मितीचं बीज मात्र पेरून जातेस तुझं जाणं म्हणजे पावसाळ्याचा शेवट बरसनं आणि रुजणं बरोबर घेऊन जातं बहर आणि दरवळ मात्र ठेऊन जातं तुझं नसणं झोंबणारा वारा दिसत नाहीस उघड्या डोळ्यांना कधीच जाणिवेला मात्र ओतप्रोत भरून टाकतेस तुझं असणं म्हणजे मृगजळ नसतानाही माझ्या डोळ्यात असणारं मिटल्या पापण्यांच्याही पडद्यावर दिसणारं अनंत जगात, तू माझा ध्रुव तारा अढळ आहेस मनाच्या आतल्या कप्प्यात तेवढीच अप्राप्य वसुंधरेच्या अवकाशात        ©अमोल मांडवे(ACP/DYSP)

जगावेगळी माणसं- विजय चौधरी(ट्रिपल महाराष्ट्र केसरी) २. काही दिवस शिकार केली नाही म्हणून वाघ पंजा मारायचं विसरत नाही.

Image
जगावेगळी माणसं- विजय चौधरी(ट्रिपल महाराष्ट्र केसरी) २. काही दिवस शिकार केली नाही म्हणून वाघ पंजा मारायचं विसरत नाही.         तीस वर्षे वयाचा विजय चौधरी. त्रिपल महाराष्ट्र केसरी. महाराष्ट्रातला सध्याच्या घडीचा सगळ्यात अनुभवी पैलवान. मोठं शरीर, मोठं मन, रुबाब तेवढाच मोठा. रस्त्यानं चालला तर लोकांची लाईन लागते हात मिळवायला. तरी सगळ्यांबरोबर सेल्फी काढून त्यांना खुश करणारा विजय चौधरी. कुस्तीच्या सगळ्या परीक्षा एका नंबरात पास झालेला. जणू खंडोबाचा भंडारा अंगावर उधळून मैदानात उतरलेला पिवळ्या लांघेतला पैलवान.          आणि समोर कोण? आदर्श गुंड. नाव आणि आडनावात किती विरोधाभास. वय अवघं १९ वर्षे.  ह्याच्या वयाचा असताना विजय अजून कुस्तीचे पहिले धडेच गिरवत होता. आणि ह्यो मात्र शड्डू ठोकून विजयच्याच समोर उभा. आडदांड पैलवान. पण पहाडाएवढ्या काळजाचा. छातीत काळीज मावंना म्हणून खाली पोटात सरकलंय वाटंतं. आणि त्यामुळे हत्तीसारखं, मातीतल्या पैलवानालाच शोभून दिसणारं डेऱ्यासारखं पोट. वय बारीक पण डोळ्यात निश्चय केवढा. खुल्या गटातली पहिली कुस्ती पटठ्याची पण नवखेपणाचा लवलेश पण नव्हता त्याच्या डोळ

मराठी शाळा

Image
                            मराठी शाळा          शाळेत असताना मनात नसताना अनेक पुस्तके वाचली आणि कित्येक पुस्तकं प्रत्यक्ष जगली. शाळेवर लेख लिहायला घेतला तर नकळत त्याचं पुस्तक होईल. तरी हा लेख लिहायचा मोह टळत नाही. शाळा तरी कुठे टळायची. जावंच लागायचं. पण ते सुरुवातीला. नंतर शाळा हेच कधी जग व्हायचं ते कळायचं नाही. अचानक घरच्यांपेक्षा जवळचं कोणी असू शकत हे कळायला थोडासा वेळ जातो पण मग घरी न बोलू शकणाऱ्या गोष्टी बोलायला आणि करायला सोबती मिळू लागले की आपलं जग पहिल्यांदा बदलू लागतं. चार भिंतींची मर्यादा गळून आयुष्यातील प्रचंड शक्यता दिसू लागतात आणि त्यांना गवसणी घालण्यासाठी लागणारं बळ, अगदी मूर्खपणा म्हणण्याइतकं वेडं धाडस या मित्रांच्या बरोबरच मिळतं.         मोठी बहीण पहिलीत होती तेंव्हा. मी अजून बराच लहान होतो शाळेत जाण्यासाठी, त्या वेळच्या मानाने. आता घरचे सांगतात याला पहिल्यापासून आवड आहे शाळेची, अडीच वर्षाचा असल्यापासून जातो वगैरे. पण याला घरी सांभाळत बसण्यापेक्षा शाळेत पाठवलेला बरा अशा प्रकाराची शक्यता नाकारता येत नाही.😀तेवढा उचपती मी असेन कदाचित. पण एका दिवशी बहिणीच्या वर्

Am I Worth Dying For???

Image
Am I Worth Dying For???        I was so happy. I was going home after eight long months. I was so excited as it was the first time I was going home after getting posted and after having the first taste of the practical policing. Moreover, the reason for excitement was, 7 days leave, which was granted quite unexpectedly.         It was about two hours since I started the journey and I hadnot left the district yet. I hadnot finished with the planning about what to do on which day. I was still busy, soaking in the pleasure derived out of the pre-imagined feeling of being home. It was then that my phone beeped and the message flashed on screen "come back on 10th night". I was asked to return 2 days earlier. I felt like wishing myself "welcome to police service". I could clearly see the Border movie scene running through my mind, where the soldiers are called back on the pretext of war being opened. Every movie with the military theme invariably contains atleast on

घराचा उंबरा आणि ओसरीची पायरी

Image
                घराचा उंबरा आणि ओसरीची पायरी                                  (Sketch Credit- Amol Bhosale, DSLR😊)         स्वतःच्या बालपणीचं काही आठवत नाही, पण ते माझ्या लहान भावंडांपेक्षा फारसं वेगळं नसावं. माझा लहान भाऊ रांगत उंबऱ्याकडे जायला लागला की कोण ना कोण त्याला उचलून आत सोडायचं. पण उचलून ठेवणारा दमून गेला तरी याची उंबऱ्याकडची मोहीम अविरत चालू राहायची. मलाही एवढं आकर्षण असेल का त्या उंबऱ्याचं? आणि असेल तर ते का? उंबऱ्या बाहेरून आत डोकावणाऱ्या नाविन्यामुळे की चार भिंतीबाहेरच्या अनिर्बंध स्वातंत्र्यामुळे की अंतरीच्या अगाध अज्ञानामुळे? याची उत्तरं तेंव्हाही मला माहिती नव्हती आणि आजही नाहीत. पण उंबऱ्या बरोबरचं माझं नातं मात्र दर प्रत्येक भेटीत एका वेगळ्या रंगाने खुलत गेलं. बहिणीचा मुलगा पण उंबऱ्याकडे जायला लागला की असंच त्याला उचलून आत नेलं जायचं. पण एकेदिवशी सगळ्यांची नजर चुकवून जेंव्हा तो उंबरा ओलांडून पायरीवर जाऊन बसला तेंव्हा मात्र दोन दिवस ती कौतुकाने सगळ्यांना तेच सांगत होती. स्वतःच्या सामर्थ्यावर बाहेरच्या जगाला आपलं बाळ सामोरं जातंय याचा आनंद झाला असावा त्या