Posts

संध्याकाळच्या गोष्टी-(२)- चहा

Image
संध्याकाळच्या गोष्टी-(२)- चहा          (Sketch credit: Amol Bhosale) ऑफिस मध्ये फारसं काम नव्हतंच आज.  पण ढग दाटून आलेले असले की एक हलकासा अंधार पडतो ऑफिस मध्ये. त्या अंधारात आधीच वाचलेलं आणि आवडलेलं एखादं पुस्तक वाचायला मला खूप आवडतं म्हणून मी खालेद होसेनीच्या "a Thousand Splendid Suns" मधील एकाच नवऱ्याच्या दोन बायकांमध्ये त्याच्या जाचाला कंटाळून निर्माण झालेलं हळवं नात कसं उलगडत जातंय हे वाचत बसलो होतो. पण थोड्याच वेळात अंधार आणखी गडद होत गेला आणि अचानक एक क्षणात पाठीमागच्या खिडकीसह सगळा परिसर उजळून गेला आणि पाठोपाठ वीज कडाडल्याचा आवाज आला. तावदानांवर थेंबांचा विरळ आवाज होऊ लागला आणि मी तडक घरचा रस्ता धरला. ऑफिस पासून जेमतेम 30 मीटर.           मी लवकर आलो. पण तिचा ऑफिसचा टाइम संपल्याशिवाय तिला निघता येत नाहीच. तोपर्यंत मी कुठल्या खिडक्या दरवाजे उघडे राहून पाणी आत येणार नाही हे पाहून घेतलं. आणि मग वऱ्हांड्यात दोन खुर्च्या टाकून कवितांची जुनी वही काढून बसलो. मावळत्या सूर्याला काही आज आपले रंग उधळता नाही आले. काही काळ्याकुट्ट ढगांनी काळवंडून टाकले तर काही उभ्या ध

आई

Image
आई तुझ्या समोर डोळे आटतात उसने अवसान घेऊन तुझ्या कुशीत बांध फुटतात अगदी धुमसून धुमसून काहीच न बोलता  तुला सगळं कळतं स्वतःसही न उमगलेलं तुला मात्र नेमकं वळतं परमार्थापेक्षा मोठा तुझा स्वार्थ कसा ठरतो तुझंही वेगळं अस्तित्व तुझा जीव कसा विसरतो तुझ्या दुःखाचं खत करून आमची सुखं रुजतात तुझ्या इच्छांच्या लक्तरांनी आमची स्वप्नं सजतात तुझ्या बेड्यांना आमचे पंख आणि  तुझ्या भिंतींना आमचं आभाळ केलंस जे तुझंं ते तर तू अर्घ्यासारखं दिलंस तुझं नसेल तेही विश्व अंगणी उभारलंस आमच्या राईच्या प्रेमाचा आम्ही पर्वत करतो तुझ्या मायेचा सागर पाझर बनून उरतो शरीराचं दुखणं  तुला कळायचंच तुझ्याच शरीराचा मी छोटा अंश ना पण मनीच्या वेदनाही पोचतातच तुझ्यापर्यंत मनांचीही कसली  नाळ असते का गं        -अमोल मांडवे(ACP/DYSP)

जंगलाचं रात-गाणं

Image
जंगलाचं रात-गाणं (In Photo: Harshwardhan Jadhav) हुंकारून कोणी शृंगार वाटतं गहिवरून कोणी दुःख मागतं आरवून कोणी रान जागवतं बावरून कोणी तार केकाटतं चुकार पक्षी मधेच चिर्र करतो रातकीडा एकसारखा किर्रर्र करतो बुंध्यावर टक टक ढाल करतो शेंड्यावर चक चक ताल धरतो डरकाळीचं आव्हान गुरगुरणारी माघार भेदरलेली आरोळी चवताळलेला फुत्कार पानांची सळसळ जणू बालपण खेळतं फांद्यांमधली घरघर जसं यौवन बोलतं ऐकता अंतरंग वनीचे नीरव स्तब्धता कानी येते कवेत घेऊनी अरण्य समाधानाची ऊब देते          - अमोल मांडवे(ACP/DYSP)

वस्त्रहरण

प्रस्थापित गोष्टींचा जरा बारकाईने विचार केला की अनेक गोष्टी खटकू लागतात. संपूर्ण समाजच दांभिक असल्याचे दाखले मिळू लागतात. आणि मग रामायण-महाभारतात रचल्या गेलेल्या या गोष्टींची खरच समाज-घडणीसाठी आवश्यकता होती का असा प्रश्न पडतो. आणि मग त्याच गोष्टी एका वेगळ्या angle ने पहायची गरज वाटते. वस्त्रहरण अपमानापोटी जन्मलेली एका स्त्रीसाठीची 'आसक्ती' सामर्थ्याचा महामेरू असूनही तिच्या इच्छेची वाट पाहणारी या वृत्तीस आम्ही दहा तोंडे लावून दर वर्षी जाळतो, टाळ्या पिटत नाचतो ही भावास 'वर'लेल्या स्त्रीची भावांनाच आसक्ती व्हावी 'आदर्श' म्हणवणाऱ्या आईनेही ती पाचांत वाटून द्यावी 'त्यागाचे' यांच्या गोडवे  हजार सहस्त्र ओव्या भजनी किर्तनी महती कारण 'हरी' पाठीराखा बायकोची वस्त्रे पणाला लावून शमीवरची शस्त्रे जनाला दाखवून सहानुभूतीच्या रथात युगानुयुगे आरूढ होऊन लोकांच्या डोळ्यात धूळ उडवत कृष्ण 'सारथ्य' सुरूच आहे त्या धुळीला गुलाल समजून आम्ही माथी लावून फिरतो प्रस्थापितांनी केलेला अन्याय स

दुःख नियोग

Image
दुःख नियोग आपल्याच हातांनी  धारदार तलवार आपल्याच छातीत वीतभर भोकसावी हृदयातली पीडा रक्ताच्या धारेसह  बाहेर पडते का स्वतःच पहावं जखमेच्या पोकळीत, तलवारीच्या पात्यावर, ओघळत्या रक्तात, कोणी-काही आहे का पहावं कंठातून ओठामार्गे, डोळ्यातून अश्रूमार्गे, मज्जेतून वेदनेमार्गे, कोणी-काही जातंय का पहावं आठलेल्या रक्तात, मिटलेल्या पापण्यात, गोठलेल्या जाणिवांत, कोणी-काही उरलंय का पहावं सगळ्याची होळी करून राखेचं अर्घ्य देऊन सरिता सिंधुस मिळताच दुःख नियोग         -अमोल मांडवे(ACP/DYSP)

सीतायण

Image
सीतायण रामावर चिडणारा मी आता सीतेचा राग येतो चारित्र्याने का कुठे समाज कलंकित होतो जंगलातच राहायचं होतं तर अग्निपरीक्षा नाकारायची होती कोणीतरी बोट दाखवण्याआधी स्वतः वाट शोधायची होती मर्यादांनी बांधलेल्याकडून कशाला आधाराची अपेक्षा प्रेमापोटीच का होईना करून का घ्यावी उपेक्षा तो नायक झाला रामायण घडलं अघटिताचं पातक तुझ्या माथी पडलं पुरुषी अरेराविचा गळा तेंव्हाच घोटता आला असता तुझं नाव काढलं की कारुण्याचा वर्षाव झाला नसता तू धैर्य दाखवलंस थोडी तिडीक दाखवायचीस तू औदार्य दाखवलंस थोडी स्वार्थी बनली असतीस तुझ्या एका त्यागाने पुरुषार्थ झाकोळला स्त्रीत्वाचा मतितार्थ कालातीत डागाळला       -अमोल मांडवे(ACP/DYSP)

वर्णनात्मक पेपर मधील निबंधाची तयारी कशी करावी?

Image
वर्णनात्मक पेपर चा अभ्यास कसा करावा: वर्णनात्मक पेपर अभ्यास करायला अतिशय सोप्पा पण थोडासा tricky आहे. मराठी आणि इंग्रजी दोन्ही पेपर मध्ये निबंध, भाषांतर आणि सरांशलेखन एवढे तीनच प्रश्न असल्याने खुप अभ्यास करावा नाही लागत, परंतु यातील कोणत्याही प्रकारात एखादी लक्षात येण्यासारखी चूक झाली तर मार्क्स एकदम खूप कमी होतात. म्हणून तिन्ही बाबींचा व्यवस्थित नियोजनबद्ध अभ्यास व सराव लागतो. निबंध/ Essay:          मराठी व इंग्रजी दोन्ही पेपर मध्ये 25 मार्क्स साठी एक एक निबंध विचारला जातो. भाषा वेगळ्या असल्या तरी दोन्ही निबंधांमध्ये अपेक्षित असणाऱ्या बाबी सारख्याच असतात. त्यामुळे दोन्हीच्या अभ्यासाची पद्धत सारखीच आहे.            निबंध हा भाषेच्या पेपर मध्ये आहे, तो GS चा भाग नाही हे लक्षात घ्यावे. त्यामुळे त्यात माहितीचा भडीमार नको. तसेच GS चे उत्तर लिहितोय असंही वाटता कामा नये. स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासात आपणाला प्रत्येक गोष्टीबद्दल खुप काही माहिती असते. त्यामुळे एखादा विषय समोर येताच त्याबद्दल आपल्याला माहिती असलेले सगळे कसे लिहिता येईल याकडे आपला भर असतो. त्यामुळे निबंध हा रुक्ष

विदर्भ-संध्या

Image
विदर्भ-संध्या पालाशाच्या माथ्यावर लक्ष सूर्य मावळले पालाशाचे रंग केसरी ओठी तुझ्या अवतरले पश्चिमेला क्षितिजावर घन काळे-दाट उतरले डोंगराच्या खांद्यावर आभाळ ते गहिवरले विद्युल्लतेच्या कटाक्षाने क्षण काही उजळले घराघरातून पाड्यावर समया-दिवे पाजळले पानझडीची करडी चादर तृणांचे गालिचे पसरले शेंड्यांवरची चुकार पाने परी तयांनी नभ झाकोळले बांबूच्या बनी सळसळ वाऱ्याने सूर आळविले फांदीवर भेदरले घरटे पंख पिलांनी पांघरले दिवस रात्रीच्या प्रणयात अरण्य सारेच हरविले संध्येच्या रम्य मिठीत भावही मनीचे शहारले                          -अमोल मांडवे(ACP/DYSP)

मर्यादा

Image
मर्यादा निखाऱ्याने जळत राहावे पोलादी इराद्यांना आकार द्यावे पाणी पडण्यापूर्वीच मात्र स्वतःहून विझून राख व्हावे सूर्याने प्रखर तळपावे तृणी-पानी जीवन द्यावे ढगाने झाकोळण्याआधी डोंगराआड बुडून जावे रात्रीनेही मनसोक्त जागावे मनोमनी स्वप्न पेरावे परी ऊनं पडण्याआधी संधीप्रकाशात दडून बसावे वाऱ्यानेही वाहत जावे सागरावरी वादळ व्हावे किनाऱ्याच्या कुशीत जाता प्रेमभराने झुळूक बनावे समुद्राने सामावून घ्यावे लाटेरूपी थोडे देत जावे अमूर्त तरी अमर्यादंच तो किनाऱ्यापाशी परी नम्र व्हावे      भरभरून प्रेम करावे कोणाचेतरी होऊन जावे स्व व स्वत्व संपण्याआधीच काही पाश सैल करावे        -अमोल मांडवे(ACP/DYSP)

उन्हाळ्याची सुट्टी

Image
                        उन्हाळ्याची सुट्टी (A Stroke of your pensil is worth a hundred words. Thank you Amol Bhosale Sarkar for such an apt sketch)       गुरुजींनी परीक्षेची तारीख सांगितली अन कुठे कुठे आंब्याच्या झाडांना मोहर लागाय सुरुवात झाली की आमच्या डोक्यात उन्हाळ्याची सुट्टी सुरू व्हायची. मागच्या वर्षीच्या उन्हाळ्यात केलेल्या आणि करायला न भेटलेल्या गोष्टींचा हिशोब लावून मग यावर्षी काय काय करायचंय याची गणितं मांडणं सुरू व्हायचं. लपवून ठेवलेले गट्टयांचे डबे, पत्त्यांचे कॅट, रबरी बॉल सगळं जागेवर आहे ना याची घरच्यांची नजर चुकवून खात्री करणं सुरू व्हायचं. घरातल्या एकूण चर्चेवरून आणि पाहुण्याच्या येण्या जाण्यावरून घरात यावर्षी उन्हाळ्यात कुणाचं लग्न होणार याचा अंदाज लावून त्यात आपल्याला काय करायचंय ह्याचं planning आम्ही करू लागायचो. तसा भर फक्त खाण्याची किती चंगळ होणार आणि नवीन कपडे भेटणार यावरच असायचा. परीक्षा मानगुटीवर येऊन बसली असली तरी पोरापोरांच्यात चर्चा सुट्टीचीच असायची. एखादा मित्र परीक्षा झाल्यावर गावाला जाणार आहे म्हणला तर त्याला आम्ही कशी लय मज्जा करणार आहोत आणि तो

मराठी-इंग्रजी वर्णनात्मक पेपर: अभ्यास कसा, कधी , किती करावा.

Image
मराठी-इंग्रजी वर्णनात्मक पेपर:         अगोदर 200 मार्क्स साठी असणारा हा घटक आता मराठीसाठी 50 आणि इंग्रजीसाठी 50 असा 100 गुणांचा करण्यात आला आहे. संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मराठी आणि इंग्रजीचे गुण अंतिम निकालात पकडले जात नसल्याने कधी कधी सुरुवातीला विद्यार्थ्यांचा असा ग्रह होतो की राज्यसेवेच्या परिक्षेतही या पेपर चे गुण फक्त qualifying आहेत. परंतु तसे नसून या पेपर चे मार्क अंतिम निकालात पकडतात आणि किंबहुना निकालात उल्लेखनीय फरकही पाडतात. वर्णनात्मक पेपर चे महत्व:          सगळी परीक्षा objective type प्रश्नांची असल्याने ज्यांना वर्णनात्मक पेपर मध्ये गती आहे त्यांना हा एकच पेपर आधार देतो. तसेच objective type पेपर मध्ये अनिश्चितता खूप जास्त असते. म्हणून मग त्यातल्या त्यात थोडेफार स्थैर्य आणण्याचे काम हाच पेपर करतो. या पेपर मध्ये जर खूप जास्त मार्क पडले तर तुमचा न येणार result येऊ शकतो, तुम्हाला क्लास 2 पोस्ट मिळणार असेल तर क्लास 1 मिळू शकते. आणि तुम्ही जर टॉप च्या पोस्ट साठी प्रयत्न करत असाल तर मग यामध्ये उत्तम मार्क पडण्याशिवाय गत्यंतर नाही.            मला स्वतःला जे

तुझ्या प्रत्येक नसण्याबरोबर

Image
तुझ्या प्रत्येक नसण्याबरोबर तुझ्या प्रत्येक न येण्याबरोबर तू थोडी थोडी सरत गेलीस वाळूच्या किल्ल्यासारखी लाटेबरोबर विरत गेलीस तुझ्या प्रत्येक आठवणीसह स्वप्नांचं विश्व बहरून येतं मात्र तुझं न येणं स्वप्नांसह आणखी काहीतरी घेऊन जातं कारणं बरोबर असतीलही पण ती माझ्या प्रेमाहुन मोठी का व्हावी? चुकार ढगाने एखाद्या संध्याकाळची लाली हिरावून का न्यावी? दर वेळी तुझ्या चाहुलीने माझ्या क्षितिजावर वसंत उतरतो वाट पाहून ग्रीष्मभर तुझी, मनी कुसळांचा माळच माळ उरतो बंद पापण्याआडच्या माझ्या दुनियेत तू नित्य उत्कट भेटत गेलीस मुठीतल्या ओल्या वाळूसारखी हलकेच डोळयांसमोर निसटत गेलीस माझ्या अवकाशात विरहाचं चांदणं शिंपत गेलीस आठवणींची कवाडं तुझ्याच हाताने लिंपत गेलीस तुझ्या प्रत्येक नसण्याबरोबर तू थोडी थोडी सरत गेलीस तुझ्या प्रेमासाठी कसलेल्या शिवारात विरह पेरत गेलीस            ©अमोल मांडवे(ACP/DYSP)

नदी-तट

Image
  नदी- तट तू सागराच्या ओढीने भरधाव चाललीयेस तुझा क्षणभर स्पर्श पुरतो मला-नदीतटाला एरवी फक्त स्पर्शून जातेस माझं अस्तित्वच नाकारून पूर आला की मात्र घट्टमिठीत घेतेस श्वास गुदमरेपर्यंत तुझा घाम माझ्या अंगावर अत्तर म्हणून दरवळतो तुझ्या एवढ्या भेटीनेही उजाड मी बहरून जातो कधी कधी उगाचच मी वेडीवाकडी वळणे घेतो क्षणभर सहवास जास्त मिळावा म्हणून तुला अडवत राहतो कधी कधी भावुक होऊन तू देखील घुटमळतेस बेसावध क्षणी अचानक मग बांध माझे फोडून जातेस तुझ्या ओढीने रोज झुरून मी थोडा थोडा सरून जातो उद्या आणखी सरता यावे म्हणून आज थोडा उरून राहतो मग अचानक एके दिवशी पाश तोडून उफाळून येतेस आयुष्यभर पुरेल ती शिदोरी पदरी माझ्या बांधून जातेस परत तुझ्या पुराची वेडी आस धरून राहतो कवेत नसतेस येणार परि नजरेत तरी ठेऊ पाहतो तुझ्या स्पर्शाच्या खुणांना अंगांगावर कोरून ठेवतो तुझ्या गजऱ्यातून पडलेल्या फुलांनी ओंजळ माझी भरू पाहतो           -अमोल मांडवे(ACP/DYSP)

अपूर्णत्व

Image
अपूर्णत्व (Sketch credit: Dearest friend Amol Bhosale) बदलून गेलेल्या नदीच्या पात्रातील  सुकलेल्या ओघळांच्या ओरखड्यांसारखं पाकळ्या गळून गेलेल्या  बोडक्या हिरमुसल्या देठासारखं विधवेच्या कपाळावरील  कुंकवाच्या पांढऱ्या वणासारखं सूर्य बुडल्यावर मागे उरलेल्या निराधार निस्तेज कांतीसारखं कसायाच्या दारात सोडलेल्या वासराच्या घरच्या दावणीला राहिलेल्या दाव्यासारखं पिलं घरट्यातून उडून गेलेल्या म्हाताऱ्या जोडप्याच्या संसारासारखं लाखो श्वापदांचे अस्तित्व असूनही निपचित अरण्यातील भयाण शांततेसारखं तिची दूर जाणारी आकृती साठवत पापणीवर थिजलेल्या आसवासारखं       -अमोल मांडवे(ACP/DYSP)

तू

Image
तू सह्याद्रीच्या कड्याचा काळा पाषाण मी आणि तू समुद्राचा निळसर किनारा विशाल जटाधारी वृक्ष मी आणि तू गर्द गार सावली चंद्र गिळालेला दाट अंधार मी आणि तू चांदणं निखळ रात्रीचं  त्सुनामीच्या मागून येणारा विध्वंस मी आणि तू तिथे उमललेलं इवलंसं फुल उथळ अवखळ खळाळता ओढा मी आणि तू नदी गूढ गहिरी रसरसत्या वणव्याच्या राक्षसी दाह मी आणि तू देव्हाऱ्यातील समई अथांग अनादी वाळवंट मी आणि तू ओल्या आठवणींचा शिंपला -©अमोल मांडवे(ACP/DYSP)

निर्माल्य

Image
  निर्माल्य तुझ्या नवीन वाटेच्या सुरुवातीला माझ्या जुन्या आठवणी विसरायच्यात तुझ्या नवीन स्वप्नांच्या पहाटेत माझ्या जागून घालवलेल्या रात्री संपवायच्यात तुझ्या सुखी जीवनाच्या अवकाशात माझ्या दुःखाचं आभाळ लपवायचंय तू नदीसारखी तुझ्या समुद्राला भेटताना मला त्या डोंगरासारखं पाठमोरं व्हायचंय तू थंडीसारखी हळूहळू बहरत जाताना मला पावसासारखं अचानक सरून जायचंय तू तुझ्या कॅनव्हासवर एक एक रंग भरताना मला मात्र रोज थोडंस पुसट होत जायचंय तुझ्या पदरी कायमचा शुक्लपक्ष बांधून कृष्णपक्ष माझ्या कपाळी धारण करायचाय तुझ्या शेवटीच्या वैकुंठ वारीवेळी मला ओवाळून टाकलेलं निर्माल्य व्हायचंय     -अमोल मांडवे(ACP/DYSP)

जगावेगळी माणसं:पैलवान विकास जाधव : दुर्दम्य इच्छाशक्तीचा नवा मापदंड!

Image
जगावेगळी माणसं:पैलवान विकास जाधव : दुर्दम्य इच्छाशक्तीचा नवा मापदंड!     ट्रेनची शिट्टी वाजली आणि हळू हळू प्लॅटफॉर्म पाठीमागं सरकायला लागला. जायचं ठिकाण तेच. लहानपणा पासून खुणावणारं, किनाऱ्या वरच्या दीपस्तंभासारखं. पण यावेळी रस्ता थोडा वेगळा होता. थोडा कसला खूपच वेगळा होता. ही वाट धरली की प्रत्येक वेळी घात झाला होता. ऐन उमेद असताना स्वप्नांचा चुराडा झाला होता. दीपस्तंभ नजरेच्या टप्प्यात आला की दर वेळी समुद्रानंच नाव गिळून टाकावी असंच काहीसं होत आलं होतं. यावेळी तर नाव ही जुनी होती आणि समुद्र खवळलेला. ही नाव समुद्रात ढकलायला आता सह्याद्री एवढ्या काळजाची गरज होती.           पण आता नावेनं किनारा सोडला होता. आणि परतीचे दोर सोबत घेउन बाहेर पडणारातली जात नव्हती. ट्रेन वेगानं पुढं सरकायला लागली आणि मन वेगानं भूतकाळात मागं सरकायला लागलं.           जीव लावणारी बायको आणि लळा लावणारी पोरं, आता चांगलंच बहरलेलं घरदार, पेट्रोल पंपच्या निमित्तानं दिवसरात्र पुरेल एवढं काम, शब्द खाली पडू न देणारे गावकरी, आणि मोठ्यात मोठ्या पैलवानांचं पण आदरानं तात्या म्हणून पायाला लागणारं हात, सगळं होत

प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव कसा करावा

Image
प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव कसा करावा आपण नेहमी ऐकतो की, खूप अभ्यास केला पण मार्क कमी पडले, ऐन पेपर वेळी गडबड झाली, प्रश्नपत्रिका सोडविण्याचा खूप सराव केला पण तरी परीक्षेत गोंधळ उडाला. कशामुळे विद्यार्थ्यांना असे प्रश्न पडतात? कशामुळे सगळे करूनही यश हुलकावणी देते? याचा एक कारण असते की प्रत्यक्ष परीक्षेमध्ये जे करावे लागते त्याचा कमी सराव किंवा सरावमध्ये कमतरता किंवा चुकीचा सराव. यास्तव हे टाळण्यासाठी सराव पुरेसा आणि सरावाची पद्धत योग्य असावी. सरावाच्या योग्य पद्धतीवर प्रकाश टाकणारा हा पाठ. 1. प्रश्नपत्रिका किती व कधी सोडवाव्यात?          प्रश्नपत्रिका किती सोडवण्यात याव्यात याचे कोणतेही मापदंड नाहीत. प्रत्येकाला कमी जास्त सराव लागू शकतो. परंतु सर्वसाधारणपणे राज्यसेवेच्या सर्व प्रश्नपत्रिका सोडवून व्हायलाच हव्यात. याशिवाय पूर्वपरिक्षेनंतर प्रत्येक आठवड्यात दोन पेपर सोडवून व्हायलाच हवे. पेपर सोडवल्याने आपल्या अभ्यासाची दिशा योग्य रहाते व आपला अभ्यास योग्य दिशेने चालू आहे हे पडताळण्यास मदत होते.            बऱ्याचदा विद्यार्थी सुरुवातीला फक्त वाचन करतात व शेवटच्या महिन